You are currently viewing क्रांतीपथावरील अग्नि-शलाका – झाशीची राणी लक्ष्मीबाई

क्रांतीपथावरील अग्नि-शलाका – झाशीची राणी लक्ष्मीबाई

रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।।

भा. रा. तांबे

भारतीय संस्कृतीमध्ये शक्ती हीच सर्वोच्च देवता मानली गेली असून ती स्त्री म्हणून गणली गेली आहे. याच शक्तीच्या जोरावर आपला दरारा निर्माण करणाऱ्या महान महिला योद्धादेखील या भारतभुमीवर घडल्या आहेत. पौराणिक कथांमधील पार्वती, दुर्गा, सिता, कुंती, द्रौपदी इ. पात्र असो किंवा भारताच्या महान साम्राज्यांमधील महिला योद्धा असो, सर्वांनीच या इतिहासात अढळपद मिळवलं आहे. विशेष म्हणजे या भारत भूमीलाही येथे आई म्हणून संबोधले जाते. याच आईच्या पोटी जन्मलेली एक धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणारी महान वीरांगना म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई ! या देशातून इंग्रजांची पाळं-मुळं उपटून काढण्याचे ध्येय बाळगणाऱ्या त्यागमूर्ती लक्ष्मीबाईंनी १८५७ च्या उठावात जो पराक्रम गाजवला, त्यामुळे आजही भारतवासीयांच्या माना गर्वाने उंचावतात. विशेषतः स्त्रियांसाठी प्रेरणेचा एक किरण ठरलेल्या लक्ष्मीबाईंचा जीवनप्रवास सर्वांसमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न !

बालपणाची छबिली !

Birth place of Lakshmibai

राणी लक्ष्मीबाईंचे खरे नाव मणिकर्णिका मोरोपंत तांबे ! १८१८च्या तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धानंतर मराठा साम्राज्याचा अस्त झाला, मात्र अजूनही देशाच्या काही भागांमध्ये मराठ्यांचे नियंत्रण होते. वाराणसीच्या एका साध्या मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीबाईंना बालपणी मनू आणि छबिली (खेळकर) म्हणून संबोधले जायचे. राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. वयाच्या अवघ्या ४थ्या वर्षी आई भागीरथीबाईचे निधन झाल्यानंतर मनू बिथुरच्या पेशव्यांच्या घरात वाढली इथेच तिला घोडेस्वारी, तलवारबाजी, नेमबाजी, मल्लविद्या, युद्धकला आणि इतर गोष्टींमध्ये पारंगत झाल्या. वयाच्या १४व्या वर्षी १८३४ रोजी लक्ष्मीबाईंचा झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतरच त्यांना लक्ष्मी असे नाव देण्यात आले.

कानपूर के नाना की, मुँहबोली बहन छबीली थी,
लक्ष्मीबाई नाम, पिता की वह संतान अकेली थी,
नाना के सँग पढ़ती थी वह, नाना के सँग खेली थी,
बरछी ढाल, कृपाण, कटारी उसकी यही सहेली थी।
वीर शिवाजी की गाथायें उसकी याद ज़बानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

सशस्त्र महिला योद्धा दलाची उभारणी !

गंगाधरराव राजकारणी होते. झाशी त्यांच्या राजवटीत भरभराटीस आला असला, तरी लोकांना त्यांची भीती वाटत होती. त्यांच्या राज्यात क्षुल्लक कारणांसाठी, लहान गुन्ह्यांसाठी आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्यात येत होती. मात्र राणी लक्ष्मीबाईंनी ही प्रथा बंद पाडली आणि वेगळ्या शिक्षांची अंमलबजावणी केली. गंगाधरराव यांनीही प्रशासकीय, न्यायिक आणि राज्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींवर लक्ष्मीबाईंच्या सल्ल्याचे पालन केले. झाशीमध्ये सुमारे ५००० पुरुष सैनिकांची फौज होती. मात्र महिला सैनिकांचीही एक तुकडी असावी, अशी राणी लक्ष्मीबाईंची इच्छा होती. झाशीचे सैन्यबळ आणखी शक्तिशाली करत त्यांनी दुर्गा नावाची एक महिला योद्धांची तुकडी उभारली. स्वतः एक उत्कृष्ट घोडेस्वार असल्यामुळे इतर महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिले. महिला सैन्यासोबत त्या नियमित शस्त्रांचा सराव करत. याचदरम्यान त्यांना साथ लाभली आणखी एका महिला योद्धाची ज्यांचं नाव होतं झलकारी बाई, विशेष म्हणजे त्या हुबेहूब राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या दिसायच्या. झलकरी बाई यांच्याविषयी आपल्याला पुढील लेखात विस्तृत माहिती मिळेल.

पती-पुत्राचा मृत्यू आणि झाशीवर फिरंगी संकट !

लक्ष्मी थी या दुर्गा थी वह स्वयं वीरता की अवतार,
देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार,
नकली युद्ध-व्यूह की रचना और खेलना खूब शिकार,
सैन्य घेरना, दुर्ग तोड़ना ये थे उसके प्रिय खिलवार।
महाराष्टर-कुल-देवी उसकी भी आराध्य भवानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

१८५१ साली त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. मात्र अवघ्या चार महिन्यातच त्याला मृत्यूने ओढवून घेतले. पोटच्या गोळ्याचा अकस्मात मृत्यू मनाला हेलावून टाकणार होता. या विरहात न राहता त्यांनी आनंदराव नावाच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचं नाव दामोदरराव असं ठेवलं. दामोदरराव यांच्या येण्याने चेहऱ्यावर आलेलं हसू अवघ्या काही महिन्यांपूरतेच होते. १८५३ रोजी लक्ष्मीबाईंचे पती गंगाधरराव यांचाही आजारपणाने मृत्यू झाला. दोन वर्षांच्या कालावधीत दोन भयाण संकट त्यांच्यावर कोसळले, मात्र त्या डगमगल्या नाहीत. वैधव्य येऊनही झाशीचे आणि जनतेचे रक्षण हेच सर्वतोपरी मानून त्यांनी राज्यकारभार सुरू ठेवला. एव्हाना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपले पाय मजबुतपणे रोवले होते आणि तत्कालीन गव्हर्नर जनरल डलहौसीने नागपूर, तंजावर आणि सातारासारखी मराठ्यांची मोठी संस्थानं खालसा केली होती. आता त्यांचा डोळा झाशीवर होता.

राष्ट्रीयत्वाची भावना

एकीकडे इंग्रज सैन्य झाशी काबीज करण्याची तयारी करत होते, तर दुसरीकडे १८५७च्या उठावाची ठिणगी पेटली होती. संपूर्ण भारतावर राज्य करण्याचे कपटी स्वप्न बघणाऱ्या इंग्रजांचा डाव लक्ष्मीबाईंनी ओळखला होता आणि आता झाशी नाही आपला भारत देश वाचवणं गरजेचं आहे, हे त्यांना कळून चुकलं. राणी लक्ष्मीबाईंनी बाणपूर संस्थानचे राजे मर्दानसिंह यांना लिहिलेल्या पत्रात त्यांची राष्ट्रीयत्वाची भावना स्पष्ट दिसून येते. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं,

‘भारत अपनो देश है… विदोसियों की गुलामी में रहिबो अच्छो नहीं है. उनसे लडवो अच्छो है… हमारी राय है के विदोसियों का सासन भारत पर न भओ चाहे और हमको अपुन कौ बडौ भरौसौ है और हम फौज की तैयारी कर रहें हैं, सो अंगरेजन से लडवौ बहुत जरूरी है…’

विदेशी शासन भारतावर नको, हे राणी लक्ष्मीबाईंनी तेव्हाच हेरलं आणि फिरंगींविरुद्ध लढा देण्यासाठी इतर राजांना आणि संस्थानांना प्रोत्साहित केलं.

मेरी झाँसी नहीं दुंगी

Rani Lakshmibai

गंगाधररावांच्या निधनामुळे झाशी खालसा करण्याची आयती संधीच डलहौसीला मिळाली. डलहौसीने दामोदररावचं दत्तक विधान फेटाळून लावलं आणि ते अस्वीकृत असल्याचं सांगितलं. त्याने झाशी खालसा करत असल्याचा जाहीरनामा काढला. जाहीरनाम्यात झाशीचा ब्रिटिश राजवटीत समावेश करावा, हे वाचताच लक्ष्मीबाई यांना राग अनावर झाला. लक्ष्मीबाईंनी तातडीने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. लक्ष्मीबाईंच्या सैन्यात , झलकारी बाई, गुलाम खान, घौसखान, खुदाबक्ष, सुंदर-मुंदर, काशीबाई, मोतीबाई, लाला भाऊ बक्शी, दिवाण रघुनाथ सिंह, दिवाण जवाहर सिंह असे १४०० सैनिक होते. ब्रिटिशांचे सैन्य लक्ष्मीबाईंच्या सैन्याच्या तुलनेत अधिक आणि बलशाली होते. मात्र स्वत:ची राणीच रणांगणात उतरल्यामुळे जनता आणि सैन्य दोघांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला होता. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांचे सैन्य शौर्याने लढत होते. त्यांचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान हेसुद्धा त्वेषाने लढत होते. लक्ष्मीबाईसुद्धा इंग्रजांशी निकरानं झुंज देत होत्या. दोन्ही हातांनी तलवार चालवत घोड्यावर स्वार होऊन, आपल्या लहान मुलाला पाठीवर बांधून त्या फिरंग्यांशी लढत होत्या. मात्र इंग्रजांच्या बलाढ्य सैन्यदलासमोर झाशीच्या सैन्याचा निभाव लागणं शक्य नव्हतं.

महायुद्ध आणि वीरांगनेची वीरगती !

Lakshmibai

ब्रिटिश सैन्य आणि लक्ष्मीबाईंच्या सैन्यात युद्ध सुरू झाले होते. संतापलेल्या लक्ष्मीबाई यांची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा फिरंगी शिपाई एकाच वारात गार होत होता. त्यांचा अफाट पराक्रम पाहून ब्रिटिश सैन्य अधिकारी ह्यू रोजची पळती भुई थोडी झाली. मात्र तरीही ब्रिटिश सैन्य कित्येक पटीने बलाढ्य होतं. तात्या टोपे यांची २० हजार सैनिकांची मदतदेखील अपुरी पडली होती. त्यांचे विश्वासू सरदार खुदाबक्ष आणि घौसखान देखील युद्धात मृत्युमुखी पडले. अचानक आणखी ब्रिटिश सैन्य युद्धस्थळी दाखल झाल्यामुळे लक्ष्मीबाईंच्या सैन्याचा प्रतिकार कमी पडू लागला. राणी लक्ष्मीबाईंचे रक्षण करण्यासाठी इतर सरदार आणि सैनिकांनी त्यांना किल्ला सोडून जाण्याची विनंती केली. त्यांनी ग्वाल्हेरला जाण्याची तयारी केली. युद्धाच्या ११व्या दिवशी रणांगणात त्यांच्यासारखाच पोशाख घालून हुबेहूब दिसणारी झलकारी बाई उतरली आणि तिने जो पराक्रम गाजवला, ते पाहून ब्रिटिश अधिकारी ह्यू रोजला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. झलकारी पकडल्या गेल्या आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. अखेर ब्रिटिशांनी झाशीवर विजय मिळवला. आपण हरलोय हीच जखम लक्ष्मीबाई यांच्या मनावर मोठा घाव करून गेली होती. त्यांनी झाशी सोडली आणि ग्वाल्हेरला आल्या.

काही दिवसांनी ब्रिटिश अधिकारी स्मिथच्या आदेशावरून ब्रिटिश सैन्याने ग्वाल्हेरवर हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी तातडीने रणांगणात धाव घेतली आणि त्या ब्रिटिशांना सपासप कापू लागल्या. मात्र यावेळीही ब्रिटिश सैन्याचं पारडं जड होतं. लक्ष्मीबाई यांनी परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या काही निवडक सैन्याला घेऊन तेथून निसटल्या. मात्र ब्रिटिश सैन्य त्यांचा पाठलाग करू लागले. पुन्हा आमनेसामनेची लढाई सुरु झाली. अचानक एका इंग्रज सैन्याने राणी लक्ष्मीबाई यांच्या छातीवर वार केला. मोठी जखम झाली मात्र त्या शुद्धीत होत्या. त्यांनी आपला मार्ग बदलला आणि जवळ असणारा एक ओढा त्या पार करू लागल्या, मात्र घोड्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही आणि तेवढ्यातच एका इंग्रज सैनिकाने त्यांच्यावर बंदुकीची गोळी झाडली, ती त्यांच्या कंबरेवर लागली.

लक्ष्मीबाई आणखी जखमी झाल्या. एक इंग्रज सैनिक लक्ष्मीबाई यांच्या घोड्याजवळ आला आणि त्याने वार करण्यासाठी तलवार उचलली. लक्ष्मीबाईंनी प्रतिकार केला मात्र त्यांच्या अंगी थोडीही शक्ती उरली नव्हती. त्या इंग्रज सैनिकाचा हा वार काळावर घाव घालणारा ठरला. लक्ष्मीबाईंच्या माथ्यावर मोठा आघात झाला, अर्ध डोकं फाटलं, एक डोळा निकामी झाला. उरलेल्या डोळ्याने आता सगळं धुसर दिसू लागलं होतं. त्या घोड्यावरून कोसळल्या. पुरुषी कापडांमध्ये असल्यामुळे आणि सर्वत्र धूळ पसरल्यामुळे इंग्रज त्यांना ओळखू शकले नाहीत. त्यानंतर एका सैनिकाने त्यांना उचललं आणि जवळच्या मंदिरात नेलं. त्यांची शुद्ध हरपली होती मात्र अखेरचे काही शब्द बोलण्यासाठी थोडेसे श्वास शिल्लक होते. लक्ष्मीबाई हळुवारपणे त्या सैनिकाला म्हणाल्या, ‘दामोदरला छावणीमध्ये सुरक्षित न्या आणि माझा मृतदेह इंग्रजांच्या हाती पडू देऊ नका.’

परकीयांनी सुद्धा झाशीच्या राणीच वर्णन “जॉन ऑफ आर्क ऑफ इंडिया” असं केलंय.

जखमांमधून वाहणारं रक्त थांबण्याचं नाव घेत नव्हतं. ‘कोणताही इंग्रज माझ्या देहाला स्पर्श करणार नाही’ ही त्यांची अखेरची इच्छा होती. ही इच्छा स्थानिकांनी आणि सैनिकांनी पूर्ण केली. १७ जून १८५८ रोजी ग्वालियरमधील फुलबाग येथे महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांची वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी प्राणज्योत मालवली. अंगरक्षकांनी जवळच लक्ष्मीबाई यांच्या पार्थिवाला अग्नी दिला आणि ही वीर योद्धा अनंतात विलीन झाली. ब्रिटिश कर्नल मॅल्लेसन याने ‘History Of The Indian Mutiny या पुस्तकात असे नमूद केले आहे,

‘Whatever her faults in British eyes may have been, her countrymen will ever remember that she was driven by ill-treatment into rebellion, and that she lived and died for her country, We cannot forget her contribution for India.’

जाओ रानी याद रखेंगे ये कृतज्ञ भारतवासी,
यह तेरा बलिदान जगावेगा स्वतंत्रता अविनासी,
होवे चुप इतिहास, लगे सच्चाई को चाहे फाँसी,
हो मदमाती विजय, मिटा दे गोलों से चाहे झाँसी।
तेरा स्मारक तू ही होगी, तू खुद अमिट निशानी थी,


बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

सुभद्रा कुमारी चौहान

राणी लक्ष्मीबाई यांनी मातृभूमीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. भविष्यातील पिढ्या-पिढ्यांना अनंतकाळपर्यंत ते प्रेरणा देत राहील आणि त्यातून आणखी लक्ष्मीबाई घडतील. शत्रूनेही कौतुक करावे, असा पराक्रम गाजवणाऱ्या लक्ष्मीबाईंना कोटी कोटी वंदन !

संदर्भ सूची :-

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments