You are currently viewing चार पावलांची वारी…. – श्रुती कुलकर्णी

चार पावलांची वारी…. – श्रुती कुलकर्णी

हजारो कोटींचे सततचे घोटाळे, पावलोपावली फसवाफसवी,
भ्रष्टाचार.. तो तर काय आता शब्द एकदम आपुलकीचा वाटतो आपल्याला.
गरिबी, उपासमार वगैरे आता आपल्यासाठी केवळ चघळत बसण्याचे विषय..
प्रेयसीचा खून बिन करून तिचे तुकडे केले म्हणून हल्ली पेपरात सारखीच झळकणारी बातमी,
आणि
आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला सावळा गोंधळ.
तो तरी आता सावळा उरला कुठे आहे ?
काळाकुट्ट झालाय एकदम !
“सगळंच कसं काळं काळं झालंय हो ??”
“का झालंय ?”
मी हल्ली हा प्रश्न विचारत निघते, वाटेत भेटेल त्याला.
तर मला पुष्कळ लोक उभे दिसतात वाटेवर.
डोळे बंद करून उभे असलेले.
बोलायला गेले की म्हणतात_

“काय पोरी, कशाला उगीच नको ते प्रश्न विचारत हिंडतेस गं ?
कशाला असल्या प्रश्नाच्या फंद्यात पडायचं?
गपगुमान डोळे मिटायचे.
बघ, डोळे उघडले तरी सगळा अंधारच आणि डोळे मिटून घेतले तरीही अंधारच.
आपल्याच्याने काही होणारे का ?
आपण साधी सुधी माणसं.
आपलं काम भलं आणि आपण भले.”

आपण ही डोळे मिटून उभं रहायचं का ?
असा विचार आपसूक डोक्यात येऊन गेलेला__

मग मी पुढे चालायला लागते.
काही काम निघाल्याने गुगल मॅप लावते,
आणि वाट शोधत शोधत FC road ला येऊन पोहचते.
एका झगमगाटी दुनियेत. सळसळतं तारुण्य.
सडपातळ सुंदरी इकडून तिकडे खरेदीचा आनंद घेताना
आणि
मुलांच्या नजरा त्यांच्या क्रॉप टॉप मधून दिसणाऱ्या कमनीय कंबरेवरून फिरताना,
“उसकी कमर देख, कितनी पतली हैं ”
आपसूकच कानावर येणारे वाक्य…

या कंबरेत एवढं दडलंय तरी काय ?

पुन्हा आणखी एक नवीन प्रश्न घेऊन मी तशीच निघाले..

PMT च्या गर्दीत कशीबशी शिरले, पाय ठेवायला ही जागा नाही इथे.
दोन पावलांची जागा मिळाली. एवढ्या मोठ्या गर्दीतला आपण छोटासा एक भाग.
मला काटा येतो असली गर्दी बघितली की,
नंतर पुन्हा त्यात कॉलेजातील मुलं बघितली की…
म्हणजे,
कसं टीकायचं आपण एवढ्या मोठ्या गर्दीत ?
PMT मध्ये घुसले की मध्ये असा प्रश्न मला नेहमीच पडतो.
नाही ! म्हणजे स्वतः ला सिद्ध वगैरे कसं करायचं ?
नुसतीच स्पर्धा… ?
नुसतीच गर्दी ?
एवढं मोठं जग…
पण इथला प्रत्येक जण स्वतः ची “ती” स्पेस तयार करण्याच्या प्रयत्नात…
मला माझी स्पेस मिळेल का ?
मला माझी पाऊलभर जागा मला मिळेल का ?
पुन्हा एक प्रश्न !

अशा असंख्य प्रश्नांना घेऊन तुमची माझी रोजची प्रश्नवारी सुरू असते.
केवळ प्रश्न प्रश्न प्रश्न…
कधी मिळतील या सगळ्याची उत्तरं ?
हा ही पुन्हा एक प्रश्र्न !
उत्तरांचा पत्ता सापडता सापडत नाही…..!

बाकी, पुण्यात पालखी चा मुक्काम आहे दोन चार दिवस असं समजलं होतं.
ही माणसं किती चालतात, का चालतात एवढं ?
कुठल्या ओढीने चालतात ?
काय मिळत असेल यांना इतकं चालत गेल्यावर ?
इतकं आहे काय त्या पंढरपुरात ?
विठ्ठलाची मूर्ती,
विठ्ठल,
पांडुरंग…
पंढरीचा राजा !
Ohh… माझे विचार जरा स्थिरावले.
मी PMT मधून उतरले, आणि वारीसोबत चार पावलं चालायचं ठरवलं.

एरवी प्रसंगी स्वार्थात बुडालेली, एकमेकांशी वाद घालत बसलेली माणसं कपाळाला काळा बुक्का लावला की वारीत एकरूप होऊन जातात.

अचानक कानावर शब्द पडला,
“माऊली !”
“हे माऊली कोण?? “
मी एकाला विचारलं…तो म्हणाला_ “अहो माऊली,इथला प्रत्येक जण च माऊली?”
हे माऊली म्हणजे काय ?
मी पुन्हा विचार करायला लागले.
इथे प्रत्येक जण सारखाच. जिथे कुणीच खालचा तर कुणी वरचा नाही. तिथे एकापेक्षा दुसरा वेगळा नाही.

“विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी भ्राता”

आई, बाप, नवरा, बायको, मुलगा, मुलगी अगदी सारी नाती गळून पडतात आणि “माऊली” होऊन जातात.

