You are currently viewing क्रांतीपथावरील अग्निशलाका – बलिदानी यदुवंशी राणी वीरमती

क्रांतीपथावरील अग्निशलाका – बलिदानी यदुवंशी राणी वीरमती

भारताला हजारो वर्षांचा जाज्वल्य इतिहास लाभला आहे. आजवर अगणित वीर, विरांगना भारतमातेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी हसत हसत रणांगणावर मृत्युमुखी पडले. दुर्दैवाने बरेच हुतात्मे आणि त्यांचं शौर्य इतिहासाच्या अंधारात कायमचं लुप्त होऊन गेलं. आज आपण अशाच एका शूर वीरांगनेची माहिती घेणार आहोत जिच्याबद्दल आपल्या इतिहासाने गेल्या कित्येक शतकांपासून मौन बाळगले आहे. त्यांचं नाव आहे वीरांगना वीरमती !

चौदाव्या शतकात देवगिरीवर यादवांचे राज्य होते. भारत जिंकण्यासाठी निघालेला अलाउद्दीन खिलजी मेवाड, गुजरात इत्यादी राज्ये जिंकून संपूर्ण भारत जिंकण्याचे स्वप्न पाहत होता. खिलजीच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा होता क्षत्रिय यादव घराण्याचे देवगिरी साम्राज्य!

देवगिरीच्या शूर आणि निर्भय यादवांचा सामना करणे म्हणजे भयंकर सिंहाच्या तोंडात हात घालण्यासारखे होते हे खिलजीलाही माहीत होते. खिलजी यादवांवरही रागावला होता कारण जेव्हा त्याने गुजरातवर स्वारी केली होती तेव्हा त्याने तेथील एका छोट्या राज्यातील सूर्यवंशी राजा करणसिंग वाघेलाचा पराभव केला होता आणि त्याच्या सुंदर राणी आणि मुलीवर वाईट नजर टाकली होती. राजा करणसिंग वाघेला आपल्या राणी आणि मुलीसह देवगिरीचा राजा महाराजा रामदेव यादव यांच्या आश्रयाला सुरक्षितपणे गेले.

हा संदेश वाचून खिलजीला चीड आली आणि त्याने मुत्सद्देगिरीची मदत घेऊन महाराज रामदेव यांना तह मान्य करण्याचा निरोप दिला, पण खरे यदुवंशी क्षत्रिय अधर्मी शत्रूंशी तह करून गुलामगिरी करण्यापेक्षा युद्धात हसतमुखाने मरणे बरे समजतात. त्यांना महाराजा रामदेव यादव यांनी खिलजीला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि तिरस्करणीय अलाउद्दीन, क्रोधित होऊन आपल्या प्रचंड सैन्यासह देवगिरीवर चढला. पण खेदाची गोष्ट म्हणजे आपल्याच हिंदू घराण्यातील काही धूर्त आणि लोभी राजघराण्यांनी भितीपोटी खिलजीची गुलामगिरी स्वीकारली होती, ते सगळे भ्याड कोल्हे आणि ते असंस्कृत राक्षस अल्लाउद्दीन खिलजी सैन्यासह हिंदूंच्या यादव क्षत्रियांशी लढायला आले होते. पण देवगिरीच्या यादव सैनिकांच्या सामर्थ्यापुढे खिलजी आणि त्याचे नापाक जड सैन्य टिकू शकले नाही. खिलजीचे अनेक सैनिक मारले गेले. पराभूत होऊन तो मागे वळला आणि इकडे देवगिरीत विजयाचा जल्लोष सुरू झाला. हे सर्व वीरमती यांच्या डोळ्यांदेखतच घडत होते.

एके काळी महाराज रामदेव यादव यांच्या सैन्यातील एक शूर यदुवंशी सरदार युद्धात हुतात्मा झाला होता. महाराजांनी त्या सरदाराची एकुलती एक मुलगी वीरमती यांना आपली कन्या म्हणून दत्तक घेतले आणि त्यांना देवगिरीची राजकन्या घोषित करून मोठ्या प्रेमाने त्यांचे पालनपोषण केले आणि त्या चौदा-पंधरा वर्षांच्या झाल्यावर महाराजांनी आपला शूर सेनापती कृष्णराव याच्याशी वीरमती यांचा विवाह करण्याचे निश्चित केले. कृष्णराव शूर होता पण यासोबतच खूप लोभीसुद्धा होता. देवगिरीचे राज्य मिळवण्याच्या लोभ मनात उत्पन्न झाल्याने, कृष्णराव खिलजीला जाऊन मिळाला. देवगिरीच्या किल्ल्याबद्दल तसेच रामदेवरायाच्या सैनिकी शक्तिबद्दल कृष्णराव ने खिलजीला सर्व माहिती पुरवली. कृष्णरावच्या या कपटाबद्दल राणी वीरमती यांना कळून चुकले होते. परिणामतः खिलजी आणि त्याच्या इस्लामी सैन्याने पुन्हा देवगिरीवर हल्ला केला. देवगिरीमधील विजयाची धुंद अजूनही उतरली नव्हती, तोच पुन्हा यवनी हल्ला आला.

