राजेंद्रनाथ लाहिरी
२९ जून १९०१ – १७ डिसेंबर १९२७
“मैं मर नहीं रहा हूं, बल्कि स्वतंत्र भारत में पुनर्जन्म लेने जा रहा हूं !”
– राजेंद्रनाथ लाहिरी
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देशाच्या विविध भागांमधील हजारो क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या अशा कित्येक क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली. नरवीर हुतात्मा उमाजी नाईक यांच्यापासून सुरू झालेलं बलिदान देण्याचं हे पर्व शहीद भगत सिंह यांच्या फाशीपर्यंत सुरू होतं. मात्र याच कालखंडादरम्यान २०० पेक्षा अधिक स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली, त्यापैकी अनेक वीर आजही अपरिचित आहेत. यापैकीच एक महान नाव म्हणजे शहीद राजेंद्रनाथ लाहिरी !
बंगालने या देशाला विविध क्षेत्रांमध्ये देशाचं नाव उज्ज्वल करणारे अगणित व्यक्तिमत्त्व दिले आहेत. यासोबतच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बंगालच्या मातीतून आलेल्या योद्धांची संख्याही कमी नाही. लाहिरी जी सुद्धा बांगला बंधू. त्यांचा जन्म २९ जून १९०१ साली बंगालच्या (आजचा बांगलादेश) पबना जिल्ह्यातील मोहनपूर गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव क्षिती मोहन लाहिरी आणि आईचं नाव बसंत कुमारी होतं. ज्यावेळी राजेंद्रनाथ यांचा जन्म झाला, त्याच वेळी त्यांचे वडील आणि काका बंगालमधील अनुशीलन दलासोबत केलेल्या आंदोलनाच्या आणि काही गुप्त कारवाईंच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते. लाहिरी यांच्या अंगी त्यांच्या वडीलांचीच देशभक्ती उतरली होती. ज्याचं संपूर्ण कुटुंब देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो, तो व्यक्तीसुद्धा क्रांतीच्या या धगधगत्या अग्नीकुंडात आपल्या प्राणांची आहुती देण्यापासून मागे सरत नाही. भगत सिंह यांच्या बाबतीतसुद्धा हेच पाहायला मिळतं.
स्वातंत्र्य लढ्याची ज्वाला अगदी बालपणापासूनच त्यांच्या मनात भडकली होती. कुटुंबियांची परिस्थिती पाहता वयाच्या नवव्या वर्षी ते आपल्या मामाच्या घरी वाराणसी येथे आले. याच शहरात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. वाराणसीच्या काशी हिंदू विश्वविद्यालयात इतिहास या विषयामध्ये ते एमए करत होते. याच दरम्यान क्रांतिकारी सच्छिंद्रनाथ संन्याल यांच्या संपर्कात ते आले. संन्याल बाबू यांनीच हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन संघटना उभारली होती. त्यांची देशभक्ती आणि स्वातंत्र्यासाठीचा लढाऊ बाणा पाहून संन्याल बाबू यांनी लाहीरींकडे वाराणसीमधून छापण्यात येणारी पत्रिका ‘बंग वाणी‘च्या संपादक पदाचे कर्तव्य सोपवले तसेच ‘अग्रदूत’ नावाचे मासिक ते काढत होते. याशिवाय त्यांना अनुशीलन समितीच्या वाराणसी शाखेतील सशस्त्र विभागाचा संपूर्ण कारभार सोपवला गेला होता. त्यांचे कार्य पाहून त्यांना एचआरएच्या गुप्त बैठकांसाठी आमंत्रण यायला लागले.
काकोरी कांड
एचआरएच्या क्रांतिकारकांद्वारे स्वातंत्र्यासाठी चालवण्यात आलेले हे सशस्त्र आंदोलन जोर धरू लागले होते. मात्र एकाच गोष्टीची चणचण भासत होती ती म्हणजे आर्थिक व्यवस्था. काकोरी कांडाबाबत नव्याने सांगण्याची गरज नाही. रामप्रसाद बिस्मिल यांच्या घरी झालेल्या गुप्त बैठकीत ब्रिटिश सरकारचा खजिना लुटण्याची योजना करण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये एकाच व्यक्तीने खजिना लुटण्याबाबत आक्षेप नोंदवला होता आणि हे न करण्याचा सल्ला दिला होता, ते म्हणजे अश्फाकउल्लाह खान. मात्र लाहिरी यांनी ही योजना पूर्ण करण्याचे मनात पक्के केले होते आणि अश्फाक यांनाही योजनेसाठी तयार केले.
