You are currently viewing खगोलशास्त्री -: लोकमान्य टिळकांचे भारतीय खगोलशास्त्रातील योगदान

खगोलशास्त्री -: लोकमान्य टिळकांचे भारतीय खगोलशास्त्रातील योगदान

लोकमान्य टिळकांनी नेहमी केवळ एक लेखक, संपादक आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणूनच पाहिलं जातं. मात्र ते खगोलशास्त्रातही पारंगत होते, याची माहिती फार कमी लोकांना असेल. टिळकांना वेदांमध्ये असलेल्या खगोलीय उल्लेखांबाबत विशेष कुतूहल होतं. याच आधारावर त्यांनी ’ओरायन’ (Orion) आणि ’द आर्क्टिक होम इन द वेदाज’ (The Arctic home in the Vedas) हे दोन खगोलशास्त्रविषयक ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष’ या पुस्तकाद्वारे त्यांनी भारतीय खगोलशास्त्र पद्धतीवर मूळ प्रकाश टाकला आहे.

‘ओरायन’ हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील प्रतिष्ठित प्राध्यापक मॉरिस ब्लूमफिल्ड यांनी हे पुस्तक म्हणजे ‘Unquestionably the literature sensation of the year’ असे म्हणत या ग्रंथाचा गौरव केला होता. याच ग्रंथापासून प्रभावित होऊन पाश्चात्य संस्कृत विद्वान असलेले फ्रेडरिक मॅक्सम्युलर हे टिळकांच्या अगदी जवळ आले. आर्यांचे मूळ काय आहे? वेद कोणत्या काळात लिहिले गेले? आर्य भारतीय आहेत की परदेशी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्यांनी वैदिक साहित्यातील खगोलशास्त्र, भाषाशास्त्र, भूगर्भशास्त्र अशा अनेक शास्त्रांच्या आधारे संशोधन करण्यास सुरुवात केली.

Lokmanya Tilak
लोकमान्य टिळक

टिळकांनी याच पुराव्यांच्या आधारे आर्य संस्कृती अतिप्राचीन असल्याचे सिद्ध करून दाखवले. खगोलीय पद्धतीने कालनिर्णय करण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय घटनांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणं होतं. वैदिक साहित्याचे आणि वेदांग ज्योतिषाचा अभ्यास करून त्यांनी ऋग्वेदाचा काळ इ.स.पू. ४००० वर्षे म्हणजे जवळापास ६ हजार वर्षे जुना असावा हे सिद्ध केलं. संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन भाषांमध्ये फार साम्य असल्यामुळे या तिन्ही भाषा एका अतिप्राचीन भाषेपासून निर्माण झाल्या असाव्यात असा टिळकांचा मतप्रवाह होता.

वेद, भारतीय खगोलशास्त्र आणि आपली संस्कृती ही अतिप्राचीन असल्याचे जगभरात लोकांना समजण्यासाठी हे दोन्ही ग्रंथ त्यांनी इंग्रजीत लिहिले होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही एकदा ‘He Was by nature a scholar and only by necessity a politician’ असे म्हणत टिळकांचा गौरव केला होता. ओरायन या ग्रंथाचे नाव ठेवण्यामागेही फार रोचक कथा आहे. भारतीय खगोलशास्त्रात एकूण २८ नक्षत्र आहेत (अभिजित घेऊन). यामध्ये ओरायन हे मृग नक्षत्राचे इंग्रजीतील नाव आहे. मृगला मृगशीर्ष असेही म्हटले जाते. मृगशीर्ष हे मार्गशीष महिन्याच्या नावासारखे भासते.

Lokmanya Tilak
लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक एकदा गीता वाचत असताना भगवान श्रीकृष्णचा एक श्लोक त्यांच्या निदर्शनास आला. यामध्ये श्रीकृष्णने ‘छंदात गायत्री मी, महिन्यांमध्ये मार्गशीष मी आणि ऋतूंमध्ये वसंत मी’ असे म्हटले आहे. मात्र भारतीय ऋतूंची सुरुवात वसंताने होते मात्र महिना चैत्र असतो, मग श्रीकृष्ण मार्गशीष का म्हणाले? या प्रश्नाचं कोडं सोडवता सोडवता दोन वर्षांनी ‘ओरायन’ हा ग्रंथ तयार झाला. टिळकांचं खगोलशास्त्र हे पूर्णपणे भारतीय तत्वांवर आधारित होतं.

ज्याप्रमाणे गणिती समिकरणांच्या आधारे ब्रम्हांडातील अनेक रहस्यमयी कोडी सोडवली गेली, त्याचप्रमाणे ऋग्वेद, वेदांग ज्योतिष आणि इतर वेदांच्या आधारे आपण आपल्या संस्कृतीची कोडी सोडविण्यासाठी त्यांनी परिश्रम केलं आणि साध्य करून दाखवलं. भारतीय खगोलशास्त्रीय विद्या शिकण्यासाठी वेदांग ज्योतिष हे पुस्तक किती महत्वाचं आहे, हे टिळकांनी १३० वर्षांपूर्वी सांगितलय, आज अनेक जणांनी याच पुस्तकाच्या आधारे भारतीय खगोलविद्या ज्ञात केली आहे.

टिळकांना वंदन !

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Rahul
Rahul
1 year ago

छान लेख आहे. नवीन माहिती मिळाली. 👍🤝

Minal Ganesh Kulkarni
Minal Ganesh Kulkarni
1 year ago

अप्रतिम 🔥