You are currently viewing आजादी के परवाने – बटुकेश्वर दत्त

आजादी के परवाने – बटुकेश्वर दत्त

वह जिस्म भी क्या जिस्म है,
जिसमें न हो ख़ून-ए-जुनूँ…!


मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा वसा घेतलेल्या कित्येक क्रांतिकारकांच्या शरीरात “ख़ून-ए-जुनूँ” तर होताच… यासोबतच अहंकारी आणि बहिऱ्या ब्रिटिश सरकारला धमाक्याचा रुपात दणका देण्याची धमकही होती. सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक असलेल्या वासुदेव फडके यांनीही जुलमी ब्रिटिशांचा शस्त्रांच्या आधारेच सामना करण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र जसजसा काळ सरला तसतसे भारतीय क्रांतिकारक शस्त्र आणि शास्त्र या दोहोंमध्ये पारंगत झाले. शस्त्र सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी आणि शास्त्र त्यांच्याद्वारे सुरू असलेली देशवासीयांची गळचेपी कायद्याच्या आधारे रोखण्यासाठी ! १९२९ साली ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडण्याची अशीच कामगिरी दोन क्रांतिकारी पठ्ठ्यांनी करून दाखवली होती, ते म्हणजे भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त !

हो… बटुकेश्वर दत्त हे तेच क्रांतिकारक आहेत… ज्यांना स्वातंत्र्यानंतर नवनिर्मिती झालेल्या भारत सरकारने आणि भारतीय नागरिकांनी डावललं. एकेकाळी देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या या क्रांतीकारकाला आपल्या अखेरच्या आयुष्यात आणि आपल्याच मायभूमीत अनेक यातना, हालअपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या. भारतातील सर्वात उपेक्षित आणि दुर्लक्षित केलं गेलेलं महान क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व म्हणजे बटुकेश्वर दत्त !
अशा अनेक क्रांतीकारकांची उपेक्षा होणे, हे भारतात काही नवीन नाही. विस्मृतीस गेलेल्या अशा कित्येकांबाबत अभ्यासक्रमात पान सोडा साधा परिच्छेदसुद्धा नाही, त्यांच्याबाबत चर्चा करणं तर दूर राहीलं. भगत सिंह यांच्या खांद्याला खांदा लावून ‘इन्कलाब जिंदाबाद‘चा जयघोष करणाऱ्या बटुकेश्वर यांचं योगदान सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचावं, यासाठी त्यांच्या स्मृतीस स्मरण करून आम्ही हा लेख अर्पण करतो !

बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० रोजी पश्चिम बंगालच्या ओरी या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोष्ठा बिहारी दत्त. त्यांना बालपण ते क्रांतिकारी काळापर्यंत संपूर्ण मित्रपरिवार बी.के. दत्त, बिके, बट्टू आणि मोहन अशा विविध नावांनी हाक मारायचा. मॅट्रिकच्या परीक्षेदरम्यान त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. पीपीएन हायस्कुलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९२४-२५ दरम्यान कानपुरच्या कॉलेजमध्ये त्यांनी भेट भगत सिंह यांच्यासोबत झाली. दोघेही तगडे तडफदार तरुण, दोघांनाही ब्रिटिशांची जुलुमी राजवट आपल्या डोळ्यांनी पहिली होती, दोघांच्याही मनात स्वातंत्र्याची आणि क्रांतीची आग धगधगत होती, विचार जुळले आणि दोघांची मैत्री झाली. नौजवान भारत सभापासून ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनपर्यंत पोहोचले. इथे सर्व नवख्या क्रांतिकारकांशी त्यांची भेट झाली आणि काकोरी कांडातील सर्व अनुभवी क्रांतिकारकांना पकडल्या गेल्याची झळदेखील त्यांच्या मनात होती. यावेळी संघटनेत कार्यरत असताना त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची माहिती जाणून घेतली आणि आग्रामध्ये एक बॉम्ब तयार करण्याचा गुप्त कारखाना उभारला. याच सुमाराला ब्रिटीश सरकार ‘सार्वजनिक सुरक्षा विधेयक(पब्लिक सेफ्टी बिल) आणि औद्योगीक कलह विधेयक(ट्रेड डिस्प्यूट बिल)‘ नावाने दोन बिलं संसदेत पास करून घेण्याच्या तयारीत होत. या कायद्ययान्वये मजूर व कामगारांच्या उपोषणावर सरकार निर्बंध घालू शकत होत तसेच कोणत्याही प्राथमिक चौकशिविना नागरिकांना कैद करण्याचा अधिकार पोलिस प्रशासनाला मिळणार होता. याचा निषेध म्हणून व क्रांतिकरकांचा आवाज सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(HSRA) च्या क्रांतिकारकांनी संसदेत बॉम्बहल्ला करण्याची योजना आखली. बटुकेश्वर दत्त यांना या मोहिमेचा सुगावा लागला आणि मग “मला लवकरच direct action मध्ये सहभागी करून घेतळ नाही, तर मी समितीशी असलेले सर्व संबंध तोडून टाकेल” असा निरोप धाडला, अखेर संसदेत बॉम्ब फेकण्यासाठी भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यांची निवड करण्यात आली.

