You are currently viewing आजादी के परवाने – रामप्रसाद बिस्मिल

आजादी के परवाने – रामप्रसाद बिस्मिल

“ अपना खून अपने ही हाथो से बहाना है हमे ,
मादर-ए-हिन्द को सर-भेट चढाना है हमे ।”

– पं.रामप्रसाद बिस्मिल 

“क्रांती” ही एक अशी भावना आहे जी, मृत्युदंडाने नाहीशी होत नाही. एक क्रांतिकारकाच्या हौताम्याने प्रेरित होऊन त्यामागोमाग असंख्य-अगणित क्रांतिकारी क्रांतियज्ञात उड्या घेतात, परिणामतः बलिदानाने क्रांतीची आग आणखी भडकून उठते. असे हे देशप्रेमाने वेडे, लोकप्रेमाने वेडे, परकीय सत्तेच्या अस्तित्वामुळे वेडे, क्रांतीचे वेडे__ “क्रांतिकारक. ”

चला तर आज फाशीलाही तूच्छ समजणाऱ्या एक मातृवेड्या क्रांतिकारकाची जीवनकहाणी जाणून घेऊ.

पं.रामप्रसाद बिस्मिल

१. बालपण :-

पं.रामप्रसाद बिस्मिल यांचे पूर्वज चंबळ च्या खोऱ्यातील एक प्रसिद्ध घराणे होते. अंतर्गत गृहकलहामुळे बिस्मिलांचे आजोबा नारायणलाल धर्मपत्नी व दोन मूल कल्याणमल व मुरलीधर यांसोबत शाहजहाँपुरला आले. सुरुवातीची काही वर्ष खूप हलाखीची गेली. बिस्मिल यांच्या वडिलांचे नाव मुरलीधर, त्यांना नगरपालिकेत नोकरी लागली व कुटुंबाची परिस्थिती सुधारली. ११ जून १८९७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म झाला. कुटुंब ब्राह्मण होते, कुटुंबात बिस्मिल तीन भाऊ व पाच बहिणी अशी एकूण ९ भावंड होती. वयाच्या चौदाव्या वर्षीच बिस्मिलांना वाईट छंद जडले, ते घरात चोरी करू लागले. चोरीच्या पैशांनी कधी पुस्तके विकत घेत तर कधी सिगरेट-भांग पित. एके दिवशी भांग च्या नशेत चोरी करताना पकडले गेले व वडिलांचा मार पडला. मार खाल्ल्याने बिस्मिलयांची भांग पिण्याची सवय तर सुटली पण, सिगरेट काही सुटेना. ते एक दिवसात ४०-५० सिगरेट पित असत, काही दिवसांनी त्यांची ही वाईट सवयही सुटली. [ १ ] ,

२. युवा जीवन

इयत्ता पाचविला असताना बिस्मिल यांचे नाव मिशनरी(English ) शाळेत घालण्यात आले. याच काळात जवळच्या मंदिरातील एका पूजाऱ्याचा बिस्मिल यांच्या मनावर प्रभाव पडला, पूजाऱ्याने त्यांना “सत्यार्थ प्रकाश” वाचयला दिला, या ग्रंथाने बिस्मिल यांच्या जीवनाला वेगळच वळण दिलं, बिस्मिल कट्टर आर्यसमाजी बनले. त्यांनी एक वेळ अन्न, मीठ, मिरची ई. ऐहिक सुखांचा त्याग केला. आर्य समजी लोकांमध्ये बिस्मिल रमू लागले, तासनतास बसून साधूंची प्रवचने ऐकू लागले. अखेर त्यांच्यावरचा हा प्रभाव इतका वाढला कि वडिलांशी भांडून त्यांनी घर सोडले, दोन दिवसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना घरी आणण्यात आले. शाहजहाँपुर मध्ये बिस्मिल व काही युवकांनी “आर्य समाज मंदिर” नामक संस्थेची स्थापना केली. दर शुक्रवारी संस्थेतील युवक भेटून धार्मिक विषयांवर वाचन, निबंध लेखन तसेच विविध धार्मिक- राजकीय विषयांवर चर्चा करत. वयाच्या अगदी चौदाव्या वर्षी व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकाची वाटचाल क्रांतिकार्याकडे चालू झाली. [ १ ] , [ ४ ]

