१८५७ साली स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली. भारताच्या या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रभाव केवळ तरुण आणि प्रौढांवरच नाही तर बालमनांवरही पडला होता.
देशासाठी कोवळ्या वयातच मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्मा शिरीष कुमार मेहता, बाजी राऊत अशी अनेक नावे आपण ऐकलीच असतील. जालियनवाला बागसारख्या भयाण हत्याकांडाचा परिणामदेखील भगत सिंह, उधम सिंह आणि राजगुरूसारख्या अनेक मनांवर वयाच्या १०-१२व्या वर्षीच झाला होता. मात्र यामध्ये दोन महान बालिकांचाही समावेश आहे, ज्यांना इतिहासाने आपल्या सुवर्णमयी स्वातंत्र्ययुद्धाच्या पर्वात स्थान दिले नाही. त्यांच्याबाबत कधीही कुठे बोलले गेले नाही, सांगितले गेले नाही. ही नावेदेखील आपण कधीच ऐकली नसतील. स्वातंत्र्य किती महत्त्वाचं होतं हे बोटावर मोजण्याइतक्या वयातच त्यांना कळलं होतं. या दोघीही स्वातंत्र्य युद्धातील पहिल्या बाल क्रांतिकारक होत्या. शहीद भगत सिंह यांना आदर्श मानून त्यांच्या बलिदानाचा बदला घेणाऱ्या १४ वर्षीय सुनिता चौधरी आणि १५ वर्षीय शांती घोष या दोन बालिका योद्धांची ही वीर गाथा !
शांती घोष
शांती घोष यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1916 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब देशकार्यात सहभागी असल्याने, देशभक्तीपर वातावरणात शांती वाढल्या. त्यांचे वडील देबेंद्रनाथ घोष हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि व्हिक्टोरिया कॉलेज, कोमिला येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. वयाच्या 15 व्या वर्षी शांती घोष यांनी छत्री संघाची (गर्ल स्टुडंट्स असोसिएशन) सह-स्थापना केली आणि त्याच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळली. यावेळी शांती यांची भेट प्रफुल्लानंदिनी ब्रह्मा या त्यांच्यासारख्याच पण वयाने २ वर्ष मोठ्या असणाऱ्या तरुण क्रांतिकारकासोबत झाली. ब्रह्मा हे युगांतर पक्षाचे सदस्य होते. युगांतर दल हा बंगालमधील तरुण क्रांतिकारकांनी स्थापन केलेली एक गुप्त संघटना होती. ब्रिटिशांना भारतातून हाकलून द्यायचे असेल, तर शस्त्रे हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही, या जहाल विचारांवर पक्षातील सर्व क्रांतिकारकांचा ठाम विश्वास होता. युगांतर पक्षातील कार्यकर्त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्येचे कट रचले. मात्र याबाबतची माहिती पसरल्याने युगांतर पक्षाच्या अनेक सदस्यांना ब्रिटिशांकडून अटक करण्यात आली. काहींना फाशी देण्यात आली आणि काहींना अंदमान बेटांवर आजीवन हद्दपार करण्यात आले. अशा जहाल मतवादी युगांतर पक्षात शांती घोष अवघ्या १५ व्या वर्षी सामील झाल्या. सामील झाल्यावर स्वसंरक्षण आणि शस्त्रांचा वापर, विशेषतः तलवारी आणि बंदुक वापरण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.
सुनीती चौधरी
सुनीती चौधरी यांचा जन्म 22 मे 1917 रोजी बांग्लादेश (तत्कालीन बंगाल, भारत) मधील कोमिला येथे झाला होता. सुनीती चौधरी यांचेही संपूर्ण कुटुंब मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यांचे दोन मोठे भाऊ आधीच स्वातंत्र्य चळवळीत सक्रियपणे सहभागी झाले होते. अगदी लहानपणापासूनच सुनीती यांच्या मनात ब्रिटिशांबाबत द्वेष निर्माण झाला होता. मोठी झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी आणि सशस्त्र बंडाच्या माध्यमातून ब्रिटिशांना भारताबाहेर काढण्याच्या – समान विचारसरणीचे संगोपन करणाऱ्या मित्रांमध्ये सुनीती यांचे मन रमू लागले. शालेय दिवसात सुनीती यांची भेट शांती घोष आणि प्रफुल्लानंदिनी ब्रह्मा या जवळपास तिच्याच वयाच्या जहाल मतवादी क्रांतिकारकांसोबत झाली. दोघांच्या देशभक्तीच्या आवेशाने सुनीती फार प्रेरित झाल्या.
ब्रिटीश वसाहती अधिकाऱ्यांच्या विरोधात वापरण्यासाठी बॉम्ब तयार करणाऱ्या उल्लास्कर दत्ताच्या कार्यांमुळे त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. प्रफुल्लानलिनी ब्रह्मा यांनी सुनीती यांना युगांतर पक्षाची सदस्य म्हणून भरती करून घेतले. त्यांनी त्रिपुरा जिल्हा छत्री संघाची सदस्य आणि नंतर संघाच्या महिला स्वयंसेवक कोर विंगच्या कर्णधार म्हणूनही कार्यभार सांभाळले. अगदी अल्पावधीतच सुनीती मीरा देवी म्हणून लोकप्रिय झाल्या. १४ वर्षांच्या सुनीती खंजीर, तलवार आणि लाठी वापरण्यात तज्ज्ञ झालेल्या होत्या. अशा प्रकारे त्यांना छत्री संघाच्या महिला सदस्यांना लाठी, तलवार आणि खंजीर वापरण्याचे प्रशिक्षण देण्याची प्रभारी म्हणून भरती करण्यात आली. सुनीती यांची दलाच्या ‘बंदुकांची संरक्षक’ म्हणूनही निवड करण्यात आली. आतापर्यंत ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संबंधित बॉम्बस्फोट आणि हत्या करण्यासाठी पुरुषांचीच निवड करण्यात येत असे. दुर्गा भाभी यांसारख्या महिला स्वातंत्र्य सैनिकांनी Direct Action मध्ये सहभाग घेतला नव्हता. पण, इतक्या लहान वयात त्यांचे शौर्य आणि धैर्य लक्षात घेता, शांती घोष आणि सुनीती चौधरी यांची Direct Action (थेट कारवाईसाठी) निवड करण्यात आली.
बाल वयातलं बलिदान !
या काळात बंगालमध्ये स्वातंत्र्य चळवळीने गंभीर वळण घेतले होते. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी उघडपणे बंड केले, अनेकांना अटक किंवा फाशी झाली. अटक झाल्यावर क्रांतिकारकांवर ब्रिटिश अधिकारी अनन्वित छळ करायचे. लाहोर केस सुनावणी दरम्यान भगतसिंग व सहकाऱ्यांनी उपोषण चालू केलं होतं, परिणामस्वरूप ब्रिटिश सैनिक त्यांना जबरदस्तीने जेवण भरवत असत. यावेळी बऱ्याचदा क्रांतिकारकांसोबत अमानवीय व्यवहार केला जायचा. जसे की त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारणे, त्यांना विविध प्रकारचा छळ करणे. रस्त्यावर महिला सत्याग्रहींचे कपडेदेखील उतरवले जात होते. तसेच ब्रिटीश पोलिसांनी महिला सत्याग्रहींवर बलात्कार केल्याच्याही अफवा काही ठिकाणी पसरल्या होत्या. युगांतर दल या देशभक्तांच्या गटाने अशा कुख्यात ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांची सरळ सरळ हत्या करण्यास सुरुवात केली. हे सर्व माहिती असूनही शांती घोष आणि सुनीती चौधरी या दोघींनी Direct Action मध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला.
फ्रीमॅन थॉमस, अर्लिंग ऑफ विलिंग्डन हे तेव्हा ब्रिटिश भारताचे 22 वे व्हायसरॉय आणि गव्हर्नर जनरल होते. त्यांनी भारतात एक अध्यादेश काढला, ज्यामुळे भारतीयांच्या नागरी हक्कांवर दडपशाही करण्यात आली. दरम्यान, 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिल्याच्या बातम्यांनी देश हादरला. ब्रिटिशांची ही क्रूरता आणि निर्दयता इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या हृदयात भीती निर्माण करण्याच्या दिशेने होती, परंतु व्यर्थ ठरली.
जर मी फाशीच्या शिक्षेतून वाचलो तर माझ्यामधील कमतरता जगासमोर उघड होतील आणि क्रांतीचे हे प्रतीक मंदावेल. कदाचित ते निष्प्रभही होऊन जाईल. मात्र, निधड्या छातीने हसत हसत मी फासावर गेलो, तर हिन्दुस्थानी माता आपल्या मुलांनी भगतसिंह बनावे अशी आकांक्षा धरतील आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची संख्या इतकी मोठी होईल की क्रांतीला रोखणे हे साम्राज्यवादी किंवा तशा तमाम सैतानी शक्तींच्या आवाक्यातील बाब राहणार नाही.
