हम भी आराम उठा सकते थे घर पर रह कर,
हम भी मां बाप के पाले थे, बड़े दुःख सह कर,
वक़्त-ए-रुख्ह्सत उन्हें इतना भी न आए कह कर,
गोद में आंसू जो टपके कभी रूख़ से बह कर,
तिफ्ल उनको ही समझ लेना जी बहलाने को |
हम ने जब वादी-ए-ग़ुर्बत में क़दम रक्खा था,
दूर तक याद-ए-वतन आई थी समझाने को ||
- हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल
भारतमाता पारतंत्र्यात असताना, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अगणित वीर आणि वीरांगणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सावरकर म्हणतात _ “रणी राष्ट्र स्वातंत्र्य युद्धासी ठेले, मरे बाप बेटे लढायासी आले”, राष्ट्रस्वातंत्र्यासाठी कुणी ऐन तारुण्यात स्वतःच लग्न लथाडून क्रांतीच्या ज्वालेत उडी घेतो, कुणी गर्भश्रीमंत घरात जन्मास येऊनही देशासाठी फासावर चढतो, कुणी अंदमान मध्ये नरकयातना भोगून आल्यावरही पुन्हा स्वातंत्र्य कार्यात स्वतःला झोकून घेतो… अशा एक ना अनेक उदाहरणांनी भारतीय इतिहासाला झळाळी प्राप्त झाली आहे. आणि म्हणूनच__ भारतीय सशस्त्र क्रांतीचा इतिहास म्हणजे अक्षरशः वेड्यांचा इतिहास !
“ज्या भूमीच्या उदरी श्री जानकी पैदा झाली, त्या भूमीच्या उदरी आमचाही जन्म झाला आहे ही कल्पना मनात प्रवेश करिताच ते आकाशाहूनही विस्तृत होते”
स्वा. सावरकर
क्रांती-समरामध्ये पुरुष स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावत असताना, स्त्रियांनी तरी मागे का रहावं ?
सध्याच्या म्यानमार मधील एका बक्कळ श्रीमंत कुटुंबात जन्मलेली, सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल आर्मी(INA) मधील सर्वात तरुण गुप्तहेर “सरस्वती राजामणी” यांची ही वीरगाथा.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
सरस्वती राजमणी यांचा जन्म ११ जानेवारी १९२७ रोजी बर्मा(साध्याच्या म्यानमार) मधील रंगून येथे झाला. राजमणीच्या वडिलांची स्वतःची सोन्याची खान होती, त्याकाळी रंगून मधील ते सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. गर्भश्रीमंत असूनही सरस्वती तसेच तीचे संपूर्ण कुटुंब निस्सीम राष्ट्रभक्त होते, बाहेरदेशात राहून स्वातंत्र्य चळवळीस मदत करणाऱ्या भारतीयांमध्ये तीचे वडील अग्रेसर होते. राजमणी १० वर्षांची होती, तेव्हा एके दिवशी गांधीजी रंगून मधील त्यांच्या राहत्या घरी पाहुणे म्हणून गेले. गांधींच्या स्वागतासाठी घरातील सर्व लोक जमले होते, पण लहान राजमणी तिथे उपस्थित नव्हती, थोडी शोधाशोध केल्यावर कळलं राजमणी घराच्या मागील बगीच्यात नेमबाजीचा सराव करण्यात व्यस्त होती. अवघ्या १० वर्षांच्या मुलीच्या हाती बंदूक पाहून गांधींना ही आश्चर्य वाटलं, राजमणीला जवळ घेऊन बापूंनी प्रश्न विचारला_
“तुला बंदुकीची गरज काय आहे ?”
बापूंकडे साधी एक नजर ही न टाकता तत्क्षणी लहानग्या राजमणीने हातातल्या बंदुकीइतकच प्रखर उत्तर दिलं, ती म्हणाली
“ब्रिटिश लुटारू असून ते भारताला लुटत आहेत, त्यामुळे आपण त्यांना मारायला हवं”
तीचं हे उत्तर ऐकून गांधी आणखीच थबकले, त्यांनी पुन्हा तिला अहिंसेचा पाठ शिकवण्याचा प्रयत्न केला. पण, “मोठी झाल्यावर मी एका तरी ब्रिटिशाचा नक्की वध करेल” अशी इच्छा व्यक्त करून अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीने गांधींच्या अहिंसेक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळेल, या भ्रामक परिकल्पणांना मूठमाती दिली.
नेताजींसोबत पहिली भेट
जसजशी राजमणी मोठी होऊ लागली, तसतसा तिचा क्रांतीपथाकडे तिचा कल वाढू लागला. त्याच काळात काँग्रेस पासून वेगळं होऊन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची (इंडियन नॅशनल आर्मी) स्थापना केली होती. सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी विचारांनी राजमणी भारावून गेली. राजमणी १६ वर्षांची असताना नेताजी आझाद हिंद सेनेसाठी पैसा मिळवण्यासाठी रंगून येथे गेले होते. जाहीर भाषणात राष्ट्रकार्यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन नेताजींनी रंगून येथील देशवासियांना केले. अवघ्या १६ वर्षांच्या राजमणी ने आपले सर्व दागिने क्षणार्धात दान केले. कुण्या लहान मुलीने इतके गडगंज दागिने दान केल्याचे नेताजींच्या लक्षात आले. नेताजी स्वतः दागिन्यांसामावेत राजमणीच्या घरी पोहोचले.
राजमणीच्या वडिलांना नेताजी म्हणाले__
“कदाचित भुलचुकीने मुलीने दागिने दिले असावेत, यामुळे मी ते सर्व परत करायला आलोय.”
राजमणीच्या वडिलांनी ही स्वातंत्र्य कार्यासाठी कित्येकदा मोठाल्या मदती केल्या होत्या, त्यामुळे नेताजींच्या हे बोलण त्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. पण, बाजूलाच उभी असलेल्या राजमणीने मात्र नेताजींना उत्तर दिलं__
“हे सर्व दागिने माझे आहेत, माझ्या वडिलांचे नाहीत. त्यांच काय करायचं ते ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार माझा आहे. मी ते तुम्हाला दिले आहेत. ते मी परत घेणार नाही”
अवघ्या १६ वर्षांच्या मुलीचं देशप्रेम पाहून स्वतः नेताजीही निःशब्द झाले. ते राजमणी ला म्हणाले__
“’लक्ष्मी(पैसा) येईलही आणि जाईल सुद्धा. पण सरस्वती(विद्या) मात्र तशीच रहाते. तुझ्यावर साक्षात सरस्वतीचा वरदहस्त आहे. म्हणून, तुझं नाव मी ‘सरस्वती’ ठेवतो.”
अशा प्रकारे, राजमणी चं रूपांतर सरस्वती राजमणी मध्ये झालं. सरस्वती इथेच थांबली नाही, तिने तिच्या चार मैत्रिणींसामावेत आझाद हिंद सेनेत भरती होण्याची इच्छा प्रकट केली. नेताजींनी सर्व मुलींना आझाद हिंद सेनेच्या गुप्तहेर खात्यात भरती केले. अवघ्या १६ व्या वर्षी, सोन्याच्या खाणीच्या मालकाची मुलगी, राष्ट्रकर्यास्ताव रणांगणात उतरली !
आझाद हिंद सेनेतील सर्वात तरुण गुप्तहेर
आझाद हिंद सेनातील गुप्तहेर खात्यात सामील झाल्यावर, सरस्वती वर इतर सर्व मुली पुरुषी वेशाख धारण करून ब्रिटिश कॅम्प मध्ये फिरत व गुप्त बातम्या गोळा करत. गुप्तहेर म्हणून त्यांचं नाव “मनी” होतं. दोन वर्ष सरस्वती व सर्व मुली गुप्तपणे बातम्या आणून देत होत्या, पण एके दिवशी एका मुलीचं सोंग ब्रिटिशांच्या निदर्शनास आल, तिला तात्काळ कैद केलं गेलं. आपली मैत्रीण संकटात आहे, याची जाणीव झाल्यावर सरस्वतीने तिची सुटका करण्याचा मनोमन निश्चय केला. नर्तकीच्या वेशात सरस्वती कॅम्प मध्ये घुसली, तिने ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुंगीचं औषध देऊन झोपवलं व मैत्रिणीची यशस्वी सुटका केली. एवढ्यातच इतर ब्रिटिश सैनिकांना सदर घटनेचा पत्ता लागला, त्यांनी दोन्ही मुलींचा पाठलाग चालू केला, गोळीबार ही चालू झाला. एक गोळी सरस्वती च्या पायाला लागली, अन तिचा पाय जबर जखमी झाला. आता मात्र पुढे पळता येणार नाही, हे ध्यानी आल्याने दोघीही बाजूच्या झाडावर चढल्या. ब्रिटीश सैनिक दोन दिवस मुलींना शोधत होते. सरस्वती घायाळ होती, सोबत अन्न, पाणी ही नव्हते. पण, अशाही अवस्थेत दोन्ही मुली तब्बल २ दिवस झाडावरच लपून राहिल्या.
स्त्रीने मनात ठाम निश्चय केलाच, तर ती कुठल्याही स्तराला जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण सरस्वतीने घालून दिलं.
उजव्या पायाला लागलेल्या गोळीने, सरस्वती कायमच्या अपंग झाल्या. सरस्वतीच्या ह्या साहसी कृत्यासाठी जपानच्या राजाने, दस्तुरखुद्द नेताजींच्या समोर सरस्वतीला पुरस्कार देऊन स सन्मानित केलं. आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी महिला रेजिमेंट मध्ये लेफ्टनंट म्हणून सरस्वती ची बढती करण्यात आली.
