
“दुश्मन की गोलियों का सामना करेंगे ,
’आजाद ’ ही रहे हैं, ‘आजाद ’ ही रहेंगे !”
— हुतात्मा चंद्रशेखर आजाद
२७ फेब्रुवारी १९३१,
अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये अचानक ब्रिटिश पोलिसांचा वेढा पडला. कोणा एका बहुरूपी माणसाला पकडण्यासाठी एवढी मोठी फौज तैनात करण्यात आली होती. अचानक गोळीबार सुरू झाला… एकीकडे २० ते २५ पोलीस सतत फायरिंग करत होते आणि दुसरीकडे एक धिप्पाड देहयष्टीचा, निग्रही वृत्तीचा, पिळदार मिश्या असलेला आणि डोळ्यात स्वातंत्र्याच्या मशालीची ज्वाला भडकत असणारा एक क्रांतिकारी अवलिया ! आपल्या डाव्या हाताने माऊजर पिस्तूल चालवत पोलिसांना अक्षरशः रडकुंडीला आणले होते. याच चकमकीत एक गोळी मांडीतून आरपार गेली आणि दुसरी गोळी उजव्या दंडावर लागली. जखमी पडला… पण शरण गेला नाही. भिल्लांच्या पोरांसोबत नेमबाजी शिकलेल्या या ‘क्विक सिल्व्हर’ला पकडणं काळालाही शक्य नव्हतं. पिस्तूलात अखेरची गोळी उरली… आयुष्यभर स्वतंत्र राहण्याचा आपला ध्यास मनात आला आणि पिस्तूल माथ्यावर ताणली… गोळी चालली !
त्या दिवशी पहिल्यांदाच अलाहाबादमध्ये एवढ्या मोठ्या जमावाने एका माणसासाठी आक्रोश केला असावा… ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणांनी अवघा शहर दणाणून उठला होता. स्वातंत्र्याचा विचार त्या माणसाच्या मनात, डोक्यात इतका भिनला होता की, त्यासाठी घर, कुटुंबासह वेळेप्रसंगी अन्नाचाही त्याग त्याने केला होता “अब तिरी हिम्मत का चर्चा गैर की महफिल में है…!” या ओळीला अगदी साजेसा भीमपराक्रम या बलदंड माणसाने करून दाखवला होता. त्या महान क्रांतिकारकाचं नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी तथा चंद्रशेखर आजाद !
चंद्रशेखर आजाद यांचं जीवन अनेक रोमांचकारी प्रसंगांनी भरलं आहे. एकाच क्रांतिकारकाच्या जीवनात इतके ऐतिहासिक प्रसंग यावेत आणि त्या प्रसंगांमधून आपल्या चपळ बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याची सुटका व्हावी, असे आजाद हे इतिहासातील एकमेवाद्वितीय ! ज्या प्रकारे ते रूप बदलत होते त्याचप्रकारे त्यांची नानाविध नावेही होती. ‘आजाद आसानीसे हाथ आनेवालों में से नहीं था, वो पलक झपकते ही गायब हो जाता था,’ हे बोलण्यासाठी केवळ एक वाक्य वाटत असलं तरी ब्रिटिशांनी हे प्रत्यक्षात अनुभवलं सुद्धा असेल. साधू, ब्राम्हण, पोलीस, भिकारी, असे कितीतरी वेश बदलून ते ब्रिटिशांना चकवा देत होते. त्यांच्या आयुष्यातील हेच विविध रोचक प्रसंग या लेखाद्वारे आम्ही तुमच्या समक्ष सादर करत आहोत.