३. प्रारंभीच क्रांतिकार्य

लखनऊ येथे अखिल भारतीय काँग्रेसचं अधिवेशन होतं, अधिवेशनासाठी लोकमान्य टिळक लखनऊ मध्ये येणार व स्टेशनपासून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल अशी खबर चहूबाजूंना वाऱ्यासारखी पसरली होती. लोकमान्य टिळक काँग्रेसमधील जहाल गटाचे नेते होते, त्यामुळे शहरभर त्यांची मिरवणूक निघाली तर त्यांना खूप प्रसिद्धी मिळेल या भीतीने मवाळांनी आयत्या क्षणाला मिरवणूक रद्द करून त्यांना गाडीने अधिवेशन स्थळी पोहचवायची व्यवस्था करण्यात आली. अधिवेशनात टिळक येणार ही खबर ऐकून पं. बिस्मिल आणि शेकडो तरुण या अधिवेशनात सामील झाले. स्टेशनावर लोकमान्य टिळकांची रेल्वे आली, त्यांना मोटारमध्ये बसवण्यात आलं. तेव्हाच बिस्मिल आणि आणखी काही युवक टिळकांच्या मोटारीपुढे जाऊन बसले. एकतर टिळकांची भव्य मिरवणूक काढा नाहीतर आम्हां सर्वांच्या अंगावरून गाडी न्या अशा हट्टावर तरुण पेटले, त्यांपैकीच एका युवकाने मोटारीचा टायर फाडून टाकला. लोकमान्यांनी युवकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण युवकांचे ते सारं काही व्यर्थ. अखेरीस एक घोडागाडी आणली गेली, त्यात लोकमान्यांना बसवण्यात आलं व स्वतः सर्व युवकांनी शहरभर गाडी ओढत टिळकांची भव्य मिरवणूक काढली. [ १ ] , [ ४ ]

या समयी बिस्मिल तसेच सर्व तरुणांच्या भावणांना उधाण आलं होतं, आपल्या आत्मकथेत बिस्मिल लिहतात__

एक बार गाड़ी में हाथ लगा लेने दो, जीवन सफल हो जाए । लोकमान्य पर फूलों की जो वर्षा की जाती थी, उसमें से जो फूल नीचे गिर जाते थे, उन्हें उठाकर लोग पल्ले में बाँध लेते थे । जिस स्थान पर लोकमान्य के पैर पड़ते, वहाँ की धूल सबके माथों पर दिखाई देती । कुछ उस धूल को भी अपने रूमाल में बाँध लेते थे । [ १ ]

लखनऊ ला “मातृवेदी” नावाची एक गुप्त संस्था आहे असं बिस्मिल यांना कळलं, आपल्या एका मित्राच्या मध्यस्तीने बिस्मिल संस्थेत सामील झाले. बिस्मिल यांनी “अमेरिकेला स्वातंत्र्य कसं मिळालं” हे पुस्तक लिहायला घेतलं, काही काळाने पुस्तकं प्रकाशित ही झालं, संस्थेच्या युवकांमार्फत पुस्तकाचा प्रसार करण्यात आला अखेर सरकारतर्फे पुस्तकावर बंदी घातली गेली. एकीकडे हे सर्व चालू असतानाच मैनपुरी मध्ये मातृवेदी संस्थेच्या कार्यकर्त्यांची धरपकड चालू झाली. बिस्मिल यांच्या नावे ही वॉरंट निघालं, त्यांना फरारी घोषित करण्यात आलं. घाबरून जाऊन त्यांच्या वडिलांनी शाहजहाँपुर सोडलं, कुटुंबावर पुन्हा गरिबीचे दिवस आले. बिस्मिल आपल्या ३ साथीदारांसोबत प्रयाग ला आले, कुण्या धर्मशाळेत दोन-तीन दिवस मुक्कामी राहणार होते. संध्याकाळी यमुनेच्या तटावर बिस्मिल बसले होते तोच गोळीचा आवाज आला, त्यांसोबत असलेले तीन साथीच बिस्मिल यांना मारण्यासाठी टपले होते. भगवंताच्या कृपेने तीन-चार फायर होऊनही बिस्मिलांना एकही गोळी लागली नाही, अंततः मित्र तेथून पळून गेले. साथीदारांच्या अशा विश्वासघाताने बिस्मिल यांना अतीव दुःख झाले, आईने सांत्वन केल्यावर त्यांची मनःस्थिती काहीशी पूर्ववत झाली.

वह फूल चढ़ाते हैं, तुर्बत भी दबी जाती |
माशूक के थोड़े से भी एहसान बहुत हैं || [ १ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

४. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)

बादशहाच्या राजघोषणेने बिस्मिल यांची मैनपुरी कटातून सुटका झाली व ते अज्ञातवासातून बाहेर येऊन पुन्हा शाहजहाँपुर ला येऊन राहू लागले. मैनपुरी कटामुळे बिस्मिल यांची ख्याती सर्वदूर पसरली होतीच. १९२३ च्या आसपास मन्मनाथ गुप्त शहजहाँपुर मध्ये आले, त्यांनी रामप्रसाद यांना HRA मध्ये येण्याची विनंती केली आणि रामप्रसाद HRA मध्ये सामील झाले. याच संघटनेत बिस्मिलांना शचिंद्रनाथ सांन्याल, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशनसिह, अश्फाकउल्लाह सारखे मित्र मिळाले. HRA च्या क्रांतिकारकांनी ३१ जानेवारी १९२५ रोजी “The Revolutionary” नावाचं पत्रक काढून भारतभर वाटलं, हे पत्रक वाचून ब्रिटिश सरकार खडबडून जाग झालं. त्या पत्रातील काही भाग खालीलप्रमाणे_

Chaos is necessary to the birth of a new star. India is also taking a new birth, and is passing through that inevitable phase, when chaos and agony shall play their destined role. The revolutionary movement of young India was the manifestation of the new life that had taken birth in the nation: Twenty years of ruthless repression has not been able to crush it. Scathing denunciations by the renowned public leaders have not been able to arrest its steady growth. The movement stands mightier today than what it was before. The prospects of this revolutionary party were never as bright as they are today.’ [ ९ ] , [ ४ ]

ब्रिटिश सरकारबद्दल असे जहरी लिखाण केण्याप्रकरणी फेब्रुवारी १९२५ मध्ये शचिंद्रनाथ यांना अटक करण्यात आली त्यामुळे HRA चं संपूर्ण नेतृत्व बिस्मिल यांच्या खांद्यावर आलं. क्रांतिकार्यासाठी पैसा लागणारच होता त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रारंभी त्यांनी दरोडे घालायला सुरुवात केली. जवळपास १४-१५ दरोडे घातले गेले, पण बहुतेक दरोड्यांमध्ये क्रांतीकारकांना अपयश आलं. विदेशातून नवीन हत्यार येणार आहेत अशी गुप्त सूचना क्रांतिकारकांना मिळाली. ह्यावेळी त्यांनी सरकारी खजिन्यावर हात साफ करण्याचं ठरवलं. ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी रेल्वे स्थानकाजवक ट्रेन लुटण्यात आली, या लुटीत एकंदरीत ८ हजार रुपये मिळाले. काकोरी लुटीनंतर इंग्रज सरकार क्रांतिकारकांना भयानक घाबरलं, कारण फक्त दहा क्रांतिकारकांनी अक्खी ट्रेन थांबवून ब्रिटिश खजिना लुटला होता. त्यामुळे चहूबाजूंना क्रांतिकारकांचा शोध चालु झाला, गाडीत लुटलेल्या २-३ नोटा शहजहाँपुर मध्ये कशाबशा पोलिसांच्या हाती लागल्या व २६ सप्टेंबर १९२५ रोजी संपूर्ण शहरात धरपकड करण्यात आली. पंडित रामप्रसाद बिस्मिल आणि ठाकूर रोशनसिंह यांना अटक झाली. ४ एप्रिल १९२६ रोजी सूनवाई ला सुरुवात झाली. पोलिसांच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर बनवारीलाल आणि इंदूभूषण मित्र हे दोघेही क्रांतिकारी फुटले, ब्रिटिशांना जाऊन मिळाले. कोर्टात सरकारी पक्षाच्या वकिलांच्या मनात जे येईल ते सर्वच्या सर्व यांकडून वदवून घेतलं जायचं, एके दिवशी तर बनवारीलाल ने बिस्मिल लुटीतील पैसा स्वतःच्या वयक्तिक कामांसाठी वापरतात अशी जुबानी दिली. बिस्मिलांना याचं अतिशय दुःख झालं, त्यांच्या मनातील भावना खालील शयरीमध्ये स्पष्ट दिसून येतात. [ १ ] , [ ४ ]

जिन्हे हम हार समझे थे, गला अपना सजाने को ।
वही अब नाग बन बैठे हमारे काट खाने को ! [ १ ] , [ ४ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

जेलमध्ये सुरुवातीला त्यांना सामान्य कैद्यांप्रमाणे वागवलं गेलं, याचा निषेध म्हणून क्रांतिकारकांनी आम्हांला राजकीय बंदी समजलं जावं सोबतच युरोपियन देशांमध्ये राजकीय कैद्यांना ज्या सुविधा मिळतात त्या आम्हालाही हव्यात अशी मागणी करण्यात आली. अर्थातच, सरकारने ती धुडकावून लावली. निषेधार्थ क्रांतिकारकांनी उपोषण चालू केलं, अखेर सोळाव्या दिवशी ब्रिटिश सरकार नरमल व त्यांनी क्रांतिकारकांच्या मागण्या मान्य केल्या.

५ . जेलमधून सुटकेचे प्रयत्न

काकोरी अभियोगादरम्यान पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी सुटकेचे दोन निष्फळ प्रयत्न केले.

  •   कैदेत असणाऱ्या क्रांतिकारकांपैकी मुख्य आरोपी पं.रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, मन्मथनाथ गुप्त यांनी कोठडीचे लोखंडी गज कापून जेलमधून पळ ठोकायचा अशी योजना आखण्यात आली, त्यानुसार नातेवाईकांची-साथीदारांची भेट व्हायची तेव्हा लोखंडी सळी कापण्यासाठी हत्यार मागवून घेण्यात आले, पोलिसांना भूल देण्यासाठी पोटॅशियम-क्लोराईड ची व्यवस्था करण्यात आली, पण दुर्दैवाने पोलिसांना तपास लागला. “पोटॅशियम-क्लोराईड आम्ही स्वत:साठी मागवल होत, जेणेकरून ते खाल्ल्याने आम्हाला जास्त भूक लागणार नाही” कोर्टात हे कारण देऊन कशीबशी या प्रकरणातून क्रांतिकारकांची सुटका झाली. दिवसातील 24 तास आठवड्यारील सातही दिवस चहूबाजूंनी पोलीसांचा खडा पहारा असताना ही गोष्ट जवळपास अशक्यच होती पण क्रांतिकारकांनी अचाट मेहनतीने व दुर्दान्त संयमाने कल्पना सत्यात उतरवून दाखवली. जेलचे गज पूर्णतः कापून झाले होते, आता फक्त मनात येईल त्या वेळी पलायन करायच बस्स ! पण, अगदी अंतिम क्षणाला पं.रामप्रसाद बिस्मिल यांच मत बदललं. लखनऊ जेल चे जेलर पं. चांपालाल क्रांतिकारकांवर पुत्रवत प्रेम करत, क्रांतिकारकांना जेलमध्ये काही आपत्ति आल्यास स्वत: लक्ष घालून दूर करत. आपलं हे कृत्य त्यांचा विश्वासघात होईल, हे रामप्रसाद बिस्मिल यांच्या लक्षात आल. स्वत:च्या पूर्वायुष्यात कित्येक लोकांच्या विश्वासघाताला बिस्मिल यांच्या पवित्र मनाला ही गोष्ट पटली नाही आणि त्यामुळे जेलमधून पलायन करण्याच्या या योजनेला तिलांजलि देण्यात आली. या सर्व क्रांतिकारकांना फाशीच्या सजा झाल्यानंतर, त्यांशी संबंधित कोठडीचे गज कापलेले आहेत, हे पोलिसांच्या लक्षात आलं. [ १ ] , [ ३ ]
  • क्रांतिकारकांनी पळून जाण्याचा आणखी एक प्रयत्न केला. न्यायालयात जाताना लखनऊ येथील कान्यकुब्जय कॉलेज जवळ रेल्वे पुलाखालून क्रांतीकारकांना घेऊन गाड्या जात असत. असं ठरलं की तो रस्ता अडवण्यात येईल अन काही क्रांतिकारक बॉम्ब, हत्यार अन गाडी घेऊन तयार राहतील अन पोलिसाच्या गाड्या थांबताच हल्ला करून जमेल तितक्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. बिस्मिल यांना अशा रीतीने सोडवण्याचाही एक प्रयत्न आधी फसला होता आता दुसऱ्या प्रयत्नात कानपूर मधील जयदेव, शिव वर्मा, विजय भाग घेणार होते त्यांच्या सोबतीसाठी पंजाबहून भगतसिंग सुद्धा कानपूर मध्ये दाखल झाले. विजय यांचा जेलमधील बिस्मिल यांसच्यासोबत पत्रव्यवहार-भेटी चालू होत्या, पण अचानक पंडित बिस्मिल यांभोवतलीचा पहारा वाढवण्यात आला, आसपासचे पोलिस अधिकारी अधिक सतर्क झाले. खूप प्रयत्नांनंतर क्रांतिकारकांना जेलमधून बिस्मिल यांनी पाठवलेली गझल उपलब्ध झाली, ती खालीलप्रमाणे____

मिट गया जब मिटने वाला फिर सलाम आया तो क्या,
दिल की बरबादी के बाद उनका पयाम आया तो क्या !
मिट गयी जब सब उमीदें मिट गये सारे ख्याल,
उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या !
ऐ दिले नादन मिट जा अब कूये यार में,
फिर मेरी नाकामियों के बाद काम आया तो क्या ।
काश अपनी ज़िन्दगी में हम वो मंजर देखते,
बरसस्तुरबत कोई महशरखराम आया तो क्या !
आखिरी शब दीद के काबिल थी बिस्मिल की तड़प,
सुबहेदम कोई अगर बालायेबाम आया तो क्या !

पं.रामप्रसाद बिस्मिल

पत्रातील बिस्मिल यांचा इशारा साफ होता, “जर त्यांची सुटका करायचीच तर लवकरात लवकर करावी. कारण फाशीनंतर मृत् काहीही कामात येणार नाही. भगतसिंग यांनी हे पत्र वाचलं आणि तो कागद तसाच त्यांच्या हातातून जमिनीवर पडला व भगतसिंग बाजूच्या भिंतीला टेकून काही काळ स्तब्ध उभे राहिले. थोड्या वेळानंतर भगतसिंग गंगा किनाऱ्याकडे एकटेच निघून गेले. मध्यरात्री जयदेव कपूर व शिव वर्मा त्यांना शोधण्यासाठी गंगेकाठी गेले अजूनही भगतसिंग वाळूवर दगडासारखे अविचल व नि:स्तब्धपणे बसूनच होते. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या (HRA) साठी सर्वच क्रांतिकारकांनी जिवापाड कष्ट घेतले होते. काकोरी कांडमुळे सर्व मुख्य क्रांतिकारी पकडले गेले, फाशी शिवाय त्यांची सुटका होणे ही शक्य नव्हते, या विचाराने भगतसिंग खूप दु:खी झाले. [ १ ] , [ ३ ] , [ ५ ] , [ ८ ]

६. काकोरी खटल्याची सुनावणी

क्रांतिकारकांना एकतर फाशीची शिक्षा होणार वा अजन्म कैद सोसावी लागणार हे पक्क होत. वसंत ऋतूचा महिना होता, आपल्यातील बऱ्याच जणांच्या आयुष्यातील शेवटचा वसंत असल्याने सर्वांनी हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले. जेलमध्ये सर्वजण खुश राहू लागले. रोशनसिंह बंगाली शिकले, रामकृष्ण खत्री यांकडून काहींनी मराठी शिकून घेतली, कुणी अध्यात्मिक पुस्तके वाचून काढली. कधी कधी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित व्हायचा. शेवटच्या सूनवाईचा दिवस आला, सर्वांनी पिवळ्या रंगाची गांधी टोपी व हातात पिवळा रुमाल बांधून सूनवाई ला जायचं असा निश्चय करण्यात आला. या खास दिवसासाठी बिस्मिल यांनी खास गीताची रचना केली__

मेरा रंग दे बसन्ती चोला |
इसी रंग में, रंग के शिवा ने माँ का बन्धन खोला |
यही रंग हल्दी घाटी में, खुल करके था खेला |
नव बसन्त में भारत के हित, वीरों का यह मेला |
मेरा रंग दे बसन्ती चोला | [ ३ ]

पं.रामप्रसाद बिस्मिल

६ एप्रिल १९२७ रोजी कोर्टात निकाल लागणार होता, मोठ्या आनंदाने सर्व क्रांतिकारी तयार झाले होते. ठाकूर रोशनसिंह यांना अत्तर खूप आवडायचं, आनंदात त्यांनी आपल्या जवळची संपूर्ण सुगंधी अत्तराची बाटली सर्व क्रांतिकारकांच्या अंगावर खाली केली. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. जेलमधून बाहेर येताच बिस्मिल गाऊ लागले_

“ अपना खून अपने ही हाथो से बहाना है हमे ,
मादर-ए-हिन्द को सर-भेट चढाना है हमे ।” [ ३ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

पोलिसांनी आदरपूर्वक क्रांतिकारकांच अभिवादन केलं त्यांना गाडीमध्ये बसवण्यात आले. क्रांतिकारी आज वेगळ्याच भावनेत होते, आजवर मातृभूसाठी ज्या खस्ता खाल्ल्या होता त्या सर्वांची समिक्षा होणार होती. बिस्मिल,सुरेशचंद्र भट्टचार्य,रामकृष्ण खत्री चांगले गायक होते, संपूर्ण रस्त्यात गायन चालू होतंच. गाडी न्यायालयाजवळ पोहोचली, बंदिस्त क्रांतिकारकांना खाली उतरवण्यात आलं, आणि बिस्मिलांनी पुन्हा राग छेडला_

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं हैं,
देखाना हैं जोर कितना बाजूए का़तिल मैं हैं ?

रहरवे राह-ऐ-मुहब्बत, रह न जाना राह मैं,
लज्जत-ए-सेहराने वर्दी दूर-ए-मन्जिल में है !

आज मक़तल में ये कातिल कह रहा हैं बार-बार,
‘क्या तमन्नाये शहादत भी किसी के दिल में हैं ?

वक्त आने दे, बता देंगे तुझे-ऐ-आस्मां,
हम अभी से क्या बतादे क्या हमारे दिल मैं हैं !

ऐ शहीदे मुल्को-मिल्लत मैं तेरे उपर निसार,
इस तेरी हिम्मत की चर्चा गैरो की महफिल मैं हैं ! [ ३ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

भारत माता की जय !
वंदे मातरम् !

घोषणा देत सर्वांनी कोर्टात सुनावणी साठी प्रवेश केला. सेशन कोर्टाने बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिडी यांवर कलम अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला होता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ठाकूर रोशनसिंह जे ट्रेन लुटीच्या समयी उपस्थित नव्हते त्यांवरही हाच गुन्हा दाखल केला होता. सरकारचा हा मनमानी कारभार पाहून बिस्मिल हसत हसत म्हणाले__

तुझसे मिलकर ओ बुते बे पीर यह उकदा खुला,
भोली भाली शक्ल वाले होते हैं जल्लाद भी || [ १ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिडी, ठाकूर रोशनसिंह यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. इतर क्रांतिकारकांना आजन्म कारावास किंवा 14-14 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आल्या. फाशीची शिक्षा झालेल्या ३ क्रांतिकारकांना इतरांपासून वेगळं करण्यात आलं. आपल्या प्राणप्रिय मित्रांना दूर जाताना पाहून बिस्मिल यांचा कंठ दाटून आला, याच भावनेत ते म्हणाले__

हैफ हम जिसपे कि तैयार थे मर जाने को |
जीते जी हमसे छुड़ाया उसी काशाने को ||
दरो – दीवार पै हसरत से नजर करते हैं |
खुश रहो अहले वतन हम तो सफर करते हैं || [ १ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

फाशी झालेल्या तिघांना दुसऱ्या गाडीने जेलमध्ये नेमण्यात आलं, सर्वांचा एक शेवटचा फोटो काढण्यात आला.

त्याच दिवशी रात्री बिस्मिल यांना गोरखपूर, राजेंद्र लाहिडी यांना गौंडा, रोशनसिंह यांना अलाहाबाद येथील तुरुंगात हलवण्यात आलं. सत्र न्यायालयाकडून शिक्षा झाल्यानंतर क्रांतिकारकांनी औंध चीफ कोर्टात याचिका दाखल केली. १८ जुलै १९२७ रोजी सुनावणी चालू झाली, व्हायचं तेच घडलं फाशीच्या शिक्षा कायम राहिला उलट काही क्रांतिकारकांच्या शिक्षा वाढवून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली.

रामप्रसाद बिस्मिल,अश्फाकउल्लाह खान, ठाकूर रोशनसिंह, राजेंद्र लाहिडी

रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशनसिंह, अश्फाकउल्लाह खान, राजेंद्र लाहिडी यांना फाशीसाठी १९ डिसेंबर १९२७ तारीख ठरवण्यात आली.

७ . पं.रामप्रसाद बिस्मिल यांनी भगतसिंग यांना पाठवलेल्या अखेरच्या पत्रातील काही भाग

“मी खूप सुखी आहे. १९ तारखेला पहाटे जे काही घडणार आहे त्यासाठी मी तयार आहे. परमात्म्याने मला पुरेसे बळ द्यावे. मला विश्वास आहे, की लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच पुन्हा जन्म घेईन. सगळ्यांना माझा नमस्कार सांगावा. कृपा करून आणखी एक काम करा, पंडित जगतनारायण (सरकारी वकील , क्रांतिकारकांना फाशी देण्यासाठी त्यांनी खूप जोर लावला होता.) यांना माझा अखेरचा नमस्कार सांगा. आमच्या रक्ताने माखलेल्या पैशांनी त्यांना शांत झोप येवो. म्हातारपणात ईश्वर त्यांना सबुद्धी देवो.” [ ६ ] , [ ७ ]

८. फाशी

मृत्यूच्या तोंडावर असतानाही रामप्रसाद बिस्मिल यांच्या तेजस्वी मनात भीतीचा लवलेशही नव्हता. मृत्यूच्या चार दिवस आधी घरच्यांना लिहलेल्या पत्रात बिस्मिल म्हणतात_
“माझा मृत्यु देदीप्यमान असेल. कोणी दुःख करू नका. परमेश्वराकडे मागणे मागायचेच असेल, तर हे मागा की, मला पुन्हा या मातृभूमीतच जन्म यावा. म्हणजे मी तिची आणखी सेवा करीन.” [ ४ ]
आपली हीच इच्छा, स्वतःच्या आत्मकथे मध्ये बिस्मिल कविता रुपात खालीलप्रमाणे प्रकट करतात_

यदि देश-हित मरना पडे मुझ को सहस्रों बार भी,
तो भी न मैं इस कष्ट को निज ध्यान में लाऊ कभी |
हे ईश भारतवर्ष में शत बार मेरा जन्म हो,
कारण, सदा ही मृत्यू का देशोपकारक कर्म हो || [

– पं.रामप्रसाद बिस्मिल

फाशीच्या दोन दिवस अगोदीर CID चे अधिकारी मि. हॅमिल्टन बिस्मिल यांना भेटायला गेले, त्यांनी बिस्मिलांना सरकारी साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला. बिस्मिलांना तोंडी सगळ्या गोष्टी सांगितल्यास त्यांना पाच हजार रुपये रोख दिले जातील आणि सरकारी खर्चाने विलायतेला पाठवून त्यांना बॅरिस्टरचे शिक्षण दिले जाईल. अशी हमी देण्यात आली, पण या सरकारी भूलथापांना बिस्मिलांनी भीक घातली नाही.

जो कुछ जो किया सो रौं किया, मैं खुद की हा नाहिं |
जहाँ कहीं कुछ मैं किया, तुम ही थे मुझ माहिं || [ १ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

फाशीच्या आदल्या दिवशी १८ डिसेंबर ला गोरखपूर जेलमध्ये बिस्मिल यांची माता-पिता यांसोबत अखेरची भेट होणार होती. बिस्मिल यांना संघटनेच्या गुप्त ठिकाणी लपवण्यात आलेल्या हत्यारांबद्दल ही माहिती होतं, ही माहिती मिळवण्यासाठी शिव वर्मादेखील तुरुंगापाशी पोहोचले होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या आईने “हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे” सांगत शिव वर्मांना ही तुरुंगात प्रवेश मिळवुन दिला. खरंतर रामप्रसाद लहानपणीपासूनच युयुत्सु प्रवृत्तीचे होते, आजवर अनंत अडचणींना ते निडरपणे बेधडक सामोरे गेले होते, पोलिसांचा अन्याय अत्याचार त्यांनी धीराने सहन केला होता.

सताए तुझको जो कोई बेवफा ‘बिस्मिल’
तो मुँह से कुछ न कहना आह ! कर लेना |
हम शहीदाने वफा का दीनों इमां और है
सिजदे करते हैं हमेशा पाँव पर जल्लाद के | [ १ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

पण, आपल्या जन्मदात्या मातेला समोर पाहून बिस्मिलांच्या धैर्याचा बांध फुटला, त्यांना रडू कोसळलं !
बिस्मिल रडत होते, मात्र त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रुचा थेंब नव्हता. उलट या वीरमातेने बिस्मिलांना म्हंटल_
‘अरे, मी तर समजत होते की माझा मुलगा शूर आहे. त्याचं नाव उच्चारताच इंग्रज सरकारच्या अंगाचासुद्धा थरकाप उडतो ! पण तो मृत्यूला भितो हे मला माहीत नव्हतं. तुला रडतच फाशी जायचं होतं, तर या कार्यात तू उगाचच पडलास, म्हणायचा ! [ ४ ] [ ६ ] , [ ७ ]

तेव्हा रामप्रसाद यांनी उत्तर दिलं_
“आई, मला कसली काळजी आणि कशाचा पश्चात्ताप ! मी कुठलेच पाप केलेले नाही. मी मरणाला घाबरत नाही. पण आई ! आगीजवळ ठेवलेले तूप विरघळतेच. तुझे-माझे नातेच असे आहे, की तू जवळ येताच डोळ्यांत अश्रू दाटून आले. अन्यथा मी खूप आनंदी आहे.” [ ४ ] [ ६ ] , [ ७ ]

बिस्मिलांचं हे बोलणं ऐकून त्यांच्या आईने शिव वर्मांचा हात पकडला आणि म्हणाल्या_
“हा तुझा सहकारी आहे, पार्टीच्या संदर्भात काय सांगायचं ते याला सांगून टाक. हरिश्चंद्र, दधीची या पूर्वजांप्रमाणे वीरत्व, धर्म आणि देश यासाठी प्राण दे. चिंता आणि पश्चात्ताप करण्याची गरज नाही.” [ ४ ] [ ६ ] , [ ७ ]

माता-पित्याशी रामप्रसाद बिस्मिल यांची ही शेवटची भेट.

१९ डिसेंबरच्या दिवशी सकाळी फाशीसाठी बिस्मिल यांना उठवण्यात आलं, त्यांनी जोरजोराने भारत माता की जय, वंदे मातरम् घोषणा दिल्या आणि फाशीच्या तख्ताकडे शांतपणे चालत असताना गुणगुणायला सुरुवात केली_

“मालिक तेरी रजा रहे और तू ही तू रहे,
बाकी न मैं रहूँ, न मेरी आरजू रहे |
जब तक कि तन में जान, रगों में लुहु रहे,
तेरा ही जिक्र या तेरी ही जुस्तजू रहे ||” [ ४ ] [ ६ ] , [ ७ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

फाशीच्या तख्तावर उभे राहून त्यांनी आपली अंतिम इच्छा प्रकट केली ते म्हणाले __
“I Wish the downfall of British Empire”

नंतर त्यांनी हा शेर म्हंटला_

नंतर अब न अहले वलवले हैं और न अरमानों की भीड !
एक मिट न जाने की हसरत, अब दिले बिस्मिल में है ! [ ४ ], [ ३ ]

– पं.रामप्रसाद बिस्मिल

शेवटी, “विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुव..” हा मंत्र म्हणून फाशीचा फंदा गळ्यात घातला. खटका उडाला, बिस्मिल यांच्या गळ्याभोवती फास आवळला गेला आणि काही वेळाने हा वेडा मातृभक्त पंचतत्वात विलीन झाला.

संध्याकाळी सहा-सातच्या सुमारास बिस्मिलांचं पार्थिव घरच्यांना सुपूर्द करण्यात आलं, मोठी अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांच्या आईच्या डोळ्यात अजूनही पुत्र वियोगाचे अश्रू नव्हते, उलट स्वाभिमानाने त्या ओतप्रोत भरून गेलेली त्यांची आई म्हणाली_
“मी माझ्या मुलाच्या या मृत्यूने आनंदित आहे, दुःखी नाही. मला श्रीरामचंद्रांसारखा पुत्र हवा होता. बोला, श्रीरामचंद्रकी जय !”

आपल्या आत्मवृत्ततात रामप्रसाद बिस्मिल शेवटी लिहतात_
देशवासियों से यही अंतिम विनय है कि जो कुछ करें , सब मिलकर करें और सब देश की भलाई के लिए करें । इसी से सबका भला होगा ।

मरते ‘बिस्मिल’ ‘रोशन’ ‘लहरी’ ‘अशफाक’ अत्याचार से ।
होंगे पैदा सैकड़ों इनके रुधिर की धार से ॥ [ १ ],

– पं.रामप्रसाद बिस्मिल

बिस्मिल आणि सहकाऱ्यांच्या तेजस्वी बलिदानातून प्रेरणा घेऊन भगतसिंग-चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. भारतमातेच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ चालू झालेला हा अखंड यज्ञ चालूच राहिला.

संदर्भ सूची :-

[1] आत्मकथा :- रामप्रसाद बिस्मिल
[2] क्रांतिकारी आंदोलन कुछ अधखुले पन्ने :- धर्मेंद्र गौड
[३] चंद्रशेखर आझाद और उनके दो गद्दार साथी :- धर्मेंद्र गौड़
[४] मृत्युंजयचा आत्मयज्ञ :- वि.श्री.जोशी
[५] सत्तावन्न ते सुभाष :– म. मो. बाळशास्त्री हरदास
[६] शहीद भगत सिंह – समग्र वाङ्मय :- दत्ता देसाई
[७] भगतसिंह जेल डायरी :- यादविंदर सिंह संधु
[८] संस्मृतियाँ – शिव वर्मा
[९] Kakori Conspiracy, Case Judgments

लेखनसीमा !


लेख आवडल्यास खालील आयकॉन वर क्लिक करून आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

0
Please leave a feedback on thisx


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.

शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Suraj
Suraj
3 years ago

अप्रतिम लिखाण,,, महत्वपूर्ण माहिती