किरणांचा उघडुनी पसारा, देवदूत कोणी |
काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी ||
-कुसुमाग्रज
सूर्य म्हणजे अनंत प्रखरतेचा स्रोतच जणू !
पृथ्वीवरील जीवनाचं रहाटगाड सुव्यवस्थित चालण्यासाठी लागणारी ऊर्जा प्रदान करण्याचं अतिमहत्वाच दायित्व सूर्य, गेल्या अब्जावधी वर्षांपासून निर्विवादपणे पार पाडत आहे. पण,
जर कुण्या एका दिवशी भर उन्हात येणारा सूर्यप्रकाश बंद होऊन अचानक सगळीकडे अंधार पडू लागला तर ?
ग्रहण म्हणजे नेमकं काय ?
सूर्य किंवा चंद्राला ग्रहण का लागतं ?
ग्रहणासबंधी प्राचीन लोकांमध्ये काय भावना होती ?
ग्रहणाचे प्रकार कोणते आहेत ?
अशा विविध प्रश्नांची उत्तरे लेखात पुढे जाणून घेऊ.
➤ १. ग्रहणांचे प्राचीन उल्लेख
पृथ्वीवरून कुण्या विशिष्ट जागेवरून पाहिल्यावर आकाशातील सूर्य किंवा चंद्र अकस्मातपणे काही काळ झाकले गेल्यामुळे दिसेनासे होतात, या खगोलीय घटनेला आपण “सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण” असे संबोधतो. जवळपास प्रत्येक प्राचीन संस्कृतीत ग्रहणासंबंधीचे उल्लेख पाहायला मिळतात. आकाशातून काही काळासाठी सूर्यच गायब ! ही कल्पनाच किती भयानक वाटते, म्हणूनच प्राचीन काळातील लोकांनी अशा प्रकारच्या खगोलीय घटनांचा संबंध विविध काल्पनिक कथांसोबत जोडला. या काळात ग्रहणे का घडतात? या प्रश्नांचा उलगडा झाला नसल्याने ग्रहणाला अशुभ किंवा अरिष्ट घटनांचे द्योतक मानले जाई. हिंदू धर्मातील वेद, पुराणे आणि महाभारतातही ग्रहणासंबंधीचे उल्लेख आढळतात. पौराणिक काळात “राहू” आणि “केतू” या दैवी शक्तींसोबत ग्रहणाचा सबंध जोडला गेला. पंचांगाच्या आधारे ग्रहणाचा स्पर्शकाल(सुरुवात) आणि मोक्षकाळ(शेवट) या वेळा काढल्या जाऊ लागल्या. ग्रहण काळात भोजन करू नये तसेच देवपूजा, होम, हवन, जप, तप केल्याने ग्रहणाचा कोप कमी होतो आशा विविध समजुती निर्माण झाल्या. आज २० व्या शतकातही काही प्रमाणात या विचारांचा पगडा जनसमान्यांवर कायम आहे.
जैन धर्मातही ग्रहणाच्या अशुभ घटनांपासून बचाव करण्यासाठी धार्मिक उपाय किंवा कर्मकांड सांगितले गेले आहेत, तर बौद्ध धर्मात हिंदू धर्माप्रमाणेच राहू-केतू यांनी चंद्र-सूर्याला ग्रासल्याने ग्रहण लागते अशी समजूत होती. चिनी वाङ्मयातही ग्रहणासबंधीचे बरेच उल्लेख आहेत. ग्रीक संस्कृती मध्ये ग्रहणास अशुभ संकेत मानले जाई. मोहिमेच्या वेळी ग्रहण दिसल्याने सैन्याने पुन्हा माघार घेतल्याचे किंवा तह केल्याचे ग्रीक इतिहासात वाचायला मिळते. सूर्याला किंवा चंद्राला लागलेले ग्रहण सुटावे म्हणुन जोरजोरात वाद्यांचा गजर काही ठिकाणी करीत तर इजिप्त मध्ये ग्रहण सुटेपर्यंत राजाला देवतेच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा करावी लागे. अशा प्रकारे प्राचीन काळात जगभरातील विविध भागांत ग्रहणांबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा निर्माण झाल्या होत्या. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसं या गोष्टींवर मानव अधिकाधिक विचार करू लागला, यासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती होत गेली आणि विश्वातील भौतिकीच्या नानाविध संज्ञा मानवाला ज्ञात झाल्या.
➤ २. ग्रहणे अमावस्या-पौर्णिमेलाच का होतात ?
सूर्याप्रमाणे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, चंद्रावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन होते आणि त्यामुळेच आपल्याला रात्रीच्या अवकाशात चंद्राचे दर्शन घडते, पण इथेही एक गंमत घडून येते. महिन्यातील प्रत्येक रात्री दिसणारी चंद्राची आकृती कमी-अधिक होत असते. अवकाशातील चंद्राच्या या नाट्यालाच आपण “चंद्रकला” म्हणतो. ग्रहणे नेहमीच अमावस्या किंवा पौर्णिमेलाच पाहायला मिळतात याचे कारण म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा या महिन्यातील दोनच दिवशी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका दिशेत येतात. अमावास्येला सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र येतो परिणामस्वरूपी चंद्राची जी बाजू आपल्याला दिसते त्या बाजूवर सूर्यप्रकाश पडत नाही आणि रात्रीच्या अवकाशात आपल्याला चंद्र दिसत नाही, तर पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र यांच्या मधोमध पृथ्वी येते अन त्यामुळे चंद्राची जी बाजू आपल्याला दिसते त्या सर्व बाजूवर सूर्यप्रकाश पडतो आणि रात्रीच्या अवकाशात संपूर्ण चंद्र दृष्टीस पडतो.
आता असा प्रश्न साहजिकच पडतो, प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला ग्रहण का दिसत नाही ?