चंद्रशेखर आजादांचा जन्म मध्यप्रदेश मधील अलिराजपूर जिल्ह्यातील “भाँवरा” गावी पं.सीताराम तिवारी व जगराणी देवी तिवारी ह्या दांपत्याच्या पोटी “श्रावण शुद्ध द्वितीया शालिवाहन शके 1828 अर्थात 23 जुलै 1906” रोजी झाला. आश्चर्याची गोष्ट अशी की क्रांतिकारकांमध्ये “बलभीम” नावाने प्रसिद्ध असणारे चंद्रशेखर आजाद जन्मतः मात्र अत्यंत कमजोर होते. ऐन तारुण्यात आपल्या भक्कम शरीरयष्टी साठी ओळखल्या गेलेल्या आजादांचे वजन जन्मतः मात्र सामान्य बालकांपेक्षा कमी होते. पुढे मात्र जसं जसं वय वाढत गेलं तस तसं आजादांच शरीर धष्ट पुष्ट बनत गेलं. चंद्रशेखर आजादांच्या जन्माआधी पं. सीताराम अन जगराणी देवी ह्या दांपत्याला 4 पुत्र झाले होते, ज्यांपैकी सर्वात ज्येष्ठ सुखदेव च जिवंत राहिले इतर 3 पुत्र बाल्यावस्थेतच मरण पावले. मोठे बंधू सुखदेव ह्यांचा जन्म 1899 मध्ये झाला होता,ते आजादांपेक्षा 6 वर्षाने मोठे होते. पुढे जाऊन त्यांना गावकडीलच पोस्टात नोकरी मिळाली,जवळपास 2 वर्ष त्यांनी ही नोकरी केली. काही काळाने त्यांना न्यूमोनिया झाला. अंततः 1925 मध्ये आजाराने सुखदेव ह्यांचा मृत्यू झाला.मोठे बंधू सुखदेव ह्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा चंद्रशेखर आजाद “काकोरी कांड केस” मध्ये मुख्य आरोपी असल्या कारणाने फरार होते.
चंद्रशेखर आजाद यांच्या जीवनातील काही अपरिचित प्रसंग पाहू..
“आजाद ” हे नाव कस पडले ?
जवळपास 1919 ते 1922 या काळात गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात “असहकार आंदोलन” छेडलं होतं. देशभरातून ह्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळत होता. आंदोलनामध्ये सभा व्हायच्या, प्रदर्शन व्हायची,नारे दिले जायचे. कित्येकदा ‘असहकार आंदोलनात’ भाग घेणाऱ्यांवर पोलीस लाठीचार्ज करत असत. चंद्रशेखरसुद्धा ह्या काळात सभांना जायचे, भाषणं ऐकायचे अन पोलिसांचे लोकांवरील अत्याचार उघड्या डोळ्यांनी पहायचे. ह्या सर्वांचा त्यांच्या कीशोरावस्थेतील मनावर खोल परिणाम झाला. असहकार आंदोलन चालूच होत तेव्हाच १७ डिसेंबर १९२१ रोजीप्रिन्स ऑफ वेल्सभारतभेटीला आल. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतभर काँग्रेसने राजकुमारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. परिणामतः राजकुमार जिथे ही जात तिथे तिथे त्याच्यावर जनता बहिष्कार टाकत असे, मोठे मोठे मोर्चे निघत. बनारस मधील मोर्चात आजाद सामील झाले. काही आंदोलनकर्ता विदेशी कपड्याच्या दुकानावर धरणं लावून बसले होते. तेव्हाच एका पोलीस इन्स्पेक्टर ने आंदोलकांना बेदम मारहाण चालू केली. हे अत्याचार चंद्रशेखर ला पहावले नाही अन त्यांनी बाजूलाच पडलेला दगड उचलला अन इन्स्पेक्टर च्या डोक्यावर फेकून मारला. नेम एकदम बरोबर लागला होता. इन्स्पेक्टर च डोकं फुटलं,अन तो तिथंच पडला. एका दुसऱ्या पोलिसांने आझादांना हे कृत्य करताना पाहिलं होतं. बनारस मधील जवळपास सर्व धर्मशाळा,विद्यालय अन सर्वच संभाव्य ठिकाणी चंद्रशेखर आजदांची शोधाशोध चालू झाली. अंततः चंद्रशेखर ला पकडण्यात पोलिसांना यश आले अन त्यांनी चंद्रशेखर ला अटक केली. पोलीस स्टेशन मध्ये आणून त्यांनी त्याला हवालात मध्ये बंद केलं.
