You are currently viewing आजादी के परवाने – हुतात्मा मदनलाल धिंग्रा 

आजादी के परवाने – हुतात्मा मदनलाल धिंग्रा 

साधारणतः १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात इस्लामी सत्ता नाममात्र शेष राहिल्या होत्या संपूर्ण भारतभरात मराठेशाहीचा डंका वाजत होता. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, लाखभर मराठी वीरांच्या प्रेतांचा खच पडला. युद्धाने मराठ्यांची ताकद काहीशी कमी झाली आणि इथूनच भारतीय राजकारणात इंग्रजांचा किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा हस्तक्षेप वाढला. एक-एक करत इंग्रजांनी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करत भारतीय संस्थाने खालसा केली, पाहता पाहता संपूर्ण भारत इंग्रज सत्तेच्या अंमलाखाली आला. ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी भारतीयांवर अत्याचार आरंभले, जनमानसांतील रोष खदखदू लागला परिणामतः ठिकठिकाणी मवाळवादी आंदोलने, सशस्त्र उठावांना सुरूवात झाली. इथूनच उगम झाला तो क्रांतीचा आणि क्रांतीकारकांचा!

राष्ट्रस्वातंत्र्यता हे एक आणि एकमेव ध्येय उराशी बाळगुन, अखेरच्या क्षणी फाशीच्या फंद्यात मरण दिसत असतानाही कुण्या लहान बालकानं आपल्या आईच्या उराशी जितक्या लाडिकपणे बिळगावं, तितक्याच लाडिकपणे फाशीचा फंदा गळ्याभोवती अडकवून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वतःच्या देहाची आहुती देणारे नरशार्दूल म्हणजे क्रांतिकारक !

“अपना खुँ अपने ही हाथों से बहाना है हमें |
मादरे हिन्द को सर-भेंट चढा़ना है हमें ||”[२]

हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल

स्वातंत्र्यानंतर मात्र क्रांतीकारकांच्या वाट्याला मात्र विस्मरण आणि उपेक्षा आली. पुष्कळ क्रांतीवीरांची नावेही आजच्या पिढीला ठाऊक नाही, असेच एक अज्ञात क्रांतीकारी म्हणजे हुतात्मा मदनलाल धिंग्रा…

madan lal dhingra
हुतात्मा मदनलाल धिंग्रा

जन्म –

पंजाबची भूमी म्हणजे गुरुगोविंदसिंह, भाई मतिदास यांच्या बलिदानाने पावन झालेली पराक्रमी शिख योद्ध्यांची भुमी. अमृतसर मधील एका धनिक कुटुंबात १८ सप्टेंबर १८८३ रोजी मदनलाल धिंग्रांचा जन्म झाला. त्यांचे वडील दित्तमल धिंग्रा हिस्सार येथे सिव्हिल सर्जन होतेz निवृत्तीनंतर दित्तमल धिंग्रा अमृतसर येथे स्थायिक झाले. दित्तमल धिंग्राची उठबस पंजाबमधील बऱ्याच उच्च पदावरील गोऱ्या अधिकाऱ्यांसोबत असल्याने, संपूर्ण घराणं पक्के इंग्रजनिष्ठ होते. मदनलाल धिंग्रांना एकूण सहा भाऊ आणि एक बहीण होती, सर्वात मोठा भाऊ कुंदनलाल व्यापारी होता त्याहुन छोटा डॉ. मोहनलाल अमृतसरला हेल्थ ऑफिसर होता. डॉ.बिहारीलाल झिंद संस्थानात चीफ मेडिकल ऑफिसर होते आणि चमनलाल तिथेच बॅरिस्टरी करत. त्यानंतरचे चुनीलाल जम्मूला मुन्सफ होते तर मदनलाल आणि भजनलाल शिक्षण घेत होते.