स्वार्थ नाही, लोभ नाही, सगळच केवळ आणि केवळ विष्णुमय !
आणि, म्हणुनच तिथे काळं जग उरत नाही,
भाव उरतो तो फक्त भक्तीचा !
मग दिसू लागतो प्रकाशमान, दैदिप्यमान झालेला विठ्ठलाचा काळा रंग.

विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांसमोर जशी दिसायला लागली तसे मला आठवले ते विठ्ठलाचे मिटलेले डोळे,
नी एकदम कबिराचा दोहा आठवला__

बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय ।
जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ॥

मिटलेल्या डोळ्यांचा आणि ध्यानस्थ तो विठ्ठल,
आपण सतत सताड उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला वाईट च बघत असताना आणि जग सुधारायची भाषा करत असताना डोळे मिटून आधी स्वत:, स्वतः मधले दोष धुंडाळून ते बाहेर काढण्याचा मेसेज तर देत नसेल ना ?

बरं त्या कंबरेवरच्या हाताचं काय ?
खरंच हो, या कंबरेत नेमकं दडलंय काय???

मी विचार करायला लागले.
कंबरे इतक्या पाण्यात माणूस बुडत नाही, हे माहीत होतं.
तसच काहीसं हे असेल का?
आणि पुन्हा मग ते FC रोड वरचं दृश्य आठवलं.
कामवासनेने अंध झालेल्या नजरा….
सगळीकडेच विषय उपभोगाची वाट्टेल ती साधने आपल्या हाकेच्या अंतरावर.
वासनांध समाजाला कमरेवर हात ठेवून,
विठ्ठल हे तर सांगत नसेल नसेल ना_

बाबा रे हवी तेवढी सुखं भोग,
हवा तेवढा उपभोग घे,
पण आहारी जाऊ नकोस.
आकंठ बुडू नकोस.
कंबरे इतकाच बुड !
एकदा की कंबरेच्या वर बुडालास की धोक्याची पातळी गाठली च समज, नाहीतर सगळाच गोंधळ…

हळु हळु विठ्ठलाची सगळी मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली, एका एका गोष्टीची उकल होऊ लागली.
विठ्ठलाच्या मार्गावर आले चार पावलं वारीत चालले !
आणि,
Eureka !
ते तिथे काय दिसतंय. विठ्ठलाच्या भाळावर वर, तो अष्टगंध….

Ohh you have reached to your location.
Location कसलं ?
तर आयुष्यात पडत जाणाऱ्या असंख्य प्रश्नांच्या उत्तरांचं !
प्रश्न कुठलाही पडू देत, तो तिथेच जाऊन संपणार याचं.
आतला कोलाहल जरा शांत होऊ लागला.
ही प्रश्न वारी आयुष्यभरासाठी अखंड चालतच राहणार कारण प्रश्नच पडणार नाहीत ते जीवन कसलं पण हे सगळे प्रश्न एका थांब्यावर येऊन थांबणार हे मात्र नक्की त्याचे शाश्वती मला मिळाली.

मला माझी स्पेस सापडली,
तुकाराम महाराज म्हणतात ना _

“तुझ आहे तुजपाशी, परी तु जागा चुकलासी”

पुण्यातील PMT च्या गर्दीत स्वतः ची जागा शोधताना गोंधळात पडलेली मी, वारीच्या अफाट गर्दीत मात्र एकरूप झाले,
माझा दृष्टिकोन पूर्णच बदलला.
माझ्यातला गोंधळ लोप पावू लागला,
उकल होऊ लागली,
दोन पावलांची जागा विठ्ठलाच्या विटे एवढी भासू लागली.
मला समोरची पांडुरंगाची मूर्ती आता स्पष्ट दिसू लागली.

सोबतच्या माणसात ही विठ्ठल दिसायला लागला आणि स्वतः मध्ये ही_
मी ही माऊली झाले !
मी ही विठ्ठल झाले !
माझं अंग शहारून गेलं. एवढं सगळं वारितल्या चार पावलांनी घडवलं.

जगण्याचा पाया दृढ झाला, आणि एकदम चालण्याचं ,चालत राहण्याचं बळ अंगात आलं.
आणि,
प्रश्नवारी आता केवळ प्रश्नांची वारी न राहता,
उत्तरांची वारी झाली !

पंढरीसी जाय,
तो विसरे बापमाय,
अवघा होय पांडुरंग |

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
10 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Somnath Baban Jagtap
Somnath Baban Jagtap
1 year ago

चार पावलांची वारी जीवनाचा भला मोठा सार सांगून जाते हे या लेखातून जाणवले नुसते जाणवलं नाही तर ते अनुभवले देखील🙏🙏

Aishwarya
Aishwarya
1 year ago

खुप सुंदर,अगदी सहज, सोप्प्या आणि साजेश्या भाषेत वारी सांगितलीस पोरी!!!

Saurabh Kulkarni
1 year ago

मस्तंच!!

ओंकार केसकर
ओंकार केसकर
1 year ago

कमाल लिहिलंय!!

विशाल सलगर
विशाल सलगर
1 year ago

वारीच्या वाटेवर देवा लागतंय माझं गाव
दुःख जाऊदे गळुनी सगळ्यांना सुखात ठेव…

Shridhar khanwalkar
Shridhar khanwalkar
1 year ago

सुंदर!!👌🏾

Prasad Sonawane
Prasad Sonawane
1 year ago

मस्त लिहिलंय👌

Rupesh Bidkar
1 year ago

उत्तम…👌👌👌

Rohit Tiwari
Rohit Tiwari
1 year ago

Khupch chan lihilay tai 👍😊

Suraj
Suraj
1 year ago

लेख अवडला, हाच अभिप्राय 😄😄😄