महाराज रामदेव यादव म्हणाले- “आमच्यासोबत कोणीतरी विश्वासघात केला आहे, म्हणूनच पराभूत शत्रू पुन्हा परतला. पण काळजी करण्यासारखे काही नाही, आपण शत्रूंचा पुन्हा एकदा नक्कीच पराभव करू. दादा द्वारकाधीश आणि महाबली बलराम यांचे रक्त आपल्या रक्तवाहिनीत आहे.”

तोच, “आम्ही शत्रूंचा पराभव करू” असे सर्व यदुवंशी सरदार तलवारी उपसून एकसुराने म्हणू लागले आणि समस्त देवगिरी किल्ला घोषणांनी दणाणून उठला. यावेळी मात्र कृष्णराव शांतच दिसत होते. सगळे सरदार त्याला शांत पाहून चकित झाले आणि त्याच्या गप्प राहण्याचे कारण विचारू लागले.

इतक्यातच ‘तो राजद्रोही आहे !’ असं म्हणत अहिराणी वीरमतीने सिंहिणीसारखी गर्जना करुन आपली तलवार कृष्णरावच्या छातीत खुपसली. राजांसह सर्व सरदार हे पाहून अचाट पडले. सर्वत्र एकच गोंधळ उडाला. कृष्णराव कसाकाय राजद्रोह करू शकतो ? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घोळत होता. कृष्णरावने वीरमती यांना काही गुप्त खलबतं सांगितली होती, त्यामुळे त्यांना कृष्णराववर आधीच संशय होता. यावेळी मृत्यूशय्येवर असताना कृष्णराव म्हणाले – ‘मी खरच देशद्रोही आहे, मी यदुकुलाची कीर्ती कलंकित केली आहे,… इतकं बोलून तो आपले शेवटचे श्वास घेऊ लागला.

इतक्यातच वीरमती म्हणाली…

मला माहित आहे की मी तुझ्याशी लग्न करणार आहे. मी तुला माझा पती म्हणून मनापासून स्वीकारले होते. पण एक क्षत्रिय यदुवंशी मुलगी एकदाच कुणालातरी आपला पती आणि देव मानते. मी दुसऱ्या पुरुषाचा विचारही करू शकत नाही. राजद्रोह करणाऱ्याला मारून मी माझ्या देशाप्रती आणि प्रजेप्रति असलेले माझे कर्तव्य पार पाडले आहे. आता मी माझ्या सतीधर्माचे पालन करीन. इतकं म्हणून वीरांगना वीरमती यांनी तीच तलवार स्वतःच्या पोटात खुपसली आणि कृष्णराव यांच्याजवळ त्या पडल्या. दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.

एक राजद्रोह करणाऱ्याने तर दुसरा आपल्या राज्याप्रती, प्रजेप्रती आणि देशाप्रती निष्ठा असणाऱ्या वीरांगनेने !

वीरमती यांचं शौर्य पाहून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. यानंतर छळकपटाने खिलजी आणि मलिक कफूर यांनी महाराजा रामदेव यादव यांचीही हत्या केली. जवळपास संपूर्ण यादव वंशाचा त्याने नाश करण्याचे निश्चित केले. अनेकांना इस्लाम कबुल करण्यास सांगितले पण शूर यादवांनी मरण पसंत केला. कित्येक यादव क्षत्राणींनी जोहर केला. यानंतर यदुवंशी देवगिरी सोडून महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये विस्थापित झाले. रामदेव यादव यांच्या कनिष्ठ पुत्राच्या वंशजांनी सिंदखेडा येथे आपली जागिर स्थापित केली. याच सिंदखेडाची पुढची पिढी म्हणजेच लखुजीराव जाधव ! लखुजीराव जाधव हे वीरमाता माँसाहेब जिजाऊ यांचे वडील आणि याच विरमातेच्या पोटी जन्मला क्षात्रभास्कर तेजस्वी पुत्र शिवाजी शहाजी भोसले !

विरमतीच्या बलिदानाची मुळं मराठ्यांच्या, शिवरायांच्या इतिहासात येऊन रुजलेली आहेत. आपल्या होणाऱ्या पतीने छलकपट केला, राष्ट्रद्रोह केला म्हणून त्याला यमसदनी धाडणाऱ्या वीरांगना विरमती या एकमेवाद्वितीय होत्या, असच म्हणावं लागेल.

राष्ट्रस्वातंत्र्य आणि मातृभूमी प्रती असणाऱ्या कर्तव्यपूर्तीसाठी परमोच्च बलिदान देणाऱ्या वीरमती यांना त्रिवार वंदन !

लेखनसीमा !

आपल्या मित्रांसोबत शेअर करण्यासाठी खालील आयकॉन्स् वर क्लिक करा.

लेख आवडल्यास आपला अभिप्राय कमेंट स्वरूपात कळवा.

Infinity_peace_007

ज्ञानाच्या अथांग महासागरातील जे ओंजळभर ज्ञात आहे, त्यातीलच काही थेंब रीते करण्यासाठी हे शब्दबिल्व !
Subscribe
Notify of
guest
2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vikrant Jadhav
Vikrant Jadhav
1 year ago

उत्तम लेख