शिक्षण –

मदनलाल धिंग्राचे प्राथमिक शिक्षण अमृतसर मधीलच मिशनरी शाळेत झाले, प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी अमृतसर येथीलच गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. वडीलबंधु मोहनलाल यांनी इंग्लंड मधून पदवी प्राप्त केली असल्याने मदनलाल यांनाही विदेशात जाऊन शिकायची मनोमन इच्छा होती. पण, रागीट स्वभावामुळे दित्तमल धिंग्राचा परदेशी शिक्षणास विरोध होता. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ही काही केल्या मदनलालच मन लागेना, सरतेशेवटी महाविद्यालयीन अभ्यासाला रामराम ठोकुन मदनलाल पंजाब सरकारच्या काश्मिर सेटलमेंट खात्यात नोकरीला लागले. सेटलमेंट खात्यात भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा भरणा असल्याने मदनलाल ने ही सुद्धा नोकरी सुद्धा सोडून काही काळाने दिली. कदाचित विवाहबंधनात अडकल्यावर तरी मदनलाल सुधारेल या आशेने दित्तमल धिंग्रांनी एक सुंदर मुलगी पाहून मदनलालचे लग्न लावून दिले. सांसारिक जबाबदाऱ्या व खर्च वाढल्याने मदनलाल सिमला कल्का टांगा सर्व्हिस मध्ये नोकरीस लागले.

ब्रिटिश सरकारच्या जुलमी प्रशासनाबद्दलच्या बातम्या मदनलाल रोजच ऐकत होते, त्यामुळचं एकंदरीत मदनलालच्या मनात ब्रिटिशांबद्दल असंतोष वाढू लागला. १९०६ च्या जुनमध्ये सावरकर लंडनला पोहोचले. ही बातमी मदनलालच्या कानावर पडली अन लंडनमध्ये शिकण्याची त्यांची इच्छा अधिकच बळावली. पण वडिल दित्तमल धिंग्रा अजूनही आपल्या निर्णयावर ठाम होते,
आता ?
मदनलाल ने नामी युक्ती शोधली,
विलायतेला जाण्याच्या आशेने १९०६ च्या नोव्हेंबरमध्ये गुप्तपणे घरातून काढता पाय घेतला आणि थेट मुंबई गाठली. एका विदेशात जाणाऱ्या बोटीत इंजिनात कोळसे भरण्याची नोकरी मिळवली खरी पण, येथे मदनलालांचा भ्रमनिरास झाला आणि काही दिवसांनी ते पुन्हा घरी परतले. मदनलालांचा विलायतेत शिकण्याचा हा हट्ट पाहुन त्यांचे वडीलबंधु पुढे सरसावले अन शेवटी डॉ. बिहारीलाल यांच्या मध्यस्तीने मदनलाल इंग्लंडला रवाना झाले.

मदनलाल धिंग्रा लंडनमध्ये –

पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना लंडनमध्ये हक्काचं निवासस्थान असावं या हेतूने इंडिया हाऊस ची स्थापना केली होती. सावरकर, मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट यांसारखे अनेक क्रांतीकारी इंडिया हाऊस मध्ये वास्तव्याला होते. १० मे १९०७ या दिवशी १८५७ च्या उठावला ५० वर्ष पूर्ण होणार म्हणून, हा दिवस सुवर्ण महोत्सवी दिन म्हणून साजरा करण्याचे सावरकरांनी ठरवले. लंडनमधील इंडिया हाऊस मध्ये होणाऱ्या या सोहळ्यासाठी जर्मनी,आयर्लंड,फ्रान्स अशा बऱ्याच देशांतील विद्यार्थ्यांना आमंत्रण धाडण्यात आली,मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला. सर्व उपस्थितांना छातीवर धारण करण्यासाठी विरमुद्रा देण्यात आली. या मुद्रेच्या एका बाजुस “In The Memory Of The Martayers Of 1857( १८५७ च्या हुतात्म्यांच्या समरणार्थ)” तर दुसऱ्या बाजूला “वंदे मातरम्” कोरले होते. भारतीय विद्यार्थी ही विरमुद्रा लावून इंग्लंडमध्ये उघडपणे हिंडू लागले,यांत मदनलाल धिंग्राही होतेच. वीरमुद्रा पाहून अनेक इंग्रजांशी भारतीय विद्यार्थ्यांचे खटके उडू लागले. एके दिवशी वीरमुद्रा लावून मदनलाल कॉलेजात गेले असता कुण्या एका मित्राने चेष्टेने ती मुद्रा त्यांच्या छातीवरून उपटून काढली अन बाजूला फेकून दिली. या कृत्याने मदनलाल इतके चवताळले की त्यांनी आपल्या कोटाच्या आतून सुराच बाहेर काढला आणि त्या मित्राच्या गळ्यावर ठेवला. नाईलाजाने त्या इंग्रज मित्राने जमिनीवर पडलेली मुद्रा पुन्हा उचलून मदनलालच्या छातीवर लावली.

