You are currently viewing स्वतंत्र भारताचा अवकाश प्रवास !
ISRO LOGO

स्वतंत्र भारताचा अवकाश प्रवास !

१५ ऑगस्ट १९४७ भारत देश अखेर इंग्रजांच्या जुलुमी राजवटीतून स्वतंत्र झाला. आज भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली. इतक्या वर्षांमध्ये भारताने प्रत्येक क्षेत्रात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. त्यावेळी विज्ञान आणि अवकाश क्षेत्रात भारतीय वैज्ञानिकांनी भारतात आणि भारताबाहेर अनेक शोध लावले होते आणि शोधनिबंधदेखील प्रसिद्ध केले होते. यामध्ये प्रामुख्याने सुब्रमण्यम चंद्रशेखर, सत्येंद्रनाथ बोस, सी. व्ही. रमण, मेघनाद साहा अशा महान वैज्ञानिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यांच्या १०० वर्षांपूर्वीच मुंबईतील कुलाबा येथे सन १८२३ साली एक वेधशाळा सुरू करण्यात आली होती. ५० च्या दशकात जागतिक पातळीवरची अवकाश शर्यत सुरू झाली होती.

आधुनिक जगात विज्ञानाची कास धरण्याशिवाय तरणोपाय नाही, हे सर्वांनाच उमगले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) स्थापना १९६९ मध्ये झाली असली तरीही १९४५ च्या काळात अंतराळ संशोधनात भारताने फार चांगली प्रगती केली. डॉ. विक्रम साराभाई आणि डॉ. होमी भाभा यांच्या अथक प्रयत्नांनी १९४५ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि अणुऊर्जा खाते उभारण्यात आले होते.

ISRO LOGO
ISRO LOGO

रशिया (तत्कालीन सोव्हिएत युनियन) आणि अमेरिका या बलाढ्य देशांनी त्याकाळी अनेक अवकाशयान आणि विविध प्राण्यांना अंतराळात पाठवून आपले संशोधन सुरू ठेवले होते. आधुनिक अवकाश युगाचा प्रवर्तक म्हणून रशियाचेच नाव घेतले जाते. १९५७ साली रशियाने पहिले अंतराळयान स्फुटनिक-१ अंतराळात सोडून इतिहास रचला. यानंतर अंतराळवीर युरी गागरीन यांनी सर्वप्रथम अवकाशाची सफर करून मानवदेखील अंतराळात जाऊ शकतो, हे सिद्ध करून दाखवलं.

मानवाचा अंतराळ प्रवास कसा चालू झाला ? याबद्दल विस्तृत स्वरूपात वाचण्यासाठी वाचकांनी “मानवाची अवकाशझेप” लेख वाचावा.

पुढील कालखंडात स्वतंत्र भारत अवकाशाच्या या शर्यतीत सामील होण्यासाठी आपल्या प्रयत्नांना धार देऊ लागला होता. डॉ. साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली सन १९६२ साली भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची (INCOSPAR) ची स्थापना करण्यात आली. यावेळी अवकाश शर्यतीत रशिया सर्वोत्कृष्ट राष्ट्र म्हणून उदयास आला होता. रशियासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारताला अंतराळ कार्यक्रम राबवण्यात कोणतीही अडचण भासली नाही.

डॉ. विक्रम साराभाई
डॉ. विक्रम साराभाई

१५ ऑगस्ट १९६९ रोजी अखेर इस्रोची स्थापना करण्यात आली आणि भारतात अंतराळ कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. डॉ. साराभाई यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि भारताचे सर्व अवकाश कार्यक्रम या संस्थेच्या नियंत्रणाखाली आले. याच दरम्यान प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचाही विविध संशोधनामध्ये हातभार लागला. इस्रोच्या स्थापनेच्या एका महिन्यापूर्वीच मानवी इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली ती म्हणजे मानवाचे चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेले पाऊल ! नासाचे अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग हे अपोलो ११ मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवणारे सर्वात पहिले मनुष्य ठरले. ही अवकाश संशोधनाच्या शर्यतीतील निर्णायक घटना ठरली. रशिया आणि अमेरिकेने अवकाशातील आपले प्रभुत्व सिद्ध केले होते. जिथे अमेरिका चंद्रावर जाऊन उभी ठाकली होती, तिथे भारताची अजून फक्त सुरुवातच झाली होती आणि भारताने स्वतःचे उपग्रह विकसित करण्याचा निर्णय घेतला.

भारताचा सर्वात पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’चे १९७५ साली रशियाच्या कापुस्टीन यार येथून प्रक्षेपण करण्यात आले. पाच दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर त्यांना इस्रोशी संपर्क तुटला. मात्र या पाच दिवसांमुळे देशवासियांच्या आणि भारतीय वैज्ञानिकांच्या मनात नवचैतन्य संचारले. भारताचे गगन भरारीचे स्वप्न आता पूर्णत्वास येण्याची ही लहान पण आभाळाएवढी सुरुवात होती.

आर्यभट्ट उपग्रह

इस्रोच्या यशस्वी वाटचालीमुळे भारत स्वतः सॅटलाइट्स आणि विविध अंतराळ उपकरणे बनवून त्यांना अंतराळ कक्षेत स्थापित करणारा जगातला सहावा देश ठरला. अंतराळात एखादे यान पाठवायचे असेल तर उपग्रह प्रक्षेपण यानाची (एसएलव्ही) गरज भासते. याच प्रकल्पाला निर्माण करण्यासाठी डॉ. सतीश धवन यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. एसएलव्हीच्या माध्यमातून भारताच्या भूमीवरून सर्वात पहिला उपग्रह अवकाशात गेला तो म्हणजे ‘रोहिणी’ !
हा दिवस होता १० ऑगस्ट १९७९ !

10 ऑगस्ट १९७९, SLV – III यानाच्या साहाय्याने ‘रोहिणी’ उपग्रहाचे प्रक्षेपण
रोहिणी उपग्रह

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘रोहिणी’चे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर भारतीय वैज्ञानिकांच्या महत्त्वाकांक्षा आणखी जागृत झाल्या. १९७९ ते १९८३ दरम्यान रोहिणी मालिकेअंतर्गत ४ उपग्रह अवकाशात सोडले गेले. याच कालखंडात एसएलव्ही, एएसएलव्ही आणि पीएसएलव्ही असे एकापेक्षा एक आणि प्रगत प्रक्षेपण यान तयार करण्यात आले. १९८४ साली ‘सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा’ चा नाद संपूर्ण अंतराळात दुमदुमला. विंग कमांडर राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे भारतातील पहिले आणि जगातील १३८वे अंतराळवीर ठरले. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-११ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्मा यांनी अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले. यानंतर भारताने राष्ट्रीय उपग्रह विकसित केले ज्यांचे नाव Indian Satellite (इन्सॅट) ठेवण्यात आले. या उपग्रहांचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्यांसाठी करण्यात आला.

भारताने १९८८ ते २००१ दरम्यान भारतातीलच तसेच फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेच्या विविध अंतराळ स्थानकांमधून अनेक अंतराळयानांचे प्रक्षेपण केले. याच दरम्यान पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही हे प्रक्षेपण यानदेखील विकसित केले होते. राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणाऱ्या दुसऱ्या भारतीय आणि प्रथम महिला म्हणजे कल्पना चावला ! १९९७ साली नासाच्या कोलंबिया फ्लाईट एसटीएस-८७ अंतराळयानातून त्यांनी ३६५ तास पृथ्वीच्या कक्षेबाहेर घालवले. दुर्दैवाने २००३ साली आपल्या दुसऱ्या अवकाश सफरीत पृथ्वीकडे परतीच्या प्रवासावर असताना यानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ७ अंतराळवीरांसह त्यांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण भारताला प्रेरित करणाऱ्या एका महान महिला अंतराळ वीरांगनेला देशाने गमावले.

आतापर्यंत भारताने केवळ उपग्रह बनवून ते अंतराळात सोडण्याचे ध्येय गाठले होते, मात्र आता भारत पृथ्वीपल्याड गरुडझेप घेणार होता. ३,८४,००० लाख किमी दूर असलेल्या चंद्रावर जाण्याचा निश्चय भारतीय वैज्ञानिकांनी केला. भारताने आखलेली सर्वात महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणजे ‘चांद्रयान-१’ ! ही भारताची सर्वात मोठी अंतराळ मोहीम होती. ८ नोव्हेंबर २००८ रोजी चांद्रयान-१ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला आणि भारत अवकाश इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झाला. साऱ्या बंधनांना तोडत हे यान भारतीय तिरंगा घेऊन शुन्यमंडळाला भेदते झाले आणि करोडो भारतीयांच्या डोळ्यात पाणी तरळले. चंद्रावर तिरंगा पोहोचला होता. चंद्रावर जाण्याच्या आपल्या पहिल्याच प्रयत्नांमध्ये यशस्वी होणारा भारत हा प्रथम देश ठरला. चंद्रावर पाण्याचे रेणू असल्याचे भारताच्या याच चांद्रयान मोहिमेतून स्पष्ट झाले होते आणि त्यानंतर चांद्रभूमीवरील जलसंशोधनाला खरी गती आली. 

