मूर देश मूर प्रान भारत मोहान तेजे तेजे पियू पिसे तुरे होंतान !
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अगणित वीरांनी आपलं बलिदान दिलं. आपला धर्म, आपला प्रांत, आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपलं सर्वस्व सगळं विसरून केवळ आपल्या भारत राष्ट्रासाठी त्यांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आहुती दिली. काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हजारो योद्धे भारताच्या स्वातंत्र्य समरात सामील झाले. नवदुर्गाच्या दुसऱ्या पर्वात आपण आसामच्या असामान्य आणि अद्वितीय भूमीतील वीरांगना कनकलता बरुआ यांचा संघर्षमयी इतिहास जाणून घेतला होता. याच आसामच्या भूमीत आणखी एक अशा स्वातंत्र्ययोद्धा होऊन गेल्या, ज्यांनी भारतभूमीसाठी छातीवर गोळ्या झेलल्या आणि हुतात्मा झाल्या, त्यांचं नाव आहे, हुतात्मा भोगेश्वरी फुकनानी ! आज या महान महिलेची महान संघर्षगाथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
भोगेश्वरी यांचा जन्म १८८५ साली आसामच्या नागांव या जिल्ह्यात झाला. दुर्दैवाने भोगेश्वरी यांची जन्मदिनांक उपलब्ध नाही. त्यांचा विवाह भोगेश्वर फुकान यांच्यासोबत झाला होता. स्वातंत्र्य लढ्यात सामील होण्यापूर्वी त्या गृहिणीचा होत्या. त्यांना एकूण सहा मुले आणि दोन मुली अशी आठ अपत्ये होती. मुलांचा आणि घराचा सांभाळ या दोनच गोष्टी एकेकाळी त्यांच्या आयुष्यात होत्या. २०व्या शतकात नागांव जिल्हा आसाममधील स्वातंत्र्यसैनिकांचे एक प्रमुख केंद्र होते. येथील फुलगुडी आणि बरहामपुर अशा अनेक ठिकाणी सतत ब्रिटिशांविरोधात विरोध प्रदर्शन आणि आंदोलन व्हायचे. आपल्या लोकांची देशाप्रती असलेली निष्ठा पाहून भोगेश्वरी यांच्या मनातही राष्ट्रवाद निर्माण झाला आणि त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मुलांनाही स्वातंत्र्याच्या आंदोलनात सामील होण्यासाठी प्रेरित केले यानंतर वयाच्या पन्नाशीमध्ये त्यासुद्धा ‘आजादी के आंदोलन’ मध्ये उतरल्या.
त्यांनी नागांवमध्ये काँग्रेसचे कार्यालय स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. १९३० साली भोगेश्वरी यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला आणि ब्रिटिशांच्या विरोधातील आंदोलनात त्या सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी विविध मागण्यांसोबत आमरण उपोषण केलं होतं, मात्र त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात डांबलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी चळवळींमध्ये त्यांचा सहभाग वाढत गेला. चूल आणि मूल यापुरतं न राहता आता त्या स्वातंत्र्य संग्रामात ताठ मानेने अनेक मोर्चांचं नेतृत्व करायला लागल्या. १९४२ साली गांधीजींच्या नेतृत्वातील भारत छोडो आंदोलनामुळे लाखो भारतीय रस्त्यावर उतरले होते. याचदरम्यान भोगेश्वरी यांचं वय साठ होतं आणि या वयातही आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी राष्ट्रधर्म पाळला. सुरुवातीला अहिंसक मार्गाने सुरू झालेल्या या आंदोलनाने नंतर हिंसक वळण घेतलं होतं आणि यामुळे ब्रिटिशांद्वारे अनेक भागांमध्ये गोळीबार करण्यात आला होता. कित्येक राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं होतं. इतकंच काय तर गांधीजींनाही यादरम्यान तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती.
याचवेळी नागांवमध्येही आंदोलन सुरूच होते. भोगेश्वरी आणि रत्नमाला या दोघी क्रांतिकारी विविध आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. अनेक गावांची लोकं त्यांच्या या आंदोलनांमध्ये सामील झाले होते. आपला राष्ट्रीय ध्वज घेऊन वंदे मातरमचा जयघोष करत सर्व आंदोलक पुढे सरसावत होते. याचदरम्यान ब्रिटिशांनी त्यांचा विरोध केला आणि पोलिसांनी आंदोलकांना मारहाण करायला सुरुवात केली. कॅप्टन फिनिश नावाचा ब्रिटिश अधिकारी यावेळी पोलिसांचे नेतृत्व करत होता. यावेळी त्याने रत्नमाला यांच्या हातातील तिरंगा हिसकावला आणि जमिनीवर फेकला. हे पाहून भोगेश्वरी यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी त्या झेंड्याच्या दंडुक्यानेच कॅप्टन फिनिशवर प्रहार केला. मात्र हा अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्याने आपली बंदूक बाहेर काढली आणि कसलाही विचार न करता थेट भोगेश्वरी यांच्यावर गोळी झाडली. भोगेश्वरी कोसळल्या. रक्त वाहू लागलं, अखेरचा श्वास जवळ येऊ लागला. त्या अखेरच्या श्वासातही ‘आजादी’ हीच त्यांची सर्वोच्च इच्छा असावी, डोळे बंद झाले आणि भोगेश्वरी फुकनानी हुतात्मा झाल्या.
भोगेश्वरी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि यासोबतच बहादूरी, अदम्य साहस आणि देशभक्तीचा वारसा मागे सोडून गेल्या. त्यांनी ना वयाचा विचार केला, ना आपल्या कुटुंबाचा… देशासाठी लढत लढत स्वातंत्र्याच्या यज्ञात त्यांनी आहुती दिली. आज इतिहासाच्या पुस्तकातही हे नाव ऐकायला मिळत नाही. अशा कित्येक वीर महिलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी छातीवर गोळी झेलल्या. त्यांचं स्मरण, त्यांचं बलिदान आपण कधीही विसरता कामा नये.
हुतात्मा भोगेश्वरी फुकनानी यांचा कोटी कोटी वंदन !
आसामच्या पवित्र भूमीतील या सर्व अज्ञात वीरांगनांना नमन !
- हुतात्मा कनकलता बरूआ
- हुतात्मा मांगरी ओरांग (मालती मेम)
- हुतात्मा दारिकी दास बरुआ
- हुतात्मा तीलेश्वरी बरुआ
- हुतात्मा रेबती लाहोन
- हुतात्मा खाहुली देवी
- हुतात्मा पाडुमी गोगोई
- हुतात्मा गोलापी चुटीयानी
- हुतात्मा लीला निओगोनी
- हुतात्मा थुनूकी दास
- हुतात्मा जलूकी कचारियानी
- हुतात्मा कोन चुटीयानी
संदर्भ:-
- भारत सरकार (अधिकृत वेबसाईट)
- इंडियन कल्चर वेबसाईट
- फेसबुक, गुगल, विकिपीडिया (कोणत्याही पुस्तकात आम्हाला भोगेश्वरी फुकनानी यांची माहिती मिळाली नाही.)
खुप छान लेख
धन्यवाद !