You are currently viewing क्रांतीपथावरील अग्निशलाका – ताराराणी श्रीवास्तव
Tararani-Shrivastava

क्रांतीपथावरील अग्निशलाका – ताराराणी श्रीवास्तव

जो कुछ जो किया सो रौं किया, मैं खुद की हा नाहिं |
जहाँ कहीं कुछ मैं किया, तुम ही थे मुझ माहिं ||

रामप्रसाद बिस्मिल

आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याचा उपभोग घेतो आहोत, ते स्वातंत्र्य भारत मातेच्या पोटी जन्मलेल्या व क्रांतीने अक्षरशः झपाटलेल्या वीरांच्या कर्तृत्वामुळेच आपल्याला मिळाले आहे. आपल्या या पूर्वजांनी स्वातंत्र्यासाठी प्रसंगी स्वत:च्या जीवाची बाजी लावली. घरदारावर, कुटुंबावर तुळशीपत्र ठेवले. आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले. या वीरांचे/विरांगणांचे वंशज म्हणून आपलेही आहे की, आपण या सर्व महापुरुषांचे स्मरण करावे. पण दुर्देवाने आज त्यातील बऱ्याच जणांची नाव इतिहासालाही पोरकी झाली आहेत. काहींची नावं, त्यांचं अफाट कर्तुत्व इतिहासाच्या पुस्तकांपुरत मर्यादित राहील आहे. अशातीलच एक नाव म्हणजे ताराराणी श्रीवास्तव !

Tararani-Shrivastava
ताराराणी श्रीवास्तव

ताराराणी श्रीवास्तव यांचा जन्म बिहार मधील सारन जिल्ह्यात झाला. दुर्दैवाने त्यांच्या प्रारंभीच्या आयुष्याबद्दल ह्या पलीकडे माहिती उपलब्ध नाही. लहानपणीच ताराराणी यांचा विवाह फुलेंद्र बाबू यांच्यासोबत झाला. फुलेंद्र बाबू गांधींचे अनुयायी होते. गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन फुलेंद्र बाबू आंदोलन, प्रदर्शन यात सक्रिय सहभाग घेत. ताराराणी मध्ये राष्ट्रस्वातंत्र्याची ज्योत पेटविण्यात फुलेंद्र बापूंचा विशेष सहभाग होता. त्या काळातील समाज मागासलेला होता, परिणामतः विवाहित महिलांवर बऱ्याच प्रकारची निर्बंध होते, चूल आणि मूल केवळ दोनच गोष्टींपर्यंत स्त्रीशक्ती मर्यादित होती.

भारतावरील जुलमी परकीय इंग्रज राजवटीचा निषेध करण्यासाठी गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी चले जाव आंदोलन पुकारले. फुलेंद्र बाबू व त्यांच्या सहकाऱ्यांनी सारन मधील पोलीस चौकीवर मोर्चा काढून, चौकीवरिल युनियन जॅक काढून तिरंगा फडकवण्याची योजना आखली होती, योजनेनुसार मोर्चा काढण्यात आला. लोकांचा वाढता आक्रोश पाहता प्रथमतः इंग्रज सैनिकांनी समुदायावर लाठीचार्ज केला, तद्नंतर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले. फुलेंद्र बाबूंनाही गोळी लागली, ते घायाळ झाले. स्वत:च्या डोळ्या देखत पती शेवटच्या घटीका मोजत असतानाही ताराराणी विचलित झाल्या नाहीत. त्यांनी आपल्या साडीचा एक तुकडा फाडून फुलेंद्र बाबूंच्या जखमेवर बांधला व त्यांना बाजूला सुरक्षित ठिकाणी नेऊन पुन्हा आंदोलनात सामील झाल्या. आंदोलन समाप्त झाल्यावर ताराराणी पती जवळ आल्या, तोवर फुलेंद्र बाबू गतप्राण झाले होते. १५ ऑगस्ट १९४२ रोजी फुलेंद्र बाबू यांच्या निधनानंतर शोक सभेचं आयोजन करण्यात आलं. पतीच्या निधनानंतरही ताराराणी स्वातंत्र्य संग्रामात तितक्याच उमेदीने कार्यरत होत्या. स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी आपल्या कुटुंबांचाही विचार केला नाही. चंद्रशेखर आजाद यांचा आई-वडिलांसोबत एक प्रसंग आहे, त्यावेळी ते म्हणतात, माझ्या म्हाताऱ्या आई-वडिलांची काळजी घेण्यापेक्षा या देशाला स्वतंत्र करणं महत्त्वपूर्ण आहे आणि जर जमलं तर माझ्या आई-वडिलांसाठी २ गोळ्याच पुरेशा आहेत. यातून क्रांतीकारकांचं स्वार्थ दिसून येत नाही पण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीची त्यांची धडपड निश्चितच दिसून येते.

Tararani-Shrivastava
ताराराणी श्रीवास्तव

सावरकरांच्या कुठल्यातरी लेखात वाचलं होत, “ज्या भूमीच्या उदरी श्री जानकी पैदा झाली, त्या भूमीच्या उदरी आमचाही जन्म झाला आहे ही कल्पना मनात प्रवेश करिताच ते आकाशाहूनही विस्तृत होते.” समाजातील ताराराणी सारख्या स्त्रीया असामान्य शौर्य व अनंत त्यागाचे प्रतीक आहेत. आयुष्यातील कठीण प्रसंगी खचून न जाता, अधिक प्रकर्षाने व तितक्याच ताकदीने पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा यांसारख्या महान स्त्रिया समाजाला वेळोवेळी देत असतात. ताराराणी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments