भारताचं स्वातंत्र्यसमर घ्या, मध्ययुगीन कालखंड घ्या किंवा अजून प्राचीन काळातही गेलात, तरी तुम्हाला अनेक विरांगनांच्या पराक्रमाच्या कथा ऐकायला मिळतात. सातवाहन काळात राणी नागनिका हिने इतिहासात महत्त्वाचं स्थान प्राप्त केलं आहे. त्यानंतर मध्ययुगीन काळात जिजाऊ माँसाहेब, महाराणी ताराबाई अशा अनेक मराठा क्षात्रनायिकांनी आपापला काळ गाजवला. मात्र दक्खन प्रदेशातील विविध साम्राज्यांमध्येही अशा वीर योद्धा झाल्या आहेत, ज्यांच्याबद्दल इतिहासात फार क्वचितच माहिती मिळते. दक्षिण भारत तसा चोल, चेर, पांड्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, विजयनगर अशा अनेक साम्राज्यांनी सजलेला होता. यातच कर्नाटकमधील बेळवडी संस्थान हे छोटंसं राज्य होतं. इथल्याच एका शूर राणीने इतिहास घडवला होता, तिचं नाव होतं राणी मल्लम्मा ! अनेकांना माहीत नसावं की, मल्लम्मा यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी युद्ध केलं होतं आणि यानंतर घडलेला इतिहास दक्खन भारताच्या भूमीवर कायमचा कोरला गेला. आज राणी मल्लम्मा यांचा पराक्रम आम्ही नवदुर्गाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
राणी मल्लमा यांचा जन्म सोढे (सोंडे किंवा सोंडा) येथे झाला. त्या सोढे राज्याचे राजे मधूलिंग नायक यांच्या कन्या होत्या. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी आपला बंधू सदाशिव नायक याच्यासोबत शिक्षण घ्यायला सुरुवात केली. शस्त्र आणि शास्त्राचं शिक्षण घेतल्यानंतर त्या आता एक परिपूर्ण राजकन्या म्हणून शोभत होत्या. मल्लम्मा घोडेस्वारी, तलवारबाजी आणि नेमबाजीमध्ये निपुण झाल्या होत्या. लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यांनी आपल्या वाडीलांसमोर आणि राजदरबारासमोर एक अट ठेवली की, जो व्यक्ती आपल्या वयापेक्षा जास्त वाघांची शिकार एकाच महिन्यात करेल, त्याच्यासोबत मी विवाह करेन.
हे आव्हान पेललं बेळवडी संस्थानाच्या राजपुत्राने, ज्याचं नाव होतं इशप्रभू देसाई (काही ठिकाणी येसाजी प्रभू देसाई असा उल्लेख आहे.) त्याने महिन्याभरात २१ वाघांची शिकार करून दाखवली आणि राणी मल्लम्माचं मन जिंकलं. दोघांचा विवाह थाटात पार पडला. यानंतर राणी मल्लम्मा या बेळवडी मल्लम्मा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. विशेष म्हणजे राणी मल्लम्मा यांनी भारतात पहिली महिला सैन्याची तुकडी उभारली होती. त्यांच्या सैन्यात शस्त्र निपुण अशा ५ हजार महिला योद्धा होत्या आणि या सर्वांना प्रशिक्षण राणी मल्लम्मा यांनीच दिलं होतं. बेळगाव आणि धारवाड या दोन्ही जिल्ह्यांवर (तत्कालीन) त्यांचं राज्य होतं. १६-१७व्या शतकात ब्रिटीश नावाचा नागदेखील फणा काढून उभा राहण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांना ठेचण्यासाठीही मल्लम्मा यांनी आपल्या सैन्यबळाचा वापर केला होता. याच दरम्यान दक्खनचे स्वामी महायोद्धा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते. यावेळी पुन्हा रायगडाकडे परतत असताना शिवराय आणि त्यांचे सैन्य तुंगभद्रा नदी पार करून कोप्पल आणि गडग गाठत लक्ष्मेश्वर येथे पोहोचले आणि यादवाड गावात शिवरायांनी विश्राम करण्याचा निर्णय घेतला. हा काळ जानेवारी १६७८ चा होता.
त्याकाळी कर्नाटकमध्ये शिवरायांची इतकी प्रसिद्धी होती की, त्यांना कर्नाटकचे स्वामी अशीही उपाधी मिळाली होती. याच दरम्यान मराठा सैन्याकडे काही गोष्टी उदा. दूध आणि इतर खाद्यान्न या अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे मराठ्यांनी जवळील काही गावांकडे मदत मागण्याची सुरुवात केली. मात्र गावकऱ्यांनी नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद झाला आणि मराठ्यांनी अनेक गोष्टी त्यांच्याकडून हिसकावून नेल्या. यानंतर गावकऱ्यांनी राजे इशप्रभू यांच्याकडे मराठा सैन्याची तक्रार केली. इशप्रभू यांनाही शिवरायांची महती माहीत होती. त्यामुळे राजा इशप्रभू यांनी आपला सरदार सिद्धगौड पाटील यास मराठ्यांनी घेतलेल्या वस्तू आणि पशु परत करण्यासाठी पाठवलं. मात्र मराठा सैन्याने पाटील यांना अपमानित केलं.
हे राणी मल्लम्मा यांनी कळल्यावर त्यांचा क्रोध उफाळला. आपली २ हजार महिला सैन्याची तुकडी घेऊन त्यांनी मराठ्यांवर गुपचूप हल्ला चढवला, ज्यामध्ये जवळपास २०० मराठी सैनिक जखमी झाले आणि १०-१२ सैनिक मारले गेले. शिवरायांपर्यंत ही बातमी पोहोचल्यानंतर त्यांनी थेट बेळवडीवर हल्ला करण्याचे आदेश दिले. मराठ्यांनी आपलं सैन्य गोळा केलं आणि बेळवडीला चारही बाजूंनी घेराव घातला. मल्लम्मा आणि इशप्रभु दोघेही युद्धासाठी सज्जच होते. तुंबळ युद्ध सुरू झालं. जवळपास १५ दिवस हे युद्ध सुरूच होतं, याचदरम्यान मराठे किल्ल्याच्या आत घुसले आणि इशप्रभू यांच्यावर हल्ला चढवला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आपण आपला पती गमावल्याचं दुःख पचवून मल्लम्मा युद्धात लढतच राहिल्या. आपल्या महिला तुकडीला प्रोत्साहन देत आणखी त्वेषाने लढा असे आदेश त्यांनी दिले.
युद्ध सुरूच राहिलं, राणी मल्लम्मा यांच्या नेतृत्वात सलग २७ दिवस हे युद्ध सुरू होतं. (काही ठिकाणी असा उल्लेख आहे की, मल्लम्मा यांनी मराठ्यांचा पराभव केला, मात्र याला सढळ पुरावा नाही.) एवढे दिवस युद्ध करून महिला सैन्य कमकुवत झालं होतं. अखेर लढत असताना मल्लम्मा यांच्या घोड्याचा पाय कापण्यात आला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. राणी मल्लम्मा यांनी बंदी बनवण्यात आलं आणि शिवरायांसमोर हजर करण्यात आलं. साहजिकच एखाद्या स्त्रीला साखळदंडात ठेवणं, हे शिवरायांच्या तत्वात बसत नव्हतं. शिवरायांनी राणी मल्लम्मा यांना ताबडतोब मुक्त करण्याचे आदेश दिले. याचवेळी मल्लम्मा यांनी सखोजी गायकवाड नावाच्या एका सरदाराने काही महिलांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार केली. नियमाप्रमाणेच शिवरायांनी महिलांच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्याचं फर्मान जारी केलं होतं, सखोजी गायकवाड यालाही शिक्षा झाली.
राणी मल्लम्मा यांनी आपल्या महिला सैन्यासोबत मराठ्यांना कडवी झुंज दिली होती. शिवराय मल्लम्मा यांचा पराक्रम पाहून प्रभावित झाले आणि शिवप्रभूंनी अत्यंत मान-सन्मानाने मल्लम्मा यांना त्यांचं राज्य परत दिलं. प्रत्येक स्त्री ही मातेसमान असते, हे धोरणाचा त्यांनी बालपणापासूनच अवलंब केला होता. हे पाहून मल्लम्मा यांचाही शिवरायांप्रती असलेला आदर आणखी वाढला. शिवराय पुन्हा स्वराज्याकडे परतण्यासाठी सज्ज झाले. यानंतर मल्लम्मा यांनी शिवरायांचं एक दगडी शिल्प तयार केलं होतं जे आजही तुम्हाला यादवाड गावातील हनुमान मंदिरात पाहायला मिळेल. असं म्हणतात शिवराय हयात असताना तयार केलं गेलेलं हे एकमेव शिल्प आहे.
मल्लम्मा यांच्या पराक्रमी इतिहासातून हेच सिद्ध होतं की, आपल्या महिला योद्धा प्रत्येक काळात कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सक्षम होत्या. मल्लम्मा यांचा हाच आदर्श समस्त महिलांनी आपल्या समोर ठेवायला हवा. मल्लम्मा यांच्या या लढाऊ बाण्याला नमन !
संदर्भ:-
- जेधे शकावली
- ९१ कलमी बखर
- चित्रगुप्त बखर
- बेलवाडी संस्थान इतिहास
- जदुनाथ सरकार : शिवाजी एन्ड हिज टाइम्स
- तुरुकारी पंचमरा इतिहास
- शंकर भट्टरू लिखित शिव वंश सुधारनव
खुप चांगला उपक्रम, आणि खूपच सविस्तर माहिती. 🙌🏻
धन्यवाद !