You are currently viewing आजादी के परवाने – शिवराम हरी राजगुरू

आजादी के परवाने – शिवराम हरी राजगुरू


दिल से निकलेगी न मर कर भी वतन की उल्फ़त…
मेरी मिट्टी से भी ख़ुशबू-ए-वफ़ा आएगी…!


अन्याय, अत्याचार आणि जुलुमी राजवटीविरुद्ध सर्वप्रथम संघर्ष करणारे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. भारतातील एकाही राज्याला राष्ट्र म्हणून संबोधले जात नाही, अपवाद “महाराष्ट्र राज्य”. कारण याच राज्याने देशाच्या आणि रयतेच्या स्वातंत्र्य आणि स्वराज्याची मशाल सर्वप्रथम पेटवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीतील याच महान राष्ट्राने ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी अगणित योद्धे दिले. १९०० सालानंतर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्र क्रांती हाच एक मार्ग उरला होता. जहाल आणि मवाळ असे दोन गट पडल्यानंतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जहालवादी होण्याचाच पर्याय निवडला. नाईक, फडके, टिळक, सावरकर, चाफेकर यांच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एक सशस्त्र क्रांतीचं वादळ पुण्याच्या पुण्यभूमीतून उठलं, त्याचं नाव राजगुरू ! शिवराम हरी राजगुरू !

वेडेचाळे, विसरभोळेपणा, गंभीर प्रसंगी थट्टा-मस्करी… पण मरण्यासाठी सर्वात पहिला तयार ! मग ते मरण मित्रांसाठी असो वा मातृभूमीसाठी ! स्वातंत्र्य लढ्याच्या सशस्त्र क्रांतीच्या इतिहासात राजगुरूएवढे पोट दुःखेपर्यंत हसायला येणारे प्रसंग कोणत्याही क्रांतीकारकांच्या जीवनात घडले नसावेत.

राजगुरूंच्या झोपेच्या सवयी – अपरिचित क्रांतिकथा

झोपा काढत राहणं, चोरून सिनेमा बघायला जाणं, आवश्यक त्या गोष्टी विसरणं, भिंतीवर हिरोईनचे फोटो लावणं असे कित्येक चाळे राजगुरूने केले असावेत. पंडित जी यांना सतावणारा एकमेव माणूस म्हणजे राजगुरू… नाहीतर पंडित जींच्या नजरेलाही नजर भिडवण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. काहीही असो पण साथीदारांच्या रक्षणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एकदम सजग ! भगत सिंह यांनी एके ठिकाणी नमूद केलं होतं की, “राजगुरू माझा सर्वात मोठा प्रतिद्वंदी आहे. तो निरागस मुलासारखा कोमल आहे. खरं म्हणायचं झालं तर राजगुरूसारखा मित्र मला संपूर्ण जीवनात कधीही मिळू शकत नाही आणि तो आपली मित्रता आयुष्यभर टिकवेल, असा मला ठाम विश्वास आहे”! राजगुरू यांच्या संदर्भात भगत सिंह यांनी म्हटलेला शब्द न शब्द खरा ठरला आणि भारतमातेच्या खातर हे दोन्ही वीर एकत्र फासावर चढले. शौर्य, धैर्य, त्याग, पराक्रम आणि बलिदान या सर्व गोष्टी राजगुरुसारख्या क्रांतिकारकाच्या अंगीच असू शकतात. बंदुकीतून सुटलेली गोळी थेट निशाण्यावर लागली नसेल, असं राजगुरुच्या आयुष्यात घडलं नसावं. स्कॉटच्या ऐवजी साँडर्सला ठोकणारा वेडा पण राजगुरूच. शेवटी क्विकसिल्व्हर आजाद यांनी निवडलेला शार्पशूटर म्हणजे शिवराम हरी राजगुरू !