दुसऱ्या महायुद्धानंतर नेताजींनी आझाद हिंद सेना विसर्जित केली. सरस्वती व सर्व कुटुंब भारतात स्थलांतरित झाले. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरस्वतीच्या परिवाराने आपली सोन्याची खाण व इतर सर्व संपत्ती विकून आपलं सर्वस्व भारत सरकारच्या स्वाधीन केल.
स्वातंत्र्यानंतर….
भारतीय स्वातंत्र्यासाठी अवघ्या १६ व्या वर्षी आपले दागिने देणाऱ्या, १८ व्या वर्षी अंगावर गोळी खाणाऱ्या व स्वातंत्र्यानंतर सर्व संपत्ती देशासाठी दान करणाऱ्या सरस्वतीला देशाने काय दिलं ?
हा प्रश्न आपण स्वतःला विचारल्याव, जे उत्तर समोर येत ते वाचल्यावर मात्र डोळ्यात पाणी आल्याविना राहणार नाही.
स्वातंत्र्यानंतर गांधींसोबत निव्वळ दांडीयात्रेत सहभागी होणाऱ्यांना मोठमोठाली बक्षिसे, सवलती देण्यात आल्या. काँग्रेस मधील बरेच नेते राजकारणात उतरले, स्वतः नेहरू पंतप्रधान झाले. पण क्रांतिकारकांच्या वाट्याला मात्र स्वातंत्र्यानंतर निव्वळ अंधःकार आला. भारतीय स्वातंत्र्यात ज्यांचं असामान्य योगदान आहे, असे बटुकेश्वर दत्त सारखे क्रांतिकारक, सरस्वती राजमणी, दुर्गा भाभी, सावरकर व चापेकर घराण्यातील स्त्रिया तसेच चंद्रशेखर आजाद यांच्या मातोश्री जगरानी देवी यांसारख्या अनेक विभूती मात्र इतिहासात गुडूप झाल्या. तत्कालीन समाजाला व दुर्दैवाने राजकीय नेत्यांना त्यांच्या उपकरांचा विसर पडला.
स्वातंत्र्यानंतर सरस्वतीचं कुटुंब चेन्नईतील मद्रास येथे स्थलांतरित झालं. एके काळी गडगंज दागिने सोबत बाळगणाऱ्या सरस्वतीला स्वातंत्र्यानंतरचे दिवस मात्र गरिबीत काढावे लागले. स्वातंत्र्याच्या १५ वर्षानंतर, १९७१ साली सरस्वतीला पेन्शन चालू झाली. २००५ साली तामिळनाडू मधील मुख्यमंत्री जयललिता यांनी सरस्वती राजमणी यांना स्वतःचे घर व पाच लाखांचे अर्थसहाय्य देऊ केले, हेही पैसे २००६ मध्ये आलेल्या त्सुनामी वेळी रिलीफ फंड ला देऊन, सरस्वती यांनी देशाप्रती आपले कर्तव्य बजावले. हलाखीच्या परिस्थितीतही देशसेवेचा वसा सरस्वतीने सोडला नव्हता. ठिकठिकाणून फाटके कपडे जमवून, ते कपडे शिवून त्या गरीब, अनाथ मुलांना दान करत असत.
आपल्या अखेच्या क्षणांतही राष्ट्रसेवा हेच ज्यांनी आपल्या जीविताच पहिलं आणि अंतिम उद्दिष्ट मानलं अशा या वीरांगणेचा १३ जानेवारी २०१८ रोजी मृत्यू झाला.
कुलतारसिंह या आपल्या छोट्या भावाला लिहलेल्या शेवटच्या पत्रात भगतसिंग म्हणतात__
“खुश रहो खुश रहो अहले वतन, हम तो सफर करते हैं ||”
भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं, अशांना विसरून आपण सर्व आजच्या काळात कृतघ्न ठरलो आहोत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सरस्वती राजमणी, आझाद, दुर्गाभाभी, राणी लक्ष्मीबाई अन इतर अगणित वीर/वीरांगणांनी बलिदान दिले.
या सर्वांनी आपल्यासाठी बलिदान द्यावं, या लायकीचे आपण खरं आहोत का ?
हा प्रश्न आपल्यातील प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
सरस्वती राजमणी यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन.
संदर्भ सूची :-
- Saffron Swords: Centuries of Indic Resistance to Invaders – Manoshi Sinha Rawal
- Saraswathi Rajamani – Wikipedia
- Saraswathi Rajamani: India’s Youngest Spy In The INA
- The Forgotten Spy: The Untold Story of India’s Youngest Covert Agent, Saraswathi Rajamani
- Saraswathi Rajamani : India’s Teenage Spy
- Voice of an Independent Indian – inspirational short film | Saraswathi Rajamani
- Saraswati Rajmani (सरस्वती राजमणि)