भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जितके पुरुष सक्रिय होते, तितक्याच स्त्रिया ! जितक्या पुरुषांनी बलिदान दिलं, तितक्याच स्त्रियांनी! जितक्या पुरुषांनी आंदोलनं केली, तितक्याच स्त्रियांनी! मात्र त्यांच्या योगदानाबाबत सहसा फार बोललं जात नाही. आपल्या महिला स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास का झाकोळला गेला, याचं उत्तर आजच्या युवकांनाच शोधायला हवं. १९२० नंतर या देशात गांधीयुग आलं होतं. अनेक जणांनी गांधीजींकडून प्रेरणा घेऊन स्वतःला स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात झोकून दिलं आणि विविध चळवळींमध्ये, आंदोलनांमध्ये सामील झाले. अशाच आंदोलकर्त्यांपैकी एक महान नाव म्हणजे अरुणा असफ अली ! नवदुर्गाच्या सहाव्या लेखात त्यांचं योगदान जाणून घेऊया.

बालपण आणि शिक्षण
अरुणा उपेंद्रनाथ गांगुली ! १६ जुलै १९०९ रोजी पंजाबमधील कालका शहरात या बंगाली रणरागिणीचा जन्म झाला. श्रीमंत कुटुंबात जन्माला आल्यामुळे कसलीही कमतरता त्यांना भासली नाही. लहानपणापासून अतिशय हुशार, त्यामुळे शालेय शिक्षणात नेहमी सर्वोत्तम हा शेरा मिळत असायचा. लाहोर आणि नैनितालमधून शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणाची पायरी पूर्ण केल्यानंर त्यांनी कोलकातामधील गोखले मेमोरियल कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी सुरु केली. म्हणजे बघा… एक बंगाली स्त्री जिचा पंजाबमध्ये जन्म झाला आहे, जी लाहोर आणि नैनीतालमध्ये शिकली आहे आणि नोकरीसाठी कोलकाता येथे गेली. हीच त्यांच्या भारतीयत्वाची खरी ओळख ठरते. कोलकातामध्येच वयाच्या १९व्या वर्षी आपल्याशी २३ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत अरुणा यांनी लग्न केलं. त्यांचं नाव असफ अली! ते सुप्रसिद्ध मुस्लिम वकील होते. कुटुंबियांच्या विरोधाला झुगारून त्यांनी हा आंतरधर्मीय विवाह केला होता.

संघर्षाचा आरंभ
त्याकाळी असफ अली हे काँग्रेसचे मुख्य सदस्य होते आणि गांधीजींच्या फार जवळ होते. आपल्या अवतीभोवती सुरु असलेल्या संघर्षाची जाणीव त्यांना झाली होती. आपण कितीही श्रीमंत असलो तरी आपला देश आजही गुलाम आहे आणि आपले नागरिक त्याच गुलामीच्या साखळदंडात अडकलेले आहेत, हे अरुणा यांना कळून चुकलं आणि त्यांनीही स्वातंत्र्याच्या या लढ्यात उडी घेतली. महात्मा गांधीजी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारांनी त्या प्रचंड प्रभावित झाल्या होत्या. आपण सुद्धा सक्रिय आंदोलनात सामील व्हावं, असा निर्धार अरुणा यांनी केला आणि अनेक प्रचार सभा, प्रभातफेर्यांमध्ये सहभागी झाल्या. याच दरम्यान ठिकठिकाणी भाषण करून त्या एक ऊत्तम वक्त्यादेखील बनल्या. कायदेभंग चळवळीत त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता आणि याचदरम्यान त्यांना तुरुंगवासदेखील भोगावा लागला. तुरुंगातील परिस्थितीने त्यांचे मन हेलावून टाकले होते, त्यामुळे आता आयुष्यभर आपण खादीचेच कापड घालणार हा निश्चय केला आणि तो आयुष्यभर पाळला !

स्वातंत्र्यलढ्यात अरुणोदय झाला
गांधीजींनी सुरू केलेली दांडी यात्रा म्हणजेच मिठाचा सत्याग्रह त्यावेळी आंदोलनकर्त्यांसाठी एक उमेद ठरली होती. या मिठाच्या सत्याग्रहाने बदल घडू शकतो, असा विश्वास जनमानसात पसरला होता. या सत्याग्रहाच्या माध्यमातून आपण आपला आवाज आणि आपले विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो, असे मनी पक्के करत त्या सत्याग्रहात सक्रिय झाल्या. यावेळी त्या मीठ बनविणे, मिरवणुका काढणे, सभा भरविणे, भाषणे करणे, लोकांना एकत्रित आणणे अशी विविध कामे करू लागल्या. त्यांचे अशाप्रकारे पुन्हा जनआंदोलनात सक्रिय होणं, ब्रिटिशांच्या पचनी पडलं नाही आणि ब्रिटिशांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर खटला भरला. यानंतर त्यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. गांधी-आयर्विन करारानुसार अनेक राजकीय कैद्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आले होते. मात्र अरुणा यांना सोडण्यात आले नाही. ब्रिटिश सरकारला त्यांची इतकी धास्ती होती. अरुणा यांची नेतृत्वक्षमता जनतेने ओळखली होती, त्यामुळे त्यांनी प्रखर आंदोलने सुरू केली आणि अखेर अरुणा यांची सुटका झाली. गांधीजी आणि इतर प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर त्यांनज मुंबईत विरोध सभा आयोजित केली आणि ब्रिटिश सरकारला खुलं आव्हान देणाऱ्या त्या प्रमुख महिला ठरल्या. मुंबईतील गवालिया टॅंक येथे ब्रिटिशांच्या वेढ्याला झुगारून ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवला ! १९३० ते १९४१ या कालखंडात त्यांच्या आयुष्यात आंदोलने अटक, तुरुंगवास आणि सुटका याच गोष्टींचे चक्र सुरू होते. १९४२ साली ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान ब्रिटिशांनी पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यासाठी वॉरंट जारी केले. मात्र ब्रिटिशांच्या हातावर तुरी देत १९४६ पर्यंत म्हणजेच ४ वर्ष त्यांनी भूमिगत स्वरूपात विविध आंदोलनांचे नेतृत्व केले.

भारतरत्न अरुणा असफ अली
१०० वर्षांचा संघर्ष, लाखो स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान, शेकडो आंदोलन, चळवळी यानंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपला संघर्ष यशस्वी ठरला, हीच भावना अरुणा यांच्या मनात होती. स्वातंत्र्योत्तर काळात १९४८ साली त्या युनेस्कोच्या मेक्सिको येथील परिषदेत डॉ. रामकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून गेल्या. यानंतर काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी कम्युनिस्ट पार्टीत प्रवेश केला, मात्र पंडित नेहरू यांच्या निधनानंतर त्या पुन्हा काँग्रेस पक्षात गेल्या, मात्र जास्त पक्षासाठी जास्त सक्रिय न राहता त्यांनी इतर समजाकार्य करणं सुरू ठेवलं. १९५६ साली त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. या काळात त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले. भारत सरकारने १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’, तसेच मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार (१९८७) देऊन त्यांचा गौरव केला. दिल्ली येथे त्यांचे २९ जुलै १९९६ रोजी निधन झाले. अरुणा यांनी ‘सोविएतलॅँड नेहरू पुरस्कार’, लेनिन पुरस्कार , इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सामंजस्याबदल ‘नेहरू पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले.
लिखनेवाला कभी सामान्य नही होता. कोई व्यक्ती उसे प्रभावित करता है, इससे ज्यादा वो किसी महान व्यक्ति के प्रभाव में रहना चाहता है यह बात गौर समझना जरूरी है. @infinity_peace आप की वजह से हमे इतनी कर्तुत्वशाली महिलाओं के बारे में जानने का मौका मिला इस लिए धन्यवाद!