८ एप्रिल १९२९ रोजी दिल्ली येथील संसदेत भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकले, यावेळी भगतसिंग केवळ २१ तर बटुकेश्वर दत्त केवळ १९ वर्षांचे होते. बॉम्ब फेकल्यानंतर भगतसिंग यांनी आपल्यासोबत असलेल्या माउजर पिस्तुलाने हवेत एक राऊंड फायर केला तर बटुकेश्वर दत्त यांनी “बहीऱ्यांना ऐकू जाण्यासाठी(To Make Deaf Hear) हे पत्र फेकले व स्वत:ला अटक करून घेतले.

शहीद भगत सिंह आणि बटूकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब हल्ल्यानंतर फेकलेले पॅम्प्लेट
तत्कालीन वृत्तपत्रात छापून आलेली बातमी

जेलमध्ये असतानाच आपल्याला राजकीय कैदी नव्हे ट्र सामान्य कैदी म्हनॉन वागवले जात आहे याच्या निषेधार्थ भगतसिंग व सहकाऱ्यांनी उपोषण चालू केले, हे उपोषण ११४ दिवस चालले, अखेरीस सरकारला क्रांतिकारकांपुढे नमते घ्यावे लागले व सर्व क्रांतिकारकांना युरोपियन राजकीय कैद्यांसारख्या सोई सुविधा देण्यात आल्या.

THE HINDUSTAN TIMES – 13/02/1930

भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी संसदेत फेकलेले बॉम्ब फक्त आवाज करणारे होते, तेही त्यांनी जाणूनबुजून निर्मनुष्य ठिकाणी फेकले, परिणामतः चार-दोघांना किरकोळ जखमा फक्त झाल्या. तरीसुद्धा ब्रिटिश सरकारने दोन्हीही क्रांतिकारकांवर हात्येचा आरोप लावला. ब्रिटिशांनी दोघा क्रांतिकारकांवर लावलेले आरोप केस फाइल मध्ये वाचायला मिळतात, खालील छायाचित्र पहावी____

अखेर १२ जून १९२९ रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त दोघांना अजन्म, कारावासाची शिक्षा देण्यात आली.

पुढे भगतसिंग यांच्यावर स्वतंत्रपणे सोंडर्स वधाचा खटला चालवण्यात आला, व बटुकेश्वर दत्त यांना आंदमान मध्ये काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी पाठवण्यात आले. १२ जुलै १९३० रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांची शेवटची भेट घडली, याच्या ४ दिवस आधी भगतसिंग यांनी आपल्या जेल डायरीत बटुकेश्वर दत्त यांचा ऑटोग्राफ घेतला.

बटुकेश्वर दत्त यांचा जेल डायरी मधील ऑटोग्राफ
खालील नोट भगतसिंग यांनी लिहली आहे

बटुकेश्वर दत्त जेलमध्ये असतानाच सोंडर्स वधाच्या खटल्यांतर्गत भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सुनावणीनंतर ऑक्टोबर १९३० मध्ये बटुकेश्वर दत्त यांना लाहोर सेंट्रल जेलमधून पत्राद्वारे भगतसिंग लिहतात__ मला फाशीची शिक्षा झाली आहे, पण तुला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तू जिवंत राहशील आणि तुला जिवंत राहून जगाला हे दाखवून द्यायचे आहे, की क्रांतिकारक आपल्या आदर्शाकरता केवळ मृत्यूला कवटाळतात असेच नव्हे, तर जिवंत राहून प्रत्येक संकटाचा सामनाही करू शकतात. मृत्यू हे खडतर ऐहिक जीवनातून सुटका करून घेण्याचे साधन बनता कामा नये. ज्या क्रांतिकारकांना प्रसंगवशात फाशीच्या फंद्यातून सुटका मिळाली आहे, त्यांनी जिवंत राहून जगाला हे दाखवून दिले पाहिजे, की ते आपल्या आदर्शासाठी केवळ फासावर चढू शकतात असे नव्हे, तर तुरुंगाच्या अंधाऱ्या कोंदट कोठड्यांमध्ये घुसमटून टाकणाऱ्या क्रूर हीनतम दर्जाच्या अत्याचारांना तोंडदेखील देऊ शकतात.

आंदमान मध्ये बटुकेश्वर दत्त यांनी पुनः ब्रिटिश सरकार विरोधात उपोषण सुरू केले, पण याच दरम्यान त्यांना क्षय(TB) रोगाची लागण झाली. त्यांची आंदमान मधून मुक्तता करण्यात आली, १९३८ साली महात्मा गांधींच्या मध्यस्तीने सुटका करण्यात आली. पुढील काळात बटुकेश्वर दत्त गांधी मार्गाला लागले, १९४२ साली त्यांनी पुनः असहकार चळवळीत उडी घेतली. पुनः सरकारने त्यांना अटक करून त्यांना ४ वर्षांची शिक्षा ठोठावली, १९४५ साली बटुकेश्वर दत्त यांची पुनः सुटका करण्यात आली. नंतर १९४७ मध्ये भारत ब्रिटिशांच्या जुलमी अधिकारतून स्वातंत्र्य झाला खरा, पण भारतीय स्वातंत्र्यासाठी अमाप अत्याचार सहं केलेल्या बटुकेश्वर दत्त यांच्या ठायी मात्र उपेक्षा आली. स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसी नेत्यांप्रमाणे क्रांतिकारकांना मान-सन्मान मिळाला नाही, स्वातंत्र्यानंतरही क्रांतिकारकांची आर्थिक परिस्थिती बिकटच राहिली, बटुकेश्वर दत्त ही याला अपवाद ठरले नाहीत.

१९४७ साली विवाह करून बटुकेश्वर दत्त पटना येथे स्थाईक झाले, वर्षभरातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मुलीचे नाव भारती ठेवले गेले. पण बटुकेश्वर दत्त यांची आर्थिक स्थिति मात्र सुधारली नव्हती, पोट-पाण्यासाठी त्यांनी बिस्किटांची छोटी बेकरी सुरु केली मात्र अल्पावधीतच ती नुकसानीत गेली व शेवटी बंद पडली. त्यानंतर बटुकेश्वर दत्त यांनी सिगारेट कंपनीची डीलरशिप घेतली, याही व्यवसायात साफल्य मिळाल नाही. पुढे काही काळासाठी त्यांना संसदेत घेण्यात आल, पण तेथील गचाळ राजकारणात या निस्पृह क्रांतिकारकाचा काय टिकाव लागणार. याच सुमाराला पटणा शहरात बस परमीट मिळण्यास सुरुवात झाली, बटुकेश्वर दत्त यांनीही अर्ज भरला. परंतु स्थानिक आयुक्ताने बटुकेश्वरांकडे आपले स्वातंत्र्य सैनिक असल्याचा पुरावा घेऊन या अशी मागणी केली. नंतर काही काळाने ही गोष्ट तत्कालीन राष्ट्रपति राजेंद्रप्रसाद यांच्या कानी पडल्यावर आयुक्ताने दत्त यांची माफी मागितली, त्यांच्या आयुष्यातील पुढील काही वर्ष सुद्धा हलाखीत गेले. १९६४ साली ते पुन्हा आजारी पडले. एकेकाळी ब्रिटीशांना हादरवून सोडणाऱ्या या क्रांतिकाकाला पटणा येथील सरकारी दवाखान्यात योग्य इलाज मिळेना झाला, तेव्हा आझाद नामक त्यांचे पत्रकार सहकारी धावून आले, त्यांनी वृत्तपत्रात बटुकेश्वर दत्त यांच्या स्थितीबद्दल लेख छापला तेव्हा सरकारला जाग आली.

‘क्या दत्त जैसे कांतिकारी को भारत में जन्म लेना चाहिए, परमात्मा ने इतने महान शूरवीर को हमारे देश में जन्म देकर भारी भूल की है. खेद की बात है कि जिस व्यक्ति ने देश को स्वतंत्र कराने के लिए प्राणों की बाजी लगा दी और जो फांसी से बाल-बाल बच गया, वह आज नितांत दयनीय स्थिति में अस्पताल में पड़ा एड़ियां रगड़ रहा है और उसे कोई पूछने वाला नहीं है.’
-चमनलाल आजाद (तत्कालीन पत्रकार, १९६४)

बटुकेश्वर दत्त यांना दिल्लीतील सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, पण टॉवर त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले होते, दिल्लीत दाखल झाल्यावर ते म्हणाले___

“ज्या दिल्लीत बॉम्बस्फोट करून मी ब्रिटिश सरकारविरुद्ध आवाज उठवला त्या दिल्लीत मला पुन्हा स्ट्रेचरवरून अशाप्रकारे आणले जाईल, असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.”

आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी अशी खंत बोलून दाखवणाऱ्या भगत सिंह यांच्या खांद्याला खांदा लावून ‘इन्कलाब जिंदाबाद’चा जयघोष करणाऱ्या या महान क्रांतिकारकाच्या वाट्याला उपेक्षा, हालअपेष्टा आणि यातनाच आल्या !

पण सरतेशेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे प्रिय साथीदार शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी पंजाबमधील हुसैनीवाला येथेच करावेत, अशी इच्छा त्यांनी भगत सिंह यांच्या मातोश्री विद्यावती जी यांच्याकडे बोलून दाखवली. २० जुलै १९६५ रोजी बटुकेश्वर दत्त यांची प्राणज्योत मावळली, निधनानंतर त्यांचे अंतिम संस्कार जिथे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे अंत्यसंस्कार झाले होते अशा हुसैनीवाला येथेच करण्यात आले.

बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्या मातोश्री विद्यावती देवी

भारताच्या इतिहासातून आणि लोकांच्या मनातून जरी तुम्ही विस्मृतीस गेला असाल तरी तुमच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचे विचार जिवंत ठेवणे आमच्यासारख्या क्रांतीवेड्यांचे आद्य कर्तव्य आहे. अखेर शाहीर दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांच्या चार ओळींनी लेखणी थांबवतो_____

त्यांचेच उभारा पुतळे, जे स्वातंत्र्यास्तव लढले !
त्यांचीच मंदिरे बांधा, जे रणांगणावर निजले !
त्यांचेच करा उत्सव हो, देशार्थ बळी जे गेले !
हे जिवंत इतिहासाचे,
पाठची नव्या पिढीचे,
होतील भविष्यीं साचे,
विख्यात कुले ती झाली, देशाच्या संकट काळी ||

बटुकेश्वर दत्त यांना नमन !


संदर्भ सूची :-

  1. Abhilekh Patal File – Petition from Bhagat Sint and B.K. Dutt together in Lahore Conspiracy Case
  2. Abhilekh Patal File – Train of Crown Vs. Bhagat Singh and Bhatukeshwar Dutta 1929
  3. भगत सिंह जेल डायरी – यादविंदर सिंग संधू
  4. शहीद भगत सिंह समग्र वाङ्मय – दत्ता देसाई
  5. मृत्युंजयचा आत्मयज्ञ :- वि.श्री.जोशी
  6. भगतसिंग और ऊनके साथियो के संपूर्ण उपलब्ध दस्तऐवज – राहुल फाउंडेशन
  7. Interview with Bharti Datta Bagachi || Daughter Of Batukeshwar Dutt
  8. DNA: Revolutionary जिसे आजाद भारत ने भुला दिया

लेखनसीमा !

लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

1
Please leave a feedback on thisx


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.

शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
रोहन गाडे
रोहन गाडे
3 years ago

अप्रतिम लेख लिहला आहे.
बटुकेश्वर दत्त जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🙏

Dr Pooja Sargar
Dr Pooja Sargar
1 year ago

Thank you so much for such initiative.
क्रांतिकारकांचा संघर्ष, मातृभूमी‌ प्रती असलेलं प्रेम हे इतिहासाच्या पुस्तकातील एका ओळीत सामावणारे नक्कीच नाही. सध्याच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी हे परीक्षार्थी बनत चालले आहेत तुम्ही त्यांना ज्ञानार्थी बनवण्याचे काम करत आहात.
खूप शुभेच्छा 🌻 ्