सबंध विश्वातील मानवजातीचा इतिहास पाहता, जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात धर्माचा अधर्मासोबत, सज्जनांचा दूर्जनासोबत, न्याया चा अन्यायासोबत संघर्ष होतच राहिला आहे. किंबहुना हीच जगाची रीत बनून राहिली आहे. अशाच प्रकारच्या संघर्षातून व्यक्ती आणि विचारधारा उदयास येतात. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला गीता सांगणारा योगेश्वर, पाच – पाच इस्लामी पातशाह्यांच्या छाताडावर पाय देऊन बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फासावर चढणारा भगतसिंग… अशी आणखी अगणित उदाहरणे देता येतील. समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, क्रूरता जेव्हा वाढीस लागते तेव्हा तत्कालीन व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक अस्मितेचा उद्रेक होतो, हीच क्रांती !
भारतीय स्वातंत्र्य समरात आझाद हिंद सेनेतील झांसी की रानी रेजिमेंटचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या, स्वातंत्र्यानंतर वैद्यकीय सेवेच्या रुपात आपलं कौशल्य भारतमातेच्या चरणी अर्पण करणाऱ्या, अनेक राजकीय वा सामाजिक कार्यामध्ये झोकून देणाऱ्या एका अज्ञात देशभक्त वीरांगणेची अर्थात कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांची ही कहाणी…!

क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब आणि पिस्तूलाचा वापर नव्हे. तर क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे. क्रांती ही ईश्वरविरोधी असू शकते, पण ती नक्कीच मानव जातीच्या विरुद्ध नसते.
शहीद भगत सिंह
बालपण
कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१४ रोजी मद्रासमध्ये झाला. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते, तर आई सामाजिक कार्यकर्त्या व स्वातंत्र्य सेनानी होत्या. लहानपणापासूनच लक्ष्मी फारच शुर होत्या. ज्या काळात खालच्या जातीतील लोकांचा स्पर्श सुद्धा विटाळ समजला जात असे, त्या काळात लहान लक्ष्मी आदिवासी मुलींसोबत हातात हात धरून मनसोक्त खेळायची. १९३८ साली लक्ष्मी यांनी डॉक्टरेटची पदवी मिळवली.

आझाद हिंद सेनेत भरती
आपले वैद्यकीय शिक्षण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कामी आलं तर… असा विचार त्यांच्या मनात एकदा आला. याचदरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद फौजबद्दल लक्ष्मी यांना माहिती मिळाली आणि ही संधी न दवडता त्या फौजमध्ये प्रवेश करण्यासाठी १९४० साली सिंगापूरला गेल्या आणि फौजेत भरती झाल्या. तिथे त्यांनी भारतातून स्थलांतरित गरीब लोकांसाठी हॉस्पिटल चालू केलं. सिंगापूर मधील वास्तव्यात लक्ष्मी यांनी जखमी भारतीय सैनिकांची सेवा करण्यासही सुरुवात केली. याचदरम्यान सुभाषबाबूंची तब्बल ५ तास मुलाखत घेतली होती. याच मुलाखतीत स्त्रियांसाठी झांसी की रानी रेजिमेंटच्या स्थापनेची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या रेजिमेंटची कल्पना नेताजींना खूप आवडली, ८ जुलै १९४३ रोजी झांसी की रानी रेजिमेंटमध्ये स्त्रियांच्या भरतीला सुरुवात झाली आणि या दलात १५०० महिला सैनिक व २०० नर्सेस सामील करण्यात आल्या. २३ ऑक्टोबर १९४३ रोजी रंगून येथे रेजिमेंटच्या स्त्रियांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. याचदरम्यान त्यांची भेट सरस्वती राजमणी, नीरा आर्या आणि इतर महिला योद्धांशी झाली.

१९४५ दरम्यान ब्रिटिशांकडून आजाद हिंद फौजेच्या सैनिकांची धरपकड सुरू झाली होती आणि मे १९४५ रोजी त्यांना ब्रिटिश सैन्याने कैद केले आणि जवळपास मार्च १९४६ पर्यंत बर्मा येथे नजर कैदेत ठेवण्यात आले, त्यानंतर भारतात रवानगी करण्यात आली. यानंतर त्यांची ओळख आझाद हिंद सेनेतील प्रेम सेहगल यांसोबत झाली आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७ साली लक्ष्मी आणि प्रेम विवाहबंधनात अडकले. १९४७ नंतर त्यांनी राजकीय चळवळींमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली व १९७१ मध्ये लक्ष्मी कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्य झाल्या. १९७१ मधील भारत-पाक युद्धातील जखमी सैनिकांना औषधोपचार करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

१९९८ साली भारत सरकारने लक्ष्मी सेहगल यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २००२ साली माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध त्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूकही लढल्या होत्या. २३ जुलै २०१२ रोजी वयाच्या ९७व्या वर्षी कानपूरमधील एका रुग्णालयात या महान वीरांगनेचं निधन झालं. त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या शौर्याला नमन!