You are currently viewing क्रांतीपथावरील अग्नि-शलाका – उदा देवी पासी

क्रांतीपथावरील अग्नि-शलाका – उदा देवी पासी

कोई उनको हब्सीन कहता, कोई कहता नीच अछूत,
अबला कोई उन्हे बतलाए, कोई कहे उन्हे मजबूत !

भारताच्या सशस्त्र क्रांतीच्या इतिहासात असे अनेक महिला योद्धा घडले आहेत, ज्यांचा त्याकाळी प्रचंड दरारा होता. एका बाजूला भारत स्त्रियांबद्दलच्या नानाविध परंपरांशी लढत होता तर दुसरीकडे या महिला योद्धांनी स्वातंत्र्याची मशाल पेटवून अक्षरशः ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले होते. भारतभूमी कपटी इंग्रजांच्या हातात न जाण्यासाठी त्यांनीही समशेरी उचलून संघर्ष केला होता. मात्र इतिहासाने आणि भारतीयांनी त्यांना नेहमी अज्ञात अंधारात झाकून ठेवलं. या महान वीरांगनेचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे, तरीही तिचा संघर्ष, तिची प्रेरणा केवळ एका प्रांतापूरतीच सीमित होऊन राहिली आहे. भारतमातेने जन्माला घातलेल्या या वाघिणीचं नाव होतं उदा देवी पासी !

Uda Devi
उदा देवी

१८५७च्या उठावामुळे आणि अगणित योद्धांच्या बलिदानामुळे देशवासीयांच्या अंगी स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतले होते. ब्रिटिशांविरुद्धचा तिरस्कार प्रचंड वाढला होता. उदा देवीचा जन्म लखनऊ म्हणजेच तत्कालीन अवध येथे झाला होता. उठावापूर्वीपासूनच उदा देवीच्या मनात ब्रिटिशांच्या अन्याय-अत्याचार आणि बळजबरीच्या कारभाराविरुद्ध द्वेष निर्माण झाला होता. बालपणी ब्रिटिशांद्वारे केल्या जाणाऱ्या कत्तली तिने आपल्या डोळ्यांनी पाहिल्या होत्या. उदा देवी यांचे पती मक्का पासी लखनऊचे सहावे नवाब वाजीद अली शाह यांच्या सैन्यात होते. आपल्या पराक्रमी पतीला पाहून उदा देवी यांनीही नवाबाच्या सैन्यात प्रवेश केला होता. विशेष म्हणजे नवाबाने आपल्या सैन्यात ३० बलशाली आणि कर्तृत्ववान महिला सैनिकांची एक तुकडी तयार केली होती. उदा देवीदेखील याच तुकडीचा भाग असून महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. त्या नेमबाजीत प्रचंड तरबेज होत्या. भारताची सर्वात पहिली स्नायपर म्हणून उदा देवीचं नाव घेतलं तरी वावगं ठरणार नाही.

१८५७चे स्वातंत्र्ययुद्ध आता मेरठ छावणीपर्यंत पोहोचले होते. मेरठच्या भारतीय सैनिकांनी इंग्रजाविरुद्ध पुकारलेला बंड आता संपूर्ण उत्तर भारतात पसरला होता. यावेळी चिनहट येथे ब्रिटीश अधिकारी हेनरी लॉरेन्सच्या नेतृत्वात आणि मेरठच्या अहमदउल्लाह शाहच्या उपस्थितीत भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध ऐतिहासिक युद्ध केले आणि ते जिंकले. हे युद्ध भारतीयांसाठी स्फूर्तिदायी ठरले. मात्र या लढ्यात शहीद झालेल्या शेकडो सैनिकांमध्ये उदा देवी यांचे पती मक्का पासीदेखील होते. आपल्या पतीच्या हौतात्म्याने त्यांचे मनोबलही वाढले आणि मनात ब्रिटिशांविरुद्ध आणखी द्वेष निर्माण झाला. पतीच्या प्रेतासमोरच त्यांनी याचा प्रतिशोध घेण्याची शपथ घेतली आणि त्यांना याची संधी मिळाली सिकंदर बाग येथे लढल्या गेलेल्या युद्धात !

चिनहटचा पराभव ब्रिटिशांच्या जिव्हारी लागला होता आणि या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी ते करत होते. जवळपास २ हजारांपेक्षा अधिक भारतीय सैनिक अवधमधील सिकंदर बाग येथे असल्याची माहिती इंग्रजांना मिळाली. १६ नोव्हेंबर १८५७ रोजी कॉलिन कॅम्पबेलच्या नेतृत्वात इंग्रजांनी एक रणनीती आखून सिकंदर बागला घेराबंदी घातली. अफाट शस्त्रशक्ती आणि सैन्यबळासह इंग्रजांनी युद्धाला सुरुवात केली. अचूक वेळ साधून ब्रिटिश सैन्याने भारतीय सैन्यावर अचानक हल्ला चढवला. ब्रिटिश सैनिक बेसावध असलेल्या भारतीय सैनिकांना अत्यंत क्रूरतेने मारत सुटले. हजारो सैनिक मारले गेले. यावेळी उदा देवी यांनी लगेच पुरूष सैनिकांचे वस्त्र धारण केले आणि लढायला रणांगणात उतरल्या. यावेळी त्यांनी हातात दोन बंदुका आणि स्वतःकडे भरपूर दारू-गोळा घेतला होता. उदा देवी स्वत: विजेच्या वेगाने गर्द झाडी असलेल्या एका पिंपळाच्या झाडावर चढल्या. ब्रिटिशांचा प्रतिकार करण्यासाठी यावेळी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी त्यांनी ही शेवटची मोहीम हाती घेतली. विजय किंवा वीरगती हे एकमेव ध्येय समोर ठेऊन यावेळी उदा देवी लढत होत्या.