India house London
इंडिया हाऊस

१९०७ मध्ये सेनापती बापटांनी रशियन क्रांतिकरकांकडून बॉम्ब बनवण्याचं तंत्र हस्तगत केलं. त्यानुसार बॉम्ब बनवण्याचे रासायनिक प्रयोग सेनापती बापट,सावरकर अन इतर क्रांतिकारक मंडळी इंडिया हाऊस च्या माळ्यावर करत असत. एके दिवशी रात्री असाच एक प्रयोग सूरु असताना सावरकर गरम भांडे उचलण्यासाठी वापरात आणला जाणारा चिमटा सोबत घेण्यास विसरले आणि काचेच्या भांड्यातील रसायन उकळू लागले. भांडे खाली घेतले नाही तर रसायनाचा स्फोट होईल आणि सोबतच चालू असलेल्या सर्व क्रांतिकार्यावर पाणी फेडले जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. हे ध्यानी येताच मदनलाल पुढे सरसावले त्यांनी ते तप्त भांडे हातानेच घट्ट पकडून बाजूला उतरवून ठेवले, या प्रयत्नात त्यांच्या हाताची कातडी पोळून निघाली तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. धिंग्राचे हे अचाट साहस पाहून सावरकर आणि उपस्थित सर्वच अवाक झाले.

एके दिवशी सावरकरांशी बोलता बोलता मदनलाल धिंग्रांनी सावरकरांना अचानक एक प्रश्न विचारला _

मदनलाल:- Has time for martyrdom come ?

धिंग्राच्या या प्रश्नाला सावरकरांनी सुद्धा तितकंच तोडीचं उत्तर दिलं

स्वा. सावरकर:- “If a martyr determined and ready, the time for martyrdom must have come !”

तद्नंतर दोघेही सावरकरांच्या खोलीत गेले, अशीच संभाषणं पुढे अजूनही काही दिवस चालू होती. येत्या दिवसांत लक्ष्यनिश्चिती ही झाली, लक्ष्य होतं लंडनमधील भारतीय विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या उच्चभ्रू अधिकारी “विल्यम कर्झन वायली”!

कर्झन वायली –

curzon wyllie
कर्झन वायली

कर्झन वायलीबद्दल लोकांचा एक मोठा गोंधळ उडतो तो म्हणजे बरेच लोक कर्झन वायलीला लॉर्ड कर्झन समजतात, तर हा कर्झन वायली वेगळा आणि लॉर्ड कर्झन वेगळा. बंगालच्या फाळणीसाठी जबाबदार असलेला तसेच त्यानंतर उदयास आलेल्या वंगभग आंदोलन चिरडणारा नराधम म्हणजे लॉर्ड कर्झन!

५ ऑक्टोबर १८४८ रोजी जन्माला आलेल्या कर्झन वायलीचे वडीलसुद्धा भारतीय सैन्यात उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत कर्झन वायली ही सैन्यात भरती झाला. जवळपास १८६७ मध्ये तो हिंदुस्थानात सैनिकी अधिकारी म्हणुन आला. भारतात अयोध्या, मद्रास, बडोदा, भागानगर अशा बऱ्याच ठिकाणी त्यानं अधिकारी म्हणुन काम केलं. सरतेशेवटी १९०१ मध्ये तो भारतमंत्र्यांचा कार्यवाह झाला. पुढे सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा तो लंडनला निघून गेला. इतकी वर्षे भारतात राहिलेल्या व्यक्तीला इंग्रज सरकार असंच हातातून कसं जाऊन देईल त्यामुळं लंडनमध्ये सुद्धा भारतीय विद्यार्थ्यांवर नजर ठेवण्यासाठी कर्झन वायलीची नेमणूक करण्यात आली.

लंडन येथील भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटिश संस्कार देण्याच्या उद्देशाने कर्झन वायली ने लंडनमध्ये “नॅशनल इंडिया असोसिएशन” ची स्थापना केली होती. एमा बेक ही या संस्थेची सचिव होती, मदनलाल चे वडीलबंधु बिहारीलल यांच्या ओळखीने मदनलाल आणि एमा बेक यांच्यात ओळख झाली आणि लगोलग वार्षिक वर्गणी भरून मदनलाल या संस्थेचे “असोसिएट सभासद झाले.” भारतामध्ये मात्र आपल्या मुलाची भारत भवनातील क्रांतिकारकांसोबत जवळीक वाढली आहे हि खबर दित्तमल धिंग्रांच्या कानी पडली. भारतात असताना कर्झन वायली आणि दित्तमल धिंग्रांची चांगली ओळख होती, याचाच फायदा घेऊन दित्तमल धिंग्रांनी वायलीला मदनलाल धिंग्रांना भारत भवनातील वाईट आणि ब्रिटिशद्रोही हालचालींपासून परावृत्त करण्यासंबंधी पत्र धाडलं. दित्तमल धिंग्रांचं पत्र मिळाल्यावर वायलीने मदनलालांना इंडिया ऑफिसमध्ये भेटावयास बोलावलं. हळू हळू मदनलालांनी वायलीशी जवळीक वाढवली, सावरकरांच्या सांगण्यावरूनच भारत भवनातील काही चुकीची महिती किंवा सावरकरांचीच खोटी पत्रे ते वायलीला पोचती करू लागले.

लॉर्ड कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न :-

lord Curzon
लॉर्ड कर्झन

८ जून १९०९ रोजी नाशिक येथे बाबाराव सावरकरांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली, ही खबर लंडनला पोहोचताच भारत भवनातील क्रांतिकरकांमध्ये संतापाची लाट उसळली. याच दिवशी लंडनमधील “रॉयल कलोनियल इन्स्टिट्यूट” मध्ये लॉर्ड कर्झनच्या अध्यक्षतेखाली बॅमफिल्ड फुल्लर च “हिंदी आकांक्षा” विषयावर व्याख्यान होतं. मदनलालांना ही बातमी समजताच या दोघांनाच ठोकायचा या उद्देशाने लगोलग आपली रिव्हॉल्व्हर घेऊन ते निघाले, पण सभास्थानी पोहचायला त्यांना उशीर झाला नि त्यांचा हा प्रयत्न फसला. निराश होऊन मदनलाल माघारी फिरले आणि पुढे सावरकरांशी भेट झाल्यावर सावरकरांना म्हणाले_ “That rascal has escaped”

