तब धूँ-धूँ करके धधक उठीं, जनता की अंतर ज्वालाएँ ।
गयाप्रसाद शुक्ल
वीरों की कहें कहानी क्या, आगे बढ़ आयीं बालाएँ॥
भारताला क्रांतीचा भला मोठा इतिहास लाभला आहे. त्यामध्ये सामाजिक क्रांती आणि सशस्त्र क्रांती घडवणारे अनेक योद्धे आणि महान व्यक्तिमत्त्व आपण पाहिले. मात्र इतिहासाच्या काही पानांना नव्या दृष्टीसह पुन्हा उजागर करण्याची गरज आहे. कित्येक अपरिचित योद्धांनी आपल्या त्याग आणि तपस्येमुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला एक निर्णायक वळण दिले. मात्र ते वीर आणि वीरांगना जणू इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेले. स्वातंत्र्य दिनी अनेक महापुरुषांचे स्मरण केले जाते, मात्र याच स्वातंत्र्य लढ्यात तळपत्या तलवारी घेऊन रणांगणात ब्रिटिशांविरुद्ध दोन हात करताना बलिदान देणारे अनेक महायोद्ध वगळले जातात. अशाच विस्मृतीत गेलेल्या एका महान योद्धाची गाथा आज आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.
क्युबन क्रांतिवीर फिडेल कॅस्ट्रोचं एक वाक्य आहे, ‘क्रांती म्हणजे केवळ फुलांचा गुच्छा नाही. हा भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या दरम्यान असलेला एक संघर्ष आहे !’. त्याकाळी विविध समाजांना भूतकाळात अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या. त्यामुळेच भविष्यात आपल्या समाजाला सन्मानाच स्थान आणि आगामी पिढीला सुखद जीवन देण्यासाठी ब्रिटिशांशी लढा, हा पर्याय घेऊन क्रांतीच्या या अग्निकुंडात अनेकांनी उडी घेतली होती. १८५७ चा उठाव हा फार प्रभावशाली उठाव होता. देशातील अनेक ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या बंडामधून त्याचा प्रभाव दिसत होता. उठावात स्त्री योद्धांचे बलिदान पाहून अनेक स्त्रियादेखील कसलाही विचार न करता पुढे सरसावल्या, त्यापैकीच एक महत्त्वाचे आणि अपरिचित नाव म्हणजे रणरागिणी महाबीरी देवी !
*सामाजिक कार्य*
उत्तर प्रदेशातील मुंडभर या गावात जन्मलेल्या महाबीरी यांच्यावरही या उठावाचा मोठा प्रभाव पडला. मात्र यासोबतच आपल्या वाल्मिकी समाजाविरुद्धच्या चुकीच्या रूढी-परंपरांना आळा घालण्यासाठी त्यांना सामाजिक व्यवस्थेविरुद्धही लढा सुरू केला. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षीच त्यांनी गावातील महिलांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटण्यास देण्यास प्रेरित केले. त्याकाळी वाल्मिकी समाजाविरुद्ध अनेक कुप्रथा समाजात सुरू होत्या. त्यापैकीच एक म्हणजे घाण स्वच्छ करणे (Manual Scavenging). इतरांनी केलेला कचरा किंवा गटाराच्या घाण पाण्यात उतरून कचरा केवळ वाल्मिकी समाजानेच काढावा, अशी ही प्रथा होती. महाबीरी देवी या प्रथेच्या विरोधात होत्या आणि हे काम केवळ वाल्मिकी समाज करणार नाही, यासाठी त्या समाजातील सर्व लोकांना जागृत करीत. महाबीरी शिक्षित नव्हत्या, पण आपल्या समाजाप्रती फार संवेदनशील होत्या. विशेष म्हणजे या लढ्याला आणखी बळ देण्यासाठी आणि आपल्या शोषित समाजाला मानसन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी २२ महिलांची एक तुकडी तयार केली होती. या महिलांचे काम होते वाल्मिकी समाजाविरुद्धच्या सर्व प्रथांविरुद्ध जागरूकता निर्माण करणे.
*मेरठचा उठाव आणि महाबीरी यांच्यासह २२ महान स्त्रियांचे बलिदान*
मे १८५७ दरम्यान मेरठच्या छावणीत उठाव झाला. ही जागा मुंडभर गावापासून फार दूर नव्हती. ब्रिटिश सैन्य कधीही याठिकाणी येऊ शकत होते. उठावाची माहिती मिळताच महाबीरी देवीने आपल्या तुकडीसह ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला. या सर्व सामान्य स्त्रिया होत्या, ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शस्त्र पाहिलेदेखील नव्हते. तसेच त्यांना युद्धाचेही प्रशिक्षण नव्हते. ब्रिटिशांविरुद्धचा द्वेष सर्वत्र पसरला होता, त्यामुळे महाबीरी देवीने आपल्या सर्व साथीदारांना शस्त्र उचलण्याचे आवाहन केले. आपल्या कुटूंबाचा आपल्या मुला-बाळांचा, कसलाही विचार न करता या २२ स्त्रिया भारतभूमीच्या रक्षणार्थ हा लढा देण्यासाठी तयार झाल्या.