त्यांनी पिंपळाच्या झाडावरून ब्रिटिश सैनिकांनी हेरलं आणि गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. सिकंदर बागवर हल्ला केलेल्या सैनिकांना उदा देवी यांनी तोपर्यंत आत येऊ दिले नाही जोपर्यंत त्यांचा संपूर्ण दारुगोळा पूर्णपणे संपून जात नाही. गोळ्या नेमकं कोण झाडत आहे, हे ब्रिटिशांना अजूनही उमगलं नव्हतं. ते पुरते हैराण झाले होते. उदा देवी या रणरागिणीने आपल्या मनगटाच्या जोरावर कूपर आणि लॅम्सडन या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांसहित तब्बल ३२ ब्रिटिश सैनिकांना यमसदनी धाडलं. याचवेळी एका सैनिकाला कळलं की गोळ्या जमिनीवरून नाही तर झाडावरून येत आहेत आणि त्याला झाडावर लपलेला एक सैनिक दिसला. तेवढ्यातच उदा देवी यांचा संपूर्ण दारू-गोळा संपला. ब्रिटिशांनी झाडाच्या दिशेने वेड्यासारख्या गोळ्या झाडायला सुरुवात केली. फांद्यांमुळे त्या वाचू शकत होत्या पण जास्त काळ नाही.

अखेर कोणतीही संधी न उरल्याने त्यांनी झाडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. मरण जवळ असूनही उरी कसलीही भीती न बाळगता मरणाला अत्यंत प्रकर्षाने सामोरे जात त्या झाडावरच ब्रिटिश सैनिकांच्या समोर आल्या. सैनिकांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्येक गोळी थेट शरीराच्या कोणत्याही भागात घुसत होती. त्यांच्यावर शेकडो गोळ्या झाडल्या गेल्या. त्या शहीद झाल्या होत्या. क्रूरकर्मा ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून त्यांच्याशी दोन हात करणाऱ्या या विरांगनेने आपला शेवटचा श्वास घेतला होता. त्या झाडावरून खाली कोसळल्या. त्यांनी परिधान केलेलं पुरुषी जॅकेट गोळ्या लागल्यामुळे ढिलं पडलं होतं, त्या खाली पडल्यावर ते जॅकेट सुटलं आणि समोरचं दृश्य पाहून सगळेच ब्रिटिश अधिकारी आणि सैनिक अवाक् झाले. रक्ताने माखलेले ते स्तन पाहून त्यांना विश्वासच बसत नव्हता की आमच्या ३२ जणांना एकट्याने ठार करणारा कोणीही पुरुष नसून एक महिला होती. या एकट्या स्त्रीने आपल्यावर इतका जीवघेणा हल्ला केला, जर प्रत्येक स्त्री हिच्यासारखी असती, तर आपण येथे पाय ठेऊ शकलो असतो का? असा प्रश्न तिथे उपस्थित ब्रिटिशांच्या मनात निर्माण झाला. २२०० स्वातंत्र्य सैनिक सिकंदर बागच्या चार भिंतीच्या आत शहीद झाले. या लढाईत १०८ ब्रिटिश सैनिक मारले गेले. त्यापैकी ३२ जणांना एकट्या उदा देवी यांनी ठार केले होते.

Uda Devi Statue

काही ठिकाणी असा उल्लेख आहे की उदा देवी यांचे शौर्य पाहून ब्रिटिश अधिकारी कॅम्पबेलने आपली हॅट काढून त्यांना सलामी दिली आणि श्रद्धांजली वाहिली होती. त्यांच्या पराक्रमाबाबत भारतीयांनी फार कमी, मात्र इंग्रजांनी गौरवपूर्ण लिखाण करून ठेवलं आहे. त्यावेळी लंडनमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये उदा देवी यांच्या बलिदानाबद्दल लेख लिहिले गेले होते. कार्ल मार्क्स यांनीही या घटनेचा आपल्या लिखाणात उल्लेख केला होता. आज संपूर्ण भारतात शालेय अभ्यासक्रमात उदा देवी यांचा साधा उल्लेखदेखील नाही. लखनऊच्या बाहेर उदा देवी आजही अपरिचित आहेत. त्यामुळे १७० वर्षांपूर्वी इतिहास घडवलेल्या या महायोद्धाचा इतिहास आणि त्यांचे योगदान संपूर्ण संपूर्ण भारतभर पोहोचावे, यासाठी ही शब्द-फुलं त्यांच्या चरणी अर्पण !

संदर्भ सूची :-

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments