You are currently viewing खुश रहो अहले वतन, हम तो सफर करते है
भगतसिंह - सुखदेव - राजगुरू

खुश रहो अहले वतन, हम तो सफर करते है

मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे

“गाजीयोंमें बू रहेगी जब तलक ईमान की !
तख्ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्थानकी !!”

बहादूरशहा जफर

हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचं बलिदान समजून घ्यायचं असेल तर या वेड्या तरुणांचे मृत्यूदंडाच्या शिक्षेमागील भावना जाणून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे.

४ ऑक्टोबर १९३० रोजी भगतसिंहांचे वडील किशनसिंह यांनी विशेष न्यायालयात अर्ज करून सुनावणीची मागणी केली. वडीलांच्या अशा कृतीने भगतसिंह प्रचंड संतापला, आपला राग व्यक्त करण्यासाठी ४ ऑक्टोबर १९३० रोजी वडिलांना लिहिलेल्या पत्रात भगतसिंह लिहितो__ही बातमी ऐकून माझ्या मनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. माझ्या वतीने असे कोणतेही पाऊल उचलण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही, असे मला वाटते. ही वेळ आपल्या सर्वांच्याच परीक्षेची होती. पण पिताजी आपण त्यात अयशस्वी झालात.

पोटच्या मुलाला जीवनदान मिळावं या निर्मळ अपेक्षेने न्यायालयात अर्ज दाखल केलेल्या आपल्या बापाला भगतसिंहांनी सुनावलेले हे खडे बोल. अर्थात न्यायालयाने किशनसिंह यांचा अर्ज फेटाळून लावला आणि ७ ऑक्टोबर १९३१ रोजी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

हायकोर्टाने जाहीर केलेले हुतात्मा भगतसिंह यांचे डेथ वॉरंट

“(दुसरा परिच्छेद) तुम्हाला अधिकृतपणे आदेश देण्यात आला आहे आहे की, भगतसिंग यांना २७ ऑक्टोबर १९३० रोजी लाहोर येथे फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, जोवर त्याचे प्राण जात नाही तोवर त्याला फाशीच्या फांद्यावर लटकत ठेवण्यात यावे. फाशीची शिक्षा झाल्यावर हा वॉरंट पुन्हा हायकोर्टास पाठवून द्यावा.”

हायकोर्टाने भगतसिंह यांचा डेथ वॉरंट जारी केला तर खरा पण सामान्य जनतेतील असंतोष दिवसेंदिवस वाढतच चालला होता. जहाल मताच्या या क्रांतिकारकांची वाढती लोकप्रियता ब्रिटिश सरकारला कदापि सहन होणारी नव्हती. परिणामतः भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू तिघांना सुनावलेल्या तारखेच्या एक-दोन नव्हे तब्बल सात महिने आगोदरच फाशी देण्याशिवाय दुसरा कुठलाही श्रेष्ठ पर्याय तत्कालीन ब्रिटिश न्यायव्यवस्थेपुढे उरला नाही.

फाशीची अंतिम तारीख ठरली २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळच्या सुमारास फाशी देण्यात यावी….

भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी फाशीची शिक्षा सूनावल्यानंतर तिघांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते आणि इतर साथीदारांना त्यांच्यापासून दूर दुसऱ्या कोठडीत ठेवले होते. एका रात्री अचानक इतर साथीदारांच्या कोठडीचे टाळे खोलण्यात आले आणि त्यांना एका अंधाऱ्या ठिकाणी नेण्यात आले. तिथे तुरुंगाच्या अधिकाऱ्याने सर्व साथीदारांना विचारले, ‘अपने साथियो से मिलना चाहोगे ?’ सर्वांनीच होकार दिला आणि त्यांना भगत सिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या कोठडीबाहेर नेण्यात आले. आयुष्यात पुन्हा आपल्या या तिन्ही साथीदारांना कधीही पाहू शकणार नाही, याच विचारांनी त्यांचे मन बिथरले होते. थोडा वेळ चर्चा करून निरोप घेताना जयदेव कपूरने यांनी भगतला एक प्रश्न विचारला, ‘सरदार… तुझं मरण जवळ आहे, पण या गोष्टीचे तुला कसलेही दुःख नाही का ?

