हम अम्न चाहते हैं मगर ज़ुल्म के ख़िलाफ़,
साहिर लुधियानवी
गर जंग लाज़मी है तो फिर जंग ही सही!
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात अग्रणी नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस ! ब्रिटिशांना सर्वात जास्त धाक होता तो याच माणसाचा, कारण त्यांनी ‘आजाद हिंद फौज’ उभारली होती. साम्राज्यवादाला जर गाडायचं असेल तर लढा गरजेचा आहे, मग त्या लढ्यात आपले प्राण गेले तरी बेहत्तर ! नेताजींच्या या आजाद हिंद फौजेने राष्ट्राला अगणित वीरांची ओळख करून दिली आणि याच फौजेतील मुख्यत्वे महिला योद्धा विशेष रूपाने देशवासीयांच्या स्मरणात राहिल्या. झांशी की रानी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल, सरस्वती राजमणी अशा अनेक वीरांगनांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी हातात शस्त्र उचलले. मात्र याच रेजिमेंटची एक अशी बहादूर योद्धा जी इतिहासात सदैव दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे नीरा आर्या ! स्वातंत्र्यासाठी, नेताजींसाठी प्रसंगी स्वतःच्या गुप्तहेर पतीलाही गोळ्या झाडणाऱ्या, कैदेत असताना देशासाठी असह्य वेदना सहन करणाऱ्या नीरा आर्या आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी हैदराबादमध्ये फुलं विकून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण करत होत्या, हे आपलं दुर्दैव ! आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, पण ही महान वीरांगना कोणालाही माहीत नाही, हे फार दुःखद आहे. अशा अगणित वीरांचा खरा इतिहास भारताच्या युवकांपर्यंत यावा, यासाठी हे दोन शब्द नीरा आर्याजी यांच्या चरणी अर्पण !
बालपण आणि आजाद हिंद फौजेत भरती
नीरा आर्या यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या खेकडा या गावी ५ मार्च १९०२ रोजी झाला होता. ८ वर्षांच्या असताना त्यांच्या आई लक्ष्मी देवी आणि वडील महावीर यांचे निधन झाले. अनाथ झालेल्या नीरा यांच्यावर आपला लहान भाऊ बसंत यांचीही जबाबदारी आली. त्याकाळी खेकडा गावात आर्य समाजाचं एक संमेलन भरलं होतं, ज्यात अनेक श्रीमंत लोकं अनाथ मुलांना दत्तक घेण्यासाठी आले होते. यावेळी दोघांनाही एका कुटुंबाने दत्तक घेतले. नीरा यांचे संपूर्ण शिक्षण कोलकातामध्ये झाले. शिक्षणानंतर एक साधं-सुधं आयुष्य जगावं यासाठी त्यांनी श्रीकांत जयरंजन दास यांच्यासह विवाह केला. पण त्यांना याची किंचितही माहिती नव्हती की आपला पती हा ब्रिटिशांचा गुप्तहेर आहे आणि त्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना पकडण्यात ब्रिटिशांची मदत केली आहे. याचदरम्यान नीरा यांना ही माहिती मिळाली की आपला पती ब्रिटिशांसोबत मिळून नेताजींची हत्या करण्याची योजना करत आहे. ही गोष्ट नीरा यांना पटली नाही आणि त्यांनी आपल्या पतीसमोर सरकारी नोकरी किंवा मी, असा प्रस्ताव ठेवला. यावर पतीने सरकारी नोकरीला निवडलं आणि नीरा घर सोडून माहेरी परतल्या. आपला पती राष्ट्रविरोधी कृत्य करतो, हे त्यांना सदैव दुःख देत राहिलं. आपल्या माहेरी शाहदरा येथे त्या लहान मुलांना संस्कृत आणि इंग्रजीचे शिक्षण द्यायला लागल्या. याचदरम्यान त्यांच्या राम सिंह नामक मित्राकडून आजाद हिंद फौजमध्ये सामील होण्याची माहिती त्यांना मिळाली आणि कसलाही विचार न करता त्या आपला बंधू बसंत, सरदार सिंह तूफान, रतन सिंह, रामलाल, उमराव सिंह, मुरारी आर्य, कर्ण सिंह तोमर, लहरी सिंह, सिरदारे आणि गिरवर सिंह या इच्छुकांसह आजाद हिंद फौजेत प्रवेश घेण्यासाठी सिंगापूरला निघाल्या आणि इथेच त्यांचा स्वातंत्र्य लढ्याचा प्रवास सुरु झाला.
आजाद हिंद फौजच्या पहिल्या गुप्तहेर
नीरा आजाद हिंद फौजेच्या एक धडाडीच्या सेनानी म्हणून नावारूपास आल्या होत्या. फौजेत त्यांची निवड झांसी की रानी रेजिमेंटमध्ये करण्यात आली. फौजेच्या प्रथम कमांडर डॉ. लक्ष्मी सहगल यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले. नीरा आर्या प्रत्येक गोष्टीत तरबेज झाल्या होत्या त्यामुळे त्यांचीही फौजेच्या गुप्तहेर विभागासाठी निवड करण्यात आली. आपला पती राष्ट्रद्रोही असला तरी आपण राष्ट्राभिमान जिवंत ठेवून आपले कर्तव्य पार पाडू, हा निर्धार त्यांनी केला होता. सरस्वती राजामणि, जानकी, बेला, दुर्गा आणि नीरा आर्या या महिलांना गुप्तहेर विभागासाठी निवडण्यात आलं होतं. यासोबतच नीरा यांना भारत देशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर असा सन्मान मिळाला. पुरुषांसारखी वेशभूषा करून या ५ जणींनी ब्रिटिशांकडे घरकाम करणे सुरू केले. मात्र याच दरम्यान दुर्गा यांना पकडण्यात आलं आणि त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. यावेळी सरस्वती आणि नीरा किन्नरांची वेशभूषा करून बंदीगृहाच्या जवळ पोहोचल्या आणि ब्रिटिश पोलिसांना गुंगीचे पदार्थ खाऊ घालून दुर्गा यांना सोडवले. मात्र काही सैनिकांना शुद्ध आली आणि त्यांनी पाठलाग करून गोळीबार केला, यातलीच एक गोळी सरस्वती यांच्या पायाला लागली. जखमी अवस्थेत त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि जीव वाचवला. तिघी जेव्हा सुखरूप कॅम्पमध्ये पोहोचल्या, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची भरपूर प्रशंसा केली आणि नीरा यांना कॅप्टन ही रँक बहाल करण्यात आली आणि त्या नेताजींच्या अंगरक्षक म्हणून कार्यरत झाल्या.
देशासाठी आणि नेताजींसाठी पतीची हत्या
नीरा यांचा पती ब्रिटिशांचा हेर होता ही बाब सुभाष बाबूंपासून फौजेतील इतर सैनिकांनाही माहीत होती, मात्र कधीही कोणीही त्यांच्यावर यावरून संशय केला नाही, हीच आजाद हिंद फौजेची शिकवण होती. एकदा नीरा रात्रीच्या वेळी नेताजींच्या सुरक्षेत तैनात होत्या. याचवेळी कोणीतरी कॅम्पजवळ आहे, असा आभास त्यांना झाला. त्यांनी २-३ वेळा चेतावणी दिल्यानंतर चक्क त्यांचे पती श्रीकांत जयरंजन दास हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उभे होते. क्षणातच श्रीकांतने नेताजींवर गोळी चालवली, जी नेताजींचा ड्रायव्हर निजामुद्दीनला लागली. मात्र आता स्वतःच्या सौभाग्याचा विचार न करता मातृभूमीसाठी लढणाऱ्या नेताजींना वाचवणं गरजेचं आहे, हा विचार मनात आणत स्वतःजवळ असलेली रायफल त्यांनी पतीवर ताणली आणि रायफलपुढे असणारे टोकदार शस्त्र संगीन श्रीकांतच्या पोटात घुसवून त्याला ठार केलं. राष्ट्रासाठी स्वतःचं कुंकू स्वतःच्या हाताने पुसणाऱ्या नीरा पहिल्या आणि शेवटच्या महिला स्वातंत्र्यसैनिक ! आपला पती गेला यापेक्षा जास्त त्यांना नेताजींचा जीव वाचला, याचं समाधान होतं. यानंतर आजाद हिंद फौजसाठी एक गुप्तहेर म्हणून अनेक मोहिमा त्यांनी पार पाडल्या. नेताजींनी नीरा यांना नागीन हे नाव दिलं !
तुरुंगात अनन्वित अत्याचार सहन करणारी योद्धा
स्त्रीच्या शरीरावर तिच्या चेहऱ्याव्यतिरिक्त तिचं खरं आभूषण म्हणजे स्तन ! हेच स्तन तान्ह्या बाळांना दूध पाजत उद्याची उज्ज्वल पिढी घडवत असतात. पण विचार करा, तुमच्यासमोर तुमचे हेच स्तन कापले गेले तर ?
नीरा आर्या यांनी आपल्या आत्मकथेत त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांचं वर्णन केलं आहे, जे वाचून तुमच्या डोळ्यात निश्चितच पाणी येईल.
१३ मे १९४५
‘आम्हाला अटक केल्यानंतर जेव्हा कोलकाताहून अंदमान येथे आणण्यात आलं, तेव्हा आमच्या राहण्याचे स्थान कोठडीतच होतं. जिथे आमच्याव्यतिरिक्त इतर राजकीय महिला अपराधी होत्या. आम्हाला साखळदंडात रात्री कोठडीत बंद करण्यात आलं आणि चटई, घोंगडी अशी एकही गोष्ट दिली नाही.
माझ्या आणि भारत मातेच्या मधोमध ते केवळ लोखंडाच्या सळईंचं बंधन आलं होतं. अशा कित्येक रात्र आम्ही काढल्या होत्या.
एके दिवशी सकाळी मला खाण्यासाठी खिचडी देण्यात आली आणि त्यासोबत एक लोहार आला, जो आमच्या हातात असलेले साखळदंड कापता कापता त्याने माझ्या हाताचे थोडे चामडे कापले. मी सहन करत राहिले. यानंतर पायातली साखळी काढत असताना माझ्या पायाचं हाड किती मजबूत आहे, याची हातोड्याने तो चाचपणी करत होता.
बळ नव्हतं पण मी त्याला बोलली, ‘आंधळा आहेस का ? पायाला का मारत आहेस ?
यावर तो म्हणाला, ‘पाय काय, आम्ही तुझ्या छातीवर जरी मारलं, तरी तू काहीही करू शकणार नाहीस !
यावर मी म्हणाले, ‘तुमच्या या साखळीत आहे म्हणून काही करू शकत नाही’, महिलांचा सन्मान करायला शिका.’ असे बोलून मी त्याच्या तोंडावर थुंकले.
त्यावेळी जेलरसुद्धा तिथेच होता, तो कडक आवाजात म्हणाला, ‘तुला आम्ही सोडून देऊ जर तू सांगशील की, नेताजी कुठे आहेत ?
मी उत्तर दिलं, ‘त्यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं, हे संपूर्ण जगाला माहीत आहे !’
त्यावर जेलर म्हणाला, ‘मला शिकवू नकोस, खोटं बोलू नकोस, आम्हाला माहीत आहे नेताजी जिवंत आहेत, ते कुठे आहेत ते सांग ?”
यावर मी म्हणाली, ‘माझ्या हृदयात ते सदैव जिवंत आहेत!’
यावर जेलरला राग आला आणि तो म्हणाला, ‘बरं ठीक आहे, तुझ्या हृदयातून आता बाहेरच काढतो त्यांना ! आणि त्याने पुन्हा एकदा लोहाराला बोलावलं. लोहाराने अक्षरशः माझे कपडे फाडले, इतक्या पुरुषांसमोर मी अर्धनग्न पडली होती. लोहाराने एक झाडाची पानं कापण्याचं अवजार (ब्रेस्ट रिपर) स्वतःसोबत आणलं होतं. मला यांची कसलीही कल्पना नव्हती की, आता हे माझ्यासोबत काय करणार आहेत. दोन शिपायांनी मला पकडलं आणि तो लोहार माझ्या स्तनांना विचित्र नजरेने पाहू लागला. त्याने त्या अवजारात माझ्या डाव्या स्तनाला धरलं आणि तो ते कापायला निघाला. मात्र त्यात धार नसल्याने माझ्या स्तनांना जखमा झाल्या आणि तो पुन्हा एकदा दोन्ही स्तनांना अशाच प्रकारे असह्य पीडा देऊ लागला. हा प्रकार खूप वेळ चालला, ज्यामुळे या वेदना मला असह्य झाल्या होत्या.
एवढ्यात जेलरने माझी मान धरली आणि म्हणाला,
जर पुन्हा तोंड चालवशील तर तुझे हे दोन्ही फुगे छातीपासून वेगळे केले जातील.
त्याच अवजाराने माझ्या नाकावर जोरदार प्रहार करत जेलर म्हणाला, ‘महाराणी व्हिक्टोरिया यांच्यामुळे तू वाचलीस, नाहीतर हेच अवजार आगीमध्ये गरम करून तुझे हे दोन्ही पुढे आलेले भाग पूर्णपणे आम्ही उखडून काढले असते.’
(सदर प्रसंग नीरा आर्या यांच्या ‘मेरा जीवन संघर्ष’ या आत्मकथेतील आहे. हिंदीतून भाषांतर करताना कुठेही छेडछाड केली गेली नाही किंवा अतिरिक्त शब्द वापरण्यात आले नाहीत.)
शत्रुच्याही वाट्याला असे प्रसंग येऊ नयेत, जे नीरा आर्या यांच्यावर आले आहेत. हे सर्व त्यांनी कोणासाठी केलं ? तुमच्या -आमच्यासाठीच ना… आणि आपण त्यांना याच्या मोबदल्यात काय दिलं हे पुढे जाणून घ्या !
माफ कर गं नीरा आई!
ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचं निधन झालं असं घोषित करण्यात आलं होतं. यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या महान विरांगनेला इतक्या हलाखीच्या परिस्थितीत राहावं लागेल, असं कधीच वाटलं नव्हतं. सोयरे उरले नव्हते, कुटुंब उरलं नव्हतं, फक्त स्वतंत्र झालेला देश हीच एक उमेद घेऊन त्या आपलं आयुष्य जगत होत्या. त्यांचे स्थानिक गाव खेकडा येथील एक लेखक तेजपाल धामा यांनी त्यांच्या पुस्तकात नीरा आर्यांच्या अखेरच्या दिवसांचं वर्णन केलं आहे. स्वातंत्र्य लढ्यासह नीरा यांनी हैदराबाद मुक्ती संग्राममध्येही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी त्या हैदराबादच्या चार मिनार येथे एका झोपडीत राहत होत्या. फुलं विकून आपला गुजराण त्या करत होत्या. त्यांची झोपडीसुद्धा तोडण्यात आली, कारण ती सरकारी जमीन होती. वृद्धावस्था आणि आजारपण या गोष्टी एकत्र आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नियतीने काळाचा घाला घातला आणि ही वीरांगना २६ जुलै, १९९८ रोजी एका गरीब, असहाय्य, आजारी वृद्ध बाईच्या रुपात मरण पावली. एकेकाळी आजाद हिंद फौज आणि स्वातंत्र्य लढा गाजवणारी महान महिला अशा प्रकारे या भारत भूमीला सोडून गेली, हेच आपल्या भारतीयांचं दुर्दैव ! त्यांचे अंत्यसंस्कार चित्रकार एम. एफ. हुसेन आणि पत्रकार तेजपाल यांनीच केले. स्वातंत्र्यासाठी आपल्या या शूरवीरांनी रक्त सांडलं, आज आपण जो मोकळा श्वास घेत आहोत, तो याच योद्धांनी दिलेल्या बलिदानामुळे ! असे कित्येक योद्धे विस्मरणात गेले आहेत, त्यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, त्यांचे बलिदान, हे आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न !
कॅप्टन नीरा आर्या यांना सलाम !