करवत कानस कोणी चालावो, पिकवो कोणी शेत मळा !
कुसुमाग्रज
कलम कागदावरी राबवो,धरो कोणी हातात तुळा !
करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा !
शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
स्वातंत्र्यवीर सावरकर एके ठिकाणी म्हणतात “ज्या भूमीच्या उदरी श्री जानकी पैदा झाली, त्या भूमीच्या उदरी आमचाही जन्म झाला आहे ही कल्पना मनात प्रवेश करिताच ते आकाशाहूनही विस्तृत होते.” भारतभूमीचा जाज्वल्य इतिहास वाचताना या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपल नाव कोरण्यात स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अशीच एक अफाट साहसी वीरांगना म्हणजे राम्प्यारी गुर्जर ! इ. स ७११ मध्ये भारतावर सर्वप्रथम इस्लामी आक्रमणाची टोळधाड कोसळली, तद्नंतर कमी – अधिक फरकाने भारतावर अगणित स्वाऱ्या आल्या. दिल्लीवर नासीर मुहम्मद सत्तेवर असताना इ.स १३९८ मध्ये दीड लाखांच्या सेना समावेत तैमूरने भारतावर आक्रमण केले. तैमूरने भारतात अक्षरशः लाखो हिंदूंची कत्तल केली. असं म्हणतात की, तैमूरने केलेल्या हत्यांमुळे जगाची लोकसंख्या तीन टक्क्यांनी कमी झाली होती.

रामप्यारी गुर्जरचा जन्म सहारनपुर येथील चौहान – गुर्जर कुटुंबात झाला. लहानपणापासूनच रामप्यारी निर्भय व धाडसी होतीच पण व्यायामात ही निपुण होती. कुस्ती आणि आसपासच्या सैनिकांना पाहून तिनेही युद्धकलेचा सराव चालू केला आणि लवकरच ती शस्त्रयुद्धात प्रवीण झाली. उत्तर भारतात तैमूर ने अक्षरशः थैमान घातलं होत. तैमूरचा एकत्रित प्रतिकार करण्यासाठी मेरठ व हरिद्वार भागातील जाट, गुर्जर, अहिर, वाल्मिकी, राजपूत, ब्राह्मण असे कित्येक समुदाय आपापसातील वैर विसरून एकत्र आले. सर्वांच्या संमतीने महापंचायत स्थापन करण्यात आली. महाबली जोगराज सिंग गुर्जर यांना महापंचायत सेनेचा सर्वोच्च सेनापती म्हणून नेमण्यात आले. सैन्यात एकूण ८०,००० पुरुष व ४०,००० महिला सैनिक होते. रामप्यारी गुर्जर हीला महिला सेनेच सर्वोच्च सेनापती बनवण्यात आलं, या वेळी रामप्यारी अवघ्या २० वर्षांची होती. महापांचायत सेनेत सामील झालेल्या जवळपास सर्वच महिलांनी या आधी युद्धात भाग घेतला नव्हता, या सर्व महिलांच्या प्रक्षिक्षणाची तसेच नवनवीन महिलांना सैन्यात सामील करण्याची जबाबदारी रामप्यारी वर सोपवण्यात आली.
रामप्यारीने महिला सैनिकांची तुकडी उभी करून त्यांना युद्धप्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, लवकरच जवळपास चाळीस हजार महिला सैनिकांची तुकडी युद्धसज्ज झाली. सर्व महापंचायत सेनेतील योद्धे व त्यांचे सर्वोच्च सेनापती महाबली जोगराज सिंग गुर्जर यांच्याकडून युद्धगर्जना ऐकण्यासाठी जमले होते. तोच जोगराजसिंग गुर्जर गडगडले, “वीरांनो, भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या प्रवचनावर चिंतन करा. आपल्यासाठी युद्धभूमीवर स्वर्गाचे द्वार उघडले आहे. तो मोक्ष जो ऋषीमुनींनी योगासने करून प्राप्त केला आहे. वीर योद्धे रणांगणावर प्राणांची आहुती देऊन साध्य करतात. राष्ट्र वाचवा, म्हणजेच स्वतःचा त्याग करा, जग तुमचा सन्मान करेल. तुम्ही मला नेता निवडला आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माघार घेणार नाही. मी पंचायतीला सलाम करतो, आणि शपथ घेतो. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी भारताच्या मातीचे रक्षण करीन. तैमूरच्या गुन्ह्याने आणि हल्ल्याने आमचे राष्ट्र हादरले आहे. योद्धे उठून उशीर करू नका शत्रूच्या सैन्याशी लढा आणि त्यांना देशाबाहेर हाकलून द्या.” सर्व योध्दयांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देण्याची शपथ घेतली.
रामप्यारी गुर्जरवर शूर महिला दलास शत्रूवर अचानक हल्ला करून शत्रूची सामग्री लुटण्याची जबाबदारी सोपवली गेली. रामप्यारी समावेत 20,000 महापंचायत योद्ध्यांनी मध्यरात्री दिल्लीत तैमूरवर अचानक हल्ला केला. 9,000 शत्रू सैनिकांची कत्तल करून त्यांची प्रेत यमुना नदीत टाकण्यात आली. दिवस उजाडण्याआधी, महापंचायत योद्धे तैमूरच्या सैन्यापासून दूर दिल्लीच्या सीमेकडे गायब झाले. हा प्रकार तीन रात्री सुरू राहिला. निराश झालेल्या तैमूरने नंतर दिल्ली सोडली आणि मेरठच्या दिशेने निघाले. तैमूरचा मेरठ लुटण्याचा प्रयत्न फसला. पंचायत हेरांनी दिलेल्या माहितीनंतर, मेरठमधील जास्त लोकवस्तीचा भाग रिकामा करण्यात आला आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या. दिल्लीहून मेरठला जाणारी गावे, विशेषत: तैमूरने घेतलेला मार्गही रिकामा करण्यात आला. त्यामुळे तैमूर आणि त्याच्या सैन्याला अस्वस्थ वाटू लागले. महापंचायतीच्या योद्ध्यांनी दिवसा तैमूरच्या सैन्यावर हल्ला केला. रात्री रामप्यारी गुर्जर आणि महिला योद्ध्यांनी शत्रूच्या छावण्यांवर वारंवार छापेमारी हल्ले केले.निराश होऊन तैमूर आणि त्याच्या सैन्याने हरिद्वारकडे कूच केले, हरिद्वारला जाताना तिरंदाजीत निपुण असलेल्या डोंगरी जमाती हिंदू सैन्यात सामील झाल्या. तैमूरचा हरिद्वारमध्ये तीन वेळा पराभव झाला होता.
शेवटच्या लढाईत 22 वर्षीय हरबीर सिंग गुलिया जाटने तैमूरच्या छातीवर भाल्याने वार केला. प्रत्युत्तरादाखल तैमूरच्या सैनिकांनी हरबीरला गंभीर जखमी केले. जोगराज सिंग गुर्जर यांनी त्याचवेळी जखमी हरबीरला सुरक्षित स्थळी नेण्याची सोय केली. जखमी तैमूरनेही त्याच्या सैनिकांसामावेत रणांगणातून पळ काढला. तैमूर या जखमेतून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही, असे म्हटले जाते. 7 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. दीड लाखाहून अधिक सैनिकांसह भारतावर चालून आलेला तैमूर अवघ्या काही काही हजार सैनिकांसह परतला. सुमारे 40000 महापंचायत हिंदू योद्धे, पुरुष आणि स्त्रियांनी हौतात्म्य पत्करले. पण त्यांनी हा प्रदेश लुटण्यापासून वाचवला तसेच लाखो हिंदूंना कत्तल होण्यापासून वाचवले. रामप्यारी गुर्जर आणि महापंचायतीच्या सर्व योद्ध्यांना सलाम !