८ मे १९५७ रोजी इंग्रजांनी मेरठवर हल्ला चढवला आणि ते मुंडभर गावापर्यंत पोहोचले. महाबीरी यांनी ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढण्यासाठी आधीच रणनीती आखून ठेवली होती. या सर्व स्त्रियांकडे चाकू, तलवार, गंडासा, बल्लम (तत्कालीन शस्त्रांचे नाव) असे सामान्य हत्यारेच होती. मात्र शस्त्राला कधीही हातही न लावता त्यांनी गाजवलेला पराक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी अनुकरणीय आहे. गर्जना उठली आणि महाबीरी यांच्यासह २२ स्वातंत्र्य योद्धा इंग्रजांवर तुटून पडल्या. आपल्या संपूर्ण शस्त्रसामग्रीसह ब्रिटिश पुरुष सैन्य गाव-खेड्यातील कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांशी लढत होते. मूठभर २३ स्त्रियांच्या एका तुकडीने ब्रिटिश सैनिकांना हादरवून सोडले होते. अनेक फिरंगी सैनिकांचा त्यांनी फडशा पडला. स्त्रियांच्या अंगी साक्षात काली संचारली होती.
मात्र ब्रिटिश सैन्यासमोर निभाव लागण फार कठीण होतं. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत लढायचं, हा एकमेव पर्याय समोर ठेऊन त्यांनी स्वतःला या स्वातंत्र्य युद्धात झोकून दिलं. ब्रिटिशांनी प्रचंड गोळीबार सुरू केला. काही स्त्रिया शहीद झाल्या आणि काही जखमींना जिवंत पकडण्यात आलं. महाबीरी तोपर्यंत लढत होत्या, जोपर्यंत त्यांचा प्रत्येक साथीदार या लढ्यात शहीद होत नाही. मात्र त्यासुद्धा पकडल्या गेल्या. काही स्त्रियांना फाशीची शिक्षा देण्यात आणि आणि काहींना जिवंत जाळण्यात आलं. यापैकी महाबीरी यांचा मृत्यू कसा झाला, याची नोंद इतिहासात जरी नसली, तरी त्यांचं योगदान और हौतात्म्य एकाही भारतीयाने विसरले नाही पाहिजे. मातृभूमीसाठी लढणाऱ्या या महायोद्धांपैकी काही नाव ऐतिहासिक नोंदीनुसार उपलब्ध आहेत… ते म्हणजे इंदिरा कौर, मान कौर, सुक राज कौर, रहीमी, बख्तावरी, हबीबा, उम्दा, आशा देवी, शोभा देवी, भुवेरी देवी त्यागी, भगवती देवी !
समाज प्रबोधनासह स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या महाबीरी आणि या २२ स्त्रियांची गाथा आजही या गावात व जवळील प्रांतात जिवंत आहे. अनेक पिढ्यांनी त्यांच्या राष्ट्रभक्तीची पूजा केली असून त्यातून प्रेरणा घेतली आहे. या विद्रोहात देशासाठी आपले प्राणार्पण करणाऱ्या या योद्धांबद्दल शालेय इतिहासाच्या पानांमध्ये एक ओळसुद्धा नाही. त्यांच्या पराक्रमी गाथेशिवाय कदाचित आपला इतिहास अपूर्ण आहे. त्यांच्या अभूतपूर्व शौर्य कथांचा कधीही कोणीही प्रचार केला नाही. मात्र या लेखाद्वारे किंचित का होईना विस्मृतीत गेलेल्या त्यांच्या पराक्रमामुळे काहींना स्फूर्ती मिळेल. काळ लोटला तरी आजही अनेक रूढी परंपरांनी आपण जखडलेलो आहोत आणि अनेक समाजांना योग्य तो मानसन्मान अजूनही मिळत नाही. त्यामुळे या देशाच्या युवा पिढीने महान महाबीरी देवी यांचं कार्य सुरू ठेऊन प्रत्येकाला योग्य तो मानसन्मान द्यावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
‘महाबीरी देवी’ यांचे एकही छायाचित्र उपलब्ध नाही. मात्र त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही त्यांच्या प्रांतात उत्साहाने सांगितली जाते. आजही कित्येकांना महाबीरी देवी कोण होत्या याची माहितीच नाही. या योद्धेचे छायाचित्र व फारशी माहिती उपलब्ध नाही, हेच आपल्या मातीचे दुर्दैव आहे.
महाबीरी कशा प्रकारच्या लढवय्या होत्या, ते हा लेख वाचून तुम्हाला नक्कीच उमजेल आणि त्यांचे छायाचित्र मनामध्ये आपोआपच तयार होईल !
महाबीरी देवी आणि त्या २२ वीरांगनांना वंदन !