हुतात्मा भगतसिंग ( २२ मार्च १९३१ रोजी सहकाऱ्यांना लिहलेल्या शेवटच्या पत्रातील काही भाग)
देशभरातून एक हजार भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव उदयास आले. त्यांच्या बलिदानाचा रोष बंगालमध्ये पाहायला मिळाला. शांती घोष, सुनीती चौधरी आणि इतर तरुण ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी आणि त्यांना ठार मारण्यासाठी अधिक सज्ज झाले. आता सर्वजण केवळ योग्य वेळेची वाट पाहू लागले होते. शांती व सुनीती यांनी कोमिला जिल्हा दंडाधिकारी चार्ल्स जेफ्री बकलंड स्टीव्हन्स यांना भेटण्याची परवानगी मागितली. शाळेत त्यांच्या वर्गमित्रांमध्ये जलतरण स्पर्धा आयोजित करण्याची याचिका सादर करण्याविरोधात त्यांची परवानगीची विनंती मंजूर करण्यात आली. ते मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयात शिरले जेथे तो बसला होता. त्यांनी त्यांच्या शालखाली लपवलेले स्वयंचलित पिस्तूल बाळगले होते. त्या शाळकरी मुली असल्याने ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर संशय घेतला नाही आणि त्यांचा शोध घेणे टाळले आणि त्यांच्या प्रवेशाची सोप्या रीतीने सोय झाली. स्टीव्हन्स दस्तऐवज पाहत असताना, दोघींनी पिस्तूल काढून स्टीव्हन्सवर ९ गोळ्या झाडल्या . स्टीव्हन्स जागीच ठार झाला. गोळीबाराच्या आवाजाने ब्रिटिश पोलिस सतर्क झाले. लवकरच त्यांना जबरदस्तीने पकडण्यात आले आणि अटक करण्यात आली. 14 डिसेंबर 1931 रोजी शांती घोष व सुनीती चौधरी यांनी स्टीव्हनसची हत्या केली तेव्हा, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याला नऊ महिने झाले होते.
दोन्हीही मुली अल्पवयीन असल्याने त्यांना फाशी झाली नाही, जन्मठेपेची शिक्षा झाली. वयाच्या १४-१६ व्या वर्षी जन्म तुरुंगवास ..! पश्चिमेकडील नियतकालिकांनी फुक्रमॅन थॉमसने पारित केलेल्या अध्यादेशाच्या विरोधात संतापाचे लक्षण म्हणून बकलँड स्टीव्हन्सच्या हत्येचे चित्रण केले. निकाल जाहीर झाल्यानंतर, राजेशाही जिल्हा पोलिसांच्या गुप्तचर शाखेला शांती घोष आणि सुनीती चौधरी यांची राष्ट्रवादी नायिका म्हणून स्तुती करणारा फ्लायर सापडला. फ्लायर मध्ये शांती घोष व सुनीती चौधरी यांचे फोटोखाली लिहिले होते, “THOU ART FREEDOM’S NOW, AND FAME’S”. तसेच स्कॉटिश कवी रॉबर्ट बर्न्सने याच्या खालील ओळी छापल्या होत्या.
Tyrants fall in every foe !
Liberty’s in every blow !
ब्रिटिशांनी सुनीतीच्या वृद्ध वडिलांचे पेन्शन थांबवले. त्यांनी तिच्या दोन भावांना खटल्याशिवाय ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर अत्याचार केले. तिच्या कुटुंबातील सदस्य काही वेळातच उपासमारीच्या उंबरठ्यावर होते. नंतर, तिचा धाकटा भाऊ वर्षानुवर्षांच्या कुपोषणामुळे मरण पावला. नंतर त्यांच्या जन्मठेपेची मुदत 10 वर्षे करण्यात आली. राष्ट्रवादी नायिका संती शांती घोष आणि सुनीती चौधरी यांना सलाम. जय हिंद!
संदर्भ सूची :-
- Saffron Swords: Centuries of Indic Resistance to Invaders – Manoshi Sinha Rawal
- Santi Ghose
- Suniti Choudhury
- Suniti Choudhury: The Youngest Female Revolutionary Of India
- The Untold Story of India’s 14-YO Female Revolutionary & Her Historic Trial