चंद्रयान -१

यानंतर भारताच्या वैज्ञानिकांची अंतराळ संशोधनाची भूक आणखीनच वाढली आणि त्यांनी पृथ्वीपासून साडे ६ कोटी किमी दूर असलेल्या मंगळ ग्रहावर आपली नजर वळवली. लाल ग्रहावर जाणे सोपे नव्हते, मात्र भारतीय वैज्ञानिकांच्या आत्मविश्वास आणि दृढनिश्चयामुळे ते शक्य झाले. भारताची ही पहिलीच मंगळ मोहीम आणि चांद्रयानाप्रमाणे पहिल्याच प्रयत्नात सफल होणाऱ्या या मोहिमेचे नाव होते ‘मंगळयान’ ! ५ नोव्हेंबर २०१३ साली अवकाशात झेपावलेले हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले. अवघ्या तुटपुंज्या बजेटवर इतकी मोठी मोहीम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारताला पाहून जगातील सर्वच अंतराळ संस्था अवाक् झाल्या. मंगळ गाठणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश बनला. या मोहिमेचा एकूण खर्च बघता, मंगळयानच्या प्रति किमी प्रवासाची किंमत ७.७ रुपये आहे, म्हणजे आपल्या पुण्यातल्या ऑटो-रिक्षा ग्राहकांकडून जे शुल्क आकारतात त्यापेक्षाही कमी ! उण्यापुऱ्या ७५ वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या भारताने अवकाश क्षेत्रात आपल्या लहानग्या बजेटच्या बळावर जे जे घडवून दाखवलंय, त्या सर्वांचं प्रतिनिधित्व मंगळयान मोहीम करते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही!

मंगळयान

भारत आता खऱ्या अर्थाने अवकाश क्षेत्रावर अधिराज्य गाजवू लागला होता. रॉसकॉसमॉस, नासा, इएसए, सीएनएसए या बलाढ्य अंतराळ संस्थापेक्षाही मोठे प्रयोग भारताची इस्रो करायला लागली होती. यानंतर भारताने जगातील सर्वात आव्हानात्मक मोहीम हाती घेतली ती म्हणजे चांद्रयान-२ ! कारण या मोहिमेत भारताचे हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते आणि असा पराक्रम कोणीही केला नव्हता. काही तांत्रिक कारणांमुळे ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नाही. चांद्रयान २ ही मोहीम केवळ भारत आणि भारतीयांसाठी नव्हती तर जग आणि मानवजातीसाठी होती. अंतराळातील सर्व मोहीमा या मानवजातीच्या कल्याणासाठीच असतात. चंद्रावर प्रथम पाऊल ठेवताना नील आर्मस्ट्राँग यांनी एक वाक्य म्हटलं होतं, ‘मानवाचं चंद्रावर ठेवलेलं हे छोटसं पाऊल, मानवजातीसाठी एक मोठी गरुडझेप आहे’. त्यांनी त्यावेळी ना नासाचा ना स्वताचा वैयक्तिक उल्लेख केला होता.

एकाचवेळी एकाच यानातून १०४ उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडणे असो किंवा कमी खर्चात मोठमोठ्या अवकाश मोहिमा पार पाडणे असो, इस्रोने जागतिक स्तरावर जे करून दाखवले आहे, ते नासासारख्या प्रतिष्ठित अंतराळ संस्थेलाही जमले नाही. चांद्रयान मोहीम अयशस्वी झाल्याचे दुःख पचवून भारताने पुन्हा एकदा चांद्रयान-३ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर जाण्याची तयारी सुरू केली आहे. भारत केवळ इथेच थांबलेला नाही, कारण भारताने आपली सर्वात पहिली मानवी मोहीम ‘गगनयान’, त्यानंतर शुक्रयान, मंगळयान-२, निसार (NISAR), आदित्य-एल १ अशा अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत अंतराळात मनुष्य पाठवणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने गगनयान मोहीम कोट्यवधी देशवासीयांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.

डॉ. साराभाई, डॉ. भाभा आणि डॉ. धवन यांच्यासारख्या मातब्बर वैज्ञानिक मंडळींच्या नेतृत्वात भारताने केलेली प्रगती आज संपूर्ण जगात प्रशंसनीय आहे. भारतीय उपग्रहांनी घडवलेल्या क्रांतीमुळे आज देशात अनेक अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य जनतेसाठी सुरू झाल्या आहेत. ७५ वर्षांपूर्वी कोणीही विचार केला नसेल की भारत हा देश अवकाश संशोधनात इतकी मोठी प्रगती करून जगासमोर, विश्वाबाबत कुतूहल असणाऱ्या तरुण-तरुणींसमोर एक उत्तम उदाहरण ठेवेल. मात्र भारताने आणि भारताच्या वैज्ञानिकांनी जे करून दाखवले, त्याला तोड नाही. अवकाशात आपला ठसा उमटवणाऱ्या इस्रोचा हा प्रगतिशील अनंत प्रवास असाच कायम राहो !

THE SKY IS NOT THE LIMIT !

सर्व वैज्ञानिकांना आणि अंतराळवीरांना सलाम !

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Suraj
Suraj
2 years ago

Wahhhh bhai