प्रश्न ऐकून सरदार जोरजोरात हसायला लागला आणि नंतर गंभीर होऊन बोलू लागला, तो म्हणाला, “क्रांतीच्या मार्गावर पाऊल ठेवताना मी हाच विचार केला होता की, आपले जीवन अर्पण करून देशाच्या कानाकोपऱ्यात इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा पोहोचवू शकलो तर मला माझ्या जीवनाचे मूल्य मिळाले, असे समजेन’. आज मी फासाच्या तख्ताच्या जवळ आहे, मात्र तरीही तुरुंगातील या लोखंडी सळईंच्या मागे बसूनही देशवासीयांद्वारे दिलेली ही घोषणा मी ऐकू शकतो. मला विश्वास आहे की मी दिलेली ही घोषणा स्वातंत्र्य लढ्यात एक असीम शक्ती बनून, साम्राज्यवादी विचारसरणीवर जोरदार प्रहार करेल.” एवढं बोलून तो थांबला आणि पुन्हा म्हणाला, ‘एवढ्या लहानग्या आयुष्याचं यापेक्षा अधिक मूल्य काय असू शकतं ?

सर्व साथीदार रडू लागले. यावर भगत म्हणाला, ही भावुक होण्याची वेळ नाही. मी काही दिवसांमध्येच मुक्त होऊन जाईन, मात्र तुम्हा सर्वांना अजून दूर जायचं आहे. मला तुम्हा सर्वांवर विश्वास आहे की तुम्ही मी नसतानाही स्वातंत्र्य लढ्याचा हा संघर्ष कायम ठेवाल. कोणीही हार मानायची नाही, अखेरपर्यंत लढायचं !

भगतच्या त्या शब्दांनी ओघळणाऱ्या त्या अश्रूंमध्येही धगधगती ज्वाला निर्माण केली होती. भगत, सुखदेव, राजगुरू आणि सर्व साथीदारांची ही अखेरची भेट ठरली.

एखाद्या सुंदर स्त्री सोबत लग्न करून संसार थाटायच्या वयात ऐन पंचविशीतील ही तीन तरणीबांड पोरं फाशीच्या तख्तावर चढणार होती, क्रांतीपथावरील त्यांचं निस्सीम समर्पण दर्शवणारा एक मार्मिक प्रसंग फाशीच्या तीन दिवस आधी घडला. लाहोर कटात क्रांतिकारकांना कायदेविषयक सल्ला देणारे श्री. प्राणनाथ मेहता यांनी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू तिघांनी ब्रिटिश सरकारकडे दयेचा अर्ज करावा, अशी विनंती केली. ही विनंती ऐकूनच राजगुरू आणि सुखदेव एकदमच खवळले, भगतसिंह ने त्यांना शांत राहण्यास सांगून सरकारास देण्यासाठी तुम्ही तुमचा अर्ज तयार करा आम्ही आमचा अर्ज तयार करतो सांगितले. त्यानुसार काही वेळाने मेहता दयेचा अर्ज घेऊन भगतसिंह यांकडे गेले, त्यावेळी भगतसिंह ने २० मार्च १९३१ रोजी पंजाब सरकारला लिहिलेल्या पत्राची एक प्रत सादर केली. या पत्रात क्रांतिकारकांनी केलेल्या साँडर्स च्या वधाबद्दल माफी, किंवा त्यांना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेबाबत ब्रिटिश सरकारने दया दाखवावी अशी एकही मागणी नव्हती उलट, “आम्ही क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकार अर्थात इंग्लंडचे सम्राट पाचवे जॉर्ज यांच्या विरुद्ध युद्ध पुकारले आहे, आणि त्यामुळेच आम्ही युद्धकैदी आहोत, त्यामुळे आम्हाला फाशीची शिक्षा देऊ नका तर आम्हास मृत्यूदंड देण्यासाठी सैनिकांची एक तुकडी रवाना करा, या तुकडीने आम्हाला गोळ्या घालून ठार करावे.” अशी परखड मागणी केली होती.

मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ असतानाही मरणाची यत्किंचितही भीती न बाळगता, आपल्या आचार आणि विचारांतील शुद्धता या तिघांनी कायम राखली होती. भगवान योगेश्वराने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला सांगितलेल्या गीतेतील हीच ती स्थितप्रज्ञता !

अगदी भगतच्याच शब्दांत बोलायचं तर__

तुझे जबाह करने की खुशी, मुझे मरने का शौक |
मेरी भी मर्जी वही है, जो मेरे सय्याद की है ||

हुतात्मा भगतसिंग

२३ मार्च – बलिदान दिन

तिन्ही क्रांतिकारकांना लाहोर येथील मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. २३ मार्च रोजी कारागृहाबाहेर क्रांतिवीरांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली होती. भगतसिंह यांच्या मातोश्री श्रीमती विद्यावती देवी, पिताश्री सरदार किशनसिंह आणि परिवारातील इतर सर्वजण जेलबाहेर जमले होते. राजगुरूच्या मातोश्री श्रीमती पार्वतीबाई पुण्याहून लाहोरला आपल्या मुलाच्या अंतिम दर्शनासाठी आल्या होत्या, सुखदेवच्या मातोश्री श्रीमती रल्लीदेवी याही कारागृहाबाहेर उपस्थित होत्या. जेल अधिकाऱ्यांनी क्रांतिकारकांच्या आई -वडीलांव्यक्तिरिक इतर कुणालाही शेवटच्या भेटीची परवानगी नाकारली. यावर सरदार किशनसिंह संतापले, तिन्ही क्रांतिकारकांना अखेरच्या दिवशी सर्व कुटुंबास भेटण्यास अनुमती द्यावी, एवढी साधी मागणी घेऊन ते बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांकडे गेले, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर तिघांच्याही आई – वडिलांनी आपापल्या मुलाची अखेरची खाजगी भेट नाकारली. शेवटच्या दिवशी सुद्धा ब्रिटिशांच्या आंधळ्या न्यायव्यवस्थेचा क्रांतिकारकांवर अन्याय सुरूच होता.

श्रीमती विद्यावतीदेवी, श्रीमती रल्ली देवी व श्रीमतीपार्वतीबाई (डावीकडून उजवीकडे)

आत जेलमध्ये भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू या तिन्ही क्रांतिकारकांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ब्रिटिश सरकार आणि जेल प्रशासनाचे पुरेपूर प्रयत्न युद्धपाळीवर सुरू होते. तुरुंगातील इतर सर्व कैद्यांना दुपार पासूनच आपापल्या कोठड्यांमध्ये कैद करून ठेवण्यास सुरुवात झाली व फाशीच्या पूर्ततेसाठी जेल प्रशासनाची लगबग चालूच होती. सर्व क्रांतिकारकांनी याचा नेमका तो अर्थ घेतला आणि संपूर्ण तुरुंगातील आसमंत “इन्कलाब जिंदाबाद”, “साम्राज्यवाद मुर्दाबाद” या घोषणांनी न्हाऊन निघाला, कैद्यांचा आवाज इतका प्रखर होता की बाहेरील जनतेलाही आतील घोषणा स्पष्टपणे ऐकू जात होत्या.

तोच मुख्य वॉर्डन सरदार चरतसिंह भगतसिंहच्या कोठडी मध्ये आला, सवयी प्रमाणे भगतसिंग शांतपणे पुस्तक वाचत बसला होता. अंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवलं आहे, सांगून चरतसिंह निघून गेला. आंघोळीच्या वेळी ही भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू तिघांची मुद्रा एकदम प्रसन्न होती, मध्येच भगतसिंह “मेरा रंग दे बसंती चोला…..” गाणं गुणगुणत होता. आंघोळ झाल्यावर थोड्याच वेळात तिघांना आपापल्या कोठडीच्या बाहेर काढण्यात आले आणि तिघांची फाशीच्या तख्ताकडे वाटचाल सुरू झाली.

शेवटच्या क्षणी आमच्या हातात लोखंडी बेड्या व डोक्यात काळी कानटोपी घालू नका, ही क्रांतिकारकांची इच्छा मान्य झाली आणि एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून, गळ्यात हात घालून तिघेही क्रांतिकारी फाशीच्या तख्ताकडे चालू लागले. डावीकडे सुखदेव, मध्यभागी भगतसिंह आणि उजवीकडे राजगुरू.

इतक्यात भगतसिंहने गायला सुरुवात केली,

दिल से निकलेगी ना मर कर भी वतन की उल्फत |
मेरी मिट्टी से भी खुशबू ए वतन आयेगी ||

तिन्ही क्रांतीकारकासमावेत तुरुंगातील मुख्य वॉर्डन आणि इतर महत्वाचे जेल अधिकाऱ्यानी फाशीघरात प्रवेश केला, फाशीघरात लाहोरचा डेप्युटी कमिश्नर आणि मुख्य जेलर महमंद अकबर आधीच उपस्थित होते. तिन्ही क्रांतिकारकांना अचानक मोकळं पाहून डेप्युटी कमिश्नर बिथरला, मुख्य जेलर महमद अकबर यांनी “माझ्यावर विश्वास ठेवा कमिश्नर साहेब, तिघेही क्रांतिकारी तुम्हाला काहीच इजा पोहचविणार नाहीत” म्हणत सुरक्षिततेच आश्वासन दिल्यावर हा पठ्ठ्या काहीसा शांत झाला. भगतसिंह ने हे ऐकलं आणि तो कमिश्नर साहेबांना म्हणाला__“Well Mr.Magistrate, you are fortunate to be able today to see how Indian revolutionaries can embrace death with pleasure for the sake of their supreme Idea!”

क्रांतीकारकांना फाशी देणारा जल्लाद लाहोरच्या शाहदरा येथून बोलावण्यात आला होता. तिघांच्याही डोळ्यांसमोर फास होता, पण मुखावर स्मितहास्य होतं. भीती नावाचा शब्द त्यांच्या शब्दकोशात कदाचित नव्हताच. तिघांनी एकमेकांकडे एकदा शेवटचं पाहिलं आणि हसतच चबुतऱ्याच्या पायऱ्या चढले आणि आपापल्या जागेवर उभे राहिले. तिघांनी एकसाथ घोषणा केली… इन्कलाब जिंदाबाद… साम्राज्यवाद मुर्दाबाद !

जल्लादही खिन्न चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होता… कदाचित त्याला त्याठिकाणी असायलाच नको होतं, असं त्याच्या मनी आलं असावं. फाशीचा दोर कंठात अडकला, डोळे मिटले, शेवटच्या श्वासाने छाती भरली… आणि फास खेचला गेला.

भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू अमर झाले…!

उपोषणाच्या काळात भगतने सुखदेवला एक पत्र लिहिलं होतं, त्यात भगत एके ठिकाणी म्हणतो___

मला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाईल, याची पूर्ण खात्री आहे. यापेक्षा कोणतीही कमी कठोर शिक्षा किंवा संपूर्ण माफी मिळेल, अशी मला यत्किंचितही आशा नाही. आपल्या मुक्तीचा प्रसंग हा एकत्रित व विश्वव्यापी स्वरूपाचा व्हावा आणि हे आंदोलन जेव्हा परमोच्च बिंदूवर पोहोचेल, तेव्हा आपल्याला फाशी दिली जावी. जेव्हा देशाच्या भवितव्याचा निर्णय होत असतो, तेव्हा व्यक्तींच्या भवितव्याचा प्रश्न पूर्णपणे नजरेआड केला गेला पाहिजे. ‘आमच्या फाशीमुळे देशातील लोकांच्या हृदयात चिरंतन काही कोरले गेले असावे, बस्स एवढेच !

याशिवाय २२ मार्च १९३१ रोजी आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगत लिहितो, जगण्याची इच्छा माझ्यामध्येही असणे स्वाभाविक आहे, मी ती लपवू इच्छित नाही. आपली आणखी जगण्याची इच्छा त्याने याठिकाणी प्रकट करून दाखवली होती.

थोडा वेळ या तिन्ही क्रांतिवीरांचे मृतदेह फासावर लटकत राहिले.

भगतसिंह चे मृत्यू प्रमाणपत्र

अखेर त्यांना खाली उतरवण्यात आलं आणि उपस्थित डॉक्टर जेजे नेल्सन और एनएस सोधी यांनी तिघांना मृत घोषित केलं. तिघांच्या फाशीची बातमी २४ तारखेला देण्यात यावी, असं अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं. मात्र जमाव मोठ्या संख्येने जेलबाहेर उपस्थित होता.भगतसिंहचे वडील किशन सिंहजी लोकांना आप्तेष्टांना धीर देत होते, तेवढ्यात तुरुंगात दूध देणारा गवळी त्याठिकाणी आला आणि त्याने सांगितलं, फासी लग गई है… जाकर लाश लेले ! भगतची आई जोरात किंचाळली, राजगुरुच्या आईने पदराचा बोळा तोंडात कोंबला आणि सुखदेवची आई सुन्न होऊन खालीच बसून राहिली. आपल्या उदरात नऊ महिने पाळलेली ती पोरं आज आईपासून कायमची वेगळी झाली होती.

२५ मार्च १९३१ रोजी The Tribune वर्तमानपत्रात छापून आलेली क्रांतिकारकांच्या फशीची खबर

तिघांचे मृतदेह घेण्यासाठी किशन सिंहजी तुरूंगासमोर आले, मात्र कोणीही तुरुंग उघडेना… पण मृतदेह केव्हाची तुरुंगाबाहेर पडली असा संदेश मिळाला.

शवांना जेलच्या मागची भिंत फोडून गुप्त रूपाने पोत्यात भरून ट्रकमधून फिरोजपूरच्या जवळ असलेल्या सतलज नदीच्या किनारी (हुसैनीवाला) आणण्यात आलं. याठिकाणी अत्यंत निर्घृण पद्धतीने तिन्ही क्रांतिकारकांच्या शवांचे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले आणि त्यांनी रॉकेल ओतून ते जाळून टाकले. ब्रिटिशांमध्ये या तिघांचा इतका दरारा होता की, मृत्यूनंतरही पुन्हा अशा पद्धतीने तिघांना मारावं लागलं. याचदरम्यान जमाव सतलज किनारी सरकू लागला आणि ब्रिटिश अधिकारी आणि पोलिसांनी तिथून पळ काढला. त्यानंतर त्या जमावाने त्यांच्या मृतदेहाचे अर्धवट जळालेले तुकडे गोळा केले.

ब्रिटिश सरकारने याचवेळी त्वरित एक पत्रक जाहीर केलं,त्यात त्यांनी लिहिलं की, ‘शीख ग्रंथी आणि हिंदू पंडित यांच्या हातून तिघांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.’

ब्रिटिशांना इतका प्रचंड धाक या २३ वर्षांच्या कोवळ्या पोरांचा होता की, काही खोट्या गोष्टींची सारवासारव त्यांना करावी लागली. मुळात गुंडासिंगवाला येथून एका हिंदू पुजारीला आणि शीख ग्रंथीलाही ब्रिटिश गाडीतून घेऊन गेले होते. पण त्यांचा धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार झाल्याची माहिती कुणालाच मिळाली नाही आणि धार्मिक विधीने जर अंत्यसंस्कार झाले असते, तर त्यांचे अशा पद्धतीने तुकडे केले गेले नसते.

सुलेखन :- मनन (Diary_of_manan)

२४ मार्च १९३१

या दिवशी याच मृतदेहाच्या तुकड्यांसह क्रांतिवीरांची भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली. रावी नदीच्या किनारी त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. या अंत्ययात्रेत उपस्थित असलेल्या ४० हजार लोकांनी आपलं मुंडन केलं होतं, तर ५ हजारांपेक्षा जास्त स्त्रिया काळ्या रंगांचे वस्त्र घालून सहभागी झाले होते. सर्वत्र ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘भगत सिंह जिंदाबाद’, ‘सुखदेव जिंदाबाद’, ‘राजगुरू जिंदाबाद’ अशा घोषणा दिवसभर सुरु होत्या.

कुसुमाग्रजांच्या ‘निर्धार’ या कवितेतली ओळ येथे घ्यावीशी वाटते, “मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!”

या प्रसंगाच्या १६ वर्षानंतर १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

भगतसिंह - सुखदेव - राजगुरू
भगतसिंह – सुखदेव – राजगुरू

भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या उर्वरित साथीदारांना जन्मठेप आणि इतर शिक्षा ठोठावण्यात आल्या. त्यापैकी शिव वर्मा, जयदेव कपूर, भगवानदास माहोर, बटुकेश्वर दत्त आणि अशा कित्येक क्रांतिकारकांनी, पत्रकारांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिघांचा समग्र इतिहास लिहून ठेवला, जो आज आपल्यापर्यंत पोहोचला होता. १९७५ पर्यंत भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांना ‘भटके हुए नौजवान’ आणि ‘दहशतवादी’ म्हणूनच काही ठिकाणी गणलं जात होतं. पण आज भगत सिंहचा दृष्टीकोन, त्याचे विचार आणि त्याचं कार्य जगभर पोहोचलं आहे. सॉंडर्सला मारणारा भगतसिंह ‘बम और पिस्तोल से क्रांती नहीं आती’ असं का म्हणाला, याचा शोध आजच्या युवकांनी घेतला पाहिजे.

इन्कलाब जिंदाबाद !

संदर्भग्रंथ

  • शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय (संपादक दत्ता देसाई) (मूळ दस्तऐवजांचा स्रोत – प्रा. चमनलाल)
  • इन्कलाब – मृणालिनी जोशी
  • शहीद – कुलदीप नय्यर
  • भगतसिंगचा खटला – ए. जे. नूराणी
  • जेल डायरी – यादवेंदर सिंग संधू
  • संस्मृतिया – शिव वर्मा
  • भगतसिंह और उनके साथियो के सम्पूर्ण उपलब्ध दस्तऐवज – राहुल फाऊंडेशन
  • क्रांतिवीर राजगुरू – दिपाकांत राक्षे
  • भगत सिंह :अमर vidrohi- मलविंदर जीत सिंह वडै़च
  • Bhagat Singh : The Jail Notebook and Other Writings
  • सरदार भगतसिंग पत्र और दस्तऐवज – वीरेंद्र संधू

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
8 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Mrunal Dhananjay Bodkhe
Mrunal Dhananjay Bodkhe
1 year ago

Sir ,
ज्या उदिष्टा साठी त्या तिघांनी मृत्यूला कवटाळले होते, ते उदिष्ट जिवंत ठेवण्याचे काम तुम्ही करत आहात. माझ्या सारख्या अनेक पामाराच्या मनात क्रांती ज्वाला चिरकाल पेटती ठेवत आहात.

Amol kumbhar
Amol kumbhar
1 year ago

खूप छान माहिती दिलीत…
असच लिखाण चालू ठेवा जेणेकरून येणाऱ्या पिढीला अश्या अनेक क्रांतिकारकांची माहिती होत जाईल…
इंकलाब जिंदाबाद…

Ganesh Kokare
Ganesh Kokare
1 year ago

भारत माता की जय.
सागर जी खुप छान 👍

Om
Om
1 year ago

इंकलाब जिंदाबाद 🇮🇳🇮🇳