१९२५ साली क्रांतिकारकांनी काकोरी येथे ब्रिटिशांचा खजिना लुटला. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारची फार नाचक्की झाली आणि क्रांतिकारकांनी लुटलेली अब्रू वाचवण्यासाठी त्यांनी सर्व क्रांतिकारकांना पकडण्याचा निर्णय घेतला. काकोरी कांडानंतर रामप्रसाद बिस्मिल यांनी लाहीरींना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी बंगालला पाठवले. कोलकातापासून दूर दक्षिणेश्वर या ठिकाणी त्यांनी बॉम्ब बनवण्याचे सामान गोळा करून प्रशिक्षण सुरू केले. याच दरम्यान चुकून एका सदस्याकडून बॉम्ब फुटला. यावेळी कोणालाही दुखापत झाली नाही मात्र बॉम्बचा आवाज ऐकून पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचले. एकूण ९ सदस्यांसह लाहिरी पकडले गेले.
न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. क्रांतीकारकांना पकडण्याची मोहीम हाती घेतलेल्या ब्रिटिशांनी चंद्रशेखर आजाद यांना वगळता सर्वांनाच अटक केले होते. यावेळी त्यांच्यावर काकोरी कांडाचा खोटा खटला आणि पुरावे सादर करून बंगालमधून लखनऊ येथे आणण्यात आले. ब्रिटिश सरकारला हे ज्ञात होते की, या अशा सशस्त्र संघटनांच्या प्रमुख नेत्यांना जोपर्यंत संपवले नाही, तोपर्यंत हे भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी असेच उठाव किंवा हल्ले करत राहतील. अखेर राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्लाह खान आणि ठाकूर रोशन सिंह यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा ऐकताना कोणाच्याही मुखावर भीती किंवा दुःख नव्हते.
तुरुंगात असताना लाहिरी यांना जेलरने विचारले होते, “हे पूजा-पठण वगैरे ठीक आहे, मात्र हा व्यायाम तुम्ही का करत आहात, आता काही दिवसांनी तुम्हाला फाशी होईल, मग याचा उपयोग काय ?
त्यावर लाहिरी जी यांनी उत्तर दिलं…
“माझ्या आरोग्यासाठी व्यायाम करणं हे माझं रोजचं काम आणि मुळात माझा नियम आहे. मृत्यूच्या भयाने मी माझ्याच नियमांचे उल्लंघन का करू ? मी हा व्यायाम यासाठीच करत आहे, कारण मला पुनर्जन्म या गोष्टीवर विश्वास आहे. पुढील जन्मात मला बलदंड शरीर मिळावं आणि या ब्रिटिश साम्राज्याची पाळं-मुळं मी उपटून काढू शकेन, यासाठीच हा व्यायाम आहे.”
१४ डिसेंबर रोजी त्यांनी एका मित्राला पत्र लिहिले होते.
त्यात त्यांनी असे सांगितले होते,
मृत्यू काय आहे ? जीवनाच्या दुसऱ्या दिशेशिवाय काहीच नाही ! जीवन काय आहे? मृत्युच्याच दुसऱ्या दिशेचं नाव आहे. मग घाबरण्याचं कारण काय ? ही तितकीच प्राकृतिक गोष्ट आहे जितकी पहाटेचा उगवणारा सूर्य !
त्यांच्या या शब्दांमुळे मृत्यूचं किंचितसुद्धा त्यांना भय नव्हतं, हे प्रकर्षाने जाणवतं.
१७ डिसेंबर १९२७
बिस्मिल, अश्फाक आणि रोशन सिंह यांना फाशी देण्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १७ डिसेंबर १९२७ रोजी उत्तर प्रदेशच्या गोंडा तुरुंगात लाहिरी यांना फाशी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेला धगधगता ज्वाला आज शांत पडला होता, मात्र त्याच्या ठिणगीने भगत सिंह, राजगुरू, सुखदेव, जतीन दास असे अनेक क्रांतिकारी निर्माण केले, ज्यांनी या देशासाठी आपले बलिदान दिले. लाहिरी जी यांचं अखेरचं वाक्य हेच होतं.
“मैं मर नहीं रहा हूं, बल्कि स्वतंत्र भारत में पुनर्जन्म लेने जा रहा हूं !”
आज भारत स्वतंत्र झाला मात्र लाहिरी जी इतिहासाच्या एका कोनाड्यात अदृश्य झाले. त्याच लाहिरी जी यांचं योगदान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख त्यांच्या चरणी अर्पण !
संदर्भ सूची
- रामप्रसाद बिस्मिल – आत्मकथा
- भगत सिंह जेल डायरी (यादविंदर सिंग संधू)
- शहीद भगत सिंह समग्र वाङ्मय (चमन लाल / दत्ता देसाई)
विकिपीडिया/गुगल
लेखनसीमा !
लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.
ALSO READ___
TAGS_____
#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters
आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.
शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.
Thank you टीम