महान क्रांतिकारक अर्नेस्टो चे गव्हेराने एकदा म्हणाला होता की, ‘गुडघे टेकून गुलामीचं आयुष्य जगण्यापेक्षा शत्रूसमोर ताठ मानेनं आणि निधडी छाती ठेऊन आपल्या पायांवर उभे राहून मरा ! जगाच्या पाठीवर असे अनेक क्रांतिकारी झाले, ज्यांना गुलामीच्या साखळदंडातून समस्त समाजाला मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांचीही आहुती दिली. भारतात अशा अनेक महापुरुषांचे दाखले दिले जातात, ज्यांनी स्वातंत्र्याच्या या धगधगत्या अग्निकुंडात स्वतःला झोकून दिलं, मात्र अशा अनेक महान स्त्रियादेखील या भारतभूमीवर जन्माला आल्या आहेत, ज्यांच्याबाबत फारसं बोललं जात नाही. गेल्या वर्षी आपण नवदुर्गामध्ये ब्रिटिशांविरुद्ध दोन हात करताना आत्मबलिदान देणाऱ्या वीरांगना कमांडर कुईलीबाबत जाणून घेतलं होतं. ही कहाणीदेखील एका अशाच विरांगनेची आहे, ज्यांनी या भारत मातेसाठी सर्वोच्च बलिदान दिलं आणि इतिहासात अमर झाल्या, त्यांचं नाव प्रीतिलता वड्डेदार !

खेँच कर लाई है सब को क़त्ल होने की उमीद,
आशिक़ोँ का आज जमघट कूच-ए-क़ातिल में है!
ज्या वयात मुली शिक्षण किंवा लग्न या गोष्टींकडे वळत असतात, त्याच वयात प्रीतिलता यांनी कसलाही विचार न करता भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. त्यांचा जन्म ५ मे १९११ रोजी चित्तगाँव (आजचे बांगलादेश) येथे झाला. मधुसूदन, प्रीतिलता, कनकलता, शांतीलता, आशालता आणि संतोष अशी ही सहा भावंड ! त्याकाळी जहाल मतवादी क्रांतिकारकांचा सर्वत्र बोलबाला होता आणि सशस्त्र क्रांतीने पुन्हा एकदा ब्रिटिशांवर आपला धाक बसवला होता. प्रीतीलता या झाशीची राणी लक्ष्मीबाईकडून प्रेरित ! शालेय जीवनातच त्या बालचर संस्थेशी जोडल्या गेल्या होत्या. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवा, देशभक्ती आणि शिस्तीचे धडे शिकवले जात होते. मात्र ब्रिटिश राजवट असल्यामुळे ब्रिटिश सम्राटाशी निष्ठेची शपथ त्यांना घ्यावी लागली, यामुळे त्या फार दुःखी झाल्या. याशिवाय आणखी एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला, ज्यामुळे स्वातंत्र्याचा ज्वाला त्यांचा मनातून पेटून उठला.

चितगावच्या एका युरोपियन क्लबबाहेर एक बोर्ड लावण्यात आला होता, ज्यावर लिहिलं होतं, ‘Dogs and Indians are not Allowed’! अनेक गर्विष्ठ इंग्रज अधिकारी किंवा विविध क्लब किंवा इतर ठिकाणांच्या बाहेर हा बोर्ड त्याकाळी हमखास असायचा. मात्र हा बोर्ड पाहून प्रीतिलता यांचा राग अनावर झाला. याच क्षणी त्यांनी शपथ घेतली की, जोपर्यंत गुलामीच्या साखळदंडात असलेल्या आपल्या या देशवासियांना त्यांचा सन्मान परत मिळवून देत नाही, तोपर्यंत ब्रिटिशांविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहिल. यानंतर त्यांचा हा स्वातंत्र्य लढा आणखी तीव्र झाला. क्रांती घडविण्यासाठी आधी शिक्षण महत्त्वपूर्ण आहे, हे ओळखणाऱ्या प्रीतिलता यांनी ढाका विद्यापीठातून बी. ए. ची पदवी घेतली. यानंतर आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी एका शाळेत त्या नोकरी करू लागल्या. मात्र अजूनही त्यांच्या दृष्टीत कुटुंब म्हणजे संपूर्ण देश होता आणि जी वागणूक ब्रिटिशांकडून आपल्याला मिळाली होती, त्या हे विसरल्या नव्हत्या !
मास्टरदा सुर्यसेन आणि प्रीतीलता यांची भेट
एकीकडे भगत सिंह आणि त्यांच्या पठ्ठ्यांनी आपल्या क्रांतीचा दरारा देशभर पसरवला होता, तर दुसरीकडे सूर्य सेन यांनी बंगालमध्ये स्वातंत्र्याचा लढा सुरूच ठेवला होता. एकीकडे गांधीजींच्या अहिंसेला काही जण स्वातंत्र्य लढ्याचा खरा मार्ग समजत होते, तर दुसरीकडे सशस्त्र क्रांतीचा एक गट होता, जो शस्त्राच्या शक्तीवर राष्ट्र स्वतंत्र करण्यावर विश्वास ठेवणारा होता. नोकरी करत असतानाच त्यांची ओळख क्रांतिकारी मास्टरदा सूर्य सेन यांच्यासोबत झाली. त्यावेळी बंगालमधील क्रांतिकरकांवर मास्टरदा यांचा चांगलाच प्रभाव होता आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रीतीलता भारावून गेल्या. क्षणाचाही विलंब न करता त्या मास्टरदा यांची संघटना हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये सामील झाल्या. याच दरम्यान मास्टरदा यांच्याकडून शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले तसेच मास्टरदा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या युगांतर या क्रांतिकारकांच्या समुहात त्या सहभागी झाल्या.
प्रीतिलताच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेचे एक उदाहरण म्हणजे, प्रीतिलता यांचे क्रांतिकारी साथीदार रामकृष्ण विश्वास हे अलीपूर तुरुंगात कैद होते. ब्रिटिशांविरोधात अनेक कट रचल्याप्रकरणी आणि चित्तगावचे ब्रिटिश इन्स्पेक्टर जनरल क्रेग यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना तुरुंगात भेटणं, हे काही सोपं काम नव्हतं. मात्र वेषांतर करण्यात तरबेज असलेल्या प्रीतिलता त्यांना तुरुंगात जाऊन तब्बल ४० वेळा भेटल्या होत्या आणि एकाही पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्यावर संशयदेखील आला नाही. पहिलं शास्त्र आणि नंतर शस्त्र चालवण्यात पारंगत झालेल्या प्रीतीलता यांच्यावर मास्टरदांचा विश्वास वाढला होता.
ब्रिटींश सरकारच्या शस्त्रांची लूट
१८ एप्रिल १९३०
मास्टरदा यांच्या नेतृत्वात चित्तगाव येथे ब्रिटींश सरकारच्या शस्त्रांची लुट करण्याची योजना आखण्यात आली होती. यामध्ये प्रीतिलता यांच्यावर महत्त्वपूर्ण कार्य सोपवण्यात आले होते आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. चित्तगावच्या शस्त्रागारावर कब्जा करून त्या ठिकाणची टेलिफोन आणि तार सेवा बंद करणे अशी योजना या क्रांतिकारी गटाने आखली होती. या गटात प्रामुख्याने युरोपियन कौन्सिलने बंदी घातलेले क्रांतिकारक होते, जे आधी ब्रिटिश सत्तेविरोधात कारवाईत सापडले होते आणि प्रीतिलता आणि धडाडीची महिला क्रांतिकारी कल्पना दत्ता यांचाही समावेश होता. ब्रिटिशांनी प्रतिकार केला मात्र ते अयशस्वी ठरले आणि सर्वच क्रांतिकारकांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर मास्टरदा, प्रीतिलता आणि इतर क्रांतिकारी ब्रिटिशांच्या रडारवर आले होते आणि मास्टरदा यांच्यावर तर १० हजारांचे इनाम ठेवण्यात आले होते.
दोन वर्ष लोटली. १९३२ साली घलघाट युगांतर समुहाचे सदस्य मास्टरदा यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी प्रीतिलता यांच्यासह अपूर्व सेन, निर्मलसेन आणि इतर क्रांतिकारीदेखील येथे उपस्थित होते. या गोष्टीचा सुगावा ब्रिटिशांना लागला होता. ज्या घरामध्ये क्रांतिकारकांची बैठक सुरु होती, त्याच घराला पोलिसांनी घेराव घातला. क्रांतीकारकांनाही यांची चाहूल लागली होती, त्यामुळे त्यांनी प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केली. यावेळी पोलीस आणि क्रांतिकारकांमध्ये जोरदार चकमक झाली. गोळीबार सुरु झाला. यामध्ये अपूर्व सेन आणि निर्मलसेन शहीद झाले तर काही ब्रिटिश अधिकारी जखमी झाले. नेहमीप्रमाणे मास्टरदा, प्रितिलता आणि काही क्रांतिकारी तेथून निसटण्यात यशस्वी झाले. ब्रिटिश आता पूर्णपणे बिथरले होते आणि त्यांनी प्रीतिलता यांना थेट मोस्ट वॉटेंड म्हणून घोषित केले.
अपूर्व आणि निर्मल यांच्या हौतात्म्याचा प्रीतिलता यांच्यावर मोठा आघात झाला होता. या देशासाठी लढणारे असे कित्येक क्रांतिकारक चकमकीत किंवा फाशीच्या तख्तावर शहीद होत होते. बिस्मिल, अश्फाक, रोशन सिंह, लाहिरी, भगत, सुखदेव, राजगुरू, आजाद असे मोठा पराक्रम गाजवणारे क्रांतिकारक अवघ्या ५ वर्षांच्या कालावधीतच शहीद झाले होते. त्यातच अपूर्व आणि निर्मल हे कोवळ्या वयाचे आणि आपल्या जीवाभावाचे सहकारी गेल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगरच कोसळले. मात्र या दुःखातून सावरत ब्रिटिशांच्या या कृत्याचा वचपा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
बहरो को सुनाने के लिए धमाके कि जरुरत होती है !

‘Dogs and Indians are not Allowed’!
ही गोष्ट बालपणापासूनच त्यांच्या मनात धुमसत होती. त्याच युरोपियन क्लबच्या बाहेर आजही हा बोर्ड झळकत होता. संघटना थोडी कमकुवत झाली होती, मात्र तरीही क्रांतीची इच्छाशक्ती अजूनही बळकट होती आणि याच क्लब हल्ला करून हा क्लब नेस्तनाबूत करण्याची मोहीम त्यांनी आखली होती. सहकाऱ्यांची संख्या कमी होती. या हल्ल्याची संपूर्ण योजना प्रीतीलता यांनीच केली होती आणि क्रांतीकारकांच्या गटाचे त्याच नेतृत्व करत होत्या. योजनेनुसार शीख पुरुषाचा वेष परिधान करून आपल्या ७ साथीदारांसह बॉम्ब, बंदुका घेऊन क्लबवर त्या निघाल्या. कदाचित ही मोहीम आपली शेवटची मोहीम ठरू शकते, असा विचार करून त्यांनी पोटॅशियम साईनाईडची बाटलीदेखील सोबत घेतली होती. अखेर क्लबवर मोठा हल्ला करण्यात आला. एका मोठ्या बॉम्बस्फोटामुळे ब्रिटिश धास्तावले. त्यांच्या हल्ल्यात अनेक ब्रिटिश मारले गेले तर अनेक जखमी झाले. मात्र क्लबमध्ये असणाऱ्या ब्रिटिशांकडेही बंदुका आणि इतर सामग्री होती. क्रांतिकारकांचा दारुगोळा संपत आला होता आणि काहींना गोळी लागली होती. इतक्यात एक गोळी प्रीतिलता यांना लागली. रक्तबंबाळ अवस्थेतही आणि सर्वत्र धूर होऊनही त्यांनी इतर साथीदारांना क्लबच्या बाहेर जाण्यासाठी मदत केली. मात्र तोपर्यंत त्यांच्याभोवती इंग्रजांचा वेढा पडला होता. ही आपल्या आयुष्याची अखेरची वेळ आहे, हे त्यांना कळून चुकलं होतं. आजपर्यंत या भारतभूमीसाठी आपले प्राण अर्पण करण्यासाठी हजारो क्रांतिकारकांचे स्मरण त्यांनी कदाचित केले असावे आणि चंद्रशेखर आजाद यांच्या ‘आजाद है और आजाद ही रहेंगे’ या तत्वावर कायम राहून स्वतःसोबत आणलेली पोटॅशियम साईनाईडची बाटली उघडली आणि ते संपूर्ण प्राशन करून टाकले. १०० वर्षांच्या संघर्षात आणखी एक थोर क्रांतीकारी वीरांगनेने स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात स्वतःला झोकून दिले. ब्रिटिशांविरुद्ध लढतानाचा राणी लक्ष्मीबाईंच्या संघर्षाचा वारसा या महान क्रांतिकारीने स्वतः च्या आत्मबलिदानाने निरंतर चालू ठेवला. भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यावेळी प्रीतिलतांच फक्त २१ वर्षं होत.
हौतात्म्याच्या एका दिवसापूर्वी प्रीतिलता यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रातील काही भाग !
“आई, असं ओरडू नकोस. बघ, मी सत्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी मरणार आहे. तुला त्यात आनंद मिळत नाही का? देश गुलामगिरीत पडला आहे ! आपण आणखी काय करू शकतो? परकीय दडपशाहीमुळे आपल्या देशातील जनता त्रस्त आहे. आपल्या मातृभूमीचा अपमान केला जातो, आपली मातृभु बेड्यांच्या भाराखाली वाकली जाते. हे सगळं तुम्ही शांतपणे सहन करणार आहात का? स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुमच्या एका मुलीचे बलिदान देऊ शकत नाही का? तू फक्त अश्रू ढाळणार आहेस का?”
“माझ्या देशवासियांना काहीतरी सांगायचे आहे. एक भारतीय स्त्री, आपले सर्व देशी शिक्षण आणि संस्कृती वाऱ्यावर फेकून देऊन ‘हत्या’ सारख्या भयंकर कृत्यात कसे सामील होऊ शकते, असे त्यांच्यापैकी अनेकांना वाटेल. स्वातंत्र्याच्या लढ्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव कसा केला जाऊ शकतो, याचे मला आश्चर्य वाटत नाही. …जेव्हा सविनय कायदेभंगाच्या चळवळीत स्त्री-पुरुष एकत्र काम करत होते, तेव्हा क्रांतिकारी चळवळीत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची परवानगी का दिली जात नाही? ही प्रक्रिया वेगळी असल्यामुळे की महिला अयोग्य आहेत? महिलांनी शस्त्र उचलणे हे काही नवीन नाही. ज्या देशात क्रांती यशस्वी झाली, तिथे शेकडो स्त्रिया सामील झाल्या. एकट्या भारतातच ते इतके शोचनीय का असेल? क्षमता हा निर्णयाचा मापदंड असेल, तर स्वातंत्र्यलढ्यात स्त्रीला पुरुषांपेक्षा कमी सक्षम समजणे अन्यायकारक नाही का? या चुकीच्या समजातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. …”मला विश्वास आहे की आमच्या बहिणी त्यांच्या कमकुवतपणाचा त्याग करतील आणि हजारोंच्या संख्येने क्रांतिकारी संघटनेत सामील होतील.”
स्वातंत्र्या रे तुझ्याचसाठी, दिले तयानी प्राण।
चरणांचा आज तयांच्या, असे आम्हां अभिमान ।
प्रितीलता यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
जय हिंद !
संदर्भ सूची :-
- PRITILATA WADDEDAR
- Pritilata Waddedar – Wikipedia
- Letter of Pritilata Waddedar
.. तेथे कर माझे जुळती 🙏🙏🙏
जय हिंद !! 🇮🇳🇮🇳
🙏🙏🙏
🙌🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