You are currently viewing आजादी के परवाने – हुतात्मा भगतसिंग

आजादी के परवाने – हुतात्मा भगतसिंग

राष्ट्रस्वातंत्र्यता हे एक आणि एकमेव ब्रीद ध्येयवेड्या क्रांतिकारकांनी आयुष्यभर उराशी बाळगलं. कधी स्वकीयांकडून तर कधी परकीयांकडून अन्याय-अत्याचार झाले, तरीही पथभ्रष्ट होण्याचा टुकार विचार त्यांच्या पवित्र मनाला स्पर्षदेखील करू शकला नाही. पण, निव्वळ बलिदानानेच क्रांतिकारक वेगळे ठरत नाहीत, तर त्यांच्या आचरणातही तितकंच वेगळेपण आढळून येतं. केवळ शस्त्रास्त्रे म्हणजे क्रांती नव्हे, याची प्रचिती क्रांतिकारकांच्या जीवनात ठायी ठायी पाहायला मिळते. भारतीय क्रांतिकरकांतील मेरूमणी म्हणजे हुतात्मा भगत सिंग. जवळपास २०१६-१७ च्या आसपास, भगतसिंग यांची भाची वीरेंद्र संधू यांचं “सरदार भगतसिंग पत्र और दस्तऐवज” हे पुस्तक हाती पडलं, अन भारतीय क्रांतीसमरातील ध्रुवताऱ्याचा आयुष्यात चंचुप्रवेष झाला. तेव्हापासून आजवर भगतसिंग यांवर बरंच वाचन झालं. कधी काळी लिहीलेली पत्रे, लेख, जेल डायरी यांमधून भगत सिंग ने जे विचार प्रकट केले त्यांनी अक्षरशः वेड लावलं. थोडक्यात भगत ने आयुष्यात खूप काही शिकवलं !

२8 सप्टेंबर, भगतसिंग यांची जयंती. दुर्दैवाने आजच्या काळात निव्वळ साँडर्स वधाइतकेच भगतसिंग आम्हाला ठाऊक असतात, परिणामतः भगत म्हणजे शस्त्रे, गोळ्या, बंदुका ही छवी तरुणांच्या मनात निर्माण होते. याचं कारण म्हणजे “Revolution is not just cult of bomb and pistol” म्हणणारे भगतसिंग आमच्या तरुणांनी वाचलेलेच नसतात. आजवरच्या आयुष्यात फुल नव्हे, फुलाच्या पाकळी एव्हढे मला समजलेले भगतसिंग वाचकांसमोर मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच.

Bhagat Singh at the age of 21
असेंम्बली बॉम्ब केस दरम्यान प्रसिद्ध झालेलं भगतसिंगांचं छायाचित्र ह्यावेळी ते 21 वर्षांचे असावेत. हे छायाचित्र ८ एप्रिल १९२९ रोजी रामनाथ यांच्या, काश्मीर गेट स्टुडियो मध्ये काढण्यात आल होत.

1. शरीराने कमजोर पडलेला भगत सिंह जेव्हा मनाने बोलू लागतो !

१० जुलै १९२९
लाहोर कॉन्स्पिरसी केसला ज्यावेळी न्यायालयात सुरुवात झाली, तेव्हा भगत सिंह उपोषणावर होते. हो त्याच जगप्रसिद्ध ११४ दिवसांच्या उपोषणावर ! असेंम्बली बॉम्ब केसमध्ये भगत सिंहला आधीच आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता पुन्हा आणखी एक केस त्यांच्यावर होणार होती आणि त्यांचे सर्व साथीदार न्यायालयात उपस्थित होते.महिन्याभरापेक्षा जास्त काळ झाला, अन्नाचा एक कणदेखील पोटात गेला नव्हता. त्याच अर्धमेल्या परिस्थितीत भगत सिंह न्यायालयात हजर राहिला. सर्वात सुंदर दिसणारा, धडधाकट असणारा आणि सगळ्यांना पुरून उरणाऱ्या भगत सिंहला जेव्हा स्ट्रेचरवर न्यायालयात आणले, तेव्हा त्याची अवस्था पाहून सगळ्यांनाच रडू कोसळले. सर्व अस्वस्थ झाले, हा नक्की आपलाच भगत आहे ना ? असा प्रश्न त्यांच्या मनी घोंघावत होता. न्यायालयात त्यांचे साथीदार ज्या भगत सिंहला भेटले ती केवळ त्याची सावली होती, शरीराने अतिशय कमकुवत झालेली !

Assembly bomb case news headline
असेंबलीमध्ये बॉम्ब फेकल्याची वर्तमानपत्रात आलेली बातमी

कित्येक महिने तुरुंगात यातना भोगल्यामुळे आणि अत्यंत कडक उपोषणामुळे त्याचं बलाढ्य शरीरात अगदी सडपातळ झालं होतं. सगळे साथीदार भेटल्यानंतर त्यांनी भगतला मिठी मारली आणि त्यानंतर जवळपास तीन दिवस साथीदारांनी आपल्याला न्यायालयात कोणकोणत्या गोष्टी मांडायच्या आहेत यावर त्यांनी चर्चा केली, रणनीती आखली. भगत सिंह इतका कमजोर होता की न्यायालयात बोलत असताना सतत त्याला खुर्चीवर बसवण्यात येत होते, अस्वस्थ असतानाही त्याने न्यायालयात आपली निर्णायक भूमिका पार पाडली, विविध मुद्दे मांडले. विशेष म्हणजे त्यानंतर आणखी ५० ते ६० दिवस सर्व क्रांतिकारकांनी मिळून उपोषण केले आणि या उपोषणात जतीन दास शहीद झाले होते.

2. पुस्तकप्रेमी भगत !

भगत सिंह आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या उपोषणामुळे क्रांतीकारकांना तुरुंगात वर्तमानपत्र, पुस्तके आणि लिहिण्यासाठी इतर गोष्टी पुरवण्यात आल्या होत्या. पुस्तकांची सुविधा मिळाल्यामुळे तुरुंगात वाचन-लेखनाचे वातावरण तयार झाले होते. यामुळे क्रांतीकारकांसह इतर कैद्यांमध्ये सैद्धांतिक आणि राजकीय विषयांवर चर्चा व्हायला लागली होती.  विशेष म्हणजे भगत सिंहच्या येण्याने त्यांना नवा श्वास मिळाला होता. तुरुंगात एकही विषय सुटत नव्हता, तत्कालीन महत्त्वाच्या विषयांवर वादविवाद सुरू व्हायचे. कोणीही एखादे नवीन पुस्तक वाचले असेल तर त्यावर चर्चा, मार्क्सवाद, सोव्हिएत संघाची भरारी, अफगाणिस्तान विवाद, चीन-जपान दरम्यानचे विवाद,  लीग ऑफ नेशन्सचा चुकीचा कारभार, मेरठ केस, कामगारांचा-शेतकऱ्यांचा संघर्ष, भारतीय मध्यम वर्गीयांची भूमिका, काँग्रेसच्या करामती अशा विविध विषयांवर चर्चा सुरूच होती.

Bhagat Sing During college days
लाहोर नॅशनल कॉलेज मध्ये शिकत असताना, नाटकात भाग घेतला तेव्हाचे छायाचित्र (भगतसिंग मागील रांगेत डावीकडून चौथे)

भगत सिंहचा एक लिओनीड एन्ड्रीव्ह नावाचा आवडता लेखक होता. एकदा त्याच्या ‘द सेव्हेन हु वेअर हँग्ड’ या पुस्तकातील एक प्रसंग भगत सर्वांना वाचून दाखवत होता. पुस्तकातील एका पात्राला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यावेळी तो जोरजोरात म्हणत होता, ‘मला फाशीची शिक्षा नको’!
भगत ही गोष्ट सांगताना जेव्हा या प्रसंगापर्यंत पोहोचला तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते. त्यावेळी फाशीची शिक्षा झालेल्या आपल्या मित्राच्या मुखाने याच संबंधित गोष्ट ऐकताना सर्वांना गहिवरून आले. मुळात भगतनेही आपल्याला फाशी नको तर गोळ्या झाडाव्यात, अशी मागणी केली होती, मात्र ही मागणी अमान्य करण्यात आली. भगत सिंहच्या फाशीच्या काही तासांपूर्वी त्याचे वकील  प्राणनाथ मेहता यांनी व्लादिमिर लेनिनचे पुस्तक दिले होते. काही तासांतच आपला मृत्यू होणार आहे, या विचाराने भगत ते पुस्तक भरभर वाचत होता, असे प्राणनाथ यांनी नमूद केले आहे. मृत्यू समीप असतानाही वाचनाची, पुस्तकांची अशी ओढ भगत सिंहला खऱ्या अर्थाने एक खंदा पुस्तकप्रेमी ठरवते.

3. मरण मारुनी पुढे निघाले, गर्व तयांचे कोण हरी !

भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी फाशीची शिक्षा सूनावल्यानंतर तिघांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आले होते आणि इतर साथीदारांना त्यांच्यापासून दूर दुसऱ्या कोठडीत ठेवले होते. एका रात्री अचानक इतर साथीदारांच्या कोठडीचे टाळे खोलण्यात आले आणि त्यांना एका अंधाऱ्या ठिकाणी नेण्यात आले. तिथे तुरुंगाच्या अधिकाऱ्याने सर्व साथीदारांना विचारले, ‘अपने साथियो से मिलना चाहोगे ?’ सर्वांनीच होकार दिला आणि त्यांना भगत सिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या कोठडीबाहेर नेण्यात आले. आयुष्यात पुन्हा आपल्या या तिन्ही साथीदारांना कधीही पाहू शकणार नाही, याच विचारांनी त्यांचे मन बिथरले होते. थोडा वेळ चर्चा करून निरोप घेताना जयदेव कपूरने यांनी भगतला एक प्रश्न विचारला, ‘सरदार… तुझं मरण जवळ आहे, पण या गोष्टीचे तुला कसलेही दुःख नाही का ?

Bhagat, Rajguru, Sukhdev Execution headline in The Tribune
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीबद्दल द ट्रिब्युन मध्ये छापून आलेली बातमी

प्रश्न ऐकून सरदार जोरजोरात हसायला लागला आणि नंतर गंभीर होऊन बोलू लागला, तो म्हणाला, ‘क्रांतीच्या मार्गावर पाऊल ठेवताना मी हाच विचार केला होता की, आपले जीवन अर्पण करून देशाच्या कानाकोपऱ्यात इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा पोहोचवू शकलो तर मला माझ्या जीवनाचे मूल्य मिळाले, असे समजेन’. आज मी फासाच्या तख्ताच्या जवळ आहे, मात्र तरीही तुरुंगातील या लोखंडी सळईंच्या मागे बसूनही देशवासीयांद्वारे दिलेली ही घोषणा मी ऐकू शकतो. मला विश्वास आहे की मी दिलेली ही घोषणा स्वातंत्र्य लढ्यात एक असीम शक्ती बनून, साम्राज्यवादी विचारसरणीवर जोरदार प्रहार करेल.’ एवढं बोलून तो थांबला आणि पुन्हा म्हणाला, ‘एवढ्या लहानग्या आयुष्याचं यापेक्षा अधिक मूल्य काय असू शकतं ?

Bhagat Singh Death warrant
भगत सिंग चे डेथ वॉरंट

सर्व साथीदार रडू लागले. यावर भगत म्हणाला, ही भावुक होण्याची वेळ नाही. मी काही दिवसांमध्येच मुक्त होऊन जाईन, मात्र तुम्हा सर्वांना अजून दूर जायचं आहे. माझा तुम्हा सर्वांवर विश्वास आहे की, मी नसतानाही स्वातंत्र्य लढ्याचा हा संघर्ष तुम्ही कायम ठेवाल. कोणीही हार मानायची नाही, अखेरपर्यंत लढायचं !

भगतच्या त्या शब्दांनी ओघळणाऱ्या त्या अश्रूंमध्येही धगधगती ज्वाला निर्माण केली होती.
भगत, सुखदेव, राजगुरू आणि सर्व साथीदारांची ही अखेरची भेट ठरली.

Bhagat Singh Death Certificate
भगतसिंग च डेथ सर्टिफिकेट

आसमान में गुंज उठा ये इंकलाब का नारा है…
आफत मे ढहा मुल्क बचाने भगत सिंग वो आ रहा है…

फींरगीओंको खदेड उसने ‘आजाद’ को संग लिया…
इत्तेहाद की मिसाल देकर आजादी का रंग दीया…
खुन बहाने उमड पडा ये लोगों का जग सारा है…
आफत मे ढहा मुल्क बचाने भगत सिंग वो आ रहा है…

जिस्म हो गया लहुलुहान इन अंग्रेजो की मारो से..
कुछ फुट गए कुछ टुट गए, पर हटे ना उनके विचारों से…
मौत भी उनसे खौफ खाती, वतन ही उन्हे प्यारा है…
आफत मे ढहा मुल्क बचाने भगत सिंग वो आ रहा है…

राजगुरू और सुखदेव ये साथी जैसे आँधी है…
हसकर-गाकर तख्तपें चढके इन्होंने फाँसी बाँधी है…
साथ जिये और मरे साथ भी, जाँ से प्यारे ये यारा है…
आफत मे ढहा मुल्क बचाने भगत सिंग वो आ रहा है…

शहीद होकर नौजवानोंको क्रांती की नई मिसाल दी…
जिसकी आग कभी ना बुझे ऐसे देशभक्ती की मशाल दी…
रग-रग मे दौडती आज भी अखंड ये विचारधारा है
आफत मे ढहा मुल्क बचाने भगत सिंग वो आ रहा है…

सागर जाधव
हुतात्मा भगतसिंग यांना नमन

संदर्भ सूची :-

  • संस्मृतियाँ – शिव वर्मा
  • क्रान्तिकारी आन्दोलन कुछ अधखुले पन्ने – धर्मेन्द्र गौड़

लेखनसीमा !

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.

शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments