You are currently viewing क्रांतीपथावरील अग्नि-शलाका – रामरखी

क्रांतीपथावरील अग्नि-शलाका – रामरखी

मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का…
उसी को देख कर जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले…

– मिर्ज़ा ग़ालिब

भारतभूमीवर असे अनेक स्वातंत्र्ययोद्धे झाले आहेत, ज्यांना त्यांच्या क्रांतीच्या संघर्ष प्रवासात आपल्या कुटुंबियांचीदेखील साथ लाभली. कित्येक कुटुंबच्या कुटुंब देशाला ब्रिटिशांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. पण भारताने आणि भारतीयांनी त्यांचा कधीही गौरव केला नाही. त्यांचे बलिदान विस्मृतीस गेले. पण तरीही कुठल्यातरी कोनाड्यात पडलेल्या एखाद्या पुस्तकाच्या पानावर मायभूमीवरचे त्यांचे प्रेम कुणीतरी लिहून ठेवलेच आहे. आपले स्वकीय राष्ट्रासाठी झटत आहेत, यासाठी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारेही अनेक लोकं या मातीत झाले आहेत. राधा आणि कृष्ण कधीही एक होऊ शकले नाहीत, मात्र त्यांचं प्रेम अगाध होतं, आजही वर्षोनुवर्षे राधा-कृष्णाचीच पूजा आपल्या मंदिरांमध्ये होते. अशाच एका पवित्र आणि अधुऱ्या प्रेमाची कथा आज आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात त्यागाचे आणि असीम प्रेमाचे उदाहरण समोर ठेवले आहे. त्यांचं नाव आहे क्रांतिकारी बालमुकुंद आणि त्यांची पत्नी रामरखी तथा लज्जावती !

लॉर्ड हार्डींगला दणका

२३ डिसेंबर १९१२ रोजी भारताचा तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड चार्ल्स हार्डींगची मिरवणूक दिल्लीच्या चांदनी चौकमध्ये निघाली होती. त्यावेळी ब्रिटिशांविरुद्ध प्रचंड रोष पसरल्यामुळे देशाच्या विविध भागांमधील क्रांतिकारकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना यमसदनी धाडण्याचे एकमेव ध्येय बाळगले होते. ‘बेहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती है’, असे भगत सिंह एकदा म्हणाले होते. भगत सिंह आणि बटूकेश्वर दत्त यांच्या संसदेतील बॉंब फेकण्याचा घटनेच्या १६ वर्षांपूर्वीच क्रांतिकारक रास बिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली असाच बॉम्ब फेकून ब्रिटिशांना हादरा देण्यात आला होता. व्हाइसरॉय हार्डींग त्यावेळी हत्तीवर होता. हा बॉंब व्हाइसरॉयच्या जवळच पडला आणि तो जखमी झाला. अंबारीवरील माहूत मात्र ठार झाला. या बॉंबचा आवाज लंडनपर्यंत पोहोचला होता. ब्रिटिश सरकारचे गुप्तचर विभाग सतर्क झाले, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना शोधाशोध करण्यासाठी सर्वत्र तैनात करण्यात आले. बॉंब नेमका कोणी फेकला आणि यामागे कोणाची योजना आहे यासाठी ब्रिटिश यंत्रणा तातडीने कार्यरत झाल्या.

बालमुकुंदाला फाशीची शिक्षा

हे प्रकरण दिल्ली बॉंब प्रकरण म्हणून गाजले. व्हाइसरॉयवर हल्ला होऊनही अपराधी न सापडणे, ही समस्त ब्रिटिश साम्राज्यासाठी शरमेची बाब होती. या प्रकरणात अनेक निष्पाप तरुण पकडले गेले आणि त्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली. व्हाइसरॉयवर बॉंब फेकणारा एक तरुण क्रांतिकारी होता. त्या क्रांतिकारकांचे नाव बालमुकुंद !

रणी राष्ट्र स्वातंत्र्ययुद्धासी ठेले,
मरे बाप बेटे लढायासी आले !

पंजाबचे प्रसिद्ध राष्ट्रभक्त भाई परमानंद यांचा हा चुलतभाऊ आणि त्यांचेच पूर्वज हुतात्मा मतीदास यांची औरंगजेबाने क्रूरतेने हत्या केली होती. बालमुकुंद त्यांचा वंशज होता. ब्रिटिशांना अजूनही क्रांतिकारकांचा मागमूस लागला नव्हता. मात्र फंद-फितुरीमुळे सर्व क्रांतिकारी पकडले गेले. या मोहिमेचे प्रमुख रासबिहारी बोसदेखील भूमिगत झाले. १३ जणांवर खटला भरण्यात आला. दिल्ली कोर्टाने निकाल दिला आणि बालमुकुंद यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

रामरखीचा त्याग

बालमुकुंदाची अवघ्या एका वर्षापूर्वीच एका सौंदर्यवती आणि पतिव्रता कुमारीशी लग्न झाले होते. तिचं नाव रामरखी. माहेरी आल्यावर तिचे नाव लज्जावती ठेवण्यात आले. आपला पती दिल्ली प्रकरणात पकडला गेला, या बातमीनेच ती हताश झाली आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली हे ऐकताच तिचे मन सुन्न झाले. आपले अश्रू लपवून तीने परिस्थितीला सामोरे जाण्याचे ठरवले. कसे बसे ती दिवस ढकलत होती. पतीला भेटण्याची व्याकुळता फार वाढली होती. आपला पती स्वातंत्र्ययोद्धा आहे, याची तिला माहिती होती. तसेच आपण अमर शहीद भाई मतीदास यांचे वंशज असल्याचा बालमुकुंदालाही गर्व होता. अखेर सहा महिन्यांनी बालमुकुंद यांना भेटण्याची परवानगी त्यांना मिळाली. त्या दिल्लीकडे रवाना झाल्या. आपल्या पतीला पाहताक्षणीच त्यांना रडू आलं. त्यांनी पाहिले, अंधारी कोठडी फार भयानक आहे, तिथे झोपण्यासाठी केवळ एक चादर आहे, सर्वत्र मच्छरांचं साम्राज्य !

पतीला भेटून रामरखी घरी आल्या. घरातील इतर मंडळी छतावर खाट टाकून निजले. मात्र त्या दिवसापासून रामरखी यांनी घरातील एका अंधारी कोठडीत चादरीवरच झोपायला सुरुवात केली. आपल्या पतीची अवस्था त्यांना असह्य झाली आणि आपले पती ज्या यातना भोगत आहेत त्याच आपण ही भोगायच्या असे त्यांनी मनी ठरवले. खूप जणांनी त्यांना सामान्य आयुष्य जगण्याचा हट्ट केला, मात्र आपल्या निश्चयावर त्या ठाम राहिल्या. पुन्हा काही दिवसांनंतर त्यांना आपल्या पतीला भेटण्याची संधी मिळाली. यावेळी पतीची अवस्था पाहून त्या स्तब्ध झाल्या. मात्र मनावर नियंत्रण मिळवून त्या पतीशी बोलू लागल्या. आपल्या पतीला दिवसातून केवळ एकदाच जेवण मिळतं आणि तिथली चपाती भेसळ बनवून तयार करण्यात आली होती. तो तुकडा घेऊन रामरखी घरी परतल्या आणि त्या दिवसापासून त्यांनी घरी अशाच प्रकारची भेसळ असलेली भाकरी बनवायला सुरुवात केली आणि दिवसातून एकच दिवस त्या अन्न प्राशन करू लागल्या.

एक आग का दर्या है और डूब के जाना है….

Drawing Credit :- Aditi Pawar ( @aditi for art )

फाशीचा दिवस जवळ येत होता, व्याकुळतेचे दिवस जात होते. बालमुकुंद यांच्या फाशीपूर्वी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रामरखी पुन्हा एकदा दिल्लीला निघाल्या. आपल्या प्राणप्रिय पतीसोबत ही त्यांची अखेरची भेट ठरली. बालमुकुंदाची हालत नाजूक होती. मात्र तरीही मृदू अंतःकरणाने तो रामरखीला म्हणाला, ‘जो प्राणी जन्माला आला आहे तो एक दिवस जाणारच, आपण एकमेकांचे सोबती होऊ शकलो नाही. तू स्वतःला भाग्यवती समज की मी देशहितासाठी स्वातंत्र्ययुध्दाच्या या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती आहे”. रामरखीचा धीर सुटला, अश्रू काही थांबेनात, कदाचित सतत ओघळत्या अश्रूंमुळे तिला आपल्या पतीचे मनसोक्त दर्शनदेखील करता आले नाही. फाशीच्या दिवसांपूर्वीच त्यांनी व्रतस्थ राहून एकाच ठिकाणी बसून अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंबही पोटात जाऊ दिला नाही. डोळ्यांमध्ये, मनामध्ये आणि ओठांवर केवळ बालमुकुंदच होते.

आपण ज्या व्यक्तीवर अमाप प्रेम केलं, ती व्यक्ती आपल्याला कधीही भेटणार नाही, हा विचार करूनच रामरखीचा जीव तुटत होता. अन्न पाण्याशिवाय तिची अवस्था फार वाईट झाली होती. कदाचित तिने आपल्या पतीसोबतच जगणं आणि पतीसोबत मरण निश्चित केलं होतं. अखेर फाशी झाली. फाशीच्या दिवशीच त्यांनी पहाटे उठून त्याच अवस्थेत स्नान केले. स्वच्छ वस्त्र आणि आभूषणे परिधान केली. जशी एखादी स्त्री पहिल्यांदाच त्याचा प्रेमाला भेटत होती, असा त्यांचा साज होता. फाशी झाल्यामुळे त्यांचे अर्धे प्राण निघूनच गेले होते, मात्र अधिकारी बालमुकुंदाचा मृतदेह आपल्याला सुपूर्द करणार नाहीत, हे ऐकल्यावर तिने जो निर्णय घेतला, तो प्रेमाची खरी पवित्रता दाखवून देतो. घरात असलेल्या तुळशीच्या झाडासमोर त्या पुन्हा ध्यानस्थ झाल्या. कदाचित त्या आपल्या पतीला भेटण्यासाठी आतुर झाल्या होत्या. भेटीची ओढ प्रचंड वाढली होती. फार दिवस परीक्षा पाहिली, आता भेटल्याशिवाय माघार नाही, हा एकच प्रण त्यांनी घेतला होता आणि काही क्षणातच आपले प्राण खेचून त्यांनी देहत्याग केला. रामरखी आणि बालमुकुंद अखेर एकमेकांना भेटले.

आपण प्रेमकथा असलेले अनेक काल्पनिक चित्रपट पाहतच असतो, त्यांच्या कथा वाचत असतो, मात्र वास्तवात घडलेली ही कथा आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. स्वातंत्र्यलढ्याच्या पर्वाला लाभलेली ही सुंदर प्रेमकथा प्रकाशाच्या झोतात यावी यासाठीच आपल्या लेखणीद्वारे रामरखीचा हा प्रवास लिहिण्याचा प्रयत्न आम्ही केला. असे कित्येक बालमुकुंद आणि रामरखी स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःच्या प्रेमासाठी झटले असतील, मात्र त्यांचे त्याग, त्यांची समर्पणाची भावना, त्यांचं प्रेम अजूनही पुस्तकांमध्येच गडप असेल. आपला पती स्वातंत्र्ययोद्धा आहे, तो केवळ आपला नाही तर २०-२५ कोटी जनतेचा विचार करतो, याचा रामरखीला अभिमान होता. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मात्र प्रेमाची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली आहे. त्यामुळे आजच्या युवा वर्गाने या दोन प्रेमवीरांचा आदर्श समोर ठेवावा आणि प्रेमाची व्याख्या समजून घ्यावी.

त्यागमूर्ती रामरखी यांना वंदन !

आप के बाद हर घड़ी हम ने…

आप के साथ ही गुज़ारी है…!

– गुलज़ार

संदर्भ सूची :-

  • Saffron Swords: Centuries of Indic Resistance to Invaders – Manoshi Sinha Rawal
  • Bhai Balmukund
  • तेजस्वी तारे – स्वातंत्र्यवीर सावरकर
  • शहीद भगतसिंग समग्र वाड्मय – दत्ता देसाई
  • भगतसिंह और उनके साथियो के संपूर्ण उपलब्ध दस्तऐवज – राहूल फाउंडेशन

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments