येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
ग.दि.माडगूळकर
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे !
महाराष्ट्र ही वीरांची भूमी ! इथे शत्रूंना पुरुन उरण्यासाठी पुरुषांचं नेतृत्व नसलं तरी स्त्रिया ताठ मानेने उभ्या होतात. छत्रपती ताराराणी, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई या रणरागिणी त्याचं उदाहरण ! छत्रपती शिवप्रभूंच्या पराक्रमाने पावन झालेल्या आपल्या या महाराष्ट्राच्या सृजन मातीतून जन्माला आलेल्या एका साहसी स्वातंत्र्ययोद्धेची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी तुम्ही कधीही ऐकली नव्हती.
नाशिक हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा ! स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे पासून अनेकांनी या जिल्ह्यातून क्रांतीची मशाल पेटवली. यातचं एक असं स्त्री नेतृत्वदेखील होतं, ज्यांच्याबाबत कधीही बोललं गेलं नाही. शाळेय इतिहासाच्या पुस्तकांनीही त्यांच्या नाव कधीही छापलं नाही, त्यांचा पराक्रम, संघर्ष कधीही सांगितलं नाही. पण आज अशा रणरागिणीचा संघर्ष आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, ज्यांचा इतिहास वाचून निश्चितच तुमचं ऊर अभिमानाने भरून येईल. या क्रांतीवीरांगनेचं नाव आहे लीलाताई पाटील !
नाशिक जिल्ह्यातील साकोरे या गावात १५ मार्च १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला होता. आपल्या घरात पुरोगामी वातावरण, त्यामुळे बालपणीच त्या पुरोगामी विचारांकडे ओढल्या गेल्या होत्या. आपल्या तरुणाईत त्यांनी अनेक कुप्रथांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. महात्मा गांधींसारखं नेतृत्व, साने गुरुजींसारखा मार्गदर्शक, वामनराव पाटलांसारखा सत्यशोधक पिता, पती उत्तमरावांसारखा देशभक्त क्रांतिकारी जोडीदार लाभल्यामुळेच देशाप्रती त्याग करण्याची वृत्ती त्यांच्या अंगी निर्माण झाली.
विवाहाआधी त्यांचे फारसे शिक्षण झालेले नव्हते. आपल्या डॉक्टर पतीच्या मार्गदर्शनातूनच नर्सिंगचा अभ्यासक्रम त्यांनी पुर्ण केला आणि १९३९ साली अंमळनेर येथे गरीब नागरिकांसाठी एक दवाखाना सुरु केला. मात्र वर्ष दोन वर्षांतच ब्रिटिशांच्या जाचामुळे तो बंद करावा लागला. कोवळ्या वयातच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या लीलाताई यांना वैयक्तिक सत्याग्रहाच्या आरोपाखाली १९४०मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी धुळे येथे तुरुंगवास भोगावा लागला होता. महत्त्वाचं म्हणजे लिलाताईंच्या वयोवृद्ध सासु स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात गेल्या आणि तुरुंगातच त्यांचे निधन झाले. १९३७ ते १९४२ यादरम्यानच्या काळात लीलाताईंनी खादी वापर, प्रभातफेरी, ग्रामसफाई, संडाससफाई, मजूर-शेतकरी संघटन अशा आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.
पाच महिन्यांच्या गर्भवती असतानाही लीलाताई गांधीजींच्या नेतृत्वातील १९४२च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग झाल्या. ‘नही रखना नही रखना, सरकार जालीम नही रखना’ अशा घोषणा देत पतीसह आंदोलनात ब्रिटिशांचा प्रखर विरोध केला. गांधीजींचा मार्ग अवलंबला असला तरी एकदा त्यांच्यातील जहाल आणि शास्त्र क्रांतीकारकदेखील जागा झाला होता. १५ ऑगस्ट १९४२ रोजी लीलाताई, पती उत्तमराव आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अंमळनेर येथील न्यायालय, टपाल कार्यालय व स्टेशनवर मोर्चा काढून या तिन्ही इमारती जाळून टाकल्या. यानंतर हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि थेट त्यांच्या पतींविरुद्ध ‘डेथ वारंट’ काढलं. त्यामुळे आपल्या पतीसोबत त्या काही दिवसांसाठी भूमिगत झाल्या.
दुसऱ्याच दिवशी त्यांनी इंग्रजांनी लावलेल्या ‘मार्शल लॉ’ तोडण्याचे आंदोलन सुरू करून ते यशस्वीही करून दाखवले. यावेळी मात्र ब्रिटिशांचे पित्त खवळले. याच दरम्यान एका आंदोलनात हातात भारतीय ध्वज घेऊन पाच-सहा तरूण आंदोलकांसह त्या ‘ऑगष्ट क्रांती जिंदाबाद, ईंग्रजी राज मुर्दाबाद’ अशा घोषणा देत होत्या. मात्र यावेळी ब्रिटिश सैनिकांनी सर्वांनाच अमानुष मारहाण केली. यावेळी आपला ध्वज त्यांनी पोटाशी कवटाळला, मात्र तरीही पोलिसांनी त्यांच्या पाठीवर मागुन पोलीसी दंडुक्याने प्रहार केले. त्यांच्या घोषणा सुरूच असल्यामुळे रागावून एका शिपायाने त्यांच्या कमरेवर आणि पोटावर रायफलच्या दस्त्याने वार केले आणि त्यांना फरफटत नेत तुरुंगात डांबले. या अमानवीय मारहाणीत झालेल्या दुखापतीमुळे लिलाताईंचा गर्भपात झाला. आपलं मातृत्व आणि आपलं मुलं गर्भातच भारत मातेच्या चरणी दान करणाऱ्या लिलाताईं खऱ्या अर्थाने एक आदर्श आहेत. अंमळनेर येथील शासकीय कार्यालयाची जाळपोळ केल्याबद्दल साडेसहा वर्षे आणि मार्शल लॉ भंग केल्याबद्दल त्यांना साडेसात वर्षे अशी एकूण चौदा वर्षाची शिक्षा झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तब्बल १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लिलाताई ह्या भारतातील पहिल्याच महीला स्वातंत्र्यसेनानी असाव्यात.
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे,
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे !
येरवडा तुरुंगात असताना एक दिवस त्या खूप आजारी होत्या. मात्र या कडक पहाऱ्यातही ब्रिटिशांच्या हातावर तुरी देत त्यांनी तुरुंगातून पलायन केलं. अंमळनेरच्या जाळपोळ प्रकरणानंतर त्यांचे पती उत्तमराव यांनी भुमिगत होवुन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वात प्रतिसरकार चळवळीत कार्य केले. यावेळी लिलाताईंनीसुद्धा या चळवळीतील तुफान सेनेच्या महिला सैनिकांचे नेतृत्व केले. १९४६ पर्यंत लीलाताई यांच्या नावे असलेले सर्व सरकारी सर्चवारंट रद्द होईपर्यंत त्यांनी भुमिगत राहून महाराष्ट्रभर सामाजिक क्रांती तेवत ठेवण्याचा प्रयत्न केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर त्यांचे सर्व सर्चवॉरंट रद्द झाले आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिलं.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लिलाताईंनी स्त्रीशिक्षण, स्त्रीमुक्ती, सहकारी संघटना इत्यादी सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं. १९४७ सालीच अंमळनेर येथे त्यांनी जनता शिक्षण मंडळ उभारलं आणि शेतकरी बोर्डींग व ट्रेनिंग कॉलेज सुरु केले. त्यांनतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिरपूर येथे त्या सलग ९ वर्षे नगरसेविका होत्या. एकाएकी लिलाताईंच्या पराक्रमावर लिहीलेला ‘पक्षी पिंजऱ्यातून उडाला’ हा धडा ईयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातुन विद्यार्थ्यांना शिकवला जात होता, मात्र आज त्यांच्याबद्दल क्वचितच माहिती उपलब्ध आहे, तीसुद्धा केवळ काही प्रांतापुरतीच !
‘लिलाप्रमाणे निर्मळ आणि निष्पाप, सरळ आणि निर्भय, सेवामय आणि त्यागमय स्त्री बघितली नाही.’ असं साने गुरुजी यांनी एका लेखात नमूद केलं आहे.
या कर्तबगार मराठा रणरागिनीचं १ मे १९८५ रोजी कर्करोगाने निधन झालं. समाजाच्या आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने ब्रिटिशांशी लढणाऱ्या, देशासाठी घरदार संसार सगळं विसरणाऱ्या महान लीलाताई पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन !
संदर्भ:-
- आजादी के दिवाने (प्रमोद मांडे)
- सचिन चौधरी लेख (अमरावती)
- स्मृतीसाहित्य (अनिलकुमार पाटील)
- ‘क्रांतिपर्व’ – महाराष्ट्र शासन
Interesting & knowledgeable ✌🏻👌🏻
धन्यवाद !
खुप छान लेख
धन्यवाद !
👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद !
🙏🙏
धन्यवाद !