कर्झन वायलीची हत्या :-

लॉर्ड कर्झनला मारण्याची संधी हुकताच “नॅशनल इंडियन असोसिएशन” चा वार्षिक समारंभ १ जुलै १९०९ ला साजरा होणार असल्याची बातमीच त्यांच्या कानी आली. यानिमित्ताने कर्झन वायली मदनलालच्या मुख्य निशाण्यावर आला. मागल्या वेळी सारखी गफलत ह्यावेळी होऊ नये म्हणुन त्यांनी सावरकर आणि आपल्या इतर काही सहकाऱ्यांसोबत मिळून आधीच संपूर्ण आराखडा तयार करून घेतला. सावरकर सुद्धा भारतभवन सोडून बिपिनचंद्र पाल यांच्या घरी राहायला गेले, बिपीनचंद्रांच्या घरीच मदनलाल धिंग्रांनी सावरकरांकडून त्यांचं अखेरचं वक्तव्य “Challenge” लिहून घेतलं आणि सावरकरांनी त्यांना एक भरलेलं ब्राऊनिंग पिस्तुलही दिल. अखेर रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराला चिरत १ जुलै १९०९ चा सूर्य उगवला, या दिवशी क्रांतीच्या ५० वर्षांत जे कुणास जमलं नव्हतं ते असाध्य भारतमातेचा एक वीर सुपुत्र सध्या करणार होता. ब्रिटिशांच्याच राजधानीत त्यांच्याच कुण्या एका उच्चप्रभु अधिकाऱ्याच्या रक्ताचे पाट वाहणार होते.

आपली सकाळची सर्व कामे आटोपून मदनलालांनी सर्वात आधी एक मोठा सुरा विकत घेतला नंतर, ते मोर्ले यांच्या फनलँड लक्ष्याशाळेत गेले. त्यादिवशी मदनलालांनी चालवलेल्या १२ पैकी ११ गोळ्यांनी लक्ष्याभेद केला होता, जाता जाता मदनलालांनी आपली बंदूक सुद्धा मोर्ले यांकडून साफ करून घेतली. तेथून ते आपल्या निवासस्थानी आले अंगात सूट-बूट घालून डोक्यावर निळ्या रंगाची पंजाबी पद्धतीची पगडी चढवली. सावरकरांनी दिलेल्या वक्तव्याचा २/३ नकला करून त्याही आपल्या खिशात ठेवल्या आणि दोन रिव्हॉल्व्हर आणि एक कट्यार अशी हत्यारं आपल्या इतर खिशांत दडवून अखेर साडेसातच्या सुमारास कार्यक्रमस्थळी जाण्यास निघाले. नॅशनल इंडियन असोसिएशनची वार्षिक मेजवानी असल्याने १००-२०० लोक उपस्थित होते. स्वतः कर्झन वायली आपल्या पत्नीसोबत हजेरी लावणार होता. परंतु पुन्हा इथेही एक घोळ झाला, घाई घाईत घरातून निघताना समारंभाची प्रवेश-पत्रिका सोबत बाळगण्यास मदनलाल विसरले; तथापि इथं दैव बलवत्तर म्हणुन मिस्-बेक हिच्या ओळखीने मदनलाल धिंग्रांना प्रवेश मिळाला.

ब्रिटिश थाटाचा कार्यक्रम असल्या कारणाने कार्यक्रम तितकाच भव्य-दिव्य होता. मदनलाल सुद्धा ओळखीच्या लोकांशी मनमोकळेपणाने बोलत होते. इतक्यात वायलीची नजर मदनलाल वर पडली, मदनलालशी चांगली ओळख असल्याने वायली त्यांशी मनमोकळेपणाने बोलत बोलत एका निवांत स्थळी आला, तोच आलेल्या संधीचा फायदा घेत मदनलालने क्षणार्धात कोल्ट रिव्हॉल्व्हर काढलं आणि वायली वर लागोपाठ दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळीनं वायलीच्या उजव्या डोळ्याचा वेध घेतला तर दुसरी डोळ्याच्या जरा खाली लागली. वायली धडकन खाली कोसळला इतक्यात मदनलालने आणखी दोन गोळ्या त्यावर चालवल्या आणि वायली तेथेच गतप्राण झाला !

Curzon Wyllie assassination
कर्झन वायलीची हत्या

तोच डॉ. कावस लालकाका घटनास्थळी पोहोचला, मदनलालांनी लगोलग त्यालाही गोळी घालून जागीच झोपवला. सर्व झाल्यावर मदनलालांनी पिस्तुल स्वतःच्या डोक्यावर रोखलं आणि चाप ओढला पण पुरेसा दबाव न पडल्याने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. गोळीबाराच्या या सर्व तांडवाचा आवाज ऐकून मदनमोहन सिंह नावाचा भारतीय विद्यार्थी आणि लेस्बि प्रोबिन नावाचा गार्ड तेथे आला आणि धिंग्रांना पकडण्यासाठी दोघेही झटपट करू लागले. झटापटीत मदनलालांनी प्रोबिनला इतक्या जोरात उचलून आपटलं की त्याच्या छातीच्या दोन बरगड्या मोडल्या आणि त्याचं शरीर ही रक्ताने लाल झालं ! संधीचा फायदा घेत मदनमोहनने धिंग्राना जमिनीवर उताणे पाडलं आणि हातातील शस्त्र काढून घेतलं. निशस्त्र झाल्यावर मात्र मदनलालने प्रतिकार थांबवला आणि बाजूला शांत बसून राहिले. इतक्यात वायलीची पत्नी घटनास्थळी पोहोचली मदनलालने झाडलेल्या गोळ्या चेहऱ्यावरच लागल्याने वायलीचा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला होता, प्रथमदर्शनी मिसेस वायली आपल्या नवऱ्याला ओळखुच शकली नाही, पण नंतर जेव्हा तिच्या ध्यानी आलं तेव्हा मात्र तिनं हंबरडा फोडला. सगळं झाल्यावर पोलिसांनी मदनलालला ताब्यात घेतलं, यावेळी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना मदनललांन फक्त “माझं नाव मदनलाल धिंग्रा, मी लेडबरी रोड वर राहतो !” इतकंच उत्तर दिलं.

मदनलाल धिंग्रांना अटक करून वॉल्टन स्ट्रीट पोलीस ठाण्यात नेण्यात आले, इथं त्यांच्याकडून आणखी एक पिस्तुल, एक सुरा, कागदावर लिहलेलं वक्तव्य आणि इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जमा केली आणि त्यांवर कर्झन वायली आणि डॉ. कावस लालकाका यांच्या खुनाचा खटला भरण्यात आला. दुसऱ्याच दिवशी कर्झन वायलीच्या वधाचं वृत्त लंडनभर पसरलं.

कर्झन वायलीच्या हत्येनंतर, या घटनेचा निषेध करण्यासाठी बरीच मंडळी पुढे सरसावली यात ब्रिटिशनिष्ठ भारतीय लोकांची ही कमी नव्हती. ५ जुलै या दिवशी “कॅक्स्टन हॉल” मध्ये आगाखान यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी विद्यार्थ्यांची सभा भरली. सभेत मदनलाल धिंग्रांवर टिका करणारी भाषणे झाडण्यात आली. अगदी मदनलालांचा लहान भाऊ भजनलाल याला व्यासपीठावर बोलवून त्याच्या तोंडून धिंग्रांच्या कृत्याचा निषेध करण्यात आला. तोच अध्यक्षांनी सर कर्झन वायलीच्या हत्येचा निषेध करणारा ठराव एकमताने पारित करण्यासाठी टाकला आणि ठरावाच्या बाजूने कोण ? असं ते हात उंचाऊन उद्गारले!
“All(सर्वजण)”
तेव्हाच मागून एक मोठा आवाज आला,

“No! Not all!!(नाही!! सर्वजण नाहीत!!)

हा पहाडी आवाज होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा!

सावरकरांच्या या विरुद्ध मताने सभेत एकच हलकल्लोळ उडाला, तोच सावरकरांच्या जवळ बसलेल्या पामर नावाच्या कुण्या एका गोऱ्याने सावरकरांच्या तोंडावर बुक्का मारला, यात सावरकरांचा चष्मा फुटला नि रक्त वाहू लागलं तरीही सावरकर म्हणाले,
“होय ! माझं मत ठरावाविरुद्धच आहे !”

पामरने सावरकरांवर हल्ला करताचं त्यांच्याच बाजूला बसलेल्या एम.पि.टी आचार्यांनी आपल्या हातातील लाठीचं पामरच्या डोक्यात घातली. तोच अय्यर यांनी पामरला ठोकण्यासाठी पिस्तुलच बाहेर काढलं, पण सावरकरांनी डोळ्याने इशारा केल्यानं त्यांनी पुन्हा ते खिशात ठेवलं.

पामरने पुढे प्रसारमाध्यमांसमोर सावरकरांवर केलेल्या हल्ल्याचं वर्णन
A genuine British blow !( जातिवंत ब्रिटिश ठोसा !)” असं केलं.

यालाच
A straight Indian lathi (सणसणीत भारतीय लाठी)

असं जळजळीत प्रत्युत्तर हिंदी क्रांतिकारकांनी दिलं.

अशा प्रकारे हिंदी क्रांतिकारकांनी मदनलाल धिंग्रांच्या या क्रांतिकार्याची पाठराखण केली पण इकडे भारतात मात्र खुद्द दित्तमल धिंग्रांनी आपल्या पुत्राने केलेल्या या हल्ल्याचा निषेध करत आपली ब्रिटिशनिष्ठता सिद्ध केली. पुढे मदनलाल धिंग्रांचा खटला पोलीस न्यायालयात आणि नंतर वरिष्ठ न्यायालयात चालला. इ.स १९०९ मध्ये इंग्लंड मधील डेली मिरर मध्ये प्रकाशित झालेल्या हुतात्मा मदनलाल धिंग्रांच्या “CHALLENGE” हे वक्तव्य खालीलप्रमाणे__

Challenge

सकाळी मदनलाल धिंग्रांनी आपलं हे वक्तव्य न्यायलायत सादर केलं नी त्यांच्या या वक्तव्याची पत्रकं लंडनमध्ये झळकू लागली आणि ब्रिटिश साम्राज्याची राजधानीच हादरून निघाली ! कोर्टातील सूनवाई पूर्ण झाली, मदनलाल धिंग्रास फशीची शिक्षा देण्यात आली. अखेर फाशीचा दिवस उजाडला. मंगळवार, १७ ऑगस्ट १९०९ या दिवशी सकाळी लवकर उठून, उत्तम पोशाख करून मदनलाल फाशीसाठी तयार झाला. तोच एक ख्रिस्ती पाद्री मदनलाल जवळ आला, व त्याने उपदेश सांगण्यास सुरूवात केली. पण, आपण जन्माने हिंदू असल्याने हे ऐकू शकणार नाही असे सांगून मदनलाल ने पाद्र्याची पाठवणी केली, आणि दृढ निश्चयाने वध स्तंभकडे वाटचाल करू लागले. गळ्यात फाशीचा फंदा अडकवल्यावर, पुढील काही क्षणात जल्लादाने खटका खेचला, मदनलालच्या गळ्याभोवती फास आवळला, आणि क्षणार्धात भारतमातेचा हा सुपुत्र मृत्युमुखी पडला.

भारतीय सशस्त्र क्रांतीची ज्वाला आणखी एका दुर्दांत बलिदानाने आणखीन पेटून उठली !

curzon wyllie assassination news

मदनलाल धिंग्रा यांच्या हुतात्म्यानंतर आयर्लंड मधील क्रांतिकारकांनी देशभर धिंग्रांच्या सन्मानार्थ भित्तीपत्रे चीटकवली, त्यातीलच काही भाग_

“Ireland honors Madanlal Dhingra who was proved to lay down his life for the sake of his country, in letters twelve inches in length were found posted today on walls within a few miles of Dublin!

हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांना नमन !

संदर्भग्रंथ:-

[१] मृत्युंजयचा आत्मयज्ञ :- वि.श्री.जोशी

[२] शोध सावरकरांचा:- य.दि.फडके

[३] भारतीय क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा :- साच्चिदानंद शेवडे

[४] मदनलाल धिंग्रा :- अवधेश कुमार चतुर्वेदी

[५] The Fire Eaters

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments