या संपूर्ण जगात विविधतेने नटलेला देश म्हणजे आपला भारत ! भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती, कला… इतकं वैभव कोणत्याही देशाच्या नशिबी नाही, ते भारतभूमीला मिळालय. साक्षात निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेल्या आपल्या देशाला समुद्र, वाळवंट, हिमाच्छादित प्रदेश, पाऊस, नद्या, जंगल… सगळ अगदी समसमान प्रमाणात मिळालं आहे. भारत जितका जंगलाने वेढलेला तितका जंगलामुळेच वाढलेला… त्याच जंगलांचं रक्षण करणारा ‘वाघोबा’ आजही आदिवासी बांधवांचं दैवत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही याच आदिवासी समाजातून एक वाघ उठून उभा राहिला, ज्याच्या डरकाळीने ब्रिटिश साम्राज्य हादरलं होतं आणि तोच या भारत देशाच्या स्वातंत्र्य समरात ‘भगवान’ म्हणून अमर झाला. त्या महान योद्ध्याचं आणि श्रेष्ठ धनुर्धराचं नाव बिरसा मुंडा !

आदिवासी नायक
स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी फक्त देशाच्या ठराविक शहरांमध्ये नाही, तर जंगलामध्येही पेटून उठली होती. ‘जल जमीन जंगल’ या मूलमंत्रावर आपल्या हक्कांसाठी लढणारी एक आदिवासी पिढी भारताच्या जंगलांमध्ये तयार झाली होती आणि त्यांचा नायक ठरला बिरसा नावाचा हा आदिवासी पठ्ठ्या! बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलीहातू या गावी एका मुंडा या आदिवासी जमातीत झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव करमी हातू ! जंगलातलं जीवन त्यामुळे धनुर्विद्येत पटाईत, त्यातच तल्लख बुद्धीचं देणं लाभल्यामुळे भविष्यात बिरसा क्रांती घडवू शकला. शालेय शिक्षणासाठी धर्मांतराच्या साखळदंडात अडकलेल्या बिरसाला नाईलाजाने बिरसा डेव्हिड हे नामांतर करून शिक्षण घ्यावं लागलं, पण बंडखोरी ही आदिवासीयांच्या रक्तातच भिनलेली असते. ख्रिस्ती धर्माची सक्ती ओलांडून तो पुन्हा आपल्या मूळ भूमी युद्धात परतला आणि अखेरपर्यंत त्याने समर्पित भावनेने मातृभूमीसाठी कार्य केलं.

भारताच्या जंगलातील जमिनी बळकावण्यासाठी ब्रिटिशांची चढाओढ सुरू झाली होती. आदिवासी समाजाचे हक्क हिसकावून घेण्यासाठी ब्रिटिशांनी वनीकरण कायद्यासह इतरही अनेक चुकीचे कायदे लागू केले गेले, ज्यामुळे आदिवासी बांधवांना राहण्यासाठी घरदेखील राहिलं नाही. जंगलात मेंढरे चरण्यासाठी नेता येत नव्हते, जंगलातून लाकडे गोळा करता येत नव्हते. त्यामुळे या लोकांना आपलं दैनंदिन जीवन जगण्यात बरीच अडचणींचा सामना करावा लागत होता. याच ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार, सावकार लोकंही आदिवासींचे प्रचंड शोषण करत होते. अशा परिस्थिती या सर्वांच्या दडपशाहीला बिरसा मुंडा पुरून उरला.
उलुगुलान चळवळ
ब्रिटिशांविरोधात विद्रोह करण्यासाठी बिरसा यांनी ‘उलुगुलान’ चळवळ उभी केली. याला मुंडा विद्रोह असंही म्हणतात. ‘उलगुलान’ म्हणजे बंड, उठाव किंवा हल्लाबोल ! १८९० साली बिरसा यांनी व्यापक क्रांती उलगुलानची घोषणा केली. यावेळी त्यांनी सर्व आदिवासींना आपल्या जंगल, जमीन आणि संपत्तीसाठी एकत्र येवून लढण्याचं आवाहन केलं. त्यांना जंगलातून बलाढ्य पाठिंबा मिळाला आणि ते आदिवासींचे महानायक बनले. आदिवासी बांधव त्यांना ‘धरती आबा’ म्हणून संबोधत होते. यावेळी त्यांनी ‘बिरसैत’ या नवीन धर्माची सुरुवात केली होती, जो पूर्णपणे एक निसर्गपूजक धर्म होता. हजारो आदिवासी लोकं त्यांच्या धर्माशी जोडली गेली.
“आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतो. आम्ही कधीही ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. आम्ही इंग्रजांचे अधिपत्य स्विकारत नाही. जो इंग्रज आमच्याविरोधात उभा राहील, त्यास आम्ही यमसदनी पाठवू.” त्यांच्या या महाघोषणेने आदिवासी बांधव पेटून उठला आणि प्रत्येकजण त्या आंदोलनात सामील झाला. या बंडामुळे ब्रिटिश सरकार त्रस्त झाले. बिरसा मुंडाचं हे आंदोलन भारतभरातील आदिवासी लोकांना एकत्र आणू शकतं या भीतीने बिरसाला पकडण्यासाठी मोहीम आखली आणि त्याला पकडून देणाऱ्यास ५०० रुपयांचं बक्षिस जाहीर केलं. बिरसा यांनी लढा सुरू केला. यावेळी त्यांनी आपल्या अनुयायांसह अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावण्यास सुरुवात केली. याप्रकरणी १८९५ साली बिरसा आणि त्यांच्या वडिलांना पोलिसांनी पकडले. त्यांना २ वर्षांचा कारावास आणि दंड ठोठावण्यात आला. हजारीबाग मध्यवर्ती कारागृहात असताना बिरसा यांची कीर्ती आणखी वाढली आणि यासोबत ब्रिटिशांची धास्तीदेखील वाढू लागली होती.