डिसेंबर 1921 मधील रात्र होती, सेल मध्ये अंथरून, पांघरून ची नीट व्यवस्था नव्हती. पोलिसांनी विचार केला होता ‘हे पोरगं थंडी ला घाबरून माफी मागेल’ पण असं काहीच झाल नाही. शेवटी चंद्रशेखर काय करत आहे हे पाहण्यासाठी अर्ध्या रात्री इन्स्पेक्टर ने आजादांना ठेवलेल्या खोलीचा चा दरवाजा उघडला, पण आतलं दृश्य बघून इन्स्पेक्टर ही आश्चर्यचकित झाला. चंद्रशेखर आजादांनी थंडीपासून वाचण्यासाठी एक नामी युक्ती शोधून काढली होती, खोलीत चंद्रशेखर दंडबैठक लावत होता. त्यामुळेच ऐन डिसेंबर च्या थंडीतही त्याच शरीर घामानं भिजलं होतं. हे सर्व दृश्य बघून पोलीस इन्स्पेक्टर आला त्या पावली परत निघून गेला. दुसऱ्या दिवशी आजादांना न्याल्यात ‘खरेघाट’ नावाच्या एका कठोर अन क्रूर मॅजिस्ट्रेट समोर सूनवाई साठी उभं केलं गेलं. ह्यावेळी चंद्रशेखर आजादांचं वय जवळपास 15 वर्ष होतं.
मॅजिस्ट्रेट खरेघाट त्यांना विचारलं, तुमहारा नाम ?
“आजाद” तत्क्षणी निर्भीड उत्तर आलं.
‘पिता का नाम ?’ मॅजिस्ट्रेट ने पुन्हा कडक शब्दांत प्रश्न केला.
‘स्वतंत्रता’ मान उंच करून, पुन्हा त्याच त्वेषाने उत्तर मिळालं.
या 15 वर्षीय बालकाची हेकडी बघून मॅजिस्ट्रेट च्या तळपायाची आग जणू मस्तकात गेली अन त्यानं पुढचा प्रश्न विचारला,
तुम्हारा घर कहाँ हैं ?
‘जेलखाना’ चंद्रशेखर तिवारी ने गर्वाने उत्तर दिलं.
ही सर्व उत्तरं ऐकून भडकलेल्या मॅजिस्ट्रेट ने त्या बालकाला 15 वेताचे फटके लावून सोडून देण्याची शिक्षा सुनावली.
वेताचे फटके देण्यासाठी चंद्रशेखर ला जेल मध्ये आणलं गेलं, त्यावेळी बनारस च्या ह्या जेल मध्ये ‘गडासिंग’ नावाचा क्रूर जेलर होता. जेलर ने शिक्षा देण्यासाठी चंद्रशेखरांच्या अंगावरील लंगोट सोडून सर्व वस्त्र काढून घेतली अन त्यांना सूनवलेल्या शिक्षेस प्रारंभ केला. पण 15 वर्षांच्या ह्या बालकाची हिम्मत बघून बनारस जेल चा हा निर्दयी जेलर पण चक्रावून गेला. कारण, एकीकडे ह्या बालकाच्या पाठीवर दारूने मदमस्त असलेल्या जल्लादाकडून वेताचे घाव पडत होते तरीही त्याच्या चेहऱ्यावर हसू मात्र कायम होतं. पाठीवर पडणारे वेताचे फटके ही ह्या बालकाच्या चेहऱ्यावरील देशभक्ती च तेज हरण नाही करू शकले. वेताच्या प्रत्येक फटक्यानंतर बालक___
“भारत माता की जय”
“महात्मा गांधी की जय”
“वंदे मातरम्” या घोषणा देतच होता.