राजगुरू – भगत सिंग – सुखदेव

हरिनारायण राजगुरू यांचे दोन विवाह झाले होते. त्यांची दुसरी पत्नी पार्वती यांच्या पोटी २४ ऑगस्ट १९०८ रोजी शिवरामचा जन्म झाला. हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे कुटुंबीयांनी ज्योतिषांना आपल्या पुत्राची कुंडली दाखवणे साहजिक होते. ज्योतिषाने हरिणारायण यांना एक सुखद तर एक दुःखद धक्का दिला. ते म्हणजे “तुमचा मुलगा प्रतिभासंपन्न आणि मोठे कार्य करण्यासाठी जन्माला आहे आणि दुसरे म्हणजे तो जास्त वर्ष जगणार नाही आणि अविवाहित राहील”. जालियनवाला बागची घटना दोन बालमनांवर परिणाम करून गेली, एक पंजाबमध्ये आणि एक महाराष्ट्रात. भगत सिंह आणि राजगुरू या दोघांवरही हत्याकांडाचा खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात उडी घेतली. राजगुरू जरी आज समस्त भारताला परिचित असले, तरी त्यांचे रोचक, प्रेरणादायी आणि हादरवून सोडणारे प्रसंग लोकांना अजूनही माहीत नाहीत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे हेच प्रसंग आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत.

प्रचंड विसरभोळेपणा !

राजगुरु जितके मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करण्यासाठी वेडे होते तितकेच ते झोपेचे वेडे होते. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा विसरभोळेपणा ! त्यांच्या विसरण्याच्या कृत्यांमुळे संपूर्ण दलातील लोकांनी डोक्यावर हात मारून घेतला होता. त्यातलाच हा एक प्रसंग !

योगेशचंद्र यांना तुरूंगातून सोडवण्याच्या योजनेत जयदेव कपूरदेखील सामील होते. त्यावेळी जयदेव सहारनपूर येथे होते आणि त्यांना आग्रा येथे आणण्याचे कार्य राजगुरुंवर सोपवण्यात आले. एक दिवस राजगुरू गाढ झोपेत होते, त्यावेळी विजय कुमार सिन्हा यांनी राजगुरूंना झोपेतून उठवले आणि सांगितले,
“हे काही पैसेसुद्धा घेऊन जा आणि ते जयदेवला दे. त्याला सांग जास्त गरज भासेल तेव्हाच हे खर्च कर. इथेही पैशांची गरज आहे त्यामुळे हे थोडे पैसे तू घेऊन जा.”

राजगुरू तात्काळ सहारनपूरसाठी रवाना झाले.

तिसऱ्या दिवशी घराचा दरवाजा ठोठावला, विजय कुमार यांनी दरवाजा उघडला…,

बघतात तर केवळ राजगुरूच समोर उभे होते. त्यांना वाटले की जयदेव थट्टा-मस्करी म्हणून एके ठिकाणी लपला आहे. ते जयदेव यांना आवाज देत अर्धे गाव हिंडून आले. घरी परतून त्यांनी राजगुरूला विचारले.

“मी जयदेवला आणण्यासाठी तूला सहारनपूरला पाठवलं होतं, तो कुठे आहे ?”

राजगुरु खोळंबले, जयदेवला येथे आणण्यासाठीच त्यांना सहारनपुरला पाठवले होते, हे ते विसरले.
ते सहारनपुरला गेले असता, त्यांनी जयदेवची भेट घेतली त्याला पैसे दिले आणि एवढेच सांगितले, “जास्त गरज भासेल तेव्हाच हे पैसे खर्च कर !

विशेष म्हणजे जयदेव यांनीच राजगुरुला आठवण करून दिली होती की, मला दलाने आग्राला बोलावले आहे.
तेव्हा राजगुरू म्हणाले, ‘नाही तू इथेच थांब आणि हे पैसे तुझ्याकडे सुरक्षित ठेव !

हे सगळं समजल्यानंतर विजय कुमार सिन्हा यांची आपलं डोकं आता कुठे आपटावं, अशी स्थिती झाली.

हा सगळा प्रसंग विजय कुमार यांनी जेव्हा आजाद यांना कळवला तेव्हा ते त्यांच्यावरच रागावले आणि म्हणाले.
“जयदेवला आणण्यासाठी तुला याच्याशिवाय दुसरा माणूस भेटला नव्हता का?”

प्रचंड आत्मविश्वास

एकदा पोलिसांकडून होणाऱ्या कठोर शिक्षेबबद्दल पंडित जी सर्व क्रांतीकारकांना सांगत होते. “क्रांतीकारकांनी पोलिसांच्या नादी लागता कामा नये, त्यांच्याकडून होणाऱ्या यातना एखाद्या सहनशील व्यक्तीचेही खच्चीकरण करतात. त्यांच्या मारापुढे मरण अधिक उत्तम आहे, असं मला वाटतं, कारण मी ते भोगलं आहे.” पंडित जी यांचा शब्द न शब्द राजगुरू कान लावून ऐकत होता आणि त्याच्या मनात अचानक एक प्रश्न निर्माण झाला की, अशा प्रसंगी माझा आत्मविश्वास अतूट राहिल का ?

त्यांनी प्रत्यक्षात स्वतःवर प्रयोग करण्याचा निर्णय घेतला !

सायंकाळी जेवणाची वेळ झाली त्यावेळी राजगुरू यांनी लोखंडाचा चिमटा चुलीत घातला आणि तो तप्त लाल होईपर्यंत तापवला. यानंतर हाच लाल भडक चिमटा स्वतःच्या छातीवर लावला. छाती पोळून उठली, वेदनेची आग मस्तकात गेली पण त्यांची मनस्थिती विचलित झाली नाही. त्यांनी स्वतःच्या छातीवर असे सात चटके लावून घेतले होते. आत्मविश्वास गमावला नाही आणि त्याच स्थितीत ते रात्री झोपले.

मध्यरात्री सगळे झोपेत असताना अचानक कोणाच्यातरी व्हीवळण्याचा आवाज ऐकू येत होता. मात्र त्या व्हीवळणाऱ्या माणसाला त्या वेदना सहन करायच्या होत्या, असं त्याच्या आवाजाच्या कंपनातून वाटत होतं. आजाद यांना कळलं की आवाज राजगुरूकडून येत आहे त्यावेळी त्यांनी कारण विचारलं, मात्र ते टाळाटाळ करत होते. अखेर व्यक्तिस्वभावामुळे त्यांनी सर्व आजाद यांना सांगितलं. आजाद यांनी गोधडी बाजूला सारली तेव्हा पाहिलं राजगुरूच्या छातीवर सात मोठे फोड आले आहेत. त्यांनी त्याच क्षणी राजगुरूला मिठी मारली आणि म्हणाले, तुझ्यासारखा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय असणारा व्यक्तीच इंग्रजांना झुकवण्याची हिंमत ठेऊ शकतो.” यावेळी आजाद यांना अश्रू अनावर झाले होते.

प्रचंड इच्छाशक्ती

एकदा राजगुरू कुठूनतरी एक कॅलेंडर घेऊन आले, ज्यावर त्यांच्या आवडत्या नटीचे छायाचित्र होते. त्यांनी तो कॅलेंडर घरात टांगत ठेवला आणि कामानिमित्त बाहेर गेले. ज्यावेळी पंडित जी घरी आले त्यावेळी ते छायाचित्र पाहून पंडित जी यांचा पारा चढला. त्यांनी ते छायाचित्र फाडले आणि कचरापेटीत टाकून दिले.
राजगुरू परतून आल्यावर त्यांनी फाटलेले कॅलेंडर पाहिले आणि त्यांनाही राग आला, ते जोरात ओरडले… हा कॅलेंडर कोणी फाडला ?

आजाद यांनी कठोर स्वरात उत्तर दिलं, मी फाडलं आहे !

राजगुरू पुन्हा म्हणाले, मी प्रेमाने हा कॅलेंडर येथे लावला होता, तुम्ही का फाडला ?
आजाद म्हणाले… आपल्याला अशा छायाचित्रांशी कोणताही संबंध ठेवण्याचा अधिकार नाही.

राजगुरू पुन्हा उतरले, ‘यावर किती सुंदर छायाचित्र होते” !

आजाद आता रागात बोलले, ” याच कारणाने मी हा कलंदर या छायाचित्रासह फाडून टाकला आहे” !

हिरमुसलेल्या अवस्थेत राजगुरू…” मग जी सुंदर गोष्ट असेल, ती तुम्ही फाडून टाकणार, तोडून टाकणार ?

आजाद… “हो फाडून टाकेन, संपूर्ण नष्ट करेन !”

राजगुरू… मग तुम्ही ताजमहालसुद्धा तोडून टाकाल ?

आजाद यांच्या रागाने आता सीमा ओलांडली होती…
माझ्या हातात असलं तर त्यालाही तोडून टाकेन !

राजगुरू आता शांत बसले आणि थोड्या वेळाने हळू आवाजात आजाद यांना म्हणाले….
“पंडित जी… स्वातंत्र्यसुद्धा फार सुंदर असेल. सुंदर गोष्टी तोडून तुम्ही सुंदर जग कसं निर्माण करणार ? कसं संभव आहे ?

पंडित जी यांचा राग काही क्षणांमध्येच निवळला !

स्कॉट मर्डर केस मधील सर्व आरोपींवर लाहोर येथील न्यायालयात केस चालवण्यात आली.सदर केस फाईल भारतीय पुरातत्व आगर च्या abhilekh patal या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केस फाईल मधील Volume -३ मध्ये क्रांतिकारकांची ओळख पटवून घेण्यासबंधी कागदपत्रे उपलब्ध आहेत.हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची ब्रिटिशांना फितूर झालेल्या “हंस राज वोहरा, जय गोपाल आणि फनिंद्र नाथ घोष” यांनी पटवून दिलेली ओळख खलील कागदपत्रांत वाचता येईल.

वयात वर्षभराचा फरक असूनही भगत सिंहला त्याने आपला गुरू मानला होता आणि भगत सिंह पण राजगुरूवर तितकाच जीव ओवाळायचा ! क्रांतिकारक हे आपल्यासारखेच हाडामांसाचे माणूस होते. स्वातंत्र्य आणि क्रांती हे लक्ष्य समोर ठेऊन तेसुद्धा आपल्यासारखे मजा-मस्करी आणि कित्येक गोष्टी करत होते. हसत खेळत जगणं त्यांच्याही आयुष्याचा भाग होता, त्यामुळे क्रांतिकारकांची दुसरी बाजू समजून घेणंही तितकंच आवश्यक !

भगत सिंहसारखं मलाही वाटतं की राजगुरूसारखा एक अवलिया आपल्या आयुष्यात हवा होता !

शिवरामला वंदन !

कभी वह दिन भी आएगा जब अपना राज देखेंगे,
जब अपनी ही ज़मीं होगी और अपना आसमाँ होगा !

-हितैषी

संदर्भ सूची :-

  • संस्मृतियाँ – शिव वर्मा
  • क्रान्तिकारी आन्दोलन कुछ अधखुले पन्ने – धर्मेन्द्र गौड़
  • शहीद-ए-वतन राजगुरू – प्रभात पब्लिकेशन्स

लेखनसीमा !

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.


ALSO READ___


TAGS_____

#tigerday Astronomy azadi Azadi ke parwane Bhagat Singh Black Hole Chandrashekhar Azad Indian freedom fight Krantipathavaril Agni Shalaka Lokmanya Tilak Madan Lal Dhingra Rajguru SHIVAJI MAHARAJ Sukhdev Veer savarkar wari Women Freedom Fighters


आपल्या मित्रांसोबत भारतमातेच्या अमर सुपुत्रांबद्दलची अपरिचित माहिती शेअर करा.

शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments