You are currently viewing क्रांतीचे धगधगते अग्निकुंड – एचआरए आणि एचएसआरए

क्रांतीचे धगधगते अग्निकुंड – एचआरए आणि एचएसआरए

हाथ जिनमें हो जुनू कटते नहीं तलवार से,
सर जो उठ जाते है वो झुकते नहीं ललकार से…!

– बिस्मिल अजिमाबादी
  • हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या (HRA) क्रांतिकारकांची विचारसरणी खऱ्या अर्थाने नाविण्यपूर्ण होती. देश स्वतंत्र झाल्यानंतरही ७०च्या दशकापर्यंत एचआरएच्या क्रांतीकारकांना सरफिरे नौजवान असंच म्हटलं जातं होतं. मात्र त्यांच्या क्रांतीचा मूळ गाभा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. काकोरी कांडानंतर एचआरएचं रूपांतर भगत सिंह यांनी एचएसआरए म्हणजेच हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं केलं !

चला तर जाणून घेऊया अवघ्या ८ वर्षात ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडणाऱ्या या क्रांतिकारी संघटनांबद्दल…

१. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)

एचआरएची स्थापना ऑक्टोबर १९२४ रोजी सच्छिंन्द्रनाथ सन्याल यांनी केली होती. एक स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक राष्ट्र स्थापित करणे, नागरिकांना त्यांचे मताधिकार, हक्क मिळवून देणे, समाजातील शोषित वर्गाला उभारी देणे इ. या संघटनेचे मुख्य उद्देश होते. रशियाच्या बोल्शेविक क्रांतिकडून प्रभावित होऊन हे सर्व क्रांतिकारक देशभरात क्रांतिच्या मशाली पेटवण्याचं कार्य करत होते. राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, सन्याल बाबू, रवींद्र मोहन, योगेशचंद्र चॅटर्जी इ. क्रांतिकारी संघटनेचे नेतृत्व करत होते.

संघटनेतील आणखी एक क्रांतिकारक प्रणवेश चॅटर्जी यांनी चंद्रशेखर आझादांकडे एचआरएमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव मांडला आणि आझाद यांच्या येण्याने एचआरएला आणखी बळ मिळालं. संघटनेच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी आझाद यांनी आपला बहुरूपी अवतार धारण करण्याचं ठरवलं. ते ब्राम्हण, साधू आणि इतर वेश परिधान करून विविध गाव-खेड्यांमध्ये जाऊन नवयुवकांचे विचार जाणून घेत होते आणि त्यांना संघटनेत सामील होण्याचं आवाहन करत होते.

संघटना वाढवायची असेल तर त्यासाठी आर्थिक बळ वाढवणं देखील गरजेचं होतं. यासाठी सरकारी खजिन्याची लूट करून संघटनेला लागणारं साहित्य आणि शस्त्रास्त्रे आणण्याचा निर्णय क्रांतिकारकांकडून घेण्यात आला. बिस्मिल यांनी काकोरी येथे सरकारी खजिना लुटण्याची योजना बनवली. योजनेत बिस्मिल, आझाद, अश्फाक, राजेंद्रनाथ, सन्याल बाबू, मन्मथनाथ गुप्ता, बनवारी लाल, मुकुंदीलाल, मुरारीलाल आणि केशव चक्रवर्ती हे क्रांतिकारी सामील होते. लूट करण्यामागचं धोरण हेच होतं की हा सगळा पैसा हिंदुस्तानाचाच आहे. त्यामुळे आपलाच पैसा वापरून या ब्रिटिश साम्राज्यविरुद्धच लढा उभारणे.

९ ऑगस्ट १९२५ :- काकोरी कांड

मुरादाबादहुन येणाऱ्या ८ डाऊन पॅसेंजरला काकोरी स्थानकाच्या आउटर सिग्नलवर थांबवून लूट करून घ्यावी, अशी योजना ठरली. योजनेप्रमाणे क्रांतिकारकांनी सगळा खजिना यशस्वीपणे लुटून नेला. काकोरी लुटीची जोरदार चपराक बसल्यानंतर ब्रिटिश सरकारने सर्व क्रांतीकारकांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेशच्या (तत्कालीन युनायटेड प्रोव्हीएन्स) प्रत्येक नाक्यावर कडक पहारा बसवला. अखेर नेहमीप्रमाणे कोणाच्याही हाती न येणारे आझाद सोडून सर्व क्रांतिकारक पकडले गेले. बिस्मिल, अश्फाक, रोशन सिंह (या कटात ते नव्हते) आणि लाहिरी यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि इतर क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बिस्मिल फार उत्कृष्ट शायर होते, तुरुंगात असताना त्यांना लिहिले…

होश में आ जाओ बुलबुलो, अब चमन खतरें में है ।

हा तत्कालीन देशवासीयांसाठी एक संदेश होता. स्वातंत्र्यासाठी आपले प्रयत्न असेच फोल ठरत गेले तट उद्याची पिढी स्वातंत्र्याची पहाट पाहू शकणार नाही तर गुलामीच्या साखळदंडातच कैद राहील. अखेर संघटनेच्या या मुख्य क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. फासाच्या तख्तावर असताना बिस्मिल यांनी आणखी एक शेर म्हटला…

अब न अगले वलवले है न अरमानों की भीड…
एक मिट जाने की हसरत, दिल-ए-बिस्मिल में है !

– रामप्रसाद बिस्मिल

२. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)

एचआरए पूर्णपणे दुबळी झाली होती. आजाद कुठे, कसे आणि कोणत्या वेशात होते, कोणास ठाऊक नव्हतं. भगत सिंह, सुखदेव आणि भगवती चरण वोहरा हे काकोरी कांडाच्या आधीच एचआरएमध्ये सामील झाले होते. त्यामुळे संघटना सांभाळण्यासाठी आता भगतसिंगच्या प्रेरक विचारांची गरज होती. भगत सिंह यांच्या विचारांमध्ये एक चिकित्सक वृत्ती आणि समीक्षात्मक दृष्टी होती. त्यांच्या विचारांमधून समाजवादी विचार जोपासण्याचे आणि राष्ट्रवादी कार्य करण्याचे एक वेगळेपण दिसून आले आहे. देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी देशातील तरुणांची आहे, असे ते नेहमी म्हणत. इटलीचे स्वातंत्र्य, जपान आणि पोलंडमधील बंड, तुर्कस्थान आणि रशियन क्रांती ही तरुणांचीच घडवून आणली होती. १८५७ च्या उठावातही तरुणांनीच मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्यामुळे देशात परिवर्तन घडवायचे असेल तर स्वातंत्र्य चळवळींमध्ये तरुणांचीच भूमिका महत्त्वाची आहे.

८ आणि ९ सप्टेंबर १९२८ रोजी भगत सिंह यांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला येथे एक गुप्त बैठक घेतली. या बैठकीत सर्वांच्या संमतीने संघटनेचं नाव भगत सिंह यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं केलं. त्यामध्ये सोशालिस्ट म्हणजेच समाजवादी हा शब्द जोडला. यावेळी आजाद, भगत सिंह, सुखदेव, सोहन सिंग जोश, सुखदेव, भगवतीचरण, शिव वर्मा, राजगुरू, बटूकेश्वर दत्त, विजयकुमार सिन्हा, जयदेव कपूर, यशपाल इ. क्रांतिकारकांनी संघटनेचं कार्य सुरू ठेवलं.

सायमन कमिशनचा विरोध करण्यासाठी लाला लजपत राय यांच्या नेतृत्वात लाहोर येथे आंदोलन करण्यात आले. मुळात या आयोगमध्ये एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नव्हता, त्यामुळे भारतीयांनी यावर बहिष्कार टाकला होता. मात्र ब्रिटिशांनी चढवलेल्या लाठीहल्ल्यात लालाजींचा मृत्यू झाला. याच मृत्यूचा सूड उगवण्यासाठी भगत सिंह, सुखदेव, आझाद, राजगुरू आणि जयगोपाल यांनी व्ह्यूहरचना आखून स्कॉट या पोलीस अधिकाऱ्याला ठार मारण्याची योजना बनवली. मात्र स्कॉटच्या जागी चुकून जे.पी. साँडर्स हा अधिकारी मारला गेला.

१९२९ भगत सिंह आणि बटूकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब हल्ला केला. ब्रिटिश सरकारद्वारे बळजबरीने लादण्यात येणाऱ्या पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डीस्प्युट बिलचा विरोध करण्यासाठी कोणालाही नुकसान न पोहोचवता त्यांनी संसदेत बॉम्ब फोडला होता. यावेळी त्यांनी जोरदार ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देऊन बहिऱ्या ब्रिटिशांचं दालन धमाक्याने दणाणून सोडलं होतं. शहीद भगत सिंह आणि बटूकेश्वर दत्त यांनी १९२९ साली संसदेत बॉम्ब हल्ला केल्यानंतर जे पॅम्प्लेट फेकले होते, त्या पॅम्प्लेटवरील हा छोटासा मजकूर !

आम्ही मनुष्याच्या जीवनाला पवित्र समजतो आणि प्रथम प्राधान्य देतो. आम्ही एका अशा उज्ज्वल भविष्यावर विश्वास ठेवतो, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे शांती आणि स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकेल. आम्ही मानवी रक्त सांडल्याबद्दल दुःखी आहोत, मात्र क्रांतिच्या माध्यमातून सर्वांना समान स्वातंत्र्य देण्यासाठी आणि मनुष्याद्वारे होणारे मनुष्याचेच शोषण समाप्त करण्यासाठी या क्रांतिमध्ये काही क्रांतिकारकांना बलिदान देणे अनिवार्य आहे.
इन्कलाब जिंदाबाद
!

साँडर्स वधानंतर क्रांतिकारकांनी जाहीर केलेले पत्रक
शहीद भगत सिंह आणि बटूकेश्वर दत्त यांनी संसदेत बॉम्ब हल्ल्यानंतर फेकलेले पॅम्प्लेट

या दोन घटनांमुळे संघटनेवर आणखी दबाव आला होता, मात्र संघटनेचे विचार, भगत सिंह आणि त्यांचे साथीदार देशाच्या घराघरात, कानाकोपऱ्यात पोहोचले होते. भगत सिंह यांना समर्थन करण्यासाठी देशभरातून लोकं एकवटली होती. पूर्ण स्वराज ही मागणी जोर धरू लागली होती आणि महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या डॉमीनियन स्टेटसला खिंडार पडू लागली होती. भगत सिंह यांची वाढती प्रसिद्धी आणि HSRA संघटनेला देशवासीयांचं समर्थन ब्रिटिशांच्या पचनी पडली नाही. जवळपास दीड वर्ष तुरुंगवासात असणाऱ्या भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीची तारीख २४ मार्च १९३१ निश्चित करण्यात आली. मात्र देशातील परिस्थिती पाहता भगत सिंह यांना २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता फाशी देण्यात आली. ८ वर्ष या संघटनेने ब्रिटिशांची पाळंमुळं उपटून काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. आज स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचं गुणगान गाण्याची अनेक कारणे देशवासियांना मिळतात, मुळात त्यांचं योगदान शून्यच आहे. मात्र HSRA ने दिलेलं योगदान कोणत्याही संघटनेशी तुलना न होण्याइतकं आहे !

कभी वो दिन भी आएगा…
कि जब आजाद हम होंगें…
ये अपनी ही जमीं होगी…
ये अपना आसमाँ होगा…!

संदर्भ सूची :-

● शहीद भगत सिंह – समग्र वाङ्मय (दत्ता देसाई आणि प्रा. चमनलाल)
● भगत सिंह – चेतना स्रोत (विक्रम सिंह)
● रामप्रसाद बिस्मिल आत्मकथा
● अमर क्रांतिवीर चंद्रशेखर आजाद
● भगत सिंह जेल डायरी (विरेंद्र सिंधू)

लेखनसीमा !


लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

0
Please leave a feedback on thisx


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.

शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
रोहन गाडे
रोहन गाडे
3 years ago

अप्रतिम लेख 👍