आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या सामूहिक बलिदानामुळे आम्ही आज मोकळा श्वास घेऊ शकतो आणि मुक्तपणे जगतो. दुर्दैवाने आज लाखो स्वातंत्र्ययोद्धे काळाच्या ओघात विस्मृतीत गेले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांना इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये स्थान मिळाले नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महिलांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका बजावली. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील शिवदेवी व जयदेवी तोमर यांचं बलिदान वगळता, दोन्ही बहिणींच्या बालपणा बद्दल कोणतेही रेकॉर्ड किंवा माहिती उपलब्ध नाही. याला भारतीय इतिहासाचं दुर्दैव म्हणावं ? की गावतालाही भाले फुटावेत तद्वत क्रांतीच्या ज्वालेने अगदी १४-१६ वर्षीय तरुण-तरुणींना राष्ट्रस्वातंत्र्य या एकमेव ध्येय्यासाठी परमोच्च बलिदान देण्यास प्रवृत्त केलं ? हा प्रश्न नेहमी पडतो. उत्तर प्रदेशमधील १६ वर्षीय जाट विरांगना शिवदेवी तोमर आणि तिची १४ वर्षीय लहान बहीण जयदेवी तोमर यांची वीरगाथा आपल्यापुढे मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच !
तो रविवारचा दिवस होता. दिनांक : 10 मे, 1857. ठिकाण: मेरठ छावणी. यावेळी देशभरातील अनेक भारतीय ब्रिटिशांविरोधात बंड पुकारत होते. यापूर्वी बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाली होती, पण व्यर्थ ! गाई-डुकराची चरबी काडतुसांना लावल्याने भारतीय सैनिकांच्या भावना दुखावत होत्या. असंख्य ब्रिटिश सैनिक ड्युटीवर नव्हते आणि मेरठ छावणीत तैनात असलेले ब्रिटिश अधिकारी त्या दिवशी चर्चला जाण्याची तयारी करत होते. छावणीत भारतीय सैनिकांनी अधिकाऱ्यांसह ब्रिटिश सैनिकांवर हल्ला केला. मेरठचे अनेक लोकंही त्यांच्यात सामील झाले. या हल्ल्यात 50 ब्रिटिशांचा मृत्यू झाला होता. लवकरच, ही बातमी जंगली आगीसारखी पसरली. मेरठला लागून असलेल्या गावांमधील स्वातंत्र्य लढ्याला प्रोत्साहन देण्यासाठी बरौत येथील शाहमल सिंग तोमर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी बरौतला वेढा घातला आणि स्वातंत्र्य घोषित केले. बरौतच्या आकाशात स्वातंत्र्याचा झेंडा उंच फडकला.
१६ वर्षीय शिवदेवी यांचे बलिदान
18 जुलै 1857 रोजी, ब्रिटिश सैन्याने शाहमल सिंग तोमर आणि त्याच्या सैनिकांवर बरौतजवळील बडका गावात हल्ला केला. शाहमल सिंग तोमर आणि ग्रामस्थांनी तीव्र प्रतिकार केला. या हल्ल्यात शाहमल सिंग तोमर शहीद झाले. तोमर यांच्या बाजूने असलेल्या 32 स्वातंत्र्य सैनिकांना पकडण्यात आले. बरौतजवळील बिजरौल गावाच्या बाहेरील एका पिंपळाच्या झाडावर त्यांना फाशी देण्यात आली. यानंतर ब्रिटिशांनी बरौतमध्ये असलेली लोकांची घरे उद्ध्वस्त केली आणि सर्वांना बेघर केले. एवढेच नव्हे तर इंग्रजांनी गावही लुटले, संपत्ती आणि मौल्यवान वस्तू लुटल्या आणि शहराची रसद बंद केली.
१६ वर्षांची शिवदेवी तोमर ब्रिटीशांनी केलेले सर्व अत्याचार डोळ्याने पाहत होती. शिवदेवीने आपल्या संपूर्ण आयुष्यात युद्धाचे प्रशिक्षण घेतले नव्हते, मात्र तरीही तिने शस्त्र हाती घेण्याचा निर्णय केला. तिने तिची एक शूर मैत्रीण किशांदेवी आणि गावातील काही तरुण-तरुणींसोबत एक गुप्त बैठक घेतली आणि त्यांनी ब्रिटीशांवर हल्ला करण्याचा निश्चय केला. शिवदेवी यांनी आपल्या साथीदारांसह इतर लोकांनाही बंडखोरीसाठी प्रेरित केले. तलवार धरून शिवदेवी तोमरने तिच्या काही गावकऱ्यांच्या गटाचे नेतृत्व करत बरौत येथे असलेल्या ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला. हातात फक्त तलवारी आणि काठ्या असतानाही, आधुनिक बंदुकांनी सुसज्ज असणाऱ्या ब्रिटिश सैनिकांवर त्यांनी हल्ला चढवला. यावरूनच स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या लढ्याची भावना आपल्याला समजली असेल. शिवदेवी तोमर प्रत्यक्ष माता कालीप्रमाणे लढली. तिने आपल्या तलवारीने १७ ब्रिटीश सैनिकांना ठार केले आणि कित्येकांना जखमी केले. ब्रिटिश सैनिकांना बरौतमधील सामान्य नागरिकदेखील तलवारी हातात घेऊन बंड करतील, अशी अपेक्षा नव्हती. बिजरौल गावाच्या बाहेरील 32 स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रूर फाशीने लोकं घाबरतील या काल्पनिक दुनियेत ब्रिटिश रमून राहिले. पण ही भारत माता आहे. मातृभूमीसाठी एकाने प्राण दिला की, त्या पाउलवाटेवर प्राण देण्यास हजार जण तयार ठाकतात. शिवदेवी व साथीदारांच्या संहारक हल्ल्यातून बचावलेले ब्रिटिश सैनिक आपले प्राण वाचवण्यासाठी पळून गेले. युद्धात शिवदेवी फार गंभीर जखमी झाली होती, तिच्या आसपास गावकऱ्यांचा गराडा पडला, १६ वर्षीय मुलीच्या धाडसाचे तोंडभर कौतुक झाले. मात्र अचानक घात झाला. शिवदेवीच्या जखमांवर उपचार सुरू असतानाच, नव्या दमाच्या ब्रिटिश सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार चालू केला. जखमी शिवदेवी च्या देहावरही अनेक गोळ्या झाडल्या गेल्या आणि ही महान वीरांगना हुतात्मा झाली. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी !
जयदेवी तोमर यांचे बलिदान
शिवदेवी तोमर यांचं हौतात्म्य व्यर्थ गेलं नाही. त्यांची 14 वर्षीय धाकटी बहीण जयदेवी तोमर हिने आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. जयादेवीने शेजारच्या गावातील तरुणांचा एक संघ तयार केला. त्यांनतर वाटेत या सर्वांनी बुलंद, मेरठ, अलीगढ, मैनपुरी, इटावा येथील लोकांना ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याचे आव्हान दिले. लखनौला पोहोचल्यावर हे सर्व ब्रिटीशांच्या तुकडीच्या शोधात कोणत्याही रसदिशिवाय आणि कोणत्याही मदतीशिवाय अनेक दिवस भटकले. अखेरीस त्यांना शिवदेवी यांच्यावर गोळ्या झाडणारं ब्रिटिश सैन्य दल सापडलं. असे म्हटले जाते की, यावेळी जयदेवी तोमरने आपल्या तलवारीने तुकडीच्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा शिरच्छेद केला. गर्जना उठली आणि उर्वरित लोकांनी ब्रिटिश सैनिकांवर हल्ला चढवला. मात्र ब्रिटिशांच्या शस्त्रांसमोर या सेनेचा टिकाव लागला नाही. यावेळी जयदेवी ब्रिटिशांच्या बंगल्यात घुसल्या आणि ब्रिटिश सैनिकांनी संधी साधून त्या बंगळ्याला आग लावली. या संघर्षात जयादेवी तोमर यांनीही हौतात्म्य पत्करले. जयदेवी यांच्यावर स्थानिक नागरिकांनी लखनौमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि मुक्तीसाठी खेळण्या बागडण्याच्या वयात शस्त्र उचलणाऱ्या अवघ्या १४-१६ वयाच्या दोन महान भगिनींनी या यज्ञकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आजच्या आधुनिक काळात याच वयात आम्हाला अनेक गोष्टी कळत देखील नाहीत. या वयातला प्रत्येक भारतीय आज या दोन्ही भगिनींच्या बलिदानामुळे मोकळा श्वास घेऊन शकतो. त्यांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही, मात्र ही किंचितशी मिळालेली माहिती इतर लोकांना सांगून आपल्या या महान योद्धांचा इतिहास आपल्याला जिवंत आणि ज्वलंत ठेवायला हवा.
शिवदेवी आणि जयदेवी यांना वंदन !
संदर्भ सूची :-
- Saffron Swords: Centuries of Indic Resistance to Invaders – Manoshi Sinha Rawal
- Shiv Devi