जा कर रण में ललकारी थी,
मैथिलीशरण गुप्त
वह झांसी की झलकारी थी |
१८५७ च्या स्वातंत्र्य समरात आपल्या दिव्य बलिदानाने ज्या वीरांगणेने भारतमातेची कुस पावन केली अशा झाशीची राणी लक्ष्मीबाईची वीरगाथा आपण कालच्या लेखात पाहिली. आज लक्ष्मीबाई सारखीच दिसणारी, दस्तुरखुद्द लक्ष्मीबाई ने युद्धासाठी प्रशिक्षित केलेली, झाशीच्या सैन्यदलातील दुर्गा दल ह्या स्त्री दलाची प्रमुख, लक्ष्मीबाई ची राजकीय, संरक्षण विषयक सल्लागार, प्रचंड पराक्रमी, अंतिम युद्धात स्वतः झाशीची राणी बनून लढलेली वीर योद्धा “झलकारीबाई” ची जीवनकहाणी पाहू !

झलकारीबाई
झलकारीबाई चा जन्म २२ नोव्हेंबर १८३० रोजी जमुनादेवी व सादोबा सिंग, या माध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पोटी, झाशी मधील लहानशा भोज गावी झाला. झलकारीबाई एकुलती एक मुलगी, त्यातच लहानपणीच जमुनादेवी यांना स्वर्गवास घडला व अतिशय लहान वयातच झलकारीचा अभ्यास मागे पडला, तिच्यावर घरकामाची जबाबदारी आली. झलकारीबाई बद्दल काही कथा प्रसिद्ध आहेत, लहानपणी जंगलात शेळ्या चरायला घेऊन गेलेली असताना निव्वळ काठीने तिने बिबट्याला मृत्युमुखी पाडलं. आणखी एक वेळी तिने दरोडेखोरांना चोप देऊन पळून जाण्यास भाग पाडलं होतं. काळाच्या ओघात हरवून गेलेल्या इतिहासातील ऐतिहासिक सत्य काहीही असलं तरी, झलकारी लहानपणी पासूनच चपळ, शूर व कुशल योद्धा होती, हा बोध मात्र या लोक-कथांमधून नक्की होतो.
वयात आल्यावर झलकारीचा विवाह झाशी च्या सैन्यातील पूनम कोरी सोबत लावून देण्यात आला. एके दिवशी राणी लक्ष्मीबाईने संस्थानातील सर्व स्त्रियांना राजवाड्यात गौरीपूजेसाठी बोलावले होते. झलकारी ही पूजेत सामील होण्यासाठी राजवाड्यात गेली असता, राणीची नजर तिच्यावर पडली आणि झलकारी हुबेहूब आपल्यासारखीच दिसते हे पाहून लक्ष्मीबाई आवक् झाली. तद्नंतर माहिती काढल्यावर राणी ला झलकारी च्या साहसी कथांबद्दल व ती एका बहादूर सैनिकाची पत्नी असल्याचे समजले. लक्ष्मीबाई ने झलकारी ला राजवाड्यात पुन्हा बोलवून घेतले, झलकारीला झाशीच्या दुर्गा दलात समाविष्ट करण्यात आले. राणी लक्ष्मीबाई स्वतः दुर्गा दलातील स्त्रियांना तलवारबाजी, नेमबाजी, घोडेस्वारी इ. शिकवत असे. थोड्याच वेळात झलकारी युद्धकलेत निपुण झाली, ती झाशीच्या राणीची राजकीय सल्लागार ही बनली.
ब्रिटिश सरकार इतर संस्थानांप्रमाणेच झाशी संस्थानालाही गिळंकृत पाहत होतं, राजाच्या अकाली मृत्यूने त्यांना आयत कारण मिळल. लॉर्ड डलहौजी ने लक्ष्मीबाई चा पुत्र दामोदर याचा वारसाहक्क नामंजूर केला. परिणामतः ब्रिटिश सरकार व झाशीची राणी परस्परांत युद्धाची ठिणगी पडली. याच काळात भारतात ठिकठिकाणी १८५७ च्या उठावाला सुरवात झाली होती, क्रांतिकारकांचा बंदोबस्त करताना ब्रिटिश सरकारच्या नाकी नऊ येत होते. या संधीचा फायदा झाशीच्या आसपासच्या संस्थानांनी घ्यायचा ठरवला. झाशीवर एकदम आक्रमण करून, राज्य आपापसात वाटून घ्यायचे ! अवघा देश पारतंत्र्यात असताना सुचलेली केवढी ती अजब कल्पना….. असो १8५७ च्या ऑगस्ट मध्ये आसपासच्या संस्थानांनी केलेला हा हल्ला, लक्ष्मीबाई व तिच्या सैनिकांनी यशस्वीपणे परतून लावला.
मार्च १8५८ च्या अखेरीस मध्ये कर्नल ह्युग रोज, याच्या नेतृत्वाखाली ४००० ब्रिटिश सैन्य झाशीच्या दारावर येऊन ठेपते. २४ मार्च ते २ एप्रिल, तब्बल १० दिवस तुंबळ युद्ध होते, भयंकर रक्तपात माजतो, दोन्ही बाजूचे बरेच लोक धारातीर्थी पडतात, तरीही राणी लक्ष्मीबाई शरण येत नाही. अखेर दुल्हेरराव नामक अधिकारी ब्रिटिशांना फितूर होतो व किल्ल्याचे दरवाजे उघडतो, व ब्रिटिश सैन्य किल्ल्यात दाखल होते. आणि,
गजापुरची खिंड स्वतःच्या रक्ताने पावन करून, थोरल्या स्वामींना विशाळगडाची वाट मोकळी करून देणाऱ्या बाजूप्रभूंच्या, “लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे” या वाक्याची इतिहासाला पुन्हा प्रचिती येते.
झलकारी लक्ष्मीबाई व तिच्या पुत्राला चोर वाटेने किल्ल्याबाहेर सुरक्षित पाठवते व स्वतः राणी लक्ष्मीबाई चा वेष धारण करून रणांगणात राणी च्या रूपाने प्रगट होते. दुर्दैवाने पुरण सिंह चा युद्धात मृत्युमुखी पडतो, झलकारी १०-१२ तासांच्या युद्धानंतर ब्रिटिशांच्या तावडीत सापडते. झलकारी ला कैद करून, कर्नल ह्यू रोज अतिशय आनंदी होतो, रोज झलकारी ला विचारतो. तुझ्यासोबत आम्ही काय सुलूख करावा ?
झलकारी त्या क्षणाला उत्तर देते :- “मला फासावर लटकवा”
आपल्या कैदेत आहे ती राणी लक्ष्मीबाई नसून, झाशीची महिला कमांडर झलकारी आहे, काही काळाने, कमांडर ह्यु रोज ला कळते, एव्हाना राणी लक्ष्मीबाई सुखरूप झाशी पासून दूर पोहोचलेली असते. नंतर ब्रिटिश सरकार झलकारी ला फाशीची शिक्षा फर्मावत, पण झलकरीच्या हौतात्म्याची नेमकी तारीख इतिहासाला अज्ञात आहे !
रणांगणावरील झलकारी च अद्वितीय साहस व पराक्रम बघून कमांडर ह्यू रोज म्हणाला होता,
जर भारतभूमीसाठी एक टक्का जरी स्रीया या झलकारीबाईसारख्या स्वातंत्र्यासाठी वेड्या होऊन लढल्या तर आम्हा इंग्रजांना हा देश सोडून पळावे लागेल.
आपल्या दुर्दांत पराक्रमाने झलकारीबाई ने भारतीय इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने उमटवले.
या वीरांगणेच्या चरणी त्रिवार वंदन !
गोरों से लडना सिखा गई,
राणी बन जौहर दिखा गई |
है इतिहास में झलक रही,
वह भारत की ही सन्नारी थी |
जा कर रण में ललकारी थी,
वह तो झांसी की झलकारी थी।
– मैथिलीशरण गुप्त
संदर्भ सूची :-
- Saffron Swords: Centuries of Indic Resistance to Invaders – Manoshi Sinha Rawal
- Jhalkaribai
- The Other Jhansi Ki Rani: The Woman Who Took on British Forces Disguised as Laxmibai
- झलकारी बाई: झाँसी की रानी का रूप धारण कर अंग्रेज़ों को चकमा देने वाली महिला
- India’s Unsung Women Freedom Fighters – Jhalkaribai
अप्रतिम नवीन माहिती होती ही माझ्यासाठी.