अंततः सजा संपल्यावर शेवटी गडासिंग बोलला “अखिर किस मिट्टी का बना हैं यह”. 15 वेतांची शिक्षा झाल्यावर जेलच्या नियमांनुसार गडासिंग ने चंद्रशेखरांना ‘तीन आने’ दिले,पण चंद्रशेखर आजादांनी दे पैसे गडासिंग च्या तोंडावर फेकून मारले. त्यांच्या पाठीवर वेताने एवढ्या जखमा केल्या होत्या की जेल मध्ये औषध लावूनही रक्त थांबत नव्हतं. शेवटी कसातरी पाय घसरत घसरत चंद्रशेखर जेल मधून बाहेर आले. शेखर आजादांना मिळालेल्या ह्या शिक्षेची बातमी पूर्ण बनारस मध्ये आगीसारखी पसरली. बातमी कळलेली जवळपास सर्व जनताच पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करू लागली. दुसऱ्या दिवशी बनारस मधीक ‘मर्यादा’ नामक वर्तमानपत्रात ‘आजादांचा’ फोटो ‘वीर बालक आजाद’ ह्या शिर्षकाने प्रसिद्ध झाला. वर्तमानपत्रातील समाचार बघून आजादांचे वडील पं.सीताराम तिवारी तडक बनारस ला आजादांना येऊन भेटले अन त्यांनी आजादांना घरी परत येण्याचा आग्रह केला. पण अनको प्रयत्न करूनही आजाद घरी जायला तयार झाले नाहीत अंततः त्यांचे वडील पुन्हा घरी निघून गेले. तर अशाप्रकारे ‘चंद्रशेखर तिवारी’ नावाच्या बालकाच रूपांतर ‘क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद’ मध्ये झालं. ह्या घटनेनंतर मात्र चंद्रशेखर आजादांनी आपल्या कानाला खडा लावला,अन आयुष्यात पुन्हा जिवंत पोलिसांच्या हातात कधीच लागणार नाही असा प्रण घेतला.
“निरपेक्ष देशभक्ती”
चंद्रशेखर आजादांच्या जीवनातील असे काही मार्मिक प्रसंग आहेत, जे ऐकल्यावर बिस्मिलांची “अब न अहले वलवले हैं और न अरमानों की भीड !” शायरी आपसूकच आठवते, या प्रसंगातून आजादांची क्रांतिकार्याप्रती असणारी अढळ निष्ठा दिसून येते.
एके दिवशी क्रांतीकारकांना नवीन पिस्तुल घेण्यासाठी काही धनाची खूप आवश्यकता होती. ह्याच चिंतेत आजाद होते, तेव्हाच त्यांचे लहानपणीचे शिक्षक श्री मनोहरलाल त्रिवेदी आले. आल्यावर त्रिवेदीजींनी सांगितलं की चंद्रशेखर आजादांच्या माता-पित्याची आर्थिक परिस्थिती ही खूप हलाखीची झाली आहे. धनाच्या अभावी ते भुकेने व्याकुळ आहेत, त्यांच्यासाठी श्री गणेश शंकर विद्यार्थी जीं नी २०० रुपये पाठवले आहेत(गणेश शंकर त्यावेळी कानपुर मधील ‘प्रताप’ नावाच्या साप्तहिकाचे संपादक होते). त्रिवेदीजींनी हे पैसे चंद्रशेखर आजादांच्या स्वाधीन केले अन त्यांना ते पैसे माता-पित्यांना पाठवावे अशी सूचना केली. चंद्रशेखर आजादांनी रुपये घेतले अन ते त्रिवेदिं ना म्हणाले…
“इन रूपियो के लिये मैं आपका आभार प्रकट करता हूं। इस समय दल को इनकी नितांत आवश्यकता थी। ईश्वर कृपा से आप सही समय पर आ गये”