याचे उत्तर असे की, अमावस्या पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी “एका दिशेला” येत असतात पण “एका रेषेत” मात्र येत नाहीत आणि म्हणुनच प्रत्येक अमावस्या-पौर्णिमेला आपल्याला ग्रहण दिसत नाही. चंद्राची पृथ्वी भोवती फिरण्याची कक्षा ही पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेला समांतर नाही तर ती “५.८°” च्या कोणावर कललेली आहे. या दोन कक्षा परस्परांना दोन बिंदूत छेदतात, जेव्हा चंद्र या दोघांपैकी कुण्या एका बिंदूवर असेल आणि नेमकं त्याच वेळी अमावस्या किंवा पौर्णिमा असेल तर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका दिशेत येतात आणि ग्रहण घडते. सूर्यग्रहण हे नेहमी अमावास्येला तर चंद्रग्रहण हे नेहमीच पौर्णिमेला घडते.”
संदर्भासाठी खाली सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या तारीख आणि तिथी यांचे कोष्टक [२] :-
➤ ३. ग्रहणांचे प्रकार:-

★ सूर्यग्रहण:-
चंद्रमासातील अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या मध्ये चंद्र येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते अर्थात सावलीतील लोकांना सूर्यप्रकाशाच्या आड चंद्र आल्याने काही काळ अवकाशात सूर्य अंशतः किंवा पूर्णतः दिसेनासा होतो यालाच सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण हे संपूर्ण पृथ्वीवर एकाच प्रमाण वेळी दिसत नाही तर सूर्यकिरणांच्या मध्ये चंद्र आल्याने चंद्राची सावली पृथ्वीच्या ज्या ठिकाणी पडते त्याच भागातील लोकांना सूर्यग्रहण पाहता येते. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा तिन रूपांत पाहायला मिळते.
◆ खग्रास(Total) आणि खंडग्रास(Partial) सूर्यग्रहण :-
खग्रास सूर्यग्रहणाच्या बाबतीत आपण पृथ्वीवासी अगदी भयंकर नशिबवान आहोत, सूर्यमालेतील एका अफलातून योगायोगामुळेच आपल्या झोळीत सूर्याचं हे अदभूत दृश्य पडतं. सूर्यमालेत बुध आणि शुक्र वगळता इतर सर्वच ग्रहांना उपग्रह आहेत पण यापैकी पृथ्वी वगळता कोणत्याही ग्रहावरून खग्रास सूर्यग्रहण दिसू शकत नाही.
का ? तर याचे कारण जाणून घेऊ.
विश्वातील कोणत्याही गोष्टीचे भासमान बिंब आपल्याला कसे दिसेल हे मुख्यत्वे दोन गोष्टींवर अवलंबून असते. १.त्या वस्तूचे आकारमान आणि २.आपल्यापासून वस्तुचे अंतर.
याबद्दल एक छोटा पण गंमतशीर प्रयोग आपण करू शकतो. आपल्या डोळ्यांपासून लांब असणारी कोणतीही भलीमोठी वस्तू निवडा (बिल्डिंग, झाड, टेलीफोन टॉवर इत्यादी) आता आपल्या डोळ्यासमोर हाताच एक बोट धरा. काय दिसलं ??
आकाराने कित्येक पटीने लहान असलं तरीही डोळ्यांपासून जवळ एका ठराविक लांबीवर बोटाला पकडलं की लांबच लांब असणारी भली मोठी गोष्टही लहानशा बोटाच्या आड जाते. थोडक्यात तुमच्या बोटाने त्या समोरील वस्तूला खग्रास ग्रहण लावलं. आता हेच सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांमध्ये कशाप्रकारे काम करत हे जाणून घेऊ.
सूर्य पृथ्वीपासून पंधरा कोटी किलोमीटर अंतरावर आहे तर चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे तीन लाख चौऱ्यांशी हजार किमी आहे अर्थात पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर चंद्र आणि पृथ्वी दोहोमधील अंतराच्या ४०० पटीने अधिक आहे, आता इथे विशेष वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सूर्याचा व्यास देखील चंद्राच्या व्यासाच्या ४०० पटीने अधिक आहे. परिणामस्वरूपी सूर्य १५ कोटी किलोमीटर इतक्या अवाढव्य अंतरावर असला तरीही जर दोघेही एका रेषेत आले तर दोघांची भासमान बिंबे सारख्याच आकाराची दिसतील (चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकेल) आणि पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्यमालेतील एकमेव असा खग्रास सुर्यग्रहणाचा नजारा पाहता येईल.
सुर्यग्रहणाच्या वेळी सूर्यकिरण चंद्राने आडवले गेल्याने प्रकाशाच्या भौतिकीच्या नियमांनुसार दोन प्रकारच्या छायांची समकेंद्री वर्तुळे पृथ्वीवर पडतात. आतील लहान वर्तुळाचा व्यास जास्तीत जास्त “३०० किमी” असतो यालाच प्रच्छाया(Umbra) म्हणतात. प्रच्छायेच्या भागात सूर्यप्रकाश पूर्णतः आडवला जातो आणि त्यामुळे चंद्राची गडद सावली पडते आणि या छायेतील लोकांना खग्रास सूर्यग्रहण (Total solar eclipse) दिसते. पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी खग्रास सुर्यग्रहणाचा काल सात ते साडेसात मिनिटांपेक्षा जास्त नसतो. उपच्छाया(Penumbra) वर्तुळाची त्रिज्या “१००० किमी” पर्यंत असू शकते. या भागात सूर्याचे पूर्ण बिंब पूर्ण झाकले न गेल्याने या भागतील लोकांना खंडग्रास सूर्यग्रहण (Partial Solar Eclipse) पहायला मिळते.



पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे ग्रहणकाळातील चंद्राची सावली सुद्धा पृथ्वीवरून एक ठराविक मार्गाने पुढे सरकत जाते याच भागातील लोकांना क्रमाक्रमाने खंडग्रास आणि खग्रास सूर्यग्रहण दिसते. जेव्हा सुर्यग्रहणास सुरुवात होते तेव्हा सर्वप्रथम चंद्र सूर्याला झाकू लागतो आणि खंडग्रास सुर्यग्रहणाची सुरुवात होते, हळू हळू चंद्र सूर्याला पूर्ण झाकू लागतो आणि संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते यालाच वैज्ञानिक भाषेत “टोटॅलिटी(Totality)” म्हणतात. खग्रास सुर्यग्रहणाच्या वेळी निसर्गाच्या काही अलौकिक आणि नयनरम्य चमत्कारांचे आपण साक्षीदार होऊ शकतो.
■ Baily’s Beads:-
चंद्राचा पृष्ठभाग पूर्णतः सपाट नाही आहे. साध्या दुर्बिणीतून ही पाहिल्यावर आपल्याला चंद्रावरील क्रेटर्स सहज पाहता येतात. खग्रास सुर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र सूर्याला पूर्ण झाकतो त्यावेळी काही सूर्यप्रकाश या क्रेटर्स मधून परावर्तित होतो आणि अल्प काळासाठी चंद्राच्या कडेचे हे लहानसे भाग उजळून निघतात यालाच “Baily’s Beads” म्हणतात.

■ Diamond Ring:-
चंद्र जेव्हा हळू हळू सूर्याला आपल्या कवेत घेत असतो तेव्हा ग्राहणाच्या स्पर्शकाळी आणि मोक्षकाळी एक क्षण असा येतो ज्या क्षणी सूर्याचा एकदम लहानसा भाग चंद्राच्या छायेच्या बाहेर राहतो. या क्षणाला संपूर्ण सूर्यबिंब चंद्राने आच्छादलेलं असतं पण या लहानशा भागातून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे सूर्य हा कुण्या हिऱ्याच्या अंगठी सारखा भासू लागतो.

◆ कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) :-
काही विशिष्ट परिस्थितीत सूर्याला तिसऱ्या प्रकारचे अर्थात “कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse)” लागते. कांकणाकृती सूर्यग्रहण होण्यामागचे कारण म्हणजे पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्या कक्षा लंबगोलाकार असल्याने काही वेळा सूर्य किंवा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, तर काही वेळा पृथ्वीपासून सर्वात लांब. ज्यावेळी पृथ्वी सूर्याला सर्वात जवळ आणि चंद्र पृथ्वीपासून कमाल अंतरावर असेल त्यावेळी सूर्याचे भासमान बिंब चंद्राच्या आकारापेक्षा मोठे होते, त्यामुळे चंद्र अगदी सूर्याच्या पूर्ण समोर आला तरीही त्याने संपूर्ण सूर्यबिंब झाकले न जाता सूर्याची लहानशी कडा मोकळी राहते, या कडेचा भाग बांगडी सारखा तेजस्वी दिसत असल्याने यास कंकणाकृती सुर्यग्रहण (Annular Solar Eclipse) म्हणतात.


★चंद्रग्रहण:-
पौर्णिमेच्या वेळीसूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते याच वेळी जर चंद्र राहू किंवा केतू या बिंदूंवर असेल तर सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते परिणामतः चंद्रग्रहण घडते. सुर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली पृथ्वीवर पडत असल्याने पृथ्वीवरील काही भागातच सूर्यग्रहण पाहता येते पण याउलट चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडत असल्याने ज्या भागातून चंद्र दिसू शकतो(जेथे रात्र असते) अशा सर्व भागात चंद्रग्रहण एकाच प्रमाण वेळी पाहायला मिळते. चंद्राला खग्रास आणि खंडग्रास या दोनच प्रकारची ग्राहने लागू शकतात. पृथ्वीची छाया चंद्राच्या तुलनेने फारच मोठी असल्याने चंद्रग्रहणाचे कालावधी ही मोठे आहेत. खग्रास चंद्रग्रहणाच्या कालावधी २ तासांपर्यंत असू शकतो तर खंडग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी ६ तासांपर्यंत असू शकतो.



➤४. भारतीय संस्कृतीमधील ग्रहणासंबंधी वैज्ञानिक निकष:-
(कठोपनिषद – १.३.१४)
भारतीय संस्कृतीला विज्ञान आणि तत्वज्ञानाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. आर्यभट, भास्कराचार्य, वराहीमिहिर असे थोर खगोलशास्त्रज्ञ, विश्वाला शून्याची क्रांतिकारी संकल्पना देणाऱ्या ब्राम्हगुप्तासारखे थोर गणितशास्त्रज्ञ तसेच वैद्यकशास्त्रातील पतंजली, शल्य आणि वात्स्यायन यांच्या कार्याचा डंका आज विसाव्या शतकातही तितक्याच प्रखरतेने वाजत आहे.
◆ आर्यभटाने ग्रहणासंबंधी मांडलेले विचार [५], [६]

इसवी सन ४७६ साली कुसुमपूर अर्थात पाटलीपुत्र येथे जन्मलेल्या आर्यभटाची गणना भारतवर्षातील श्रेष्ठ खगोलशास्त्रज्ञांमध्ये होते. आर्यभटाने “आर्यभाटीय” आणि “आर्यभट सिद्धांत” असे दोन ग्रंथ लिहले असल्याचे उललेख वाचायला मिळतात पण दुर्दैवाने आजच्या घडीला त्याचा “आर्यभटीय” हा एकच ग्रंथ उपलब्ध होतो. असे असले तरीही या एकमेव ग्रंथाची प्रगल्भता इतकी अफाट आहे की जगविख्यात “नेचर” या सप्तहिकात सुद्धा यावर आधारित “साइन्स इन टर्स व्हर्स” नावाचा लेख त्रिकोणमिती मधील साइन कोष्टकासबंधी प्रकाशित झाला होता. “आर्यभट नवसंप्रदाय प्रवर्तक होता” असे पाश्चात्य लेखक “के(kaye)” आपल्या “हिंदू अस्ट्रॉनॉमी” पुस्तकात म्हणतो.

आर्यभटाने आपल्या आर्यभटीय ग्रंथात दशगीतिका, गणितपाद, कालक्रियापाद आणि गोलपाद अशा चार प्रकरणांतील एकूण १२१ श्लोकांत गणितशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोन विषयांवर विपुल प्रमाणात अतिशय सखोल आणि तितकंच अचूक लिखाण केलेलं आहे. या ग्रंथात ग्रहणासबंधी पूर्णतः वैज्ञानिक विचार आर्यभटाने मांडले आहेत, राहू-केतू या राक्षसांना किंवा इतर कोणत्याही पुरातन विचारांना त्यानं ग्रंथात स्थान दिलेले नाहीय. ग्रहणासबंधी आर्यभटाने आपल्या ग्रंथात विस्तृत वर्णन केलेलं आहे, त्यातील काही महत्वाच्या श्लोकांचा इथे आढावा घेऊ.
१. पृथ्वीचे परिवलन:-
अनुलोमगतिनौस्थः पश्चत्यचलं विलोमगं यद्वत् ।
(आर्यभटीय>>> गोलपाद श्लोक -९)
अचलानि भानितद्वत् समपश्चिमगानि लंकायाम् ॥ ९ ॥
अर्थ :- ज्याप्रमाणे पुढे जाणाऱ्या नौकेतील व्यक्ती काठावरील स्थिर वस्तू मागे जाताना पाहते त्याचप्रमाणे लंका येथून पाहणाऱ्या व्यक्तीला स्थिर नक्षत्रे बरोबर पश्चिम दिशेकडे मागे जाताना दिसतात. [५]
स्पष्टीकरण :- पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करते आणि यामुळेच खग्रास आणि खंडग्रास ग्रहणाच्या छाया ठराविक मार्गाने पुढे सरकत असतात हे आपण लेखात वर पाहिलं. पृथ्वीच्या परिवलनाचा सिद्धांत आर्यभटाने या श्लोकात मांडला आहे.
२. ग्रहणाचे स्वरूप:-
चंद्रोजलम् अर्कः अग्नि मृद् भू . छायापि या तमः तद्धि ।
(आर्यभटीय>>> गोलपाद श्लोक – ३७)
छादयति शशी सूर्यम् शशिनं महती च भूच्छाया ॥ ३७ ॥
अर्थ :- चंद्र जलमय आहे, सूर्य अग्निस्वरूप आहे, पृथ्वी मृत्तिका आहे. छायासुद्धा अंधकार आहे. चंद्र सूर्याला आच्छादितो आणि पृथ्वीची प्रदीर्घ छाया चंद्राला ग्रहण लावते. [५]
स्पष्टीकरण :- सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अवकाशात फिरण्याने ग्रहणाची निर्मिती होते त्यामुळे आर्यभटाने श्लोकाच्या सुरुवातीला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्या भौगोलिक स्थितीबद्दल अंदाज बांधला आहे. आर्यभटाचे सूर्य अग्निपासून बनलेला आहे, तसेच मृथ्वी मातीपासून बनलेली आहे, हे अंदाज पूर्णतः बरोबर आहेत पण चंद्र जलरूप आहे हा अंदाज मात्र चुकीचा आहे. श्लोकात पुढे चंद्र सूर्याला आच्छादितो त्यामुळे सूर्यग्रहण घडते आणि पृथ्वीची चंद्रावर पडणारी छाया चंद्राला ग्रहण लावते ही विधाने सर्वथैव बरोबर आहेत, इथे आर्यभटाने प्रचलित राहू-केतू विचारधारेला थारा दिलेला नाही हे लक्षात येते.
३. चंद्रग्रहणाचे निरीक्षण :-
प्रग्रहणान्ते धूम्रः खंडग्रहणे शशी भवति कृष्णः ।
(आर्यभटीय>>> गोलपाद श्लोक – ४६)
सर्वग्रासे कपिलः सकृष्णताम्रः तमोमध्ये ॥ ४६ ॥
अर्थ :- ग्रहण स्पर्श आणि ग्रहण मोक्ष या वेळी चंद्रबिंब धुरासारखे काळपट दिसते. खंडग्रास ग्रहणाच्या काळात चंद्रबिंब कृष्णवर्णी होते. खग्रास ग्रहणाच्या काळात चंद्रबिंब तांब्याच्या रंगाप्रमाणे काळी झाक असलेले तांबूस रंगाचे दिसते. [५]
स्पष्टीकरण :- ग्रहणकाळात आर्यभटाने चंद्राचे केलेले निरीक्षण त्याने या श्लोकात मांडले आहे. चंद्रग्रहणाच्या सुरुवातीला सर्वप्रथम चंद्र पृथ्वीच्या उपच्छायेत(penumbra) प्रवेश करतो आणि खंडग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होते या वेळी चंद्रबिंब धुरासारखे काळपट दिसते असं आर्यभट म्हणतो पुढे काही वेळाने चंद्र प्रच्छायेत प्रवेश करतो आणि खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात होते. आपल्या पृथ्वी भोवती वातावरणाचे विविध जाडीचे तसेच विविध घनतेचे थर आहेत. चंद्रग्रहणाच्या वेळी काही सूर्यकिरण पृथ्वीच्या वातावरणातुन वक्रीभूत होऊन चंद्रापर्यंत पोहोचतात आणि मग पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पृथ्वीवर येतात. इतर सर्व रंगांपेक्षा तांबड्या रंगाचे वक्रीभवन कमी होत असल्याने त्याच रंगाचा सूर्यप्रकाश रंग चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतो( पहाटे सूर्योदयाच्या किंवा सायंकाळी सुर्यास्ता वेळी आपल्याला सबंध आसमंतात तांबूस छटा पाहायला मिळतात त्यामागे सुद्धा हेच कारण आहे) आणि परिणामस्वरूपी आपल्याला चांद्रबिंब ताम्रवर्णी दिसते.
आर्यभटीय ग्रंथात ग्रहणासबंधी आर्यभटाने एकूण १२ श्लोक लिहले आहेत, इतर श्लोकांत ग्रहण काळात पृथ्वीच्या छायेची लांबी, ग्रहणाचा अर्धकाल, छायेचा व्यास इ. संबंधी माहिती दिली आहे, यामधील भुमितीचे स्पष्टीकरण किचकट असल्याने लेखात मांडत नाही आहे, तूर्तास इथेच विराम देऊ.
◆ वराहमिहिरांच्या बृहतसंहिता मधील ग्रहणासंबंधी उल्लेख [७]
इसवी सन पाचव्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान वराहमिहीर नावाच्या खगोलशास्त्रज्ञाने बृहतसंहिता नामक ग्रंथ लिहिला. एकूण १०६ अध्याय असलेल्या या ग्रंथात ज्योतिषशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र इ. विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. आर्यभटाच्या पावलावर पाऊल टाकत या ग्रंथातील “राहुचार” या अध्यायात वरहमिहिराने ग्रहणाबाबत राहू-केतू या विचारांना तिलांजली देत ग्रहणाबद्दल वैज्ञानिक सिद्धांत मांडला आहे. या अध्यायात एकूण ९८ श्लोक असून त्यापैकी काही श्लोकांचा आढावा घेऊ.
१. ग्रहणासबंधि प्रचलित कथांचे खंडन:-
अमृतास्वादविशेषाच्छिन्नमपि शिरः किलासुरस्येवम् ।
प्राणैरपरित्यक्तं ग्रहतां यातं वदन्त्येके ॥ १ ॥इन्द्वर्कमण्डलाकृतिरसितत्वात् किल न दृश्यते गगने ।
अन्यत्र पर्वकालाद् वरप्रदानात् कमलयोनेः ॥ २ ॥मुखपुच्छविभक्ताङ्गं भुजङ्ग माकारमुपदिशन्त्यन्ये ।
कथयन्त्यमूर्तमपरे तमोमयं सैहिकेयाख्यम् ॥ ३ ॥यदि मर्तो भवचारी शिरोऽथवा भवति मण्डली राहुः ।
भगणार्धेनान्तरितो गृह् णाति कथं नियतचारः ॥ ४ ॥अनियतचारः खलु चेदुपलब्धिः संख्यया कथं तस्य ।
पुच्छाननाभिधानोऽन्तरेण कस्मान्न गृह् णाति ॥५ ॥अथ तु भुजगेन्द्ररूपः पुच्छेन मुखेन वा स गृह् णाति ।
मुखपुच्छान्तरसंस्थं स्थगयति कस्मान्न भगणार्धम् ॥ ६ ॥राहुद्वयं यदि स्याद् ग्रस्तेऽस्तमितेऽथवोदिते चन्द्रे ।
( बृहत् संहिता>>> अ:- राहुचार > श्लोक- १ ते ७)
तत्समगति नान्येन ग्रस्तः सूर्योऽपि दृश्येत ॥ ७॥
स्पष्टीकरण :- बृहतसंहितेतील “राहुचार” या अध्यायातील १ ते ४ या श्लोकांत सर्वप्रथम वरहमिहिराने राहू-केतू या असुरांसंबंधित प्रचलित कथांचा उल्लेख केला आहे. अमृत प्राशन केल्याने किंवा त्यांना ब्रम्हाचं वरदान प्राप्त झाल्याने हे असुर सूर्य, चंद्र यांना ग्रहण काळात ग्रासतात किंवा राहू-केतू हे सर्पाच्या(सापाच्या) आकाराचे असावेत अशा नानाप्रकारच्या दंतकथा त्याकाळी प्रचलित असाव्यात हे यावरून दिसून येते. पुढील ५ ते ७ क्रमांकाच्या श्लोकांत त्याने या सर्व काल्पनिक कथांचे खंडन केलेले आहे. वरहमिहिर म्हणतो “ सूर्याला किंवा चंद्राला ग्रहण जर कुण्या सापामुळे लागले असते तर मग ग्रहणे फक्त अमावास्या किंवा पौर्णिमेलाच का घडतात ? इतर कुण्या दिवशी ग्रहणे का घडत नाहीत ? तसेच या सापामुळे कधी मुखाने, शेपटीने किंवा शरीराने सुद्धा ग्रहण लागायला हवं. काहीजण म्हणतात राहू-केतू असे दोन राक्षस आहेत आणि ते क्रमाक्रमाने चालत राहतात तर मग एक राक्षस जेव्हा चंद्राला ग्रहण लावतो तेव्हाच सूर्याला ग्रहण का लागत नाही ??”
ग्रहणासबंधी राहू-केतू या राक्षसांबद्दल वरहमिहिराने उपस्थित केलेले प्रश्न त्याच्या अचाट तर्कशक्तीची आणि अचूक निरीक्षण शक्तीची प्रचिती घडवतात. ग्रहणे अमावस्या-पौर्णिमेलाच होतात हेही त्याला माहिती होतं.
२. ग्रहणाचे वैज्ञानिक कारण:-
भूच्छायां स्वग्रहणे भास्करमर्कग्रहे प्रविशतीन्दुः ।
( बृहत् संहिता>>> अ:- राहुचार > श्लोक- ८)
प्रग्रहणमतःपश्चान्नेन्दोर्भानोश्च पूर्वार्धात् ॥ ८ ॥
स्पष्टीकरण:- प्रारंभीच्या श्लोकांमध्ये राहू-केतू या संज्ञांच खंडन केल्यावर या श्लोकात वरहमिहिराने चंद्रग्रहण आणि सुर्यग्रहणाचे वैज्ञानिक कारण दिले आहे. चंद्रग्रहणाच्या समयी चंद्र पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तर सुर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची छाया सूर्याला ग्रहण लावते असे त्याने मांडले आहे. पुढे तो म्हणतो याच कारणास्तव पश्चिम दिशेकडून चंद्रग्रहणाची तर पूर्वेकडून सुर्यग्रहणाची सुरुवात होत नाही. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून-पूर्वेकडे फिरते तर चंद्र पृथ्वीच्या परिवलनाच्या विरुद्ध दिशेत अर्थात पूर्वेकडून-पश्चिमेकडे प्रदक्षिणा घालतो, यामुळेच सूर्यग्रहण पश्चिम दिशेकडून तर चंद्रग्रहण पूर्वेकडून घडते.
३. सुर्यग्रहण:-
चन्द्रोऽधःस्थः स्थगयति रविमम्बुदवत्समागतः पश्चात् ।
( बृहत् संहिता>>> अ:- राहुचार > श्लोक- ११ )
प्रतिवेशमतश्चित्रं दृष्टिवशाभ्दास्करग्रहणम् ॥ ११ ॥
स्पष्टीकरण:- सुर्यग्रहणाबद्दल विस्ताराने वरहमिहिराने या श्लोकात मांडले आहे. पूर्वेकडून-पश्चिकमेकडे परिभ्रमण करणारा चंद्र पश्चिमेकडून सूर्याच्या छायेत प्रवेश करतो आणि सुर्यबिंबाला झाकून टाकतो आणि ग्रहण होते. इथे वरहमिहिराने प्रत्येक देशात अनेक प्रकारची ग्रहणे होतात हेही मांडले आहे यावरून त्याने कदाचित एकाहून अनेक ठिकाणहून ग्रहणांचे बारकाईने निरीक्षण केलं असावं हा तर्क लावू शकतो.
➤५ :- ग्रहणासंबंधी प्रचलित धर्मश्रद्धांवर सावरकरांनी केलेली टीका
प्रचिनातले जे आजही उत्तम, अनुकार्य, उदात्त, अपेक्षनिय, प्रगत नि प्रबुद्ध ठरते ते ये आजचे संस्कृत, ते ते रक्षिणे म्हणजे खरे खरे संस्कृतीरक्षण होय. तसे प्राचीन संस्कृती रक्षण करणे आजचे कर्तव्य होय, प्राचीन दुष्कृतीरक्षण हे नव्हे. [१०]
– स्वातंत्र्यवीर सावरकर
आज आपण सर्व एकविसाव्या शतकात जगतोय, एकविसावे शतक म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग. विश्वरचनेच्या भौतिकीच्या नवनवीन नियमांना मानव गवसणी घालत आहे. मानवाने बनवलेल्या उपग्रहांनी सूर्यामलेच्या सीमा ओलांडल्या आहेत. एक बाजूला इतकी प्रगती होत असताना, सामान्य भारतीय समाज मात्र आजही हजारो वर्ष जुन्या वेद, पौराणिक काळातील ग्रहणविषयीच्या संकल्पनांमध्ये गुरफटून गेला आहे. राहू-केतू तसेच ग्रहण काळात पाळावयाचे अनेक पुरातन नियम अशा विविध अंधश्रद्धा निव्वळ पूर्वजांनी आचरणात आणल्या, म्हणूनच आजचा सामान्य मनुष्यही निखळ आंधळेपणाने त्या पाळताना दिसून येतो. ग्रहणा संबंधी प्रचलित अंधश्रद्धांवर टीका करताना सावरकर म्हणतात______
पूर्वी रानटी स्थितीत मनुष्याला ग्रहणाचे नियम माहीत नसत; तेव्हा आकाशात सूर्य वा चंद्र दिसता अवेळी नाहीसा होत चाललेला पाहून केवढ आश्चर्य नि भीती वाटत असेल ह्याची कल्पना आजही आपणास सहज करता येईल. आकाशात एकदम दोन सूर्य एखाद्या दिवशी दिसू लागले तर आजही ती भयविव्हल अधीरता आपल्यासही आल्यावाचून राहणार नाही. ऐतिहासिक काळातही रानटी लोकांच्या ह्या भयाचे अनेक पुरावे सापडतात. उदाहरणार्थ कोलंबसाविषयी आख्यायिका पाहा. अमेरिकेतील मूळवासी रानटी लोकांना ग्रहण केव्हा येते वर्तविता येत नसे. यास्तव ते त्यांना देवाच्या कोपाचेच अनयिमित नि भीतिप्रद चिन्ह वाटे. कोलंबसाच्या लोकांना ग्रहणे आधी वर्तविता येत, त्यामुळे अमेरिकनांस त्यांनी भिवविले, की जर तुम्ही आम्हास शरण न याल तर आमचा देव येत्या अमुक दिवशी अमक्या वेळी आकाशातून सूर्यासही नाहीसा करील! त्या धमकावणीप्रमाणे नक्की त्याच वेळी सूर्य नाहीसा होऊ लागला- कारण तो ग्रहणाचा दिवस होता। घाबरलेले ते मूळवासीय कोलंबसास शरण येऊन ‘देवाचा राग शांत करा!’ म्हणून प्रार्थना करू लागले; कोलंबसाच्या लोकांनीही उ:शाप दिला, की ‘अमक्या वेळेस सूर्य परत देऊ’ आणि बरोबर त्याच वेळी सूर्य आकाशात पुन्हा प्रकाशू लागला। ह्या साध्या भाकिताने त्या मूळवासीयांवर कोलंबसाच्या सैन्याच्या अद्भूत शक्तीचा केवढा परिणाम झाला असेल ते अमेरिकन त्या नवागत लोकांस अजिंक्य असे ‘राक्षसदूत’ किंवा ‘देवदूत’ समजू लागल्यास त्यांत काय नवल आहे! अशा रानटी अज्ञानाच्या काळी ग्रहणासरशी भयभीत होऊन त्या ईश्वरी कोपास पुण्यकृत्यांनी शांतविण्यास्तव लोक दे दान सुटे गिव्हाण ‘म्हणून ओरडत नि दाने देत: स्नार्ने करीत; ते सूऱ्याचे सुतक सुटताच कपडे धुऊन, झाडून, सारवून त्या संकटाच्या विटाळातून मुक्त होत, ते साहजिकच होते, कित्येक जाती बहुधा चेटकाने आपण ग्रहण लावतो असेही भासवीत असाव्या आणि ते खरे वाटून त्यांस दान देऊन, संतोषवून ग्रहण सोडवणे इतरांस भाग पडत असावें. राहुकेतु हे दैत्य, राक्षस; त्यांचे वंशज नि सगेसोयरे म्हणजेच गावाबाहेर राहणारे ते ‘उग्र, मांग, चेटके, गारुडी, महार प्रभृती चांडालवर्ग। म्हणून बहुधा तेच ओरडत फिरण्याचीही वहिवाट पडली असावी ‘दे दान सुटे गि-हाणा दान द्याल तर आमचे चेटूक मागे घेऊन हे गि-हाण आम्ही सोडवितो !
ते काही असले तरी आज विज्ञानाने ग्रहणांचे नियम नि कारणे अशी सुनिश्चितपणे ठरवून टाकली आहेत की जसें बे वे चार। तुम्ही दान द्याल तरी ते ग्रहण एक पळही आधी सुटत नाही; न दिलेत तरी एक पळही अधिक टिकत नाही, तिथे देवादानवांची कोणाचीही खरोखरी लढाई होत नाही; ती सगळी कथा सुंदर रूपक आहे. जशा हितोपदेशातील कुत्र्यामांजरांच्या कल्पित गोष्टी तसेच अगदी सर्वांशी कल्पिता त्याच्याशी देवाच्या रागलोभाचा लवलेश संबंध नाही.
आपल्या आज अगदी टाकाऊ ठरलेल्या रूढी पूर्वीच्या अज्ञानाच्या वा भिन्न परिस्थितिच्या काळात खऱ्या वा हितकारक वाटणे साहजिकच होते. हे समर्थन पुरेसें न वाटून त्याचे समर्थन आजच्या विज्ञानाच्या दृष्टीनेही करू पाहणारा जो एक वर्ग आहे. त्याचा कोटिक्रम तर त्या रूढीस अधिकच हास्यापद करून सोडतो. कसे तर या ग्रहणांच्या प्रकरणीच पाहा! ते म्हणतील, ‘अहो, ग्रहणाच्या वेळी एकंदर वातावरणात मोठी चलबिचल होते।” बरं होते. पुढे ”त्याचा मनुष्याच्या शरीरावर नि पृथ्वीवरील वस्तूंवर मोठा परिणाम होतो बरं होतो. पुढं? ”अहो पुढं काया म्हणूनच आमचं आरोग्य राखण्यासाठीच त्रिकालदर्शी ऋषींनी ह्या रूढी पाडल्या, की ग्रहणाच्या वेळात खाऊ नये; लोणच्याची बरणी, पापडाचे डबे, मोरावळ्याची बाटली यांवर तुळशीपत्र ठेवावी; चांडाळ, मांग, महारांस फाटकी वस्त्रे द्यावी, ब्राह्मणांस दाने द्यावी; ग्रहणे लागता सुटता स्नाने करावी; गायत्री जपजाप्य यांचा धुमधडाका उडवावा !
‘ग्रहणांमुळे वातावरणात हये ते फेरफार होत असले तरी डबे, बाटल्या बरण्यांवर तुळशीपत्रे ठेवल्याने आतील लोणची, पापड, मोरावळे यांवरील अनिष्ट परिणाम टळतात; तेव्हा सृष्टीविज्ञानाचा नियम अजब खरा। आणि जर इब्याबरणीवर, शालीपैठणीवर तुळशीपत्रे ठेवल्याने ग्रहणाचे संकट टळते. तर त्या घरावरच तुळशीपत्रांचा बुचका टाकून मोकळे का होऊ नये? म्हणजे मग घरातील कपड़े आदि पदार्थांवर प्रत्येकी तुळशीपत्र टाकणे नको. ग्रहणात जेवल्याने हिंदू लोकांचेच आरोग्य तेवढे बिघडते असे दिसते. कारण युरोप, अमेरिका, चीन, जपान सारें जग ग्रहणातून जेवतही असते आणि जगतही असते। तिकडे कोणच्याही भयंकर साथी-ग्रहणांत पाणी प्याल्याने, कपड़े न धुतल्याने, महारांस वा ब्राह्मणांस दान न दिल्याने, जपजाप्य न केल्याने, ग्रहणानंतर पडल्याचे फारसे ऐकिवात नाही। त्यांचे वायुमान निराळे, हिंदू स्थानचें वातावरण निराळे म्हणून पुन्हा एका भौतिक विज्ञानाच्या नावे थाप ठोकाल तर तुम्हांस तीही सोय नाही. कारण आधी एकाच गावात घराला लागून असणाऱ्या घरांत नि पेठांत हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिस्ती. पारशी जे राहतात त्यांपैकी तुळशीपत्राखालील लोणचे खाल्ले म्हणून तो जगला नि तुळशीपत्र नसलेल्या एका बरणीतले लोणचे नि ताजा भात ग्रहणांना जेवला तो तो उठतो तोच पोट फुगून मेला असं कधीही घडत नाही !
मनुस्मृतीत निषेध आहे, की, ‘ नेक्षीतोद्यन्तमादित्यं स्नातं ग्रस्तं कदाचन! नोपस्पृष्ट न वारिस्थं न मध्यनभसो गतम!’ (अ.४.३७) उगवताना, ग्रहण लागताना, खग्रास ग्रहणात, पाण्यात वा मध्यान्ही सूर्यास मुळी पाहूच नये। आता या कोणत्याही अवस्थेत, आकाशात वा पाण्यातही जर सूर्यास पाहावयाचें नाही तर आम्ही त्यास पाहायें तरी कुठे? चित्रात की काय? सूर्याविषयीची काही प्रकरची वैज्ञानिक माहिती त्यातला त्यात जर केव्हा उत्कृष्टपणे निरीक्षिता येत असेल तर ती त्याच्या ग्रहणाच्या वेळीच होय. एवढ्यासाठी युरोपीय ज्योतिर्विद मोठ्या प्रयासाने हजारो मैलांचा प्रवास करून सूर्यग्रहण खग्रास असेल तिथेच जातात नि अनिमेष निरीक्षण करतात; पण आमची मनुस्मृती म्हणते, खग्रास सूर्यग्रहण मुळी पाहूच नये !
ह्या सूर्यचंद्रांच्या ग्रहणाविषयी प्राचीन काळच्या अज्ञानयुगात अशा आज साफ चुकीच्या ठरलेल्या अनेक विक्षिप्त समजुती जगातील यच्चयावत् मनुष्यसमाजात प्रचलित होत्या- केवळ आपल्या हिंदूतच नव्हेत; पण आजच्या युरोपियन समाजासारख्या विज्ञाननिष्ठ प्रगत लोकांनी त्या प्रत्यक्ष सिद्ध ज्ञानाच्या उलट आहेत असे दिसताच जशा तत्काळ सोडू दिल्या. तसेच आम्हीही आता करावयास हवे आणि ग्रहणाविषयीची वर वर्णिलेली सारी धर्मभोळी अज्ञानजन्य विधिविधार्ने मुळीच टाकून दिली पाहिजेत. [११]
सारांश___
ज्योतिगोलविषयक सारी पूजाअर्चा नि व्रतवैकल्ये साफ खोटी असल्यामुळे आजच्या आज टाकून द्यावयास हवींत। [११]
➤६. आईनस्टाईनचा सापेक्षतावाद आणि ग्रहणे -:
नोबेल पारितोषिक विजेत्या अल्बर्ट आईनस्टाईन या अवलियाचं नावं तुम्ही ऐकलंच असेल, आपल्या विविक्षित सापेक्षता (Special Relativity) आणि व्यापक सापेक्षता (General Relativity) या दोन प्रबंधांमुळे आईनस्टाईन जगभर गाजला. यातील गुरुत्वाकर्षणाशी संबंधित व्यापक सापेक्षतेचा सिद्धांत इतका क्रांतिकारी होता की जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ “रॉजर पेनरोज” याविषयी म्हणतात “आईनस्टाईनचे इतर शोध इतर कुणीतरी त्याच्यानंतर लावलेच असते, पण जनरल थिअरीचं मात्र तसं नव्हतं. ती म्हणजे कल्पनाशक्तीची एक प्रचंड भरारीच होती. आईनस्टाईन झाला नसता तर कदाचित आजही जनरल थिअरी निघाली नसती. यातच आईनस्टाईनचं मोठेपण आहे.” [९]
गुरुत्वाकर्षण हा शब्द जरी कानी पडला तरी आपल्याला न्यूटन आणि शाळेत सांगितली गेलेली सफरचंदाची गोष्ट चट्कन आठवते. १६६५ साली प्लेग च्या साथीमुळे न्यूटन ला महाविद्यालयातून घरी यायला लागले अन त्यानं याच काळात “विश्वातील कोणत्याही दोन वस्तूंमधील परस्परांना आकर्षित करणारी शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण” असा अफलातून शोध लावला. पुढे जवळपास दोनशे ते तीनशे वर्ष न्यूटन चे हेच विचार टिकून राहिले. पण १९१५ मध्ये आईनस्टाईन ने व्यापक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आणि गुरुत्वाकर्षण शक्ती अभ्यासण्याची एक नवी वहिवाट घालून दिली. आईनस्टाईन च्या व्यापक सापेक्षता सिद्धांतानुसार “संपूर्ण विश्व हे “स्पेस-टाईम फॅब्रिक” ने बनलेलं आहे, आणि यावरील प्रत्येक वस्तू स्वतःच्या वास्तुमानानुसार आपल्या आजूबाजूच्या स्पेस ला वक्रीभूत करते, जेव्हा कुणी हलकी दुसरी वस्तू या वक्र स्पेस मध्ये येते तेव्हा ती जड वस्तूकडे घरंगळत जाऊ लागते, ही घटना म्हणजेच गुरुत्वाकर्षण.”

अधिक माहिती साठी पहा:- General relativity demonstration

प्रकाशकिरण सुद्धा फोटॉन्स नावाच्या कणांनी बनलेले असतात, तर मग व्यापक सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार प्रकाशकिरण सुद्धा वक्र स्पेस मधून जाताना आपल्या नियमित मार्गावरून काही प्रमाणात वाकले पाहिजेत असं भाकीत आईनस्टाईन ने केलं. प्रकाशकिरणांचं वस्तुमान अगदीच अल्प असल्याने यासाठी प्रचंड वस्तुमाची गरज होती, त्यामुळे मग या कार्यासाठी दुरून येणाऱ्या एखाद्या ताऱ्याचा प्रकाश सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने वक्रीभूत होतो की नाही हे खग्रास सुर्यग्रहणाच्या वेळी मोजायचे असे ठरले. १९१२ साली पाऊस पडल्यामुळे यावर्षीचा प्रयोग फसला. पुढील सूर्यग्रहण २१ ऑगस्ट १९१४ रोजी रशियातुन दिसणार होतं, पण याच काळात पहिलं महायुद्ध चालू झालं आणि प्रयोग तर फसलाच उलट निरीक्षणास गेलेल्या संशोधकांना रशियाने कैद करून ठेवलं. शेवटी २९ मे १९१९ रोजी संशोधकांच्या दोन वेगवेगळ्या तुकड्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निरीक्षण करण्यासाठी पोहोचल्या. या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्व एडिंग्टन करत होता. सरतेशेवटी ६ नोव्हेंबर १९१९ रोजी लंडनमधील “रॉयल अस्ट्रोनॉमिकल सोसायटी” समोर अधिकृतरित्या एडिंग्टन ने आपले निष्कर्ष मांडले आणि व्यापक सापेक्षता सिद्धांताने केलेले प्रकाशकिरणांच्या विक्रीभवनाचे भाकीत अचूक आहे असे जाहीर केले. [८], [९]
संदर्भसूची:-
[१] अंतराळ आणि विज्ञान :- डॉ. जयंत नारळीकर
[२] सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार :- मोहन आपटे
[३] मराठी विश्वकोश :- ग्रहणे
[४] Crash Course Astronomy – Eclipse’s
[५] आर्यभटीय :- मोहन आपटे
[६] Aryabhatiya :- Kripa Shankar Shukla
[७] वारही(बृहत्) संहिता :- पंडित बलदेवप्रसाद मिश्रा
[८] जिनियस(अल्बर्ट आईनस्टाईन) :- अच्युत गोडबोले
[९] किमयागार :- अच्युत गोडबोले
[१०] विज्ञाननिष्ठ लेख :- स्वातंत्र्यवीर सावरकर
[११] अंधश्रद्धा निर्मूलन :- स्वातंत्र्यवीर सावरकर
छायाचित्रे साभार:- NASA
लेखनसीमा!
___________________________________________________________
लेख आवडल्यास कमेंटबॉक्स मध्ये प्रतिक्रिया कळवा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.
खूप मस्त explain केलं आहेस.. असच लिहीत रहा.👍
आभार!
[…] Also read :- ग्रहणे (Eclipses) […]
👌👌👌
आभार.
So beautifully explained 👍🏻👌🏻
Thank you !