सुटकेनंतर बिरसा यांनी ब्रिटीश राणीचा पुतळा जाळण्याचा आदेश दिला. त्यांच्या अनुयायांनी सर्वत्र ब्रिटिश राणीचे पुतळे जाळण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ब्रिटिश आणखी चिडले. मात्र शांत बसणं हे बिरसा यांच्या तत्वास बसत नव्हतं. संपूर्ण जंगल त्यांनी जमा केलं होतं. बाण, कुर्हाड आणि गुलेर घेऊन त्यांनी आणि आदिवासींनी इंग्रजांवर प्रखर हल्ला चढवला, त्यांची मालमत्ता जाळली, बऱ्याच इंग्रज पोलिसांना ठार केलं. १८९८ साली तांगा नदीकिनारी झालेल्या युद्धात बिरसा आणि त्यांच्या शिपायांकडून इंग्रज सेनेचा पराभव झाला होता. मात्र यानंतर ब्रिटिशांनी फौजफाटा आणत मोठ्या प्रमाणात आदिवासी नेत्यांना अटक केलं.
आतापर्यंत ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना पकडण्याची पूर्ण योजना तयार केली. जानेवारी १९०० रोजी झारखंडमधील डोंबरी पहाड याठिकाणी ब्रिटिश आणि आदिवासींमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये अनेक लहान मुलं आणि महिलांना आपले प्राण गमवावे लागले. ब्रिटिशांच्या प्रतिकारामुळे आंदोलन कमजोर होत गेलं आणि अखेर ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसा यांना चक्रधरपूर येथून अटक करण्यात आली. त्यांच्या विद्रोहाची ठाणीही उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांच्यासोबत इतर ४६० आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आलं होतं. यानंतर काही महिने बिरसा यांचे ब्रिटिशांनी तुरुंगात अतोनात हाल केले. बिरसा यांच्या मृत्यूचे गूढ अजूनही बाहेर पडलेले नाही. कारण काहींच्या मते त्यांना इंग्रजांनी फासावर चढवलं होतं, काहींच्या मते त्यांचा प्लेगमुळे मृत्यू झाला तर काहींचं असं म्हणणं आहे की, ब्रिटिशांकडून त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यांच्या मृत्यूचं कारण काहीही असो, पण त्यांचं जगणं या मातृभूमीसाठीच होतं आणि आपले प्राणही त्यांनी मातृभूमीच्या वेदीवरच अर्पण केले. आदिवासी समाजामध्ये क्रांतीची आणि स्वातंत्र्याची ज्वाला पेटवणारं असं महान व्यक्तिमत्त्व यापूर्वीही झालं नव्हतं आणि भविष्यातही होणार नाही. आदिवासी समाज आजही त्यांच्या योगदानाचं स्मरण करून सदैव त्यांचा गौरव करतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा यांनी आपल्या आयुष्याची, घरदाराची, संसाराची राखरांगोळी केली. त्यामुळे हीच भावना प्रत्येक भारतीयामध्ये जागृत व्हावी आणि एवढंच वाटतं.
कोई पकड़ ना पाता उनको अगर अपने ही दगा ना देते,
आजाद हिंद : संग्राम, शहादत और सत्य – शुभंकर वर्मा, आशुतोष मिश्रा
साँस ना लेते वो जब तक गोरों को भगा ना देते,
अपनी आँखों से खून भी देखा और अपने ऊपर भी जुर्म सहा,
भगवान ने धरती पर आकर क्या खूब आज़ादी का युद्ध लड़ा ||
बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन !
संदर्भग्रंथ:-
- आझादी के दिवाने – प्रमोद मांडे
- आजाद हिंद : संग्राम, शहादत और सत्य – शुभंकर वर्मा, आशुतोष मिश्रा