चंद्रशेखर आजादांच्या तोंडून ही वाक्य ऐकून त्रिवेदी हैराण झाले अन ते चंद्रशेखर आजादांना म्हणाले___
“पंडितजी ! (चंद्रशेखर आजादांच्या बऱ्याच छद्मनावांमधील एक) विद्यार्थी ने यह पैसा आपके माता-पिता की सहायता के लिये दिया हैं। वे भुखों मर रहे हैं. पर समझ नहीं आता,आप इन पैसों को दल के लिये क्यों खर्च करना चाहते हैं”
ह्यावर चंद्रशेखर आजाद बोलले__ “देश के करोडों लोग भुखों मर रहे हैं। मुझे केवल अपने माता-पिता की नहीं अपितु पुरे देश की चिंता हैं। जिसके लिये इस समय पिस्तोल खरीदना नितांत आवश्यक हैं। देश की ऐसीं स्थिती मैं केवल अपने परिवार की चिंता करना स्वार्थमात्र हैं।”
चंद्रशेखर आजादांच्या ह्या उत्तराने श्री मनोहरलाल त्रिवेदी निरुत्तर झाले.
चंद्रशेखर आजादांनी मिलेलेले २०० रुपये पिस्तुल खरेदी करण्यासाठी वापरले, पुढे काही काळाने जेव्हा ‘विद्यार्थीजी’ चंद्रशेखर आजादांना भेटले तेव्हा त्यांनी चंद्रशेखर आजादांना पैसे आपल्या माता-पित्याला पाठवले की नाही ह्याबद्दल विचारणा केली त्यावर आजाद म्हणाले___
“विद्यार्थी जी मेरे माता-पिता को तो फिर भी कभी-न-कभी कुछ न कुछ खाने को मिल जाता हैं। किन्तु मेरे दल के ऐसें कुछ युवक हैं जिन्हे कई बार भुखों ही रहना पडता हैं। मेरे माता-पिता बुढे हैं अगर मर भी गये तो देश को कोई हानि नहीं होगीं। किन्तु क्रांतिकारी दल का कोई क्रांतिकारी भूख से तडप-तडपकर मर जाये,तो यह हमारे लिये बहुत शर्म की बात होगीं और देश को इससे भारी नुकसान होगा”
पुढे जाऊन चंद्रशेखर आजादांनी श्री मनोहरलाल त्रिवेदीजींना कळवलं की
“त्रिवेदी जी आप ही मेरे माता-पिता का खयाल रखना। मैं अगर आगे उन्हे कष्ट में देखुंगा या सुनुंगा तो पिस्तौल की दो गोलियां उनकी सेवा के लिये बहुत हैं”
आशा प्रकारे चंद्रशेखर आजादांच संपूर्ण जीवन मातृभूमिसाठी, क्रांतिकारी दलासाठी समर्पित होतं.
चंद्रशेखर आजादांच्या मनातील प्रेयसी बद्दलची कल्पना
आपल्या जीवनसंगिनी ची कल्पना करताना कधी कधी आजाद म्हणायचे____
“आम्ही दोघे फरारी अवस्थेत दूर कुठेतरी डोंगरांमध्ये असू. एक रायफल तिच्या खांद्यावर एक रायफल माझ्या खांद्यावर असेल, सोबतीला काडतुसांची गोणी भरलेली असेल. तोच दुश्मन चारही बाजूंनी दोघांना घेरेल. ती रायफलमध्ये गोळ्या भरत जाईल, व मी दणादण गोळ्या मारत राहील.
चंद्रशेखर आजाद स्वातंत्र्याच्या भावनेसोबत इतके एकरूप झाले होते कि, त्यांच्या प्रेम भावनेत ही क्रांतीचा सुगंध दरवळताना दिसून येतो.
चंद्रशेखर आजादांच निर्विवाद शुद्ध चारित्र्य
नियमित व्यायाम करीत असल्याने चंद्रशेखर आजादांचे शरीर एकदम धष्टपुष्ट बनलं होतं. पिळदार शरीरामुळे बऱ्याचदा मुली/स्त्रीया ही चंद्रशेखर आजादांना बघून त्यांच्यावर मोहित होत असत. धीमरपूर गावातील ठाकूर मलखान सिंह ह्यांच्या घरी आजाद वास्तव्यास असतानाचा असाच एक प्रसंग आहे.
ठाकूर मलखान सिंह ह्यांच्या परिवारासोबत चंद्रशेखर आजादांचे स्नेहपूर्ण संबंध होते. मलखान सिंह ह्यांच्या परिवारासोबत त्यांची मोठी बहीण ही राहत असे जिला सर्व क्रांतिकारक “जिजी” नावाने पुकारात. एके दिवशी जिजींची कुणी एक जुनी मैत्रीण मलखान सिंह ह्यांच्या घरी आली. चंद्रशेखर आजादांना बघून ती स्त्री चंद्रशेखर आझादांवर मोहित झाली. ही स्त्री विधवा होती, तिला ही मुलं होती. पण काही वर्षांपूर्वी तिचा पती मरण पावला होता, त्यामुळे शरीरसुखापासून वंचित होती, चंद्रशेखर आजादांना बघून त्या विधवा स्त्री च्या मनातील काम भावना जागृत झाली. तिने आपल्या मनातील भावना जिजीला सांगितली. साहजिकच जिजीने तिला असं काहीही न करण्याचा सल्ला दिला पण ती मैत्रीण काही ऐकायला तयार होईना. त्याच दिवशी रात्री चंद्रशेखर आजाद घराच्या छतावर झोपलेले असतानाच ती स्त्री चंद्रशेखर आजादांच्या जवळ जाऊन बसली तिच्या अशा वागण्याने आजाद अंथरुणात उठून बसले. चंद्रशेखर आजादांना वाटलं बहुतेक काही वेळाने जिजी ही येणार असाव्या, पण बऱ्याच वेळ गेल्यानंतरही जिजींचा काहीच पत्ता लागत नसल्याने चंद्रशेखर आजादांनी त्या स्त्रीला येण्याचं कारण विचारलं. आता मात्र ती स्त्री चंद्रशेखर आजादांच्या दिशेने सरकू लागली अन तिने चंद्रशेखर आजादांना धमकी दिली की जर त्यांनी तिचं म्हणणं ऐकल नाही तर ती आरडाओरडा करून त्यांना बदनाम करेल. मागे सरकत सरकत आजाद छताच्या कठड्यापर्यंत पोहोचले होते,आता काही रस्ता उरला नाहीय हे पाहून त्यांनी छतावरून उडी मारली अन तडक हनुमान मंदिरात पोहोचले. ह्या प्रसंगानंतर चंद्रशेखर आजादांनी धीमरपूर मधून प्रस्थान केल अन काही काळ आपला मुक्काम बुंदेलखंड येथे केला. काही वेळाने बुलदेलखंड सोडून ते पुन्हा मुंबईत आले. ह्यावेळी मुंबईत आल्यावर त्यांनी “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांची भेट घेतली”.
हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचे केवळ दोन-तीन छायाचित्रे पहायला मिळतात. खरेतर क्रांतिकारी असल्या कारणाने आजादांचा छायाचित्र काढण्याला साफ विरोध होता, तरीही त्यांची ही छायाचित्रे कोणी काढली ? स्वातंत्र्यानंतर ही छायाचित्रे आपल्याला कशी प्राप्त झाली ? वाचण्यासाठी खालील आर्टिकल ला भेट द्या.
हुतात्मा चंद्रशेखर आजादांची दुर्मिळ छायाचित्रे
क्रांतिकारक भगवतीचारण वोहरा ह्यांच्या धर्मपत्नी दुर्गादेवी वोहरा अर्थात ‘दुर्गाभाभी’ १९६४ ला प्रकाशित झालेल्या “नर्मदा” मासिकातील “आझाद” अंकात म्हणतात……..
“आझाद(भैया) एक ऐसा कलाकार था जिसका हृदय अत्यंत कोमल था. जिसका अंतर-बाह्य सभी पवित्र था किन्तु कर्तव्य उतना ही कठोर. हिंदुस्थान सोसिएलिस्ट प्रजातांत्रिक संघ(हि.स.प्र.स)” का वो महान सेनापति था. भैया का प्रण था की ‘जीते जी शत्रू मेरे शरीर को हाथ नहीं लगा सकता’
वे कहा करते
“दुश्मन की गोलियों का सामना करेंगे
‘आजाद’ ही रहे हैं, ‘आजाद’ ही रहेंगे”
अपनी इस वाणी का उन्होंने एक-एक अक्षर सत्य कर दिखा दिया.
दिनांक 27 फेब्रुवारी 1931 च्या दिवशी आझाद अल्फ़्रेंड पार्क मध्ये पोलिसांशी लढता लढता वीरगती ला प्राप्त झाले.
लेखणीला विराम देताना थोडसं मनातलं ____
चंद्रशेखर आजाद तसेच इतरही क्रांतीकारकांच्या जीवनातील बरेचसे मार्मिक, हृदयस्पर्शी, शब्दांत व्यक्त न करता येणारे प्रसंग आहेत. हे प्रसंग वाचताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा कधी लागतात ते कळतही नाही…. सावरकर म्हणतात “पुढे हजारो लोकांच्या घरांतून सोन्याचा धूर निघावा, म्हणून स्वत:ची चूल बोळकी फोडणे म्हणजे संसार !”. देशाच्या येणाऱ्या पिढीला सुखाचे दोन घास खाता यावे, यासाठी सर्व क्रांतिकारकांनी अगणित रात्री उपाशी पोटी काढल्या. आपल्याला समाधानानं झोपता यावं, ह्यासाठी कित्येकांनी अंधाऱ्या कोठरीत रात्री घालवल्या. येणाऱ्या पिढीला स्वातंत्रयाने जगता यावं, यासाठी कित्येकांनी बलिदान दिलं. म्हणूनच सर्व क्रांतिकारकांचे आपल्यावर इतके उपकार आहेत. कि एकच जीवन नाही, तर पुढील अनंत जीवनातही आपण त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गायले तरीही, आपल्यावरील उपकार तसूभरही फीटणार नाहीत.
शहीदों की चिताओं पर लगेगें हर बरस मेले,
वतन पर मरनेवालों का यही बाक़ी निशाँ होगा !
-हितैषी
लेखनसीमा !
संदर्भ सूची :-
- चंद्रशेखर आझाद और उनके दो गद्दार साथी :- धर्मेंद्र गौड़
- क्रांतिकारी आंदोलन कुछ अधखुले पन्ने :- धर्मेंद्र गौड
- अमर क्रांतिवीर चंद्रशेखर आजाद
- संस्मृतियाँ – शिव वर्मा
- मृत्युंजयचा आत्मयज्ञ :- वि.श्री.जोशी
लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.
ALSO READ___
TAGS_____
#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters
आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.
शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.
Ha lekh vachun krantikarak chandrashekhar aajhad yanchya baddal ajun read krychi iccha zali…
Reference book mentioned kelyabaddal thank you…..!
.
Keep doing great work…
Krantikarak che hei balidan tumhi vaya jau det nahi ahat….tumchya likhanane kuthetri thinagi (ठिणगी) padat ahe…. Yacha vanva houn hei lavkar ch spread hou de